नमस्कार मिपाकरांनो,
नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेखाच्या स्वरूपात काही माहिती देण्याचा प्रयत्न ह्याठिकाणी करतोय.
सर्वसामान्यपणे अनेकांना असे वाटत असते की कोणीतरी एखादा व्हिडीओ बनवून युट्युबवर अपलोड केला आणि त्याला बऱ्यापैकी प्रेक्षकवर्ग लाभल्याने त्या व्हिडीओच्या Views ची संख्या काही हजार ते काही लाख झाली म्हणुन त्या क्रिएटरला किंवा त्याच्या चॅनलला भरपूर पैसे मिळतात.
पण असं प्रत्यक्षात होतं का?
ह्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे.
कारण कुठल्याही क्रिएटरला/चॅनलला युट्युबवरच्या आपल्या व्हिडीओंच्या माध्यमातून जर कमाई (Monetization) करायची असेल तर आधी त्याला YouTube Partner Program (YPP) मध्ये सहभागी होणे आवश्यक असते.
ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया आहे.
YPP मध्ये सहभागी होण्यासाठी सहा किमान पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक असून त्यापैकी चार विशेष अवघड नाहीत पण खाली दिलेला चौथा आणि पाचवा निकष पूर्ण करणे थोडे आव्हानत्मक असते,
4. Have more than 4,000 valid public watch hours in the last 12 months.
12 महिन्यांच्या कालावधीत चॅनल वरचा व्हिडीओ/व्हिडीओज चार हजार तासांपेक्षा जास्ती वेळ प्रेक्षकांद्वारे बघितला/बघितले गेले असले पाहिजेत.
5. Have more than 1,000 subscribers.
चॅनलचे एक हजारापेक्षा जास्त सदस्य (सबस्क्रायबर्स) असले पाहिजेत.
सातत्यपूर्ण दर्जेदार कंटेन्ट निर्माण करणाऱ्यांना विशेष अडचण येत नाही त्यामुळे असे क्रिएटर्स हे निकष साधारणपणे वर्षभरात पूर्ण करू शकतात, पण यथातथा व्हिडीओ बनवणाऱ्यांची मात्र तारांबळ उडते आणि ते ह्या पहिल्या पायरीवरच बाद होतात.
अशा बाद होण्याची शक्यता असलेल्या काही जणांनी मध्यंतरी नवोदित युट्युबर्सचे Whatsapp ग्रुप्स काढून 'तू माझे चॅनल सबस्क्राईब कर, मी तुझे चॅनल सबस्क्राईब करतो' तसेच 'तू माझ्या चॅनल वरचे व्हिडीओ बघ, मी तुझ्या चॅनल वरचे व्हिडीओ बघतो' अशी शक्कलही लढवली होती 😀
सर्व सहा निकष पूर्ण केल्यावर मग युट्युब कडून अर्जाची छाननी, चॅनल रिव्हयू वगैरे प्रक्रिया पार पडल्यावर एकदाचा तो क्रिएटर/चॅनल YPP मध्ये सहभागी होतो!
(इच्छुकांना सर्व निकष व त्यापुढची प्रक्रिया ह्याची माहिती YouTube Partner Program overview & eligibility इथे वाचता येईल.)
एवढे सगळे खटाटोप पार पाडल्यावर क्रिएटरला YPP मध्ये दाखला तर मिळाला, आता त्याला पैसे किती मिळतात त्याकडे वळूयात.
सर्वसामान्यपणे असे सांगितले जाते की 1000 Views साठी $0.5 इतकी रक्कम मिळते, पण हे अंतिम सत्य नाही!
ह्याविषयावर अनेक लोकांचे (युट्युबर्स/ब्लॉगर्स) अनेक दावे बघायला/वाचायला मिळतील आणि त्यातही तफावतही दिसून येईल त्याचे कारण म्हणजे युट्युब मॉनेटायझेशनसाठी पात्र अशा 1000 Views साठी पैसे देते, पण ती रक्कम किती असेल हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही!
"There are no guarantees under the YouTube partner agreement about how much or whether you'll be paid. Earnings are generated based on a share of advertising revenue from viewers watching your video."
YouTube partner earnings overview
व्हिडीओच्या प्रतिहजार Views पासून चॅनलला किती कमाई होईल हे समजण्यासाठी YouTube Analytics मधल्या दोन संज्ञा आणि त्यातला फरक समजून घेणे आवश्यक आहे.
1. RPM
Revenue Per Mille (RPM) is a metric that represents how much money you’ve earned per 1,000 video views. RPM is based on several revenue sources including: Ads, Channel memberships, YouTube Premium revenue, Super Chat, and Super Stickers.
RPM is your total revenue (after YouTube's revenue share) per 1000 views.
2. CPM
Cost per 1,000 impressions (CPM) is a metric that represents how much money advertisers are spending to show ads on YouTube.
CPM is the cost per 1000 ad impressions before YouTube revenue share.
(इच्छुकांना RPM आणि CPM बद्दलची तपशीलवार माहिती Understand ad revenue analytics इथे वाचता येईल.)
RPM मध्ये जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न + कमाईच्या अन्य मार्गांतुन मिळालेल्या उत्पन्नाच्या तपशीलांचाही समावेश असतो तर CPM मध्ये मुख्य भर हा जाहिरातींतुन मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तपशीलावर असतो,
आणि ह्या जाहिरातींचे व्यवस्थापन AdSense मार्फत होते.
त्यामुळे प्रत्येक युट्युबर/चॅनलच्या YouTube Analytics मध्ये त्याला 1000 Views साठी मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे हे वेगवेगळे असतात. आणि हे आकडे कमी-अधिक होण्यास काही अन्य घटकही कारणीभूत ठरतात, कसे ते आपण खालच्या उदाहरणातून बघुयात.
समजा पैजारबुवा, चांदणे संदीप, तुषार काळभोर, भक्ती, चौथा कोनाडा, जेम्स वांड आणि मी अशा सात मिपाकरांचे अध्यात्मिक, वाद्यवादन, शरीरसौष्ठव, संगीत, नृत्यकला, पाककृती असे सहा विषयाधीष्ठित आणि एक कुठल्याही विषयाला समर्पित नसलेले असे खालील प्रमाणे सात मॉनेटायझेशन साठी पात्र युट्युब चॅनल आहेत.
1. पैजारबुवांच्या अध्यात्मिक चॅनलवर ते त्यांच्या कीर्तन, प्रवचनाचे व्हिडीओज प्रकाशित करतात.
2. चांदणे संदीप ह्यांच्या चॅनलवर ते तबला आणि मृदूंग वादनाचे धडे देणारे व्हिडीओज प्रकाशित करतात.
3. तुषार काळभोर आपल्या चॅनलवर Gym, बॉडी बिल्डिंग, झुंबा डान्स असे व्यायाम/फिटनेस विषयक मार्गदर्शनपर व्हिडीओज प्रकाशित करतात.
4. भक्ती आपल्या चॅनल वरच्या व्हिडीओज मधून शास्त्रीय संगीताचे/गायनाचे धडे देतात.
5. चौथा कोनाडा ह्यांचे नृत्यकलेला वाहिलेले चॅनल आहे आणि त्यावर ते आपल्या व्हिडीओज मधून भरतनाट्यम, कथकली अशा शास्त्रीय नृत्यकलेचे धडे देतात.
6. जेम्स वांड आपल्या चॅनलवर भारतीय, मंगोलीयन, तुर्की, अफगाणि अशा विविध देशी-विदेशी खाद्यपदार्थांच्या पाककृती व्हिडीओतून सादर करतात.
7. माझे चॅनल विषयाधीष्ठित नाही, 'गळका नळ कसा दुरुस्त करावा' पासून 'घराला आणि गोठ्याला कुठले पत्रे लावावेत' पर्यंत कुठल्याही विषयावर सल्ले देणारे व्हिडीओज त्यावर प्रकाशित होतात.
जुन 2022 मध्ये आमच्या प्रत्येकाच्या चॅनलवरच्या व्हिडीओजना 1000 Views मिळाले, सर्व व्हिडीओजची लांबीही समान आहे, आणि प्रत्येक व्हिडीओला मिळालेल्या जाहिराती आणि त्यांची संख्याही समान आहे असे आपण उदाहरणासाठी गृहीत धरू.
पण Views ची संख्या समान असली तरी युट्युब कडून आम्हाला झालेली कमाई मात्र खाली दिल्याप्रमाणे प्रत्येकाची वेगवेगळी आहे.
पैजारबुवा - ₹ 500
चांदणे संदीप - ₹ 450
तुषार काळभोर - ₹ 400
भक्ती - ₹ 350
चौथा कोनाडा - ₹ 300
जेम्स वांड - ₹ 200
टर्मीनेटर - ₹ 50
आता प्रश्न असा पडेल की सगळ्या गोष्टी समान असूनही उत्पन्नात फरक कशामुळे पडला?
ह्याचे उत्तर आपल्याला प्रत्येकाचे YouTube Analytics बघितले की मिळेल.
'पैजारबुवा' म्हणजे काय ऋषीतुल्य माणूस, आणि त्यांच्या व्हिडीओजना लाभलेला प्रेक्षकवर्ग सुद्दा एकदम सात्विक प्रवृत्तीचा!
त्यामुळे त्यांच्या सर्व प्रेक्षकांनी नुसता व्हिडीओच नाही तर त्यात दाखवण्यात आलेल्या जाहिरातीही स्किप वगैरे न करता तेवढ्याच भक्तीभावाने बघितल्या.
अशा आदर्श परिस्थितीमध्ये त्यांच्या YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views पण 1000 होते आणि CPM मध्ये दर्शवलेले Views from the videos that monetized पण 1000 होते.
थोडक्यात त्यांचे सर्वच्या सर्व views मॉनेटायझेशन साठी पात्र ठरले आणि बुवांना युट्युबचा कट वजा होऊन 500 रुपये मिळाले.
'कविराज' चांदणे संदीप ह्यांच्या बाबतीत परिस्थिती थोडी बदलली. त्यांच्या YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views 1000 होते आणि CPM मध्ये दर्शवलेले Views from the videos that monetized मात्र 900 होते.
त्यामुळे त्यांचे 100 views मॉनेटायझेशन साठी अपात्र ठरल्याने पात्र ठरलेल्या 900 views साठी त्यांना 450 रुपये मिळाले.
आता इथे प्रश्न हा येतो की 'कविराजांच्या व्हिडीओचे 100 views कशामुळे अपात्र ठरले?
तर त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही शक्यता अशा की त्या 100 पैकी काही प्रेक्षकांनी जाहिराती स्किप केल्या असतील, काहींनी AdBlocker किंवा तत्सम plugins / addons इन्स्टॉल असलेल्या ब्राऊझर वरून त्यांचा व्हिडीओ पाहिला असेल, काही प्रेक्षकांनी YouTube Vanced वगैरे वर त्यांचा व्हिडीओ पहिला असेल तर काहींजणांनी त्यांचा व्हिडीओ डाउनलोड करून पहिला असेल.
वरील चार शक्यतांपैकी काहीही झाले असेल किंवा अन्य काही क्लुप्त्या वापरून काही प्रेक्षकांनी व्हिडीओमध्ये दाखवलेल्या 'जाहिराती पाहिल्या नाहीत' हे कारण ते 100 views मॉनेटायझेशन साठी अपात्र ठरण्यास पुरेसे आहे.
पुढे 'पैलवान' तुषार काळभोर ह्यांच्यापासून भक्ती, चौथा कोनाडा, जेम्स वांड ते माझ्यापर्यंत सगळ्यांचे YouTube Analytics वर RPM मध्ये दर्शवलेले Total number of views 1000 दिसत असले तरी CPM मध्ये प्रत्येकाच्या कमी कमी होत गेलेल्या मॉनेटायझेशन साठी पात्र views च्या संख्येमुळे आमची कमाई सुद्धा कमी कमी होत गेली.
एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही! हा एक प्रचंड गुंतागुंतीचा आणि काहीसा अपारदर्शक व्यवहार आहे.
वरील उदाहरणात सोयीसाठी सर्व गोष्टी समान गृहीत धरल्या होत्या पण प्रत्यक्षात त्या आणखीन क्लिष्ट आहेत.
YouTube Analytics वरचा RPM हा क्रिएटर/चॅनलचा पक्ष असतो तर CPM हा जाहिरातदारांचा पक्ष असतो. दोन्ही पक्षांचे काही अधिकार आणि निवड स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ: आपल्या व्हिडीओमध्ये जाहिरात दाखवायची की नाही, दाखवायची असल्यास ती फक्त सुरुवातीला दाखवायची की उत्पन्न वाढवण्यासाठी मध्ये मध्ये पण जाहिराती दाखवायच्या, कोणत्या प्रकारच्या जाहिराती दाखवायची परवानगी द्यायची आणि कोणत्या प्रकारच्या जाहिराती नाकारायच्या कि सर्वच प्रकारच्या जाहिराती दाखवायच्या वगैरे ठरवण्याचे स्वातंत्र्य क्रिएटर/चॅनलला असते आणि त्या प्रमाणे ते सेटिंग करू शकतात. अर्थात जाहिरात प्रकारांची निवड फारच मर्यादित ठेवल्यास काहीवेळा त्या प्रकारांत मोडणारी जाहिरातच उपलब्ध नसेल तर विना जाहिरातीचे व्हिडीओ बघितले जाऊन नुसते views वाढणार पण त्यापासून काही उत्पन्न न मिळण्याचा धोका असल्याने ही निवड फार काळजीपूर्वक करावी लागते.
दुसऱ्या बाजूला जाहिरातदार देखील आपली जाहिरात कुठल्या देशात/प्रदेशात, कुठल्या वयोगटाला, कुठल्या उत्पन्नगटाला, स्त्रियांना की पुरुषांना, विद्यार्थी की विवाहितांना अशा असंख्य पर्यायांतून आपल्या टार्गेट ऑडियन्सची निवड करू शकतात तसेच कुठल्या विषयावरचे कंटेन्ट दाखवणारे व्हिडीओज, चॅनलची/क्रिएटर ची लोकप्रियता, व्हिडीओंचा दर्जा वगैरे गोष्टींचा विचार करून त्यावर आपली जाहिरात दाखवायची की नाही हे ठरवू शकतात.
Google Ads ह्या पर्सनलाईज्ड असल्याने जाहिरातदारांना आपला टार्गेट ऑडियन्स निवडणे खूप सोपे जाते.
इच्छुकांना ह्याबद्दल अधिक माहिती About targeting for Video campaignsइथे वाचता येईल.
दर्जेदार कंटेन्ट निर्माण करणाऱ्या क्रिएटर्स/चॅनल्सना चांगल्या म्हणजे प्रती 1000 views साठी जास्त दाम मोजणाऱ्या जाहिराती मिळतात तसेच नॉन-स्किपेबल Ads मिळाल्यासही त्यांची कमाई वाढते. आणि परदेशातून (विशेषतःअमेरिकेतून) त्या व्हिडीओजना प्रेक्षक लाभत असतील तर त्या views साठी जादा कमाई होते कारण भारतापेक्षा अमेरिकेतला प्रती हजार views साठीचा जाहिरातींचा दर जास्त आहे.
असो, सारांश काय तर युट्युबर्सना पैसे मिळतात पण ते सहजासहजी मिळत नसून त्यासाठी त्यांना बरेच कष्ट उपसावे लागतात, जिद्द आणि संयम बाळगावा लागतो!
फार जास्त तांत्रिक तपशीलात न जाता विषय समजावण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे फक्त महत्वाच्या मुद्द्यांवरच प्रकाश टाकलाय. प्रतिसाद लिहायला घेतला होता त्याचा लेख झाला. सगळ्याच मुद्द्यांना हात घातला तर लेख मालिका होइल, आणखीन एका अपूर्ण मालिकेचे पाप डोक्यावर घ्यायची आता इच्छा नाही (लै टोमणे ऐकावे लागतात) त्यामुळे आता इथेच थांबतो 😀
काही राहिलं असल्यास प्रतिसादातून चर्चा करूच!
प्रतिक्रिया
27 Jul 2022 - 5:21 am | यश राज
धन्यवाद तुम्हाला, बरीच महत्त्वपूर्ण माहिती कळली.
27 Jul 2022 - 7:14 am | प्रचेतस
एकदम तपशीलवार माहिती, धन्यवाद ह्या धाग्याबद्दल.
27 Jul 2022 - 1:17 pm | टर्मीनेटर
यश राज आणि प्रचेतस...
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
27 Jul 2022 - 8:16 am | जेम्स वांड
इतकी झटपट प्रोजेक्ट डिलिव्हरी आवडलीच. बिसाईड्स यूट्यूब अंतरंगात डोकावून पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार, आम्हाला रुपये २०० (अक्षरी २०० फक्त) मिळाल्याबद्दल आनंद झाला आहे संजुभाऊ
27 Jul 2022 - 1:31 pm | टर्मीनेटर
फिर पार्टी तो बनती हैं... मला पण 50 रुपये मिळालेत 😀
लेट्स सेलिब्रेट... क्वार्टर तुमच्या कडून चखणा माझ्याकडून 🍷
27 Jul 2022 - 4:46 pm | तुषार काळभोर
तंदूरी माझ्याकडून!!
27 Jul 2022 - 5:09 pm | टर्मीनेटर
और जीने को क्या चाहिये....
सात पैकी अजून ३ जण बाकी आहेत, आणि तिघेही पुणे जिल्ह्यातले आहेत! एकदा का त्यांच्याकडून अभय मिळाले की मग होऊन जाऊदे जंगी पार्टी 😀
28 Jul 2022 - 11:08 am | ज्ञानोबाचे पैजार
माझ्या कडून ७ जणांना प्रत्येकी एक काकडी खिचडी, मसाला दुध, प्रत्येकी एक केळे, खजुर (प्रत्येकी ४) आणि भेट म्हणून आमच्या किर्तनाच्या कॅसेट देण्यात येईल.
सात पेक्षा जास्त लोक आल्यास ज्याने पाहुणा आणला त्याने आपल्या वाटणीचे पदार्थ पाहुण्या बरोबर शेअर करावे.
रच्याकने:- इतके सगळे वाचल्यावर कार्यालयिन निवृत्ती नंतर योउतुबे चॅनेल काढायचा विचार रद्द करण्यात आला आहे.
पैजारबुवा,
1 Aug 2022 - 2:17 pm | टर्मीनेटर
आधीच श्रावणमास त्यात पैजारबुवांचा सहवास म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायचा की!
तुम्ही देऊ करत असलेला सात्विक फराळरुपी प्रसाद आम्ही सर्वजण आनंदानी ग्रहण करू, आणि त्यासाठीच्या अटी-शर्तीही आम्हास बिनशर्त मान्य आहेत 🙏
असे मात्र करू नका! निवृत्ती नंतर तुम्हाला लाभणारा फावला वेळ ह्या उद्योगात नक्कीच सत्कारणी लावता येईल. आणि फायनान्स क्षेत्रातल्या तुमच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर सर्व शक्यतांचा विचार करून नवनवीन कल्पना राबवत, RPM-CPM ची अचूक गणिते मांडत, व्यावसायीक दृष्टिकोनातून चॅनल चालवून त्यात तुम्ही यशस्वीही व्हाल ह्यात मलातरी तिळमात्र शंका नाही.
27 Jul 2022 - 8:29 am | आग्या१९९०
You tube premiums घेतल्यावर जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहता येतो, अशा वेळेस क्रियेटरला पैसे मिळतात का? मिळत असेल तर कोणते घटक विचारात घेतले जातात?
27 Jul 2022 - 12:32 pm | शाम भागवत
मलाही हाच प्रश्न विचारायचा होता.
मी भाऊ तोरसेकरांच्या धाग्यावरच विचारणार होतो. पण तुम्ही वेगळा धागा काढणार आहात म्हटल्यावर त्यावेळेस समजेल किंवा तिथे विचारणे योग्य होईल असे वाटल्याने थांबलो होतो.
27 Jul 2022 - 2:21 pm | टर्मीनेटर
माझ्यापरीने उत्तर दिले आहे त्यात काही शंका आढळल्यास जरूर कळवावे 🙏
27 Jul 2022 - 3:09 pm | शाम भागवत
हो.
मला उत्तर मिळालेय.
तसेच ज्याला पैसे मिळावेत असे आपल्याला वाटते, त्या चॅनेलच्या जाहिराती स्कीप करायच्या नाहीत हेही कळले. ;)
27 Jul 2022 - 2:18 pm | टर्मीनेटर
@ आग्या१९९०
ह्या बाबत अजून तरी युट्युबची भूमिका स्पष्ट नाही पण त्यामुळे होणारे क्रिएटर्स/चॅनल्सचे नुकसान भरून काढण्यासाठी "YouTube Premium" चे सबस्क्रिप्शन विकून त्यातला हिस्सा क्रिएटर्स/चॅनल्सना मिळवण्याची संधी ते देत आहेत.
लेखात उल्लेख केलेल्या RPM बद्दलच्या माहितीत,
"Includes total revenue reported in YouTube Analytics including ads, YouTube Premium, Channel Memberships, Super Chat, and Super Stickers"
असा उल्लेख आला आहे. पण लेखाचा फोकस फक्त जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर ठेवल्याने त्यावर भाष्य केले नव्हते.
युट्युबवर आपण बरेच व्हिडीओज बघतो त्यातले काही डाउनलोडही करतो. एखादा व्हिडीओ डाउनलोड करताना आपल्याला एक पॉपअप मेसेज दिसतो त्यात एकतर हा व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी "YouTube Premium" चे सबस्क्रिप्शन घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले जाते किंवा सदर व्हिडीओ अमुक तमुक "लो रिसॉल्युशन वर डाउनलोड करता येऊ शकेल पण "हाय रिसॉल्युशन" वर डाउनलोड करण्यासाठी "YouTube Premium" चे सबस्क्रिप्शन घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले जाते.
इथे समजून जायचे की सदर क्रिएटरने / चॅनलने "YouTube Premium" चे सबस्क्रिप्शन विकून दोन पैसे अधिक कमवण्याचा पर्याय निवडला आहे.
जर आपण अशा गोष्टी वारंवार दिसायला लागल्या तर एकतर आपले संपलेले सबस्क्रिप्शन रीन्यू तरी करतो किंवा नवीन लोकं त्यासाठी सबस्क्राईब करतात. अशाप्रकारे विकल्या गेलेल्या सबस्क्रिप्शन्स वर युट्युब सदर क्रिएटर/चॅनलला कमिशन म्हणा किंवा त्याचा हिस्सा देते.
असे मी लेखात म्हंटले आहे ते त्यासाठीच!
27 Jul 2022 - 8:47 am | कुमार१
तपशीलवार सुंदर माहिती.
आता माझा अनुभव लिहितो.
मध्यंतरी एकाने माझ्या डोक्यात युट्युब चॅनेल हा किडा सोडून दिला. मला मनापासून इच्छा नव्हती पण म्हटलं, ठीक आहे. अनेक दशके आपण फक्त लेखन करतो आहोत तर या निमित्ताने नवे तंत्रज्ञान शिकून घेऊ.
म्हणून मी स्वतःचा युट्युब चॅनेल कसा निर्माण करायचा ते शिकून घेतले. नंतर मी सहज म्हणून एक पाच मिनिटांचे छोटेसे सादरीकरण मोबाईलवर रेकॉर्ड केले. करत असताना मला अनेक गोष्टी लक्षात आल्या :
१. मुळात लेखक असलेल्या मला दृश्य माध्यमात उतरताना मनोभूमिकेमध्ये फार मोठा बदल करावा लागणार आहे.
२. ते सादरीकरण करताना मला ते सर्व पाठ असायला हवे, तसेच ते आकर्षक पद्धतीने सादर करता आले पाहिजे.
३. मी जेव्हा लेखक असतो तेव्हा माझा वाचक मला, मी लिहिलेल्या शब्दांवरूनच ओळखत असतो. मी लेखन करताना माझी वेशभूषा किंवा केशभूषा कुठली होती किंवा मी कसा दिसतो, याच्याशी त्याला काहीही देणेघेणे नसते !!
हा लेखनकलेचा फार मोठा फायदा आहे.
४. तेच दृश्य माध्यमात उतरायचे ठरल्यास अनेकरंगी कपडे हवेत, प्रत्येक वेळेला वेगळ्या रंगाचा/नक्षीचा शर्ट घाला वगैरे वगैरे…… मला व्यक्तिशः हे जरी आवडत नसले तरी त्या माध्यमाची ती नकळत गरज असते.
५. निव्वळ रेकॉर्ड करून ते तसेच प्रक्षेपित करून चालणार नाही. मग त्याला कलाकाराची मदत लागेल वगैरे वगैरे…
६. मुख्य म्हणजे, जर का यात उतरायचे असेल तर स्वतः मधून स्वतःचा पिंड वजा करावा लागेल आणि बाजारात खपणारे विषय आत्मसात करावे लागतील.
लेखकाची वस्त्रे उतरवून दिग्दर्शकाचा कोट चढवणे हे वाटते तितके सोपे नाही.
७. मुद्दा एवढाच होता, की आताचे जे जालीय लेखन चालले आहे त्यातून अर्थप्राप्ती शून्य. मग हा दृश्य माध्यमाचा पैसे देणारा प्रकार करून बघायला काय हरकत आहे ?
परंतु……
आता विचारांती आणि प्रस्तुत लेख वाचल्यानंतर डोक्यात लख्ख प्रकाश पडलेला आहे
आणि….
माझ्यापुरता तरी मी, " गड्या आपुले लेखन बरे, निर्वेधपणे करावे आणि त्याचा निखळ आनंद घ्यावा", या निष्कर्षाप्रत आलेलो आहे.
27 Jul 2022 - 9:25 pm | टर्मीनेटर
अशा गोष्टी आपल्या आनंदासाठी करायच्या, त्यातून उत्पन्न मिळेल नं मिळेल हा भाग आलाहिदा!
👍
28 Jul 2022 - 11:53 pm | श्रीगणेशा
कुमार सर,
तुम्ही अगदी मोजक्या शब्दात मांडलेला अनुभव आवडला!
29 Jul 2022 - 7:51 am | कुमार१
टर्मिनेटर, श्रीगणेशा व आग्या
आपल्या अभिप्रायांबद्दल आभारी आहे !
27 Jul 2022 - 8:59 am | श्रीरंग_जोशी
माहितीपूर्ण व माहितीचे उत्तम पृथःकरण करणारे व सोदाहरण समजावणारे लेखन आवडले.
माझ्या भावमुळे मला युट्युबवरुन पैसे कमावले जाऊ शकतात हे काही वर्षांपूर्वी कळले होते. त्याच्या शैक्षणिक युट्युब चॅनेलचे ५२ हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स व ५ दशलक्षांहून अधिक व्ह्युज झाले आहेत. युट्युबवरुन कमाई होत असली तरी कष्टाच्या तुलनेत ती फारशी उत्साहवर्धक नसल्याने त्याने दोन वर्षांपासून ऑनलाइन शिकवण्यांचा व्यवसाय सुरू केलाय.
27 Jul 2022 - 9:54 pm | टर्मीनेटर
ही नेत्रदीपक कामगिरी आहे!
खरं आहे, कष्टाच्या तुलनेत कमाई कमी होती.
28 Jul 2022 - 12:26 am | हणमंतअण्णा शंकर...
योगायोग! मी कौस्तुभ सोबत नियुज नावाच्या कंपनीत वर्षभर काम केले आहे. खूप कष्टाळू आहे आहे कौस्तुभ!
28 Jul 2022 - 9:48 am | श्रीरंग_जोशी
हणमंतअण्णा - तुम्ही माझ्या भावाबरोबर वर्षभर काम केले आहे हे जाणून आनंद झाला. मिपाकर किंवा मिपावाचकांची प्रत्यक्ष जीवनात कुठेही अन केव्हाही गाठ पडू शकते याची पुन्हा एकदा अनुभूती मिळाली :-).
27 Jul 2022 - 9:26 am | आग्या१९९०
मुद्दा एवढाच होता, की आताचे जे जालीय लेखन चालले आहे त्यातून अर्थप्राप्ती शून्य. मग हा दृश्य माध्यमाचा पैसे देणारा प्रकार करून बघायला काय हरकत आहे ?
करुन बघाच. सादरीकरण ओळखीतल्या व्यक्तीकडून करून घ्या हवे तर. परंतु प्रयत्न करून बघा. मिपाकर म्हणून मी तरी नक्कीच शेअर करून तुमचे व्हिडिओ.
1 Aug 2022 - 2:19 pm | टर्मीनेटर
+१०००
27 Jul 2022 - 9:28 am | मदनबाण
उत्तम माहिती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “You cannot save everyone. Some people are going to destroy themselves no matter how much you try to help them.” :- Bryant McGill
27 Jul 2022 - 9:57 am | कंजूस
आणि हीच उत्तरे मिळाली यूट्यूबरसकडून.
27 Jul 2022 - 10:08 pm | टर्मीनेटर
धन्यवाद मदनबाण आणि कंकाका 🙏
27 Jul 2022 - 10:15 am | धर्मराजमुटके
आपण इतक्या तत्परतेने धागा प्रकाशित केल्याबद्द्ल अभिनंदन ! आमच्या भाषेत याला तवा गरम आहे तर पोळ्या भाजून घेतल्या असे म्हणतात :)
असो.
संपूर्ण लेख वाचनिय मात्र ह्या निष्कर्षाशी दुर्दैवाने सहमत होता येत नाही. मी काढलेल्या 'काय बोलावं सुचेना !' या धाग्यावर दिलेल्या युट्यूब चॅनेलचेच उदाहरण घ्या. या चित्रफितीतील स्त्री चे असंख्य व्हिडिओ आहेत. बहुसंख्य चित्रफितीमधे बाई झाडू मारणे, भांडी धुणे, कपड्यांच्या घड्या घालणे ह्याच क्रिया वारंवार करताना दिसतात.
शिवाय
१. बाई कोणताही महत्वाचे विषय हाताळत नाहित.
२. अंगप्रदर्शन करतात असे देखील नाही. (यात त्यांचा अपमान करण्याचा हेतू नाही)
३. चित्रफितींची शीर्षके आकर्षक असतात असे देखील नाही.
तरी देखील त्यांच्या प्रत्येक चित्रफितीस दोन ते तीन लाख लोकांनी भेट दिलेली असते. याचे गणित मला काही केल्या सुटत नाही. असो. ही चित्रफित किंवा चॅनेल केवळ उदाहरणादाखल आहे. अशा कित्येक चित्रफिती युट्यूबवर आहेत ज्याचे गणित काही केल्या उलगडत नाही.
मला व्यक्तीशः वाटते की AI Technology ने कितीही प्रगती केली तरी मानवी मन ओळखण्यास मर्यादा आहेतच. अर्थात तो लेखाचा विषय नाही.
हळूहळू १०-१५ मिनिटाच्या युट्यूब चित्रफितींवर मिळणारे उत्पन्न कमी होत जाईल. हल्ली युट्यूब रिल्स जास्त प्रचलित आहे. माणसांना १०-१५ मिनिटे लक्षपुर्वक काही बघायला वेळ नसतो. मात्र १ ते २ मिनिटाच्या चित्रफिती पाहण्यासाठी त्यांच्याकडे बराच वेळ असतो. तीच गत ट्विटर माध्यमाची.
लोकांना थोडक्यात गंमत हवी आहे हेच खरे !
27 Jul 2022 - 10:50 am | गवि
चपखल.
27 Jul 2022 - 8:59 pm | ढब्ब्या
तरी देखील त्यांच्या प्रत्येक चित्रफितीस दोन ते तीन लाख लोकांनी भेट दिलेली असते. याचे गणित मला काही केल्या सुटत नाही ==> ह्या मागे बॉट चा हात असण्याची शक्यता जास्त वाटते.
म्हणजे असा एक काँप्यूटर प्रोग्राम जो अनेक फेक युटुब आईडी बनवेल आणी वेगवेगळ्या हजारो (लाखो) आईडी नी हा विडीओ बघीतलाय असे भासवेल. अनेक अश्या कंपन्या अस्तित्वात आहेत जे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन असे बॉट तयार करतात.
अवांतर - ट्विटर आणी मस्क मधे हाच वाद चालू आहे. मस्क चे म्हणणे आहे की ट्विटर वर ५% पेक्षा कमी फेक्/बॉट युजर आहेत हे सिद्ध करा तरच मी ट्विटर खरेदि करेन आणी ते अजिबात शक्य नाही असे ट्विटर चे म्हणणे आहे. (कई ईतर पॉलिटीकल मुद्दे पण आहेत, पण तो विषय वेगळा)
28 Jul 2022 - 2:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
हा पण एक चांगला धंदा आहे. लाइक्स पाहिजेत? घ्या आमचा बॉट विकत आणि ईंटरनेट्ला कनेक्ट करुन वाढवत रहा लाईक्स. हे म्हणजे चॅनेलवाल्यांचे टी आर पी प्रकरण मागे गाजले होते तसेच आहे. बनावटपणे टी आर पी रेटींग वाढवुन देणार्या कंपन्याही आहेत. म्हणजे प्रथम टी आर पी वाढविणारी सेवा विकत घ्या, आणि त्यासाठी खर्च केलेले पैसे चॅनलवरती जाहिरातींचे रेट वाढवुन वसुल करा. भयंकर आहे हे सगळे.
28 Jul 2022 - 1:44 pm | टर्मीनेटर
धन्यवाद, आणि मला हा लेखन विषय मिळवून दिलात त्यासाठी तुमचे विशेष आभार 🙏
😀
त्याचं असं झालं,
माझ्या आधीच्या धाग्यावरच्या तुमच्या प्रतिसादात भाऊंच्या उत्पन्नाविषयीचा अंदाज वर्तवणाऱ्या त्या व्हिडीओच्या रूपाने मला 'चूल' मिळाली.
पुढे तुमचा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद वाचताना "असे किती पैसे मिळतात युट्युब व्हिडीओ बनविणाऱ्याला?" असा प्रश्न तुम्ही एका प्रतिसादात विचारलेला वाचल्यावर ती चूल 'पेटली'.
आणि त्या प्रश्नाला वांड भाऊंनी दिलेल्या उत्तरातून तो लिंक रुपी 'तवा' मिळाला!
आता एवढी सगळी तयारी आयती मिळाल्यावर माझ्यासारखा कणिक, तेल, पाणी, मीठ अशा कच्च्या मालाची उपलब्धता आणि पोळी बनवण्याचे तंत्र अवगत असलेला 'व्यापारी' माणूस गप्प कसा बसेल???
मग घेतली प्रतिसादरुपी पोळी करायला! पण कच्चा माल एवढा होता की लेखरुपी 'भंडारा' घालण्या एवढ्या पोळ्या भाजता आल्या 😀 😀 😀
असो, आता विनोद बाजूला ठेऊन तुमच्या मुख्य मुद्द्याकडे वळतो!
प्रामाणिक पणे सांगायचे तर तुमचा 'काय बोलावं सुचेना !' हा धागा मी वाचला होता आणि एकंदरीत तुम्ही त्या बाईंच्या व्हिडीओ आणि चॅनल बद्दल जे लिहिलं होतंत त्यावरून ते चॅनल आणि त्यावरचे व्हिडीओज नक्कीच कंडम असणार हे लक्षात आल्याने त्या लिंकला भेट देऊन 'उगाच का अशा कंडम व्हिडीओचा आणखीन एक view वाढवायचा' अशा विचाराने तिथे फिराकलोच नव्हतो!
लेखात शेवटी दिलेल्या लिंक्स ह्या न्यायालयीन कामकाजच्या व्हिडीओ /चॅनल विषयीच्या होत्या आणि त्या विषयात मला शून्य रस असल्याने ते पाहायचाही प्रश्न नव्हता.
काल तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे जमले नाही कारण त्यासाठी आधी त्या बाईंचे चॅनल आणि व्हिडीओ बघणे आवश्यक होते. आज मात्र ते 'अलौकिक' कार्य पार पाडले आहे 😀
आज, आत्ता तो व्हिडीओ आणि चॅनल बघितल्यावर लक्षात आले की तुम्ही मला अजून एक लेख लिहिण्यासाठी विषय दिला आहे 😀 पण मी तसे नं करता फुरसतमध्ये दुसऱ्या प्रतिसादतून त्या विषयावर उहापोह करतो.
(ह्याच प्रतिसादात केला असता पण लांबी फार वाढेल म्हणुन दुसरा स्वतंत्र प्रतिसाद लिहितो.)
29 Jul 2022 - 1:21 am | टर्मीनेटर
काल तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे जमले नाही कारण त्यासाठी आधी त्या बाईंचे चॅनल आणि व्हिडीओ बघणे आवश्यक होते. आज मात्र ते 'अलौकिक' कार्य पार पाडले आहे 😀
पुढे चालू...
त्या बाईंचे म्हणजे रुबी दीक्षित ह्यांचे "Ruby Dixit official" हे युट्युब चॅनल बघितल्यावर मला असे वाटले की ह्या रुबीताई अतिशय चलाख आहेत. (अर्थात हे चॅनल सुरु करणे आणि त्यावर अशा प्रकारचा कंटेन्ट दाखवणे ही त्यांची स्वतःची कल्पना आहे असे गृहीत धरून! अन्यथा ज्या कोणाच्या सल्ल्याने त्यांनी हे चॅनल सुरु केले असेल तो सल्लागार हुशार आहे.)
असे मी म्हणतोय कारण त्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग कोण आहे, त्याचा आर्थिक/सामाजिक स्तर काय आहे, त्याच्या आवडी-निवडी आणि अपेक्षा आणि स्वतःच्या मर्यादांची चांगली जाण आहे.
चॅनलचा About सेक्शन बघितल्यावर लक्षात येते की त्यांनी चॅनलचा प्रचार/प्रसार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तताही व्यवस्थित केली आहे. जसे की त्यांच्या Instagram, Facebook आणि Facebook Page च्या लिंक्स आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्यक्तिगत संपर्कासाठी दिलेला आपला इमेल आयडी. Promotional Enquiries किंवा इतर युट्युबर्स बरोबर Collaboration च्या दृष्टीने महत्वाचा ठरणारा email id न देण्याची घोडचूक कितीतरी (चांगला/दर्जेदार कंटेन्ट देणारे) युट्युबर्स ही करतात.
रुबीताई युट्युबवर 15 जून 2018 रोजी आल्या असल्या तरी त्यांनी आपले व्हिडीओज बहुतेक जानेवारी 2022 म्हणजे गेल्या 7 महिन्यांपासून अपलोड करायला सुरुवात केलेली असावी कारण Video सेक्शन मध्ये oldest video असा फिल्टर केल्यास सर्वात जुना व्हिडीओ 7 months ago असं दिसतंय. आणि ह्या उण्यापुऱ्या 7 महिन्यात त्यांनी (हा प्रतिसाद लिहीत असताना) तब्बल 390 व्हिडीओज अपलोड केलेले आहेत, म्हणजे त्यांनी जवळजवळ दर दिवशी सरासरी 2 व्हिडीओज तयार केलेत त्यामुळे ही सातत्यपूर्ण कामगिरी आहे असे म्हणता येईल आणि हे चॅनल यशस्वी होण्यासाठी आवश्यकही आहे.
त्यांच्या व्हिडीओज मधला कंटेन्ट काय लायकीचा आहे हा मुद्दा बाजूला ठेऊन आणि कुठलाही पुरवग्रह न बाळगता माझ्या परीने त्यांच्या चॅनलचे हे परीक्षण केले आहे त्यात काही त्रुटीही असू शकतील.
पण आजघडीला त्यांच्या चॅनलला लाभलेले ४५००० + सबस्क्राईबर्स आणि त्यांच्या व्हिडीओजना मिळालेले एकूण ८६,९९,९३१ Views पाहता रुबीताईंचा प्रवास एक 'यशस्वी युट्युबर' होण्याच्या दिशेने सुरु आहे. किंबहुना त्या 'यशस्वी युट्युबर' झाल्या आहेत असे माझे वैयक्तिक मत बनले आहे!
ह्याचे कारण रुबीताईंनी सोशल मिडियावर त्यांच्या व्हिडीओजचे /चॅनलचे प्रभाविपणे केलेले मार्केटिंग (आणि त्यात यशस्वी होण्यात त्यांचे 'स्त्री' असणे ही जमेची बाजू) हे असावे!
वरती त्यांच्या चॅनलच्या केलेल्या परीक्षणात मी लिहिलंय की,
"त्यांनी चॅनलचा प्रचार/प्रसार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तताही व्यवस्थित केली आहे. जसे की त्यांच्या Instagram, Facebook आणि Facebook Page च्या लिंक्स आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी व्यक्तिगत संपर्कासाठी दिलेला आपला इमेल आयडी."
Instagram, Facebook, Facebook Page, Facebook Messenge, Whatsapp ह्या गोष्टी सोशल मिडियावर एखाद्या उत्पादनाचे मार्केटिंग करण्यास खूप उपयोगी पडतात. ह्या केस मध्ये रुबीताईंचे उत्पादन हे त्यांचे व्हिडीओज आहेत आणि ते ज्या ऑडियन्सला नजरेसमोर ठेऊन बनवलेत त्या ऑडियन्सचा 'क्लास' (सामाजिक/आर्थिक स्तर) लक्षात घेता तेवढे पुरेसे आहेत, अन्यथा कंटेन्ट अनुसार Twitter, LinkedIn वगैरेही पूरक/आवश्यक ठरले असते.
रुबीताईंच्या व्हिडीओजचे विषय, सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या कॉमेंट्स बघता त्यांचा टार्गेट ऑडियन्स हा मुख्यत्वे हिंदीभाषिक राज्यांतला, गरीब नाही म्हणता येणार, फार तर कनिष्ठ मध्यमवर्गीय ते मध्यमवर्गीय परिवारातील ३० ते ५० वयोगटातले अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लेकुरवाळ्या गृहिणी / कष्टकरी पुरुष आणि ज्याच्या आशय-विषयातून कुठला बोध मिळावा वा ज्ञानप्राप्ती व्हावी असल्या फाजील अपेक्षाच नसणारा फक्त औटघटकेचं मनोरंजन झालं तरी पुरेसं वाटणारा प्रेक्षकवर्ग असावा असा माझा प्राथमिक अंदाज!
वर उल्लेख केलेल्या ऑडियन्समधल्या कष्टकरीवर्गातील (हिंदी भाषिक) पुरुष परप्रांतीय कामगार महाराष्ट्रातच कमी नाहीत. माझ्या एका मित्राच्या हॉटेलमध्ये असे आठ जण काम करतात. वर्षाकाठी एकदा ही मंडळी पंधरा दिवस ते एखाद महिन्यासाठी त्यांच्या मूळ गावी जातात वर्षातले बाकीचे दिवस हे लोक आपल्या कुटुंबापासून दूर असतात. कधी कधी रात्री हॉटेल बंद झाल्यावर आत आमचा 'बैठकीचा' कार्यक्रम रंगतो. त्यावेळी हा कामगारवर्ग कोपऱ्यातल्या एखाद्या टेबलवर घोळक्याने असल्या (तुमच्या-माझ्या सारख्यांच्या मते पांचट, कंडम, निरर्थक अशा) चित्रफितींचा सामूहिक आस्वाद घेत असताना बघितलंय. टाईप हाच असला तरी रुबीताईंचे व्हिडीओ परवडले म्हणायचे इतके ते दर्जाहीन असतात. हे बघून त्यांना काय आनंद/समाधान मिळत असेल हा मानसशास्त्रीय संशोधनाचा विषय असेल पण 'कुटुंबा' पासून दूर असलेल्या ह्या लोकांच्या 'कुठल्यातरी' भावना सुखावत असतील हे नक्की!
त्यांच्या महिला प्रेक्षकांना त्या आपल्यासारख्याच एक वाटत असणार त्यामुळे त्यांच्याशी ह्या महिला लवकर रिलेट होऊ शकतात. घरात बोलायला कोणी नाही / एकटेपणा खायला उठलाय अशा महिला प्रेक्षकांना रुबीताईंचे बोलणे ऐकताना एखाद्या मैत्रिणीशी गप्पा मारल्यासारखा अनुभव देत असतील. तर पुरुष प्रेक्षकांना त्यांची ह्या क्रिया करत असतानाची देहबोली / हालचाली 'अपीलिंग' वाटत असतील कदाचित!
वरती म्हंटल्या प्रमाणे त्यांच्या प्रेक्षकांच्या आशय-विषयातून कुठला बोध मिळावा वा ज्ञानप्राप्ती व्हावी असल्या फाजील अपेक्षाच नाहीत, त्यांचं औटघटकेचं मनोरंजन होणं एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं आहे.
त्यांच्या महिला प्रेक्षकांची तशी अपेक्षा नसावी. आणि अर्धवस्त्र स्त्रीदेहापेक्षा पेक्षा अंगभर कपड्यांतून थोडाफार दृष्टीस पडणारा स्त्रीदेह जास्त आकर्षक असतो असे म्हणतात! आणि त्याची काळजी रुबीताई 'व्यवस्थित' घेताना दिसतात 😀
बाकी पुरुष प्रेक्षकांनी कॉमेंट मधून व्यक्त केलेल्या अमुक रंगाची साडी आणि तमुक स्टाईलचा ब्लाउज घालून व्हिडीओ करा वगैरे सारख्या मागण्याही त्या पूर्ण करतात हे देखील कौतुकास्पद 😀
शिर्षक वाचायचंय कोणाला? महिला प्रेक्षकांसाठी त्यांच्या मैत्रिणीचा काहीतरी नवीन व्हिडीओ आलाय एवढेच पुरेसे.
आणि पुरुष प्रेक्षकांसाठी शीर्षकापेक्षा व्हिडीओचा थंबनेलच पुरेसा आहे की! कुठल्या थंबनेल मध्ये बेंबीच्या खाली नेसलेली साडी तर कुठे दोन्ही हात वर करून केस बांधतानाचा क्लोजअप तर कुठल्यात स्लीव्हलेस वगैरे वगैरे... त्यासाठीच मी सुरुवातीला म्हटलंय की ह्या रुबीताई चलाख आहेत. त्यांना त्यांचा प्रेक्षकवर्ग कोण आहे, त्याचा आर्थिक/सामाजिक स्तर काय आहे, त्याच्या आवडी-निवडी आणि अपेक्षा आणि स्वतःच्या मर्यादांची चांगली जाण आहे.
असो, प्रतिसाद फारच लांबलाय त्याबद्दल क्षमस्व!
27 Jul 2022 - 10:47 am | गवि
अत्यंत रोचक, उपयुक्त माहिती. धन्यवाद.
एकूण असे दिसते की हा क्लिष्ट प्रकार आहे. कदाचित हेतुपुरस्सर क्लिष्ट ठेवला गेलेलाही असू शकतो.
आणि कोणी उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून याकडे पाहू गेल्यास निराशा हाती येऊ शकते.
अजून एक विषय. नेमक्या कोणत्या घटकांमुळे युट्युब चानेल प्रचंड लोकप्रिय होतात ते समजत नाही. टॉप प्रसिद्ध भारतीय म्हणा किंवा आणखी कोणते ब्लॉग म्हणा, अनेकदा डेली रूटीन दाखवणारे व्हिडिओ किंवा नुसता व्हिडिओ गेम खेळत बसलेला व्हिडिओ असेही दिसतात. व्ह्यू मात्र मिलियन्स.
स्ले पॉइंट हा करमणूकप्रधान आहे. कॉमेडीत अमित टंडन (पण आता जवळपास बंद केलेन. फक्त शॉर्ट व्हिडिओ येतात)
सर्वांना एकत्र बसूनही बघता येईल आणि खरेच काही मनोरंजक असेल असे चानेल कमीच.
29 Jul 2022 - 4:04 pm | टर्मीनेटर
@ गवि,
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
+1
दोन - चार व्हिडीओज बनवून युट्युबवर टाकले की कमाई चालू... असा विचार करून चॅनल सुरु करणाऱ्या हौशा-नौशा-गवशांच्या पदरी नक्कीच निराशा येऊ शकते पण उत्पन्नाचा मुख्य स्रोत (Full-time Business) म्हणून गंभीरपणे ह्याकडे पाहणारे, व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून असलेले युट्युबर्स चांगले यशस्वी होतात. त्यांच्यासाठी असे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न हा दुय्यम विषय असतो.
लेखाचा फोकस मी जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्ना पुरता मर्यादित ठेवल्याने ह्या माध्यमातून कमाई करण्याच्या अन्य मार्गांविषयी लिहिणे टाळले होते पण ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने त्या कमाईच्या अन्य मार्गांची तोंडओळख करून देता येईल!
YouTube Partner Program (YPP) मध्ये सहभागी झाल्यावर जाहिरातींच्या माध्यमातून, YouTube Premium चे सबस्क्रिप्शन्स विकून, चॅनल मेम्बरशिप शुल्का द्वारे, Super Chat आणि Super Stickers च्या मार्गांनी कमाई करता येऊ शकते.
ह्यापैकी YouTube Premium चे सबस्क्रिप्शन्स विकणे आणि चॅनल मेम्बरशिप शुल्क हे थोडेतरी खात्रीशीर मार्ग वाटतात पण आपल्याकडे Super Chat आणि Super Stickers च्या माध्यमातून (व्हिडीओ गेम्स वर आधारित चॅनल्स वगळता) अन्य क्रिएटर्स/चॅनलसना काही कमाई होत असेल असे निदान मलातरी वाटत नाही.
तसेच YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घेतलेल्या प्रेक्षकांनी पाहिलेल्या ad-free व्हिडीओज साठी क्रिएटर/चॅनलला त्याद्वारे आपल्याला मिळालेल्या उत्पन्नातील थोडाफार वाटा युट्युब देते असे असा दावा ते (YouTube) करतात पण तो किती आहे/असेल ह्याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती मात्र ते देत नाहीत (तसे बघितलं तर ते बऱ्याच गोष्टींची स्पष्ट माहिती देत नाहीत 😀)
असो, YouTube Partner Program (YPP) व्यतिरिक्त युट्युब बाह्य मार्गानीही व्यावसायिक क्रिएटर/चॅनल्स भरघोस कमाई करू शकतात जसे की Merchandization, Sponsorship's, Promotion's.
ह्यात आर्थिक देवाण-घेवाण ही थेट क्रिएटर्स /चॅनल्स आणि E-Commerce कंपनी / जाहिरातदार पुरस्कर्ता / जाहिरातदार उत्पादक कंपनी ह्यांच्यात परस्पररीत्या होत असल्याने ह्या व्यवहारात युट्युबला कुठलेही स्थान नसते.
Merchandization, Sponsorship's, Promotion's. हे प्रकारही खूप रोचक आहेत. इथे त्यांची फक्त तोंडओळख करून दिली आहे सोदाहरण माहिती द्यायची झाली तर अजून एक स्वतंत्र प्रतिसाद खरडावा लागेल 😀
ह्याबद्दलची काही माहिती वर ह्या प्रतिसादात दिली आहे.
सोशल मीडिया मार्केटिंगचा ह्यात फार मोठा वाटा असतो. मग हे मार्केटिंग स्वतः क्रिएटर/चॅनलने केलेले असो की त्यांनी दुसऱ्या व्यावसायिक कंपनीला 'Hire' करून त्यांच्याकडून करवून घेतलेले असो.
तसेच प्रत्यक्ष जीवनात 'माऊथ पब्लिसिटी' जशी उपयुक्त ठरते तशीच प्रेक्षकांनी स्वतःहून (विना मोबदला) फॉरवर्ड /शेअर / ब्लॉग / vlog द्वारे सोशल मिडियावर केलेली प्रसिद्धीही Views वाढवायला बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत असते, मग ती 'गुड पब्लिसिटी' असो की 'बॅड पब्लिसिटी' असो.
सकारात्मकरित्या केलेली प्रसिद्धीचा 100 पैकी 20 ते 25 % लोकांवर प्रभाव पडत असेल असा अंदाज लावू पण नकारात्मक प्रसिद्धीही उत्सुकतेपोटी 5-10% लोकांनातरी प्रभावित करत असेल असे मानण्यास जागा आहे.
ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुटके साहेबांचा लेख! तो लेख लिहिण्यामागे 'त्या' बाईंच्या व्हिडीओचे Views वाढवणे हा त्यांचा उद्देश नक्कीच नाही! त्यांनी फक्त त्यांना पडलेले प्रश्न त्या लेखात विचारले होते! पण 'त्या बाई', त्यांच्या व्हिडीओज बद्दलची (नकारात्मक असली तरी) वर्णनात्मक माहिती ह्या गोष्टी काही वाचकांची उत्सुकता नक्कीच जागृत करू शकतात. आज त्या लेखाची 1700+ वाचने झाली आहेत त्यापैकी आपण 10% पण नको फक्त 5% वाचकांनी उत्सुकतेपोटी हा काय प्रकार आहे हे बघण्यासाठी त्या लिंक वर क्लिक करून तो व्हिडीओ पहिला असेल तरी त्या व्हिडीओचे 85 Views वाढवण्यात धागाकर्त्यांचा तसा काही उद्देश नसतानाही हातभार लागला असेल ना?
चला बाकीच्यांचे जाऊद्यात पण ज्यांनी त्यावर प्रतिसाद दिलेत त्यांनी तरी तो व्हिडीओ पहिला असेल ना? त्यात मी पण एक आहे हे तर नक्की! कारण त्या धाग्यावर नाही पण ह्याच धाग्यावर त्यांच्या प्रश्नांना माझ्यापारीने उत्तर देण्यासाठी मला त्या चॅनल वरचे 5-6 व्हिडीओज बघावे लागले, त्यावरच्या काही कॉमेंट्स वाचव्या लागल्या, म्हणजे त्या चॅनलचे 5-6 Views वाढण्यासाठी तर मीच कारणीभूत ठरलो की 😀
अर्थात हे फक्त 'बॅड पब्लिसिटी' चे इथलेच एक ताजे उदाहरण म्हणुन दिले आहे त्यात वैयक्तिक असे काहीच नाही.
थोडक्यात काय तर Views वाढवण्यास सोशल मीडिया वरचे अनेक घटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या, जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे हातभार लावत असतात. पण नुसते Views वाढून काही फायदा नाही, त्यातले किती Views मॉनेटायझेशन साठी पात्र ठरतात हे महत्वाचे!
हे बघितले नाहीयेत.
+1000
सर्वांनी एकत्र बसून बघता येईल असे गंगाधर टिपरेंसारखे काही कार्यक्रम यावे असे मलाही वाटते. पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या इंटरेस्ट नुसार, हवे ते, हवे तेव्हा बघता यावे हा उद्देश असलेल्या युट्युब कडून ती अपेक्षा बाळगणे म्हणजे.... जाऊदेत 😀
27 Jul 2022 - 10:56 am | सौंदाळा
या विषयावर खूपच उत्सुकता होती. बर्याच प्रश्नांची उत्तरे लेखातून मिळाली.
खेडेगावातील खूप मुले शेती, मासेमारी, रोजचे रुटीन, गावातील उत्सव वगैरे यु ट्युब चॅनलद्वारा दाखवतात. कदाचित जोडधंदा म्हणून बरी कमाई होत असेल.
मला तर वाटते पुढे मागे एखाद्याचे व्हिडिओ खूप वाढले की जुने व्हिडिओ चॅनलवर ठेवण्यासाठी यु ट्युब त्यांच्याकडून पण पैसे घेईल. (आताच घेत असेल तर माहिती नाही)
29 Jul 2022 - 4:56 pm | टर्मीनेटर
@ सौंदाळा,
युट्युबवर कमाई होण्यासाठी अधून मधून एखाद-दुसरा व्हिडीओ टाकून चालत नाही, समर्थांनी लिहिलंय "दिसामाजी काहीतरी ते लिहावे" च्या धर्तीवर "दिसामाजी २-३ व्हिडीओ अपलोडवावे" (ह्याला काही सन्माननीय युट्युबर्स अपवाद आहेत ज्यांच्या एकेका व्हिडीओला दशलक्ष वगैरे views मिळतात) तेव्हा कुठे घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाल्या सारखे वाटेल अशी आज परिस्थिती आहे 🙂
😀
आत्ता तरी घेत नाहीत आणि नजीकच्या भविष्यात तरी असे होण्याची शक्यता कमी आहे! अर्थात आजन्म फुकट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांचे कित्येक विभाग आज अस्तित्वात राहिलेले नाहीत हे देखील खरे!
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
27 Jul 2022 - 11:02 am | क्लिंटन
मस्त लेख. आवडला.
युट्यूब मोनेटायझेशनसाठी आणखी काही नियम आहेत. म्हणजे नुसत्या व्ह्यू, सबस्क्राईबर्स, आर पी एम, सी पी एम आणि इतर भानगडींबरोबरच मोनेटायझेशनसाठी आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. व्हिडिओमधला कंटेन्ट स्वतःचा असला पाहिजे. म्हणजे कोणा प्रसिध्द लेखकाचे पुस्तक वाचून दाखविणारा युट्यूब चॅनेल असेल तर त्याचे मोनेटायझेशन होत नाही. दुसरे म्हणजे व्हॉईस ओव्हर केलेले व्हिडिओ किंवा टेक्स्ट टू स्पीच सॉफ्टवेअर वापरून केलेले व्हिडिओ मोनेटाईझ होत नाहीत. तिसरे म्हणजे व्हिडिओ करणार्याचा चेहरा व्हिडिओत दिसायला हवा. तो दिसत नसेल तरी व्हिडिओ मोनेटाईझ करता येत नाही. चौथे म्हणजे गुगलच्या कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन करणार्या व्हिडिओंचे मोनेटायझेशन होत नाही. म्हणजे शिवराळ भाषा वापरणे, एखाद्या समाजघटकाविरोधात प्रचार करणे, पॉर्नोग्राफी, हिंसेला उत्तेजन देणे वगैरे गोष्टी असलेले व्हिडिओ मोनेटाईझ होत नाहीत. असे काही व्हिडिओ गुगल स्वतःहून युट्यूबवरून हटवू शकते. दोनेक वर्षांपूर्वी हे सगळे गुगल सपोर्टवर प्रश्नोत्तरे असतात त्यात वाचल्याचे आठवते. चटकन लिंक सापडली नाही.
29 Jul 2022 - 12:23 am | आग्या१९९०
तिसरे म्हणजे व्हिडिओ करणार्याचा चेहरा व्हिडिओत दिसायला हवा. तो दिसत नसेल तरी व्हिडिओ मोनेटाईझ करता येत नाही.
Hebbars kitchen ह्या you tube चॅनल वर commentary आणि क्रिएटरचा चेहरा दोन्हीही नसते.
https://youtu.be/titVko7ijlo ह्या चॅनल वर फक्त commentary असते. वरील दोन्ही चॅनल खूप लोकप्रिय आहेत. ते मोनेटाईझ नसतील असे वाटत नाही.
29 Jul 2022 - 5:51 pm | टर्मीनेटर
@ क्लिंटन,
ह्यातले बरेचसे मुद्दे पहिले सहा निकष पूर्ण करताना कव्हर होतात त्यातले २ जे आव्हानात्मक आहेत फक्त त्यांचाच उल्लेख लेखात केला आणि बाकीचे निकष जाणून घ्यायचे असल्यास इच्छुकांसाठी खाली लिंक दिली आहे.
कॉपीराईटचा मामला नसल्यास काही अडचण येत नाही.
किंवा क्रिएटर त्या व्हिडीओ पासून मिळणारे उत्पन्न थेट त्या लेखकाकडे वळवू शकतो अर्थात त्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी आहेत!
असे आता नाहीये, Bright Side, What If
अशी फेसलेस/व्हॉइस ओव्हर कंटेन्ट देणारी यशस्वी चॅनल्स खोऱ्याने पैसे कमवत आहेत, त्यातल्या Bright Side चॅनलच्या Views नी १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
बाकीचे मुद्दे वर म्हंटल्या प्रमाणे पहिल्या फेरीत कव्हर होतात, त्यातून जर ते निकष पूर्ण होतं नसतील तर अर्ज छाननी आणि युट्युबच्या टीम कडून चॅनलचा रिव्हयू केला जातो त्या पातळीवर बाद केला जातो. अर्थात बाद झालेला क्रिएटर/चॅनल सर्व निकष पूर्ण करून ३० दिवसांनंतर पुन्हा अर्ज करु शकतो!
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
29 Jul 2022 - 7:03 pm | तर्कवादी
+१
मलाही असेच वाटते कॉपीराईट क्लेम नसल्यास कोणतेही व्हिडिओ मॉनेटाईज होवू शक्तात बाकी धोरणात न बसणारे व्हिडिओज युट्युबकडून सरळ काढून टाकण्यात येतात.. मग मॉनेटायजेशनचा प्रश्नच उरत नाही.
हे पण असू शकत नाही. कित्येक चॅनेल्समध्ये क्रिएटरचा वा कुणाचाही चेहरा दिसत नाही . उदा. vigyan tv india, यांचे मी खूप व्हिडिओज पाहिलेत, निवेदकाचा फक्त आवाज असतो , चेहरा नाही. हे मॉनेटाईज होत नसेल तर केवळ समाजसेवा म्हणून कुणी इतकी मेहनत घेवून बनवलेले व्हिडिओ सहसा टाकणार नाही.
1 Aug 2022 - 2:23 pm | टर्मीनेटर
स्वयंनिर्मित कंटेन्टच मॉनेटायझेशन साठी पात्र असतो. अन्य कोणाचा कंटेन्ट अपलोड करणे हे युट्युबच्या पॉलिसीचे उल्लंघन ठरते.
27 Jul 2022 - 11:26 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद ....
27 Jul 2022 - 11:49 am | Bhakti
मला तर इतर सोमिपेक्षा युट्युबच जास्त आवडतं.
मानलं भाऊ किती सोप्या भाषेत लिहिलेले आहे.
😊
27 Jul 2022 - 12:16 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान माहितीपुर्ण लेख.
27 Jul 2022 - 12:35 pm | योगविवेक
हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. एवढे करून कमाईचे पारडे हल्के वाटते.
29 Jul 2022 - 6:05 pm | टर्मीनेटर
मुविकाका, भक्ती, ॲबसेंट माइंडेड ... & योगविवेक
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
27 Jul 2022 - 2:55 pm | टर्मीनेटर
बाब्बो पैलवान भाऊ ऑनलाईन आलेत... आता पळा...
27 Jul 2022 - 5:36 pm | तुषार काळभोर
चारशे रुपये दिले, म्हणून मी शांत आहे..
29 Jul 2022 - 6:08 pm | टर्मीनेटर
हुश्श... जीव भांड्यात पडला बघा!
आता 'कवीराज' आणि चौ. को. तेवढे बाकी राहिले म्हणायचे 🙂
27 Jul 2022 - 3:41 pm | टर्मीनेटर
रोजी-रोटीची कामं करता करता आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांना उत्तरे देणे किती कठीण असते ते आज समजले!
27 Jul 2022 - 4:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
थोडक्यात आणि छान माहिती दिली आहे. मागे माझ्या विषयातील काही तांत्रिक माहितीविषयक व्हिडिओज तुनळीवर टाकले होते, पण तेव्हा असे काही डोक्यात नव्हते. मात्र लोक यातुन पैसे कसे कमवतात ही उत्सुकता होती. लेख आणि प्रतिसाद वाचुन बर्यापैकी माहिती गोळा झाली आहे.
अर्थात टिक टॉक वगैरे बंद झाल्याने तुनळीची लोकप्रियता वाढली आहेच. पण हे जाहिरातीचे मॉडेल नवीनच समजले. पुनश्च धन्यवाद!!
27 Jul 2022 - 5:58 pm | सुरसंगम
खूप छान माहिती.
पण जे लोकं कॉपी राईट नसलेले जुने चित्रपट चढवतात त्यांनाही जास्त view असतात.
मग त्यांनाही पैसे मिळतात का.
27 Jul 2022 - 11:55 pm | तर्कवादी
मला वाटते होय.. कॉपीराईटचा क्लेम येईपर्यंत मिळू शकतात. अर्थात अशा जुन्या चित्रपटांना सातत्याने किती व्यूव्ह्ज मिळत असतील ?
29 Jul 2022 - 6:31 pm | टर्मीनेटर
राजेंद्र मेहेंदळे & सुरसंगम
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
@ सुरसंगम
त्या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेच्या चॅनलवर जर तो चित्रपट आधीपासून उपलब्ध असेल आणि दुसरा कोणी अपलोड करत असेल तर त्याचे उत्पन्न मूळ चॅनलला द्यावे लागेल अशी अट स्वीकारावी लागते. हीच गोष्ट संगीताच्या बाबतीतही लागू होते. अन्य कोणी निर्माण केलेला कंटेन्ट युट्युबच्या मॉनेटायझेशन पॉलिसीत बसत नाही. कुठलाही व्हिडीओ अपलोड केल्यावर प्रकाशित करण्याआधी स्वयंचलित पद्धतीने त्याची तपासणी होते. आणि जरी ही प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली तरी पुढे खाली तर्कवादी म्हणाल्या प्रमाणे कुठले कॉपीराईट विषयक ऑबजेक्शन आले तर समस्या येऊ शकते.
थोडक्यात सांगायचे तर कुठलाही स्वयंनिर्मित कंटेन्टच मॉनेटायझेशन साठी पात्र असतो. अन्य कोणाचा कंटेन्ट अपलोड करणे हे युट्युबच्या पॉलिसीचे उल्लंघन ठरते.
28 Jul 2022 - 11:59 pm | श्रीगणेशा
छान, माहितीपूर्ण लेख!
थोडक्यात काय तर पैसा कमविण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही :-)
29 Jul 2022 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण लेखन धन्यवाद. चॅनल सब्स्क्राईब केले आणि आणि व्ह्युवर्स वाढले की पैसे मिळतील असे वाटायचे.
पण प्रक्रिया क्लिष्ट आहे, असे दिसते.
-दिलीप बिरुटे
29 Jul 2022 - 6:33 pm | टर्मीनेटर
श्रीगणेशा & प्रा. डॉ.
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
29 Jul 2022 - 10:41 am | मदनबाण
युट्युब आणि व्हू काऊंट :-
मला व्यक्तिगतपणे हे माहित आहे की Embed केलेला युट्युब व्हिडियो प्ले केला गेला असता त्याचा व्हू काऊंट हा गणला जातो. परंतु तुम्हाला यात अधिक माहिती असल्याने यावर अधिक माहिती हवी आहे.
हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे अश्विन अघोर यांच्या घनघोर या युट्युब चॅनलचा एक व्हिडियो मी काही काळा पूर्वी इथे शेअर केला होता, परंतु तो व्हिडियो इथे प्ले झाला नव्हता, इथे प्ले होण्या ऐवजी तो मूळ चॅनलवर जाऊन प्ले व्हावा असे सेटिंग त्यांनी ठेवले असावे असे मला प्रथम दर्शनी वाटले. बरेच दिवस माझ्या मनात या बद्धल विचार चालु होता. तेव्हा आज मी अश्विन अघोर यांना संपर्क करुन या बाबतीत कळवले तेव्हा त्यांच्या मता नुसार Embed केलेला युट्युब व्हिडियोचा काऊंट धरला जात नसल्याचे सांगितली परंतु ते याबाबतीत त्यांच्या तात्रिक टिम बरोबर बोलतील असे देखील ते म्हणाले.
तेव्हा यावर अधिक माहिती दिली तर उत्तम होईल. :)
उदा. म्हणुन त्यांचाच एक व्हिडियो या प्रतिसादात देत Embed करुन देत आहे. हा आता Embed स्वरुपात प्ले होतो की नाही ते पहाता येईल.
मिपा वेबसाईट त्यांना माहित असल्याचे देखील त्यांनी सांगितले. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neeli Neeli || Full Song || Folk Song || Ft. Dhethadi Harika || Nivriti Vibes || Tamada Media
29 Jul 2022 - 7:05 pm | टर्मीनेटर
@ मदनबाण,
नाही! Embed केलेला युट्युब व्हिडियो खुद्द युट्युब सोडून अन्य कुठल्याही ठिकाणी (वेबसाईट/app) पहिला गेल्यास त्याचा युट्युब वरील View count वाढत नाही तसेच त्यात जाहिराती दाखवल्या जात नसल्याने तो मॉनेटायझेशन साठीही पात्र ठरत नाही.
ह्या कारणामुळे बरेचसे व्यावसायिक युट्युबर्स व्हिडीओ एम्बेड करण्याची परवानगी आपल्या सेटिंग्स मध्ये नाकारतात.
आणि जे एम्बेड केलेले व्हिडिओ अन्य ठिकाणी प्ले होतात त्यावरही खाली Watch on YouTube असा ऑप्शन दिसतो. बघणाऱ्याने त्यावर क्लिक केल्यास प्रेक्षकाला युट्युबवर redirect केले जाते, अशावेळी त्या व्हिडिओचा View count पण वाढतो आणि जर त्यावर जाहिरात बघितल्यास तो मॉनेटायझेशन साठीही पात्र ठरतो.
तुम्ही खाली दिलेला व्हिडीओ दिसत नाहीये, ह्या व्हिडीओची एम्बेड सेटिंग off ठेवलेली आहे.
अरे वाह! मस्त.
जाता जाता: एक स्वानुभव,
इजिप्त आणि दुबई सहलीतले माझे ३ व्हिडीओ मिपावरच्या लेखांत एम्बेड केलेले आहेत, इथे हजरोंच्या घरात दर्शने झाली पण युट्युब वर त्यांचा काउंट आजाबात वाढला नाही 😀 😀 😀
17 Feb 2024 - 12:15 pm | मदनबाण
अश्विन अघोर यांच्या घनघोर या युट्युब चॅनलचा एक व्हिडियो मी काही काळा पूर्वी इथे शेअर केला होता, परंतु तो व्हिडियो इथे प्ले झाला नव्हता, इथे प्ले होण्या ऐवजी तो मूळ चॅनलवर जाऊन प्ले व्हावा असे सेटिंग त्यांनी ठेवले असावे असे मला प्रथम दर्शनी वाटले. बरेच दिवस माझ्या मनात या बद्धल विचार चालु होता. तेव्हा आज मी अश्विन अघोर यांना संपर्क करुन या बाबतीत कळवले तेव्हा त्यांच्या मता नुसार Embed केलेला युट्युब व्हिडियोचा काऊंट धरला जात नसल्याचे सांगितली परंतु ते याबाबतीत त्यांच्या तात्रिक टिम बरोबर बोलतील असे देखील ते म्हणाले.
घनघोर हे युट्युब चॅनलच चालवणारे अश्विन अघोर आता आपल्यात राहिलेले नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! _/\_
त्यांच्या विषयी ज्यांनी भावना प्रकट केल्या आहेत :-
फार घाई केलीस अश्विन !| AshwinAghor | AbaMalkar | Lakshyavedh
सुन्या सुन्या मैफिलीत या
दगा केलास दोस्ता | Sushil Kulkarni | Analyser | Ashwin Aghor
मदनबाण.....
17 Feb 2024 - 1:37 pm | कंजूस
त्यांचं सेटिंग नसतं.
मिपावरून कोणताच Embed tag चालत नाही.
(बाकी अश्विन अघोर यांच्या चानेलबद्दल माहिती नाही. )
17 Feb 2024 - 6:10 pm | टर्मीनेटर
ऑ... मला तर माझ्या चॅनलच्या सेटींग्स मध्ये हा पर्याय दिसत होता/आहे, युट्युब पंक्तीभेद करत असल्यास कल्पना नाही 😀
सध्या मिपाची सेटींग्स बदलल्याने Embed tag चालत नाही, पण त्याचा युट्युबच्या सेटींग्सशी काहिही संबंध नाही!
17 Feb 2024 - 8:50 pm | कंजूस
Embed मधून यूट्यूब विडिओ वर थेट जाण्याऱ्या/ पाठविणाऱ्या अशा साईट किती असतील आणि त्यांचा viewing count वाढेल? यूट्यूबरना त्यांचे विडिओ किती लोक पूर्ण पाहतात, जाहिरातीसकट पाहतात यावर पैसे मिळतात. शिवाय महत्त्वाचे म्हणजे त्या व्हिडिओच्या विषयाला धरून कोणती जाहिरात टाकता येईल. पाककृती चानेलवर हॉटेल किंवा बँकिंग जाहिराती टाकून उपयोग नसतो. म्हणजे त्या जाहिराती मिळणार नाहीत पैसे मिळणार नाहीत. राजकीय समीक्षा आणि प्रचार असेल तर कोणते सेटिंग्ज जाहिराती खेचून आणेल? Viewing time वाढेल, चानेलचे सबक्राईबर्स वाढतील पण गूगलला जाहिरातींचे उत्पन्न मिळणार नसेल तर चानेलला काय देणार?
Prakash raj thakur पाहा.
17 Feb 2024 - 6:03 pm | टर्मीनेटर
अरेरे...अश्विन अघोर ह्यांच्या आकस्मित मृत्युबद्दल वाचुन वाईट वाटले.
एका ठरावीक विचारसरणीला वाहिलेले असल्याने त्यांचे फारसे व्हिडिओज पाहिले नव्हते.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
29 Jul 2022 - 7:28 pm | तर्कवादी
Embed केलेले व्हिडिओजचा काउंट गणला जात नसेल असे मला वाटत नाही. नाहीतर अनेक व्यावसायिक युट्युबरर्सनी केलेले व्हिडिओज युट्युबवरच चालवता येतील अशी सेटिंग केली असती. पण तसे दिसत नाहीये. बहुतांश व्हिडिओज Embed करुन चालवता येतात
उदाहरणादाखल काही व्हिडिओज :
विग्यान टिव्ही
राजश्री प्रॉडक्शनः
टिप्स
29 Jul 2022 - 10:39 pm | सस्नेह
ज्ञानवर्धक धागा आणि प्रतिसाद.
वाचल्यावर तूनळीवर व्हिड्यो टाकायची हौस विरुन गेली :))
1 Aug 2022 - 2:24 pm | टर्मीनेटर
धन्यवाद 🙏
13 Aug 2022 - 3:05 am | एकुलता एक डॉन
https://www.youtube.com/watch?v=tK8n0Y6KYcA
https://www.youtube.com/watch?v=-d1xxk8MX4o
12 Nov 2022 - 7:28 pm | चौथा कोनाडा
सोलापूरचं शिंदे कुटुंब युट्यूबवरून लाखो रुपये कसं कमवतं?
https://www.bbc.com/marathi/india-62135371
14 Nov 2022 - 12:15 pm | विवेकपटाईत
लेख वाचून एक लक्षात आले. यू ट्यूब 99 टक्के विडियो बनविणार्यांना एक नवा पैसा ही देत नसेल. बाकी अश्या चॅनेल वर 90 टक्के विज्ञापन ही वाचले जात असेल. तो सर्व नफा यू ट्यूबचा. उगाचच एमवे वेस्टिगे इत्यादि अमेरिकन कंपन्यांची आठवण आली.
18 Feb 2024 - 9:59 am | चित्रगुप्त
यूट्युबवरील हजारो लाखो विडीयो दर्शकांना मोफत उपलब्ध आहेत. जाहिराती बघायच्या नसतील तर फक्त 129 रुपये दरमहा देऊन Premium यूट्यूब घेऊ शकता. (मी घेतले आहे) असे असता आपण कोणती तक्रार करु शकतो?
18 Feb 2024 - 10:06 am | अमरेंद्र बाहुबली
१२९ न देताही जाहीरातीविना विडींओ पाहू शकतो.
18 Feb 2024 - 10:51 am | कर्नलतपस्वी
जाहिरात आली की डोळे मिटून घ्यावे.
हा का ना का.....
18 Feb 2024 - 2:02 pm | अमरेंद्र बाहुबली
हाहाहाहा. पण आवाज येतोच ना? जंगली रमी पे आव ना महाराज…
18 Feb 2024 - 1:58 pm | कंजूस
जाहीरातीविना विडीओ पाहू शकतो. होय. मी तसेच पाहतो.
18 Feb 2024 - 6:42 pm | चित्रगुप्त
यूट्युबवर वि. जा. कसे बघायचे त्याची रेशिपी पण द्यावा की.
18 Feb 2024 - 7:55 pm | कंजूस
1.विडिओ उघडा. जाहिरात सुरू झाली तर बंद करा.
2.पुन्हा उघडा. जाहिरात सुरू झाली तर बंद करा.
3.पुन्हा उघडा. जाहिरात सुरू झाली तर बंद करा.
साधारणपणे दोनमध्ये पायऱ्यां मध्ये काम होते.
19 Feb 2024 - 9:33 am | अमरेंद्र बाहुबली
जाहीरातीला रिपोर्ट करायचं बटण असतं तिथे रिपोर्ट करायची, लगाच बंदं होते.
19 Feb 2024 - 12:11 pm | कंजूस
रिपोर्टींग वगैरे काही नाही. वरची पद्धत वापरा.
19 Feb 2024 - 9:06 am | माहितगार
बर्याच जणांसाठी इक्विपमेंट रेकॉर्डींग एडीटींग ह्या तांत्रिक गोष्टीत रस किंवा कौशल्य नसते, आपण किंवा आपल्या (तुमच्या) परिचयात कोणी (माफक दरात) युट्यूब स्टुडीयो किंवा रेकॉर्डींग आणि एडीटींग सेवा देणारी मंडळी आहेत का?
19 Feb 2024 - 12:23 pm | सुरिया
मी देतो अशी सेवा पण तुम्हाला देणार नाही कारण तुम्ही फार पाल्हाळीक किरकिर करता. ;)
19 Feb 2024 - 1:59 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद टर्मी भाऊ,
भारी धागा आहे.
महत्त्वपूर्ण माहिती कळली.
❤️❤️❤️
चौथा कोनाडा हा माझा नामोल्लेख वाचून अमंळ मौज वाटली आन आपण सेलीब्रेटी (मिनी मिपा का होईना) असल्याची भावना सुख देऊन गेली
❤️❤️❤️
पुनश्च आभार !
19 Feb 2024 - 2:43 pm | कर्नलतपस्वी
चिमणी पासून घारी पर्यंत
वारी पासून तारी पर्यंत
सर्व गोष्टींचे व्हिडिओ काढतो. बघणारे म्हणतात लई भारी,यु ट्युब वर टाका.
नुकताच एक प्रोजेक्ट पुरा केलाय.श्री व सौ शिंजीर आणी मी. शिंजीर म्हणजे सनबर्ड. घरटे बनवण्या पासून ते पिल्ले परदेशी जाईस्तो पर्यंत.
नमुना तुमच्या कायप्पावर पाठवतो. मूल्यांकन करा. फायदा वाटला तर पुढे विचार करू नाहीतर विद्यापीठात देईन म्हणतो.