अवघाचि संसार - आणि पुढे

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
9 Nov 2021 - 10:55 pm

आधीचे भाग
अवघाचि संसार-हिंदळे

अवघाचि संसार- हिंदळे-२

अवघाचि संसार- जांभुळपाडा

अवघाचि संसार - कल्याण

अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ

गोपाळरावांना चाळीतल्या दोन खोल्या मिळाल्यामुळे डोक्यावरील छपराची चिंता तात्पुरती तरी मिटली.कोर्टाची केस पुढे सरकत राहिली आणि इकडे दोन्ही भावांचे आयुष्यही. यथावकाश खटल्याचा निकाल लागला आणि घराचा अर्धा हिस्सा मुकुंदाला मिळावा असा कोर्टाचा आदेश झाला.मात्र सामायिक विहिरीवर दोन्ही भावांचा समसमान हक्क राहील असेही निकालात होते. थोडक्यात मुकुंदाच्या मनासारखे झाले. गोपाळरावांना त्यामानाने कमी हिस्सा मिळाला होता, पण किमान घर सोडावे लागले नव्हते यात समाधान होते. देव्हाऱ्यातील कालभैरवाच्या मूर्तीला साख्ररेचा नैवेद्य दाखवून गोपाळरावांनी आनंद व्यक्त केला. आपल्या डोळ्यादेखत घराची वाटणी झालेली बघून आधीच वयोवृद्ध झालेले रामचंद्र मात्र मनाने फारच खचले. ज्या गावात आपण पाय रोवून उभे राहिलो, कर्तृत्व दाखवले,घर बांधले तेथेच आपल्या मुलांनी आपल्याला मान खाली घालायला लावली याचे त्यांना अनिवार दुःख झाले. हळूहळू या धक्क्याने ते खंगत गेले आणि एक दिवस त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. वर्षभरातच गोदावरीबाईंनीही त्यांचाच मार्ग धरला.

इकडे गोपाळरावांना अंबरनाथचे घरही ताब्यात मिळाले होते.पण आता तिकडे राहायला जायची गरज नव्हती . त्यामुळे ते तसेच पडून राहिले. या दरम्यान एकदा ते काही कामानिमित्त अंबरनाथला गेले असता मालुताई नावाच्या एका शिक्षिकेने त्यांना त्या जागेबद्दल विचारणा केली. मालूताईंना एक बालवाडी सुरु करायची होती आणि त्यासाठी त्या जागेच्या शोधात होत्या. गोपाळराव जरी फारसे शिकलेले नसले तरी शिक्षणाचे महत्व चांगलेच जाणून होते. आपली जागा सत्कार्यासाठी वापरली जातेय म्हटल्यावर ते मालूताईंना जागा द्यायला तयार झाले. शिवाय त्यांना म्हणाले " हे बघा मालुताई,माझ्या जागेत विद्यादानाचे कार्य होणार, यातच मला समाधान आहे. मला त्याचे भाडे नको." आणि हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळले. पुढे मालुताई जाईपर्यंत तिथे शाळा सुरु राहिली.

इकडे गोपाळरावांची मुले मोठी होत होती. प्रभाकर आणि नारायण दोघांची शाळा चालू झाली.शिवाय सकाळी नमस्कार मंडळात व्यायाम,मल्लखांब, संध्याकाळी आसपासच्या वाड्यांमध्ये वेगवेगळे खेळ, किंवा खाडीच्या काठी मोकळे चरायला सोडलेल्या घोड्यांवर स्वारी, नाहीतर खाडीत पोहणे ,पुलावरून पाण्यात उड्या मारणे अशा खेळांमुळे दोन्ही मुलांच्या तब्येती दणकट होत्या. वडील सालस होते पण मुलांची अरे ला कारे करायची खुमखुमी होती. त्यामुळे कधी कधी होणारी हमरीतुमरी,मारामाऱ्या सोडल्यास सगळे आलबेल चालू होते. मात्र गोपाळरावांच्या तुटपुंज्या उत्पन्नात किती भागवणार? ते नेहमी म्हणायचे "मी तुमच्यासाठी पैसाठेवला नाही ,पण भरपूर पुण्य करून ठेवले आहे." पण जगायला तर पैसाच लागतो ना? शेवटी एक दिवस गोपाळरावांनी मुलांना जवळ बोलावले, आणि म्हणाले"हे बघा मुलांनो, मला जितके जमले तितके मी तुम्हाला शिकवले. दहावीनंतर शिकायचे की नाही हे मात्र मी तुमच्यावर सोडतो.माझी शक्ती संपली. आता तुम्ही नोकरी करून शिका."

वडील म्हणाले तशीच परिस्थिती आहे हे तर मुलांना वेगळे सांगायला नकोच होते. त्यामुळे मोठ्या प्रभाकरने तर लगेचच नोकरी शोधायला सुरुवात केली. नारायणची शाळा अजून बाकी होती, पण त्यानेही मनाशी खूणगाठ बांधून ठेवली. दिवस,महिने,वर्षे सरत गेली.प्रभाकर पुढे छोट्या मोठ्या नोकऱ्या करत करत मेहनतीने शिकत राहिला आणि एम ए ,पी. एच. डी. झाला. नारायण मात्र फार शिकू शकला नाही, तरीहि जिद्दीने इंटर पर्यंत शिकून त्याने पुढे शॉर्ट हॅन्ड आणि टायपिंग चांगलेच आत्मसात केले आणि त्या जोरावर चांगली नोकरीहि मिळविली. काळ बदलत चालला होता. आता घराला थोडे बरे दिवस आले होते. दोन्ही मुले शिकून नोकरी करू लागली होती. घराची ओढगस्त लहानपणापासून बघितली असल्याने पौरोहित्य करायचे नाही अशी खूणगाठ त्यांनी लहानपणीच बांधली होती. पण मग दुसरे काय करायचे? याचेही उत्तर पुढे शिकल्याने मिळाले होते. धोतर टोपी घालून घरोघरी पूजा सांगत हिंडण्यापेक्षा शर्ट पॅंट घालून आगगाडीने बोरीबंदरास जाण्यात जास्त मजा होती. जमाना बदलला होता. कल्याणात रिक्षा आणि टांगे आले होते. चालत जाणारे लोक होतेच, पण एक आण्यात टांग्यात बसून कल्याण स्टेशनवर जाण्यात वेगळीच ऐट होती.

पुढे प्रभाकरचे लग्न झाले. त्याला सुंदर सुशिक्षित बायको मिळाली त्यामुळे गोपाळरावांनाही मोठा मुलगा मार्गी लागल्याचे समाधान वाटले. एक दिवस काही सरकारी कामानिमित्त गोपाळराव प्रभाकरला बरोबर घेऊन ठाण्याला निघाले होते. टांग्याने स्टेशनवर पोचून प्रभाकरने दोघांची तिकिटे काढली आणि बापलेक जिना चढून जाऊ लागले, पण अर्ध्यातच गोपाळरावांना छातीत कसेतरी होऊ लागले. धड श्वास घेता येईना आणि पुढे पाऊलही टाकता येईना.कपडे पूर्ण घामाने भिजले. त्यांनी प्रभाकरचा हात घट्ट धरून ठेवला पण सगळे भोवतालच जिथे गरगर फिरत होते तिकडे तो बिचारा एकटा तरी कसा पुरा पडणार?परिस्थितीचे गांभीर्य प्रभाकरच्या कधीच लक्षात आले होते पण वडिलांना एकटे सोडून जावे कि डॉक्टरांना बोलवावे अशा विवंचनेत तो सापडला. आणि अचानक छातीत एक जीवघेणी कळ येऊन गोपाळरावांची मान प्रभाकरच्या मांडीवर कलंडली. (क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

काय तुमच्या मनात आहे काही कळत नाहीये.

काही आवर्तने दाखवण्याचा उद्देश आहे का? नवी पिढी, मुले, नोकरीव्यवसाय, घर, लग्न, वार्धक्य, मृत्यू.. आणि या पार्श्वभूमीवर भाऊबंदकी आणि बदलता काळ हा समान धागा अशी मांडणी वाटते आहे. पण आता मात्र कोणती पिढी जिवंत आहे, त्यांची नावे आणि त्यांचे आईवडील, आजीआजोबा अशी सर्व नावे लक्षात राहणे अवघड होऊ लागले आहे. विशेषत: एकेका भागात सर्वसाधारण एकाच प्रकारे एकेक पिढी पडद्याआड जात आहे. पुढे काही कलाटणी मिळेल अशी आशा.

लेखनशैली अर्थात आवडलीच आहे..

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2021 - 12:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

गोष्ट जशी घडली तशी सांगत जातो आहे. "दिलका हाल सुने दिलवाला,छोटीसी बात ना मिर्च मसाला" टाईप....त्यामुळे तुम्ही सांगितलेला सारांश साधारण्तः बरोबर आहे.

हे आवडलं.. कथा म्हणजे ट्विस्ट, सस्पेंस असे असलेच पाहिजे असे नाही हे मान्य.

मुक्त विहारि's picture

12 Nov 2021 - 10:55 am | मुक्त विहारि

कथामालिका आवडत आहे

प्रचेतस's picture

12 Nov 2021 - 2:51 pm | प्रचेतस

लेखमालिका सुरेख आहे.

श्वेता व्यास's picture

15 Nov 2021 - 3:00 pm | श्वेता व्यास

मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात पिढ्यांप्रमाणे झालेले बदल सर्वसाधारण असेच असावेत, मालिका आवडते आहे.