" माझ्यावर विश्वास ठेव" महेश माझ्याकडे पहात बोलतो.
" हो खात्री बाळग.... आपण मित्र आहोत. " महेशला खांद्यावर हात ठेवत मी दिलासा देतो. तो काय बोलणार आहे हे मला माहीत नाही.
" तुला खोटं वाटेल पण मी खरं सांगतोय. विश्वास ठेव."
आपण आलो त्या दिवसापासून मी झोपू शकलेलो नाही. त्या दिवशी तुला सोडलं आणि घरी गेलो. हातपाय धुवून झोपायला गेलो. थकलो तर होतोच. जरा डोळा लागला असेल माझा. हा मघाशी फोटोत दिसला ना तो स्वप्नात आला. रागारागाने पहात होता. दरडावून काहीतरी बोलत होता. विचारत होता. मला भाषा समजत नव्हती. पण मी खडबडून जागा झालो. खूप घाबरलो होतो. दरदरून घाम फुटला होता अंगाला. छातीची धडधड वाढली होती. आत्ता झालं तसंच. मी डोळे मिटले की तो समोर येतो. रागारागाने माझ्या कडे पहात असतो. झोप सोड.... मी डोळे पण मिटू पण शकत नाहिय्ये. गेले सात दिवस टक्क जागा आहे. डॉक्टरांकडे गेलो त्यांनी गोळ्या इंजेक्षनं दिली. काही उपयोग नाही. सात दिवसात वजन दहा किलोने कमी झालंय.
महेश सांगतोय ते खरं आहे. त्याच्या अवतारावरून समजतंय .
"होतं रे असे कधी कधी, त्या दिवशी तुला व्याळ दिसला. ती एक मूर्ती होती. आणि अंधूक उजेडामुळे तूला ती दगडी मूर्ती खरी आहे असा भास झाला.त्याच वेळेस तू भिंतीवरची मूर्ती पाहिलीस.ती तुझ्या मनावर बसली.त्यामुळे हे असे भास होतात. " मी महेशला समजावतोय.
नाही रे मलाही पटलं तू म्हणतोस ते. डॉक्टरही हेच म्हणाले. पण......
आपण थोडे पुढे जाऊया. तो म्हणजे त्या दगडी मूर्तीची चेहेरा तुला नुसताच दिसतो की आणखी काही करतो? म्हणजे ओरडून बोलतो, हल्ला करतो..... चावतो वगैरे..."
" तो समोर दिसला की मी घाबरतो. पुढचा काही विचारच डोक्यात येत नाही. पण एकदा तो म्हणाला होता की माझी यंत्रमुद्रा परत दे म्हणून."
" म्हणेज ? तु तेथून काही आणलं आहेस का?" माझ्या प्रश्नावर महेश चपापतो.
" अं .... हो. संगायचंच राहिलं" सांगावं की नाही या संभ्रमात महेश. तो पँटच्या खिशातुन एक कसलीशी अष्टकोनी चकती काढून माझ्या समोर धरतो. " हे बघ. मी हेच म्हणत होतो"
मी चकती हातात घेऊन नीट न्याहाळतो. खूप गुळगुळीत मशीन पॉलीश केल्यासारखी, त्यावर काही अक्षरं एंबेड केलेली. एंबेड हा शब्द मुद्दामुनच वापरतोय. त्या चकतीत कोरलेली नाही तर चकतीच्या पृष्ठभागावर जडावली असावीत अशी वर आलेली. नीट न्याहाळलं तर एकसंध दिसताहेत. चिकटवलेली दिसत नाहीत. ही अक्षरंच आहेत. डिझाईन असतं तर त्यात क्रमबद्धता असते. अक्षरांत तशी क्रमबद्धता नसते. अक्षरं आहेत पण लीपी कोणती ते समजत नाही. देवनागरी नाही.... ब्राम्ही पण नसावी. हडप्पा मधे नाणी सापडली त्यावरच्या अक्षरांशी संगती लागू शकेल.
" हे बहुतेक नाणं असावं' पण नाणं इतकं मोठे नसते कधी" त्या दगडी अष्टकोनी चकतीवरची अक्षरं लागत नाहीत. ते नक्की नाणं आहे की काय तेही समजत नाही.
मी त्या चकतीचा फोटो घेतो. नेटवर हा फोटो टाकला तर कोणीतरी सांगू शकेल.
" मला तो बहुतेक हेच मागत असावा." महेश अजूनही घाबरलेला आहे. मला खूप त्रास होतोय रे शिवा. भितीही वाटते.
"अरे मग तर सोप्पं आहे.... हे बघ मी एक गोष्ट वाचली होती. एका माणसाला त्याच्या पलंगाखाली भूत रहातय असं वातायचं. त्याला झोप यायची नाही. मानसोपचार तज्ञांनी खूप उपचार केले काउन्सीलींग केले. त्याचा भ्रम काही जाईना. त्या माणासाच्या मित्राने एक साधा उपाय केला. त्याने पलंगाचे चारही पाय कापून टाकले. पलंग जमिनीच्या पातळीवर आला. आता खाली कोणी राहू शकत नाही. ही त्या माणसाची खात्री झाली. भितीचे मूळ कारण संपले. भिती संपली."
माझ्या बोलण्याचा महेशवर परीणाम होतोय.
"म्हणजे काय करायचं आपण?"
" आपण ही दगडी चकती तिथे ठेऊन यायची"
" म्हणजे परत तिथे जायचे!"
" हो. ही चकती तुझ्याजवळ आहे याची तुझ्या मनाला खंत असेल... ही वस्तू जिथे होती तिथे नेऊन ठेवली तर मनाला बसणारी टोचणी कमी होईल." माझं तर्कशास्त्र महेशला पटतय हे त्याच्या चेहेर्यावरून जाणवतंय.
" बाय द वे तो तुला स्वप्नात दिसतो त्याने कधी तुला त्याचं नाव सांगितलंय? नाही म्हणजे आपल्याला बोलताना " तो " किंवा "ते" असलं सर्वनाम वापरावं लागणार नाही.
महेशच्या समस्येवर तोडगा निघाल्याने आमच्यातला ताण जरा हलका झालाय.
" अरे हो ना ... सांगितलं त्याने एकदा नाव त्याने..... काय बरं. विचित्रच नाव आहे त्याचं.... काय तर म्हणे " खिरलापखिरला"
महेश हसत हसत म्हणतोय. पण नाव ऐकल्यावर घाबरायची पाळी माझी आहे. मी काहीच प्रतिक्रीया देत नाही.
-- ---- ----- ------- ------ ------- ----- ----- ----- -----
या गोष्टीला तीन दिवस झाले. मध्यंतरीच्या कालात बरीच फोनाफोनी करत महेशने माझ्या घरातल्याना आणि मी त्याच्या काकांना आमच्या प्लॅनबद्दल पटवलेय. अर्थात ते देऊळ / खिरलापखिरला . एकसारखी दिसणारी माणसे हे सगळं लपवून.
मी नुकताच आयसी यू मधून परतलेला. आणि महेश भ्रमिष्ट होण्याच्या काठावर बसलेला. बरेच कष्ट घ्यावे लागले. दिंडोरीला जातोय असं खोटंच सांगितले. बाईकवर जायला परवानगी मिळणे शक्यच नव्हते. महेशने काकांची सँट्रो घेतली. दिंडोरीला जातोय म्हंटल्यावर महेशची चुलत बहीण मीना पण मागे लागली. तीला कसंबसं कटवलं.
पहाटेच घरातून निघालोय. खिरलापखिरला सतत दिसतो या समस्येवर उपाय सापडला म्हणून परवापर्यंत आजारी हेही विसरलोय. आजूबाजुला काय घडतय. कोणती गावे मागे पडताहेत या कडेही लक्ष्य नाहिय्ये.
गाडी पार्क करून आम्ही डोंगर चढायला लागलोय. मला माझेच आश्चर्य वाटतय. परवापर्यंत साधं उठून बसलो तरी चक्कर येत असणारा मी आत्ता उत्साहाने डोंगर चढतोय. खरंच आजारपण हे मानसीक असते. अंगात शंभर ताप असताना द्रवीड सेंच्यूरी ठोकतो. जबड्याचं हाड मोडलेलं असताना डोक्याला बँडेज बांधून कुंबळे बॉलिंग साठी मैदानात उतरतो. इच्छाशक्ती दांडगी असेल तर काहिही करता येतं. हे पटलं.
पायवाटेनं आम्ही त्या डावीकडून खाली उतरणार्या वाटेला लागलोय. घाईघाईत डोंगर चढल्यामुळे छातीचा भाता फासफूस करतोय.
आम्ही खंदकाच्या काठावर आहोत. खंदकात उतरून चालायला सुरवात केली. या वेळेस पाय घसरू नये म्हणुन पूर्ण काळजी घेतोय. दोघेही एकमेकांचे हात धरून चालतोय.
त्या अष्टकोनी दगडाच्या चकतीला महेश जिवापाड जपतोय. बॅगेत व्यस्थित गुंडाळून ठेवली आहे.तरीही तो ती पुन्हा पुन्हा तपासतो. खंदकात उतरण्यापूर्वी बॅग नीत बंद केली आहे. खंदकात पाणी आमच्या कमरेपर्यंत आलंय. माझा पाय कशात तरी अडकला. खाली पडणार तेवढ्यात महेश मला सावरतो. मी उभा रहातो.पण या गडबडीत महेशच्या खांद्यावरून सॅक निसटते. पाण्यात पडते. कशामुले काय माहीत . सॅक न तरंगता. थेट पाण्यात तळाला जाते.
क्रमश:
प्रतिक्रिया
25 Jan 2022 - 12:43 am | श्रीगणेशा
हा अंदाज नव्हता केला!
यापूर्वी तिथे जाणारे परत येऊ शकले नाहीत, पण महेश आणि शिवा परत आले, हे का, याचा उलगडा पुढील काही भागांत होईल असं वाटतंय.
त्या शिल्पांचाही एखादा फ्लॅश बॅक असावा.
वाचकाची अपेक्षा :-)
25 Jan 2022 - 11:18 am | टर्मीनेटर
वाचतोय.....
25 Jan 2022 - 11:37 am | कर्नलतपस्वी
खुप भारी, नारायण धारप आणी द पां खाबेंटे यांच्या लेखनशैली बरोबर मीळती जुळती. तुम्ही लिहा आम्ही वाचू.
25 Jan 2022 - 12:15 pm | शित्रेउमेश
बापरे.....
खूपच उत्कंठावर्धक.....
25 Jan 2022 - 12:36 pm | गवि
दहा दिवस झोप नाही, दोघे स्वत:पुरते या अनुभवांनी प्रचंड घाबरलेत. पण एकमेकांशी त्यावरुन संवाद करताना ते मधेच हलके घेताहेत, अजूनही त्यांना ते मनोरंजक अथवा हसू येण्यासारखे वाटत आहे हे विसंगत वाटलं. इतक्या भयानक अनुभवानंतर काहीही कारणास्तव ते पुन्हा "तिकडे" जातील हे तर अगदीच पटले नाही. त्यांची तशी अवस्था वाटत नाही.
पण पूर्ण कथा वाचल्याशिवाय काही फिक्स मत बनवणे टाळावे हे उत्तम.
25 Jan 2022 - 11:46 pm | विजुभाऊ
पुढील दुवा ध्रांगध्रा - १९ http://misalpav.com/node/49827
27 Jan 2022 - 5:48 pm | चौथा कोनाडा
उत्कंठावर्धक.....
वाचत आहे !
31 Jan 2022 - 10:52 am | विजुभाऊ
मागील दुवा ध्रांगध्रा- १७ http://misalpav.com/node/49819
पुढील दुवा ध्रांगध्रा - १९ http://misalpav.com/node/49827