ध्रांगध्रा - १२

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Jan 2022 - 8:23 pm

" शिवा. शिवा. अरे हे बघ. इकडे बघ. हे काय आहे" महेश उत्सूकतेने ओरडतोय. उत्सूकता की काय समजत नाही. पण ती तीस पावले मी धावत जातो. डोंगराला वळ्या पडाव्या तसं वर आलेलं ते टेकाड गाठतो.महेश मला हात करून दाखवतो.
डोळ्यावर विश्वास बसत नाहीये
मागील दुवा ध्रांगध्रा - ११ http://misalpav.com/node/49775
डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्या टेकाडावरून पुढे थोडे खाली एक मंदीर दिसतय. थोड्या वेगळ्या पद्धतीचे मंदीराचा कळस दिसतोय. त्या नंतर लगेचच पायर्‍या.खाली उतरत जाणार्‍या. पायर्‍या समोर सोंड वर केले दोन दगडी हत्ती. अगदी खरेखुरे वाटावेत असे. हत्तींच्या सोंडेत दगडी हार. पायर्‍यांना नक्षीदार दगडी कठडे.सगळे काल्याशार दगडात. मंदीराच्या कळसावर अनेक मूर्ती आहेत.बटू ,विरुपाक्ष हे ओळखू येणारे. या मंदीराबद्दल कधीच कुठे वाचले नाही.कळसावर अनेक स्त्री पुरूष प्रतिमा आहेत.कसलेसे प्राणी पण आहेत.दगडातून कोरून काढलेले.
एरवी मंदीराच्या पायर्‍या चढून जावे लागते. या मंदीराच्या पायर्‍या उतराव्या लागताहेत. डोंगरावर आहे म्हणून असेल.मी पुढे होतो. सात आठ असतील पायर्‍या बर्‍यापैकी उंची आहे प्रत्येक पायरीची. त्यापुढे सभा मंडप. महेश अगोदरच पुढे गेलाय. मी पायर्‍या उतरायला लागतो.प्रत्येक पायरीवर दोन्ही बाजूला दगडी द्वारपाल्,पायर्‍या उतरल्यावर पुढे प्रवेशद्वार . प्रवेशद्वारावर गणेशपट्टीवर दक्षीणेकडे असतात ना तसे वाद्य वाजवणारे बटु , इतक्या रेखीव आणि सुबक आणि मुख्य म्हणजे न फुटलेल्या अभंग मूर्त्या कुठेच पहायला मिळत नाहीत.बरं झालं इस्लामी आणि युरोपीयन आक्रमकांना हे देऊळ कधी सापडले नाही ते.

मी एक एक पायरी उतरतोय. पायर्‍यांवरही कोपर्‍यात एक एका प्राण्याची शिल्पे आहेत. कुत्रा बैल मांजर हे ओळखू येताहेत. ही शिल्पे नुसती दगडावर रेखाटलेली नाहीत तर कोरून काढलेली आहेत.माम्जराच्या विवीश मुद्रा , बसलेले, पाठ उंचावलेले, कान खाजवत असलेले, शेपटी फुगवलेले हल्ल्याच्य तयारीत असलेले. एक एक शिल्प संपूर्ण अभ्यासावे असे.मला शिल्पकलेतले फारसे कळत नाही. पण ही शिल्पे वेगळीच वाटताहेत.ही ना दक्षीणेकडच्या देवळातली दिसतात ना इतर कशासासरखी, मांजरची शिल्पे हे तर सुमेरीयन शैलीचे वैशिष्ठ्य, ते इथे कसे काय?
मी एक एक पायरी खाली उतरतोय.प्रवेशद्वाराचे कमान . कमानीवर दोन्ही खांबावर व्याळ आहेत. त्यांनी प्रवेशद्वाराची कमान पेलली आहे. कमानीसहीत संपूर्ण प्रवेशद्वार एका दगडात आहे एकसंध. कमानीवर फुले कोरलेली आहेत.कमळाची नाहीत. अरे हां ..... ही तर धोत्र्याचे फुले. जास्वंदीसारखी वाटतात . पण जास्वंद नाही. धोत्र्याची फुले त्यांच्या लांबट पानांमुळे ओळखू येतात. त्या कमानीवरून नजर काढाविशी वाटत नाहीय्ये.
पाठीवरच्या सॅकमधून कॅमेरा काढायचीहोते. नशीब ही सॅक वॉटर टाईट आहे. मघाशी त्या खंदकात पडलो तेंव्हा पाणी आत गेलेले नाहिय्ये.मी कॅमेरा काढतो. फटाफट सात आठ फोटो काढतो.अजून तीन पायर्‍या उतरतो. एका विस्तीर्ण दालनात आलोय. दगडी फरसबंदी , अधूनमधून छत तोलायला दगडी खांब. प्रत्येल खांबावर एक मांजर कोरलय.खांबाच्या तळाशी नाग युगुले आहेत. विळखा घातलेली. मधेच कुठे श्रीयंत्र असते तशी चौकोन षटकोनी नक्षी. खांबाचा आकार गोल पण चुण्या पाडाव्यात तशा उभ्या वळत वळत वर जाणार्‍या रेषा.खांबाच्या तळापासून वर वर नजर खांब जिथे छताला भिडतो तिथे जाते. धोतर्‍याच्या फुलांच्या उमलून पाकळ्या पसराव्या तशा पाकळ्यांमुळे खांब छताशी एकजीव झालाय. छतावर घंटा वेली फुले दगडात कोरली आहेत.
हे सगळे पहाताना नजर भिंतीकडे जाते. दगडी भिंतीवरही मूर्ती कोरलेल्या आहेत. देवता की उपदेवता ते नक्की कळत नाही. सगळ्या मूर्ती पाच साडे पाच सहा फुट उंचीच्या आहेत. बहुतेक मूर्ती माही ना काही करत आहेत. बैल हाकणारा शेतकरी , मडके घडवणारा कुंभार, घोड्यावर बसलेला योद्धा , तलवार ढाल घेऊन युद्ध करणारे दोघेजण, कुस्ती खेळणारे मल्ल , अनेक शिल्पे , लोकांचं जगणं दाखवणारी अशी शिल्पे कुठेच पहायला मिळत नाहीत. या शिल्पांच्या चेहेर्‍यावरचे भाव इतके जिवंत आहेत की आत्ता आपल्याशी बोलायला लागतील असं वाटतंय. मी कॅमेरा सरसावतो. फटाफटा फोटो घ्यायला लागतो. काही फोटो फ्लॅशवर तर काही नैसर्गीक अंधार उजेडाचा खेळ करत, मूर्तीचा चेहेरा वगैरे बारकावे टिपतोय. मागे वेरूळला गेलो होतो तेंव्हा तिथे लाईटचा अँगल बदलला की शिल्पाच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलायचे हे पाहिले होते. म्हणून प्रत्येक शिलाचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढतो.सगळी शिल्पे अभम्ग, वार्‍याचा उन्हापावसाचा काहीही परिणाम झालेला नाहिय्ये.
गरुडाची , घुबडाची , मांजराची ..... अरे हे काय हा तर डायनासॉर टरॅनोसोरस रेक्स, हा पण आहे इथे! म्हणजे ज्यावेळेस हे मंदीर घडले त्या काळी घडवले त्या काळी लोकांना डायनोसॉर माहीत होते! आश्चर्य माझ्या ओसंडुन वहात असावे.
एक एक खांब म एक एक भिंत या शिल्पानी नटली आहे.सगळी शिल्पे प्रमाणबद्ध . आजवर अज्ञात असलेले ही शिल्पे पहाणारे आम्ही दोघेच. मनात एक पुसटशी भावना आली. अंगावर काटा आला. महेश तिकडे उजवी कडच्या भितीवरचे पॅनेल पहातोय.उजेडात . मोबाईलच्या टॉर्चचा उजेड त्यांच्यावरून फिरतोय. ही सगळी शिल्पे ग्रीक सुमेरीयन, भारतीय , इजिप्त चिनी अशी काहिशी सम्मीश्र शैलीत .
सभा मंडपात कॅमेराला काय काय टिपावं असं झालय.माझे लक्ष्य गाभार्‍या कडे जातं. एका महिरपवजा कमानीतून गाभार्‍यात उतरायला पायर्‍या आहेत. मी पायर्‍या उतरून आत येतो. येताना त्या दगडी महिरपीवर एका बाजूला ओळखू येईल अशी मूर्ती . विरुपाक्षाची माझ्या मते. दुसर्‍या बाजूला चार डोकी असलेले हरीण.
मी गाभार्‍यात उतरतो.सभा मंडपात आणि गाभार्‍यात जाणवलेले एक गोष्ट इथं सगळं स्वच्छ आहे. पाला पाचोळा धूळ असं काहीच नाही. कोणीतरी या जागेची परिसराची स्वच्छता राखत असावेत. कदाचित गावातलेच कोणी येत जात असतील.
मी गाभार्‍यात आलोय. हे एक अष्टकोनी दालन आहे. छताला असलेल्या झरोक्यातून प्रकाश येतोय. प्रशस्त गाभार्‍यात समोरच मध्यभागी एम छोटा दगडी चौथरा त्यावर शिवलिंग , पण नेहमी असते तसे गोल आकाराचे नाही.अष्टकोनी. शिवलिंगावर शाळुंकेच्या जागी एक मानवी चौमुखी डोके. दगडीच पण त्या चेहेर्‍यावरचे भाव , ते विकट हास्य आणि तुमचा थेट वेध घेणारे डोळे. इतकं जिवंत वाटतंय पहिल्यांदा पालिलं तेंव्हा अंगावर काटाच आला. डोकम चौमुखी आहे , चारही बाजूंना एक एक मुख. चार मुखे पण प्रत्येकाची ठेवण वेगळी आहे. समोर दिसतय त्याला पात्तळ धारधार नाक मोठे डोळे, रुंद जिवणी ,एखाद्या ग्रीक शिल्पा सारखे. डाव्या बाजुचे मुख आहे त्याला जाड रुंद फुगवलेले नाक , नाकपुडीला दोन्ही बाजुने किंचीत मुरड घातलेली.जाड ओठ, आत्ता बाहेर येतील असे वाटणारे डोळे, अफ्रिकन वंशाचा असतो तश्या माणसाचा हा चेहरा , उजवीकडचे मुख गालाचे उंचवटे वर आलेले,नाक बसकट , डोळे लहान अरुंद जिवणी , छोटी हनुवटी चिनी मंगोल वंशाची सगळी लक्षणे आहेत यात. मागच्या बाजूचे मुख ...आडवे डोळे , थोराड वाटावा असा चेहरा, नाक धारधार पण पातळ नाही. फताडेच म्हणूयात. या सगळ्या चेहेर्‍यांवर एक विलक्षण रागीट कृद्ध भाव. चढत्या क्रमाने, मागच्या बाजूच्या मुखाचा खालचा ओठ दातानी दाबलाय.... आत्ता रक्त निघेल इतका
मुंबईत घारापुरी लेण्यात पाहिलेल्या अंधकासूर वधाची गोष्ट सांगणार्‍या शिल्पाची आठवण व्हावी असे शिल्प.
अगदी फोटो काढावा तसे आणि इतके बारकावे दगडात टिपणार्‍या त्या अनामिक शिल्पकाराला लाख वेळा कडक सॅल्यूट केला तरी कमी पडेल.. ग्रेट हा शब्द ही थिटा पडतोय.
मी कॅमेराने धडाधड फोटो काढत सुटलोय काय टिपू आणि काय नाही असं झालंय. ती चौमुखी शाळूंका , त्या चारही मुखांवरचे रागीट भाव मी पुन्हा पुन्हा कैद करतोय. गाभार्‍यात भिंतींवर अनेक कोनाडे आहेत. प्रत्येक कोनाड्यात अखंड मूर्ती ऐवजी फक्त शीर आहे. प्रत्येक शीराच्या चेहेर्‍याची ठेवण वेगवेगळी आहे. द्रविड , मंगोल , ग्रीक अफ्रिकन, ठळक लक्ष्यात येणारी. काही संमिश्र , काहींचे डोळे मिटलेले, काहींचे अर्धवट उघडे. वेदना दु:खे प्रत्येक चेहेर्‍यावर स्पष्ट जाणवते. एका कोनाड्यात एका स्त्रीचे शीर आहे. तिच्या शेजारी एक लहान बाळाचे शीर. स्त्रीच्या डोळ्यावाटे बाहेर पडणारे अश्रुही जाणवतात.
मी सगळ्या पुतळ्यांचे फोटो पुन्हा पुन्हा काढतोय , न थांबता. ही असली शिल्पे कधीच पहाण्यात सोडा वाचनात किंवा ऐकण्यातही आली नाहीत. नाही म्हणायला सातारच्या पाटेश्वरच्या डोंगरात काही वेगळी शिवलिंगे आहेत हे ऐकलंय. पण ती म्हणए अघोरपंथीयांची असावीत असे म्हणतात.
ही कसली शिल्पे ना बौद्ध ,ना ग्रीक ,ना शाक्त. कसली आहेत तेच समजत नाहिय्ये.विशेष म्हणजे या मंदीरात इतकी स्वच्छता असूनही कोणी कधी पूजा केल्याच्या काहीच खुणा दिसत नाहियेत. फुले निर्माल्य, उदबत्तीची जळून उरलेली काडी भिंतीवर धुराची काजळी , जमिनीवर दिवे लावताना सांडलेल्या तेलाचे डाग, विझलेल्या पणत्या अशा जुन्या देवळात हमखास सापडणार्‍या वस्तु इथे अजिबात नाहीत. बंद मंदीरात असतो तसा कुबट वास नाहिय्ये. नक्कीच कोणीतरी इथे वावरतय. स्वच्छता ठेवतय.
..... पण मग पूजा..... फुले काहीच कसं नाही. तसं पूजा करायला इथे देवाची मूर्ती ही नाहिय्ये म्हणा.
त्या अष्टकोनी गाभार्‍याच्या कानाकोपर्‍यातून माझ्या कॅमेर्‍याची नजर फिरतेय. एका कोपर्‍यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.

क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बारा भाग झाले, मेदुचा भुगा झालाय पण समजेना नक्की काय शेवट करनार आहात, आजुन कोणाला काही समजलं आहे का? वाचतोय आम्ही, वाट पाहुन वाचतोय.

रंगीला रतन's picture

15 Jan 2022 - 1:23 am | रंगीला रतन

वाचतोय

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jan 2022 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटी सापडले मंदीर,
आता पुढे काय होणार?
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2022 - 1:00 pm | चौथा कोनाडा

अदभूत ..... केवळ अदभुत !

त्या अष्टकोनी गाभार्‍याच्या कानाकोपर्‍यातून माझ्या कॅमेर्‍याची नजर फिरतेय. एका कोपर्‍यात काहितरी हालचाल जाणवतेय. कोणीतरी तिथे उभे आहे.

झेलेअण्णा असणार ! आणि हे सगळे "चकवा लागलेल्या भासमान अवस्थेतील" वर्णन असणार !

क्रमशःभाऊ, येऊ द्या पुढचा भाग लवकर !

Yogesh Sawant's picture

15 Jan 2022 - 8:25 pm | Yogesh Sawant

ईगल्स च्या हॉटेल कॅलिफोर्निया सारखं काहीतरी वाटतंय

विजुभाऊ's picture

16 Jan 2022 - 12:00 pm | विजुभाऊ

पुढील भाग ध्रांगध्रा - १३ http://misalpav.com/node/49786

सौंदाळा's picture

18 Jan 2022 - 6:02 pm | सौंदाळा

मस्तच
मिपाच्या झेले अण्णांची आठवण झाली, हल्ली दिसत नाहीत.

हा देखील भाग उत्तम जमलाय मात्र शुद्धलेखनाच्या भरपूर चुका आहेत. बहुतेक घाईत टंकल्यामुळे तसे झाले असावे. संपादक मंडळास सांगून सुधारणा करता आली तर बघा. चांगल्या मालिकेत खडे लागू नये म्हणून एक सुचना.

मला आढळलेल्या टंकनचुका :
बहुतेक मूर्ती माही ना काही करत आहेत.
शिल्पे अभम्ग,
आश्चर्य माझ्या ओसंडुन वहात असावे.
प्रशस्त गाभार्‍यात समोरच मध्यभागी एम छोटा दगडी
डोकम चौमुखी आहे
पण ती म्हणए अघोरपंथीयांची असावीत

विजुभाऊ's picture

20 Jan 2022 - 8:16 am | विजुभाऊ

नोटेड......

सुखी's picture

31 Jan 2022 - 1:49 pm | सुखी

भारी