ध्रांगध्रा- १४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Jan 2022 - 8:28 pm

गावातली घरं आता मागे पडलीत. अंधार त्यामुळे अधीकच गडद वाटतोय. आकाशात चंद्र... त्याचाच काय तो उजेड.
आता आम्ही गावाबाहेरच्या खंदका जवळ आलोय. वाट खंदकाच्या पायर्‍यांपर्यंत पोहोचते.महेशने पायर्‍या उतरायला सुरवातपण केलीये. मी कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे कोंबतो.झीप लावतो. आणि महेशच्या पाठोपाठ खंदकाच्या पाण्यात पाऊल टाकतो

मागील दुवा ध्रांगध्रा - १३ http://misalpav.com/node/49786

खंदक पार केला की पलीकडे पोहोचू.पाण्यातून आम्ही धावतोय. पाणी जवळजवळ कमरे इतके आहे. कमरेइत्तक्या पाण्यातून धावणं अशक्य असतं . एक तर पाणी तुम्हाला विरोध करत थांबवत असतं आणि दुसरे म्हणजे पायाखाली दगड गोटे , खाच खळगे , वाळू चिखल यातलं काय येईल ते सांगता येत नाही.
माझी धावायची गती अगदीच शून्यावर आली असावी. पुढे गेलेला महेश मागे वळालाय. तो हात पुढे करतो. माझा हात पकडतो. आणि ओढतो. माझ अपाय कशात तरी अडकलाय. पाय अडकलाय म्हणता येणार नाही. पण पाऊल कोणीतरी पकडल्यासारखे वाटतय. मी शहारतो. काय असेल ते? बुटांवरूनसुद्धा घट्ट पकड जाणवते. मी एक जोराचा हिसडा देतो. त्या कशाच्या तरी पकडीतून पाय बाहेर आलाय. पण त्या नादात बूट सटकला हे समजले. मी पाण्यात आडवा झालोय. माझ्या पडण्यामुळे महेश पण पडलाय.पण त्याने माझा हात सोडलेला नाहिय्ये. आधीच अंधार आहे.त्यात पाण्यात पडलो.डोळ्यासमोर काही दिसत नाही. पायाला खाली दगडी फरशी लागते. फरशीला पायाने रेटा देऊन वर येतो. दिशा समजत नाही . पण मी चालायला सुरवात करतो. पाण्याची खोली कमी कमी होतेय. गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत आलंय पाणी. मी चालत रहातो. आता पाण्याबाहेर आलोय.मी एका हाताने चेहेर्‍यावरचे पाणी पुसून टाकतो.आता जरा दिसायला लागलय.महेशने पण माझा सोडलाय तोही डोळे चोळतोय.
चंद्राचा प्रकाश आहे त्यामुळे अंधार इतका जाणवत नाहिय्ये.
आम्ही खंदकाच्या अलीकडच्या काठावर उभे आहोत. मे महेशकडे पहातो. तो पुन्हा माझा हात पकडतो." पळ......" इतकेच काय ते शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडतात. आम्ही ज्या वाटेवरून आलो त्या वाटेवर आता धावतोय. चढण आहे त्यामुळे दम लागतोय. माझ्या एकाच पायात बूट आहेत. त्यामुळे गवतावरून चालताना दुसर्‍या पायाला मधूनच खडे टोचताहेत. तरीही धावतोय.
चढणीची वाट संपली. आता आम्ही सकाळी डोंगरावर वर जाणारी एक आणि खाली जाणारी एक वात होती त्या तिठ्यावर आलोय. धावत आल्यामुळे आमच्या छातीचा लोहाराचा भाता झालाय. फास.... फुस्स..फास ... फुस्स. .... फक्त श्वासाचेच आवाज येताहेत. आम्हाला बोलतासुद्धा येत नाहिय्ये. महेश मला हाताने "चल चल" अशा खुणा करतोय. मी ही त्याला थांबुया म्हणतोय. दोघांनाही प्रचंड दम लागलाय. तोंडातून शब्द फुटत नाहोय्ये. जरा उसंत म्हणून मी थाम्बलोय. पण महेशच्या चेहेर्‍यावर भीती दिसतेय की अश्चर्य ते कळत नाहिय्ये. तो त्या पांढरीकडे जाणार्‍या पायवटे कडे पहातोय. आणि त्याच वेळेस मला पळ लवकर म्हणत हात ओढतोय. नक्कीच काहितरी असावं. मला एका बुटानिशी पळता येणार नाही. मी बूट काढून तिथेच टाकून देतो. चांगला नॉर्थस्टार चा बूट फेकायला नको वाटतं पण एक बूट नेऊन तरी काय करू. आम्ही दोघेही ती उजवीकडची वाट मागे टाकून उतारावर पळत सुटतो.चढ नाही. उतारावर पळताना दम तरी लागत नाही.पण तोल सांभाळावा लागतो.पायाला दगड , खडे टोचताहेत. त्याची पर्वा करायची ही वेळ नाही.
आम्ही धावत उतरतोय. आता अगदी पोहोचलोय. येताना बाईक लावली होती त्या झेलेआण्णांच्या चहाच्या टपरी जवळ. इतक्या रात्री अर्थातच टपरी बंद आहे. महेश बाईकची किल्ली शोधतोय. कुठल्याच खिशात सापडत नाहिय्ये. तोअस्वस्थ झालाय. किल्ली सपडली नाही तर बाईक तिथेच टाकुन पळत सुद्धा जाईल तो, इतका अधीर झालाय. त्याचे आमच्या दोघांच्याही शर्ट पँटचे खिसे चाचपून झालेत. किल्ली तरीही सापडत नाही. आता फक्त कॅमेरा आहे ती सॅक पहायची बाकी. खूप शोधून शोधून एका कोपर्‍यात किल्ली सापडते. महेश इतका दमलाय की त्याला बाईकला कीक पन मारता येत नाहिय्ये. तो बाईक स्टँडवरून काढून तशीच पळवतो. थोडा वेग आल्यावर उडी मारून बसतो. आणि गियर टाकुन स्टार्ट करतो.माझी वात कहात उभा रहातो. बाईक स्टार्ट झाल्यामुळे जरा जिवात जीव आलाय. मी जाऊन त्याच्या मागे बसतो.
बाईक नाशीकच्या दिशेने धावू लागली आहे.वाटेत आम्ही कुठेही थांबत नाही. दोघेही एकमेकांशी काहीच बोलत नाही. रात्रीची शाम्तता आणि बाईकच्या इंजीनाचा एकसुरी आवाज. ........ माझ्या डोळ्यासमोर आजचा आख्खा दिवसाचा सिनेमासारखा प्लेबॅक चाललाय.
बाईक थाम्बते. माझी तंद्री तुटते. समोर आमची सोसायटी दिसतेय.मी यांत्रीकपणे उतरतो. महेश निरोप न घेताच बाईक पुढे घेऊन जातो.पहाटेचे पाच वाजलेत. सोसायटीच्या गेटमधून मी आत येतो. गेटवरचा सिक्युरीटी काहितरी विचारतोय मे मला समजतही नाही. मी तसाच पुढे चालत रहातो आमच्या बिल्डींगच्या दिशेने.. या क्षणी मला कोणी पाहिलं ना तर त्याला वाटेल मी झोपेत चालतोय. दोन जिने चढून मी वर येतो. लॅच की ने हलकेच दार उघडून घरात येतो. घरात कोणाला जाग आली नसावी. पायात बूट नाहीतच. मोजे काढायचे भान नाहिय्ये. मी रूम मधे जातो. नीटनेटक्या आवरलेल्या बेडकडे पहातो. बेडवर बसून रहातो. डोक्यात ती कालच्या दिवसाची फिल्म चालूच आहे.
" शिवा..... उठ रे , शिवा ऊठ." आईचा आवाज येतो. चेहेर्‍यावर पाण्याचा सपकारा मारावा तसा उजेड भककन डोळ्यावर येतो. आईने खिडक्यांवरचे पडदे उघडलेत. इतका करकरीत उजेड डोळ्याना सहन होत नाही. मी डोळे हळू हळू उघडायचा प्रयत्न करतो. डोक्यात पाठीमागे एक सण्णकन कळ उठते. मी पुन्हा डोळे मिटले.
"आई गं...... " माझ्या तोम्डून उद्गार निघाला असावा.
" का रे काय झालं. बारा वाजलेत दुपारचे ऊठ. आणि अरे तु आलास किती वाजता...? " आई विचारतेय. माझ्या कानात गुहेत घुमत यावा तसा आवाज येतो. माझा चेहेरा निर्वीकार असावा.
" शिवा ....अरे उठ आता. आंघोळ करून घे. तू कधी आलास ते आम्हाला समजलंच नाही.
" आई झोपू दे ना जरा.... काल खूप चालणं झालंय. काल डोंगरावरून वाटेत झेले आण्णा महेशला पाण्यात देऊळ लागले" मी काय बोलतोय हे आईला सोडा माझे मलाच समजत नाहिय्ये.
" बरं बरं ...आधी आंघोळ कर .आणि हे काय मोजेही काढले नाहीत.?
आई काय म्हणतेय हे अर्धवट समजतय कुठून तरी लांबुन बोलतेय असं वाटतय. काय होतेय हे? हा भगभगीत उजेड नको वाटतोय. मी डोळे मिटतो. या कुशीवरून त्या कुशीवर वळतो. विजेचा झतका बसावा तसा एक ज्रदार झटका बसतो. डोक्यात पाठीमागे.... इतकी घान वेदना आयुष्यात कधी अनुभवली नाही...... तो डोंगरावर डोक्याला मार बसला होता.... त्या माणसाने पाठीमागून काहितरी मारलं होतं. ..... डोकम ठणकतंय... आई गं.... माझे डोळे मिटतात. बाहेरच्या भगभगीत प्रकाशाची जाणीव बंद पापण्यां आडूनही होत रहाते. .... डोक्यात जाळ पेटावा तशी आग आग होतेय. मी डोके उशीवर स्थिर टेकवायचा प्रयत्न करतो. ..... मेरी गो राउंडच्या पळण्यात खाली खाली जाताना जसं वाटते तसं काहीसं खाली खाली जातोय.
खाली ..... आणखी खाली...... आणखी खाली. पृथ्वीला तळ नसल्यासारखे वाटतय. खाली...... खाली....
डोळ्यापुढची उजेडाची जाणीव नाहिशी होतेय. डोळ्या समोर अंधार पसरतोय. सुखद गारवा देणारा अंधार....
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

गवि's picture

18 Jan 2022 - 9:51 pm | गवि

भंजाळले डोके.

पुढे...??

लवकर आणि मोठे भाग.

विजुभाऊ's picture

19 Jan 2022 - 10:34 am | विजुभाऊ

लवकर आणि मोठे भाग......

सांगड घालायचा प्रयत्न करतोय.
उपलब्ध वेळ आणि टायपिंगचा वेग...
रोज एक भाग पोस्ट करायचा हे मात्र नक्की.
( थोडम समजून घ्या पामराला दादा. ती मॅट्रीक्स मधे दाखवलेली थेट मेंदूला प्रोब जोडायची टेक्नॉलॉजी कुठे मिळतेय का पहातोय....)

कॅलक्यूलेटर's picture

19 Jan 2022 - 10:43 am | कॅलक्यूलेटर

खिळवून ठेवणारा लेखन. असं वाटत होते कि ते तिथून बाहेर येऊच शकणार नाहीत. पण आता कुठलेही तर्क वितर्क न करता फक्त पुढच्या भागाची वाट पाहणे हातात आहे फक्त.

विजुभाऊ's picture

20 Jan 2022 - 8:11 am | विजुभाऊ

पुढील भाग ध्राम्गध्रा- १५ http://misalpav.com/node/49796

चौथा कोनाडा's picture

20 Jan 2022 - 8:49 pm | चौथा कोनाडा

स्टोरी खतरनाक चालू आहे !
आता पुढे काय होणार ........ ?

उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चाललीय !
|| पु भा प्र ||