अवघाचि संसार - अनगाव ते अंबरनाथ

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
3 Nov 2021 - 5:16 pm

आधीचे भाग

अवघाचि संसार-हिंदळे
अवघाचि संसार- हिंदळे-२
अवघाचि संसार- जांभुळपाडा
अवघाचि संसार - कल्याण
अवघाचि संसार- पुन्हा कल्याण
अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

हरभटांच्या जाण्याने रामचंद्रांचा एक आधारवडच गेला. त्याला कल्याणात जम बसवायला मदत करणारे लेले शास्त्री, काळे गुरुजी, अभ्यंकर शास्त्री तर आधीच पैलतीरी पोचले होते.अडीनडीला सल्ला विचारावे असे वडीलधारे माणूस न उरल्याने काही काळ रामचंद्र सैरभैर होऊन गेला. पण अखेर मागे राहिलेल्यांना रोजचे जगण्याचे प्रश्न सोडवावेच लागतात. जीवन काही एका जागी थांबत नसते. गोदावरीने त्याला सावरायला खूपच मदत केली. हळूहळू रामचंद्र, पत्नी आणि मुलांकडे बघून मागचे विसरून जाण्याचा प्रयत्न करीत होता. या त्याच्या प्रयत्नात त्याचे काही मित्रही त्याला जमेल तशी मदत करीतच होते. कामाच्या व्यापात गुरफटणे हाच दुःख विसरण्याचा एक उत्तम मार्ग असावा. आताशा रामचंद्रांची कल्याणातील प्रतिष्ठित समाजात ओळख पाळख वाढली होती. मोठे शहर असल्याने लग्न,मुंजी,पूजा,सण समारंभ, होम हवन असे काहींना काहीतरी चालू असायचेच. शिवाय आसपासच्या गावांमध्येही जावे लागत असे त्यामुळे त्याची बऱ्याच ठिकाणी उठबस होत असे. एकीकडे मुले मोठी होत होती. त्यांचे व्रतबंध होऊन शेंड्या आल्या होत्या.गोपाळ मोठा मुलगा असल्याने त्याने आपली परंपरा पुढे चालवावी असे रामचंद्रांना वाटत होते. परंतु त्याला पौरोहित्याचे पुढचे शिक्षण देण्यासाठी एखाद्या चांगल्या पाठशाळेत घालणे जरूर होते.

एकदा असेच एका कामाच्या निमित्ताने भिवंडीजवळच्या अनगावला जाणे झाले असता तेथील रानडे गुरुजींची वेदपाठशाळा रामचंद्रांना आवडली. एकतर रानडे गुरुजींकडे वेदाध्ययनाची परंपरा होती, आणि मुख्य म्हणजे ती टिकवण्याची आच होती. इथे विद्यार्थ्यांना राहायची सोय होती. घरी दूध दुभते भरपूर दिसत होते शिवाय थोडीफार शेतीवाडी, कवाड वगैरे आसपासच्या गावांमध्ये होती. एकूण व्यवस्था चांगली वाटल्याने गोपाळला पुढील शिक्षणासाठी अनगावला ठेवायचे नक्की झाले. गोपाळची शिक्षणाची सोय चांगली झाल्याने रामचंद्र गोदावरीबाई दोघांनी समाधानाचा निश्वास टाकला. इकडे मुकुंदही वयात येत होता. पण त्याला पौरोहित्याची फारशी आवड न दिसल्याने रामचंद्र त्याच्या मागे लागले नाहीत. यथावकाश त्याने शिक्षणाच्या जोरावर सरकारी नोकरीत प्रवेश मिळवला.

इकडे २-३ वर्षात गोपाळने त्याचे वेदाध्ययन उत्तम रीतीने पूर्ण केले आणि रानडे गुरुजींची शाबासकी मिळवली. येताना रानडे गुरुजींच्या पाय पडायला गेला असताना मात्र गुरुजींनी त्याच्याकडून एका गोष्टीचे वचन मागितले. गुरुजी म्हणाले " गोपाळ, वेदाध्ययन पूर्ण करून आता तू दशग्रंथी ब्राम्हण झालास. तू हुशार आहेसच.तुझ्या विद्येच्या जोरावर पुढे सगळे चांगलेच होईल. पण जायच्या आधी मला गुरुदक्षिणा काय देशील?" गोपाळ विचारात पडला. आत्ता या घडीला घरून निघताना घेतलेल्या सामानाशिवाय माझ्याकडे काय आहे जे मी देऊ शकतो? रानडे गुरुजी लोभी तर नव्हतेच. त्यामुळे पैसे अडका देण्याचा प्रश्नच नव्हता.मग काय द्यावे बरे गुरुदक्षिणा म्हणून? पण त्याचा प्रश्न गुरुजींनीच सोडविला. ते म्हणाले" असे बघ, लग्नकार्य लोक हौस म्हणून करतात, त्यामुळे त्याची दक्षिणा घेणे काही वाईट नाही.परंतु व्रतबंध हा एक संस्कार आहे, आणि ब्रह्मचर्याश्रमाची व विद्या ग्रहणाची सुरुवात तेथून होते. तेव्हा एखादया गरीब माणसाच्या मुलाचे व्रतबंध संस्कार जर केवळ पैशाअभावी होत नसतील, तर ते तू फुकटात करून द्यावेस एव्हढी गुरुदक्षिणा मला दे." गोपाळला गुरुजींच्या वृत्तीचे मोठे कौतुक वाटले. सगळ्याच गोष्टी पोटासाठी नाही तर काही गोष्टी समाजासाठी सुद्धा करायच्या असतात हा मोठा धडा तो त्या दिवशी शिकला आणि पुढे आजन्म ते व्रत त्याने पाळले.

गोपाळ कल्याणला परतला आणि वडिलांना त्यांच्या कामात मदत करू लागला. रामचंद्रांचेही वय वाढत चालले असल्याने त्यांना घरचाच मदतनीस हाताशी आल्याचे समाधान वाटले. आता गोपाळसाठी एकीकडे मुली बघणे सुरु झाले. रामबागेतील जोश्यांची यमुना गोदावरी बाईंच्या माहेरच्या नात्यातील होती. घरचे वळण चांगले होते. मुख्य म्हणजे माहिती मधील कुटुंब होते. त्यामुळे फार काही चौकशी वगैरे करायची भानगड नव्हती. मुलीची पत्रिका मागवून घेतली गेली. रामचंद्रांनी स्वतःच गुणमेलन बघितले आणि उत्तम गुण जुळत असल्याची खात्री करून घेऊन जोश्यांना होकार कळवून टाकला. जोश्यांच्या घरी एकच धांदल उडाली. एकीकडे मुलगी सुस्थळी पडत असल्याचा आनंद तर दुसरीकडे ध्यानी मनी नसताना अचानक लग्न ठरल्याचे आश्चर्य अशा दुहेरी मनस्थितीत ते सापडले.अर्थात गोदावरी बाईंच्या पुढाकाराने पुढच्या सगळ्या गोष्टी भराभर पार पडत गेल्या अन गोपाळ लग्नाच्या बोहल्यावर चढला. चांगला मुहूर्त पाहून यमुना गोपाळचे शुभ मंगल झाले आणि उंबर्यावरचे माप ओलांडून नवीन सून घरात आली. आतापर्यंत घराला एकाच बाईची सवय होती. सगळी सत्ता गोदावरी बाईंच्या ताब्यात होती.पण हळूहळू त्यांनी नवीन सुनबाईला सगळे काही शिकवले.नाहीतरी त्यांना स्वतःला मुलगी नव्हतीच. त्यामुळे यमुना त्यांना मुलीसारखीच वाटू लागली. सगळीकडे ती सासूचा पदर धरून फिरत राही आणि त्या म्हणतील तसे तसे करत असे. मग ते सकाळचा स्वयंपाक असो, दुपारचे रामाच्या देवळातले कीर्तन प्रवचन असो, की सायंकाळची अग्निहोत्र आणि आरती.मुकुंदाची सरकारी नोकरी आता कायम झाली होती तेव्हा यथावकाश त्याचेही लग्न अंबरनाथच्या भिड्यांच्या मुलीशी करून देण्यात आले. त्याचा वेगळा संसार सुरु झाला.

रामचंद्रांचे बरेचसे लक्ष आताशा अध्यात्मात लागले होते.त्यांनी काहीएक जप पूर्ण करायचे मनावर घेतले असल्याने बरेचसे काम आता गोपाळच्या खांद्यावर टाकून ते त्यातच मग्न असत. गोपाळही चांगलाच तयार झाला होता आणि वडिलांची वृत्ती चांगल्या प्रकारे पुढे चालवीत होता.मात्र त्याने रानडे गुरुजींचे शब्द चांगलेच लक्षात ठेवले होते. त्यामुळे आतापावेतो त्याने बऱ्याच गरीब मुलांच्या मुंजी फुकटात लावून दिल्या होत्या. कोणी गरीब माणूस दारात येऊन म्हणे "गुरुजी, मुलाची मुंज करायची आहे, पण द्रव्य नाही हो!!" कि गोपाळ म्हणे " काळजी नको, काय आहे तुझ्याकडे तेव्हढ्यात आपण भागवू, पण मुंज झाली पाहिजे" परंतु या वृत्तीमुळे गोपाळची कीर्ती जरी आसपास पसरत असली तरी पैसे अडक्याच्या नावाने फार बरी स्थिती नसे. जे काही धान्य,फळे, सुकामेवा आणि दक्षिणा मिळे त्यात यमुना घर चालवीत असे. शिवाय कोणी न कोणी विद्यार्थी वार लावून जेवायला असे, दारात माधुकरीला कोणी येत असे. या सर्वांना यथा शक्ती काहीतरी दिले जात असे. भाद्रपद चतुर्थीला तर गोपाळला अजिबात उसंत नसे. प्रथम पहाटे ३ वाजता स्वतःच्या घरच्या गणेशाची प्रतिष्ठापना करून मग तो घरोघरी पूजा सांगायला जात असे. ते सर्व उरकून दुपारी घरी परतायला २-३ वाजत असत. या सर्व धावपळीत यमुनेची मात्र गोपाळला चांगलीच साथ होती.

गोपाळ आणि मुकुंदाचे संसार मार्गी लागले असल्याने रामचंद्र आणि गोदावरी बाईनी हळूहळू संसारातील लक्ष काढून घेतले होते. नव्या सुनांच्या हाती घराच्या चाव्या सोपवून ते निर्धास्त झाले होते. परंतु हळूहळू घरात कुरबुरी वाढू लागल्या. मुकुंदाला पहिल्या दोन मुली झाल्या आणि नंतर मुलगा. तर गोपाळला दोन्ही मुलगे. शिवाय रोजच्या व्यवहारातील कटकटी, आर्थिक अडचणी ह्या होत्याच. मुकुंदाला सरकारी नोकरी होती तर गोपाळ भिक्षुकी करत होता.त्यामुळे उत्पन्नांध्येही फरक होता. हळूहळू भावाभावात पटेनासे झाले. आणि मग मुकुंदाने वाटणीचा विषय लावून धरला. रामचंद्रांना आणि गोदावरीबाईंना फार वाईट वाटले. त्यांनी मुकुंदाला समजवायचा बराच प्रयत्न केला. आतापर्यंत जसे गुण्यागोविंदाने एकत्र राहिलो तसेच राहू असे सांगून पाहिले. वेगळ्या दोन खोल्या आणि चूल देऊ केली, पण तो ऐकेना. घर तसे मोठे होते. पण वाटणी करण्याने दोघांना अगदीच लहान हिस्सा मिळाला असता. शिवाय सामायिक विहीर एका भागात गेली असती त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असता.

शेवटी बरीच वादावादी झाली आणि मुकुंदाने कोर्टाची पायरी चढली. त्याने सरळ सरळ घराची वाटणी करण्याचा दावाच दाखल केला. गोपाळलाही आता दुसरा मार्ग उरला नाही. आलेल्या नोटिशीला उत्तर देणे तर भागच होते. मग रीतसर वकील, कोर्ट,खटला साक्षीपुरावे असे सगळे सुरु झाले. वयस्क झालेले रामचंद्र आणि गोदावरीबाई या सगळ्या तमाशाकडे हताशपणे बघत राहिले. धाकट्याची बाजू घ्यावी तर मोठा रागावणार आणि मोठ्यांची बाजू घ्यावी तर धाकटा , अशा कात्रीत ते सापडले. हळूहळू त्यांचा जीवनातील रस संपत चालला. नव्या युगाशी,वेगाशी जुळवून घेणे त्यांना कठीण जाऊ लागले. एकीकडे रस्त्यावरून धावणाऱ्या मोटारी, तर दुसरीकडे नव्याने सुरु झालेली आगगाडी अशा वेगाने ते भोवंडून जाऊ लागले.

दिवसेंदिवस खटला पुढे सरकत राहिला आणि एक वेळ अशी आली कि गोपाळरावांना भीती वाटू लागली की आपल्याला बेघर व्हावे लागते कि काय? त्यांना अन्नपाणी गोड लागेना. आपण असा काय अपराध केला होता की हि वेळ आपल्यावर यावी? या विचाराने त्यांची झोप उडाली. बरे, नवीन घर घ्यायला रक्कम कुठून आणायची? हा मोठाच प्रश्न होता. प्रभाकर नारायण ही त्यांची मुले अजून लहान होती. त्याची अशी अवस्था यमुनाबाईंना पाहवेना. त्यांचा भाऊ बांधकाम व्यवसायात होता. त्याचे बरे चालले होते. सध्या कुळगाव अंबरनाथ भागात तो काही चाळी बांधत होता. गोपाळराव त्याला भेटले आणि आपली रडकथा मेव्हण्याच्या कानावर घातली. त्यालाही कानोकानी ही गोष्ट समजली होतीच. त्याने गोपाळरावांना धीर दिला. "हे बघा गोपाळराव,कल्याणला काय सोने लागले आहे? आता आगगाडीने कुठूनही कुठेही झटक्यात जाता येते. उद्या निकाल तुमच्या विरुद्ध गेला तर लहान मुलांना घेऊन तुम्ही कुठे राहणार? तेव्हा असे करा. मी अंबरनाथला दोन चाळी बांधतो आहे. तुमच्याकडे जे काय पैसे जमले असतील त्यात दोन खोल्या घेऊन ठेवा. उरलेले पैसे सावकाशीने मला द्या. निदान राहायला छप्पर तरी होईल." गोपाळरावांपुढे दुसरा पर्याय तरी काय होता?त्यांनी घरी येऊन निमूटपणे आपल्या जवळचे थोडेफार पैसे आणि दागिने एकत्र करून अंदाज घेतला आणि मेव्हण्याला रक्कम देऊन चाळीतल्या दोन खोल्या आपल्या नावावर करून घेतल्या.(क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 Nov 2021 - 7:58 pm | मुक्त विहारि

रामायण असो की महाभारत, हिंदू कधीच एकत्र येणार नाहीत

ते रामभाऊंच्या गुरुजींचा परत काहीच पत्ता नाही लागला का? आणि हे लोक गावी सुद्धा कधी नाही गेले का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2021 - 12:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

बोडस गुरुजींच्या कुटुंबाचा पुढे पत्ता लागला नाही. जे वाचले ते इथे तिथे पांगले आणि तगले. हरभट आणि रामचंद्रानंतर हिंदळ्याचा संबंधही संपलाच.

भाऊबंदकी हा कोकणातल्या असंख्य घरांना मिळालेला शापच आहे.
ओघवते लेखन अतिशय आवडले.
आवर्जून वाचावीच अशी ही मालिका आहे.

पाषाणभेद's picture

4 Nov 2021 - 7:30 pm | पाषाणभेद

छान लेखन. वाचतो आहे.

सुचिता१'s picture

7 Nov 2021 - 11:36 pm | सुचिता१

छान ओघवती शैली आहे तुमची!!
पुभाप्र .

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2021 - 12:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

सर्व वाचकांचे धन्यवाद