अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
30 Oct 2021 - 2:24 pm

आधीचे भाग

अवघाचि संसार-हिंदळे
अवघाचि संसार- हिंदळे-२
अवघाचि संसार- जांभुळपाडा
अवघाचि संसार - कल्याण
अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

रामचन्द्र आणि हरभट कल्याणात पावते झाले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. भागीरथीबाई गेल्यापासून हरभटांचे मन संसारातून उडालेच होते. त्यात हिंदळ्यात आता जीवाभावाचे असे कोणीच उरले नव्हते. मुली आपापल्या घरी सुखाने नांदत होत्या, आणि तिकडे गेले तरीहि ४ दिवसांपेक्षा जास्त किती राहणार? त्यापेक्षा इथे कल्याणला राहणे हरभटांना आवडू लागले.

कल्याणचे रामचंद्राचे घर तसे हिंदळ्याच्या मानाने लहानच होते, पण पुरेसे होते. पुढे रस्त्याला लागून दिंडी दरवाजा, छोटे अंगण, तुळशी वृन्दावन आणि इतर झाडे , मग तिपाखी घर त्यात पहिली ओटी , मग एक पायरी चढून वर आल्यावर बैठकीची खोली , नंतर मोठे माजघर आणि त्यावर माळवद , मग स्वयंपाक घर , त्यात दोन चुली, एका बाजूला भांडी घासायची राख आणि काथ्या साठवायचा रांजण,सामान ठेवायची कपाटे, एक दुभत्याचे तर दुसरे भांड्यांचे. एक घुसळखांब आणि जाते. या खोलीला लागून अजून एक दोन साठवणीच्या खोल्या. मग घराचे मागचे दार आणि अंगण. गोदावरीला झाडांची फार आवड त्यामुळे असे मोठे अंगण मिळाल्यावर तिने ती पूर्ण करून घेतली होती. परसात गोदावरीने प्रेमाने लावलेले दोन नारळ , खोबरी आंबा ,फणस, एक दोन चिकू आणि पेरूची झाडे. कुठे कोपऱ्यात रोपलेली केळ तर एक्या बाजूला जाई,जुई,शेवंती,मोगरा, कर्दळ, जासवंद,चाफा, कन्हेर,कोरांटी अशी फुलझाडे. थोडे दुसऱ्या बाजूला गेले की कोपऱ्यात विहीर. देवदयेने तिला बारमाही थंडगार पाणी होते. विहिरीजवळ गवती चहा, तुळस, बेल,ओवा,वेखंड,कडुलिंब, आंबेहळद,नागरमोथा,शिकेकाई,रिठा अशा औषधी वनस्पती लावल्या होत्या.

सकाळी एकदा विहिरीवर अंघोळ आटोपून आले आणि सिद्धेश्वराच्या देवळात दर्शन घेऊन आले की हरभटांचा मुक्काम दिवसभर ओटीवर किंवा बैठकीच्या खोलीतच असे. त्यांचे जेवण खाणंही बरेचदा तिथेच होत असे. दोन गोड नातवंडांना खेळवताना त्यांना नेहमी रामचंद्राचे बालपण आठवत असे.दोघात थोरला गोपाळ शांत आणि समंजस होता तर धाकटा मुकंद जरा मस्तीखोर आणि वांड होता.पण एकूण त्यांच्यात विशेष भांडणे वगैरे व्हायची नाहीत. शिवाय आजूबाजूची बर्वे,काणे,लेले,सहस्रबुद्धे,कर्वे,मोकाशी अशी बरीच मुले एकत्र खेळत असल्याने कोणाचेच आपापल्या मुलांकडे विशेष असे लक्ष नसायचे.जेवण्याच्या वेळेस मुलांना कोणाच्या ना कोणाच्या वाड्यातून शोधूनच आणायला लागायचे. लगोरी,विटी दांडू, आबाधुबी किंवा कधीतरी गम्मत म्हणून मुलींबरोबर काचापाणी, सागरगोटे,कवड्या, पट असेही खेळ खेळले जायचे. सकाळी लवकर उठून हरभट मुलांकडून पाढे,पावकी,निमकी,दिडकी ,तिथी नक्षत्रे वगैरे घोटून घेत असत. पुढे शाळेत पंतोजी या मुलांना नेमून दिलेले विषय शिकवत. संध्याकाळी दिवेलागणीला शुभम करोति, परवचा वगैरे होई, आज्ञाधारक सून ,मुलगा आणि दोन गोड नातवंडे असे एकुणात त्यांचे दिवस बरे चालले होते.

रामचंद्रांची दिनचर्या आता चांगलीच व्यस्त झाली असल्याकारणाने ते बहुतेक वेळ बाहेरच असत. किंवा घरी असत तेव्हाही सतत कोणी ना कोणी भेटायला येत असे. आता खाडीवर पूल बांधला असल्याने कल्याण हे कोन,भिवंडी वगैरे गावांशी चांगलेच जोडले गेले होते.बैलगाडीऐवजी मोटारगाडी सुरु झाली होती. त्यामुळे एका दिवसात भिवंडीस जाऊन येणे शक्य झाले होते. तसेच भुईडोंगरीच्या पुलामुळे नेतिवली,सागाव,पाथर्लि वगैरे बाजूही जवळ आल्या होत्या.तिसरीकडे कुळगाव,अंबरनाथ वगैरे होतेच. एकूणच कल्याणचा परीघ विस्तारला जात होता आणि त्याचमुळे कामेही वाढली होती.

दिवस,महिने,वर्षे सरत गेली आणि कालमानाने हरभटांची श्रुती,स्मृती,वैखरी मंदावू लागली. पैलतीर दिसू लागला.आताशा सकाळचे सिद्धेश्वरास चालत जाणेही त्यांना त्रासदायक वाटू लागले होते. पूर्वी नातवंडांना कडेवर घेऊन खेळवणारे हरभट आताशा त्यांचाच आधार घेऊन उठू बसू लागले. दिवसभर ओटीवर बसून गतायुष्याचे चिंतन करणे हेच त्यांचे काम बनले. पूर्वी एकदा त्यांनी रामचंद्राकडे काशीला जायची इच्छा व्यक्त केली होती , ती त्यांनी त्याला परत बोलून दाखवली.वडिलांची तब्येत बघता त्यांना काशी यात्रा जमेल का असा रामचंद्राला प्रश्न पडला, परंतु अखेर हरभटांच्या हट्टाखातर त्याने त्यांना काशी दर्शन करवून आणलेच. येताना हरभटांनी काशीहून हट्टाने कालभैरवाची दगडी मूर्ती आणली. अखेर ते त्यांच्या हिंदळ्याचे ग्राम दैवत होते. त्यामुळे ते देव्हाऱ्यात असावे हि त्यांची भावना होती.सुरेख कोरीव काम असलेली एका हाती धनुष्य, दुसऱ्या हाती बाण, तिसऱ्या हाती तलवार आणि चौथा वरदहस्त अशी चतुर्भुज मूर्ती त्यांनी रामचंद्रांच्या घरी देव्हाऱ्यात ठेवली. आता जरी सिद्धेश्वरास जाता आले नाही तरी त्यांना घरीच देवदर्शनाचे समाधान मिळू लागले.

लवकरच पावसाळा सुरु झाला आणि सगळी झाडे वेली हिरव्यागार झाल्या. खाडी लाल पाण्याने दुथडी भरून वाहू लागली. नवीन सृजनाची रूपे सर्वत्र दिसू लागली. गोगलगायी धावपळ करू लागल्या , गांडूळे बिळातून बाहेर आली ,बेडकांची डराव डराव सुरु झाली.आठाठ दिवस पावसाची संततधार असल्याकारणाने घराबाहेर पडणे कमी होऊ लागले. सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले. आणि अशातच एक दिवस रामचंद्र काही कामासाठी नारिवली कुशीवलीला गेला असताना इकडे हरभटांनी डोळे मिटले. मोठ्या गोपाळच्या नक्की काय झाले ते लक्षात येईना पण आजोबा नेहमीप्रमाणे हालचाल करत नाहीत हे बघितल्यावर त्याने धावत जाऊन आईला बोलावून आणले.गोदावरीच्या लक्षात लगेच सर्व परिस्थिती आलीच. केव्हातरी हे होऊ घातलेच होते, पण ती वेळ प्रत्यक्ष आल्यावर मात्र तिची तारांबळ उडाली. तिने गोपाळला सांगून देव्हाऱ्यातील गंगेचा गडू आणला आणि तो फोडून हरभटांच्या तोंडात पाणी घालायला आणि तुळशीपत्र ठेवायला सांगितले. पुन्हा गोपाळला दोन चार ओळखीच्या ठिकाणी जाऊन निरोप द्यायला सांगितले. हळूहळू लोक जमू लागले. तोवर दुपार झाली आणि रामचंद्र घरी परतले. घरापुढे गर्दी बघून त्यांना परिस्थितीचा अंदाज आलाच.तातडीने पुढची कार्यवाही त्यांनी आपल्या हातात घेतली.
झटपट ठिकठिकाणी निरोप पाठवून कामाची माणसे बोलावली. स्मशानात निरोप धाडला. पुढचे दहा बारा दिवस अतिशय गडबडीत गेले. नातेवाईकांना निरोप गेले होतेच.एकेक करून ती मंडळी येऊन जात होती. सांत्वन करीत होती. सल्ले देत होती. अखेर सगळे संस्कार यथासांग पार पडले.एक पर्व संपले. सपिंडी श्राद्ध वगैरे होऊन हरभट अनंताच्या प्रवासाला निघाले.(क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Oct 2021 - 2:29 pm | प्रचेतस

हा भागही खूप आवडला. ओघवते लिखाण आणि झरझर निघून जाणारा काळ. जुन्या काळचे वर्णन सुरेख.

कुमार१'s picture

30 Oct 2021 - 2:47 pm | कुमार१

छान चालू आहे लेखमाला

उत्तम शैली आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

जेपी's picture

30 Oct 2021 - 11:12 pm | जेपी

+1

मुक्त विहारि's picture

1 Nov 2021 - 11:21 am | मुक्त विहारि

हा पण भाग आवडला

श्वेता व्यास's picture

1 Nov 2021 - 3:57 pm | श्वेता व्यास

+1
पुभाप्र

जुन्या काळचे वर्णन सुरेख. >>> +++१