अवघाचि संसार- पुन्हा कल्याण

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
24 Oct 2021 - 3:52 pm

आधीचे भाग
अवघाचि संसार-हिंदळे

अवघाचि संसार- हिंदळे-२

अवघाचि संसार- जांभुळपाडा

अवघाचि संसार - कल्याण

जांभूळपाड्यात राहण्यात आता काहीच अर्थ राहिला नव्हता कारण मुळात गावाचा आणि गावकऱ्यांचाच पत्ता नव्हता तर राहणार कुठे आणि करणार काय? तस्मात ही सर्व मुले आपापल्या गावी परतली आणि रामही हिंदळ्यात परत आला. राम असा अचानक परत येईल असे कोणालाच वाटले नव्हते तयामुळे प्रथम आश्चर्य , मग चिंता असे क्रमाक्रमाने जात सगळ्यांनी त्याची कथा समजून घेतली. तिकडे थोर पाऊस झाल्याची वार्ता हिंदळ्यातही पोचली होती पण एव्हढी वाताहत झाली असेल अशी मात्र कुणाला कल्पना नव्हती. आता रामच्या तोंडून चक्षुर्वेसत्य घटना ऐकल्यावर सर्वांना तिथे काय हाहाकार उडाला असेल याची चांगलीच कल्पना आली. देवाच्या कृपेने ही मुले त्यावेळी कल्याणला असल्याने त्यांचा जीव वाचला हेही समजले .एकुलता एक मुलगा वाचल्याने हरभटांनी देवाचे शतशः आभार मानले आणि कालभैरवाला अभिषेकही घातला. काही दिवसात राम हिंदळ्यात रुळला आणि मग आपल्या काकाने केलेले उद्योग त्याच्या नजरेस येऊ लागले. अर्धी बाग हातची गेली होती, घर आणि उरलेल्या बागेबद्दल कोर्टात केस चालू होती. इतरही बारीक सारीक त्रास होतेच.पण हरभटांना मात्र रामने या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावे आणि आपला मार्ग शोधावा असे वाटत होते. त्यामुळे ते रामला या सर्व कटकटींपासून लांबच ठेवत. रोजच्या त्याच त्याच दिनचर्येचा रामलाही कंटाळा येऊ लागला. रोज उठून करणार काय? खण्डाने दिलेल्या शेतीचे उत्पन्न एकदाच दसऱ्याला येणार, त्यात करण्यासारखे काही नाही. बागेतील नारळ सुपार्यांची देखभाल करायला आणि गोठयाकडचे बघायला एक गडी.त्याच्यावर देखरेख करायची गरज नाही.इतर वेळी छोट्याशा गावात वेळ घालवायचे आणि उत्पन्नाचे काही साधन नाही. मग रामसारखा तरुण माणूस करणार काय?व्यापार धंदा करावा तर तो आपला पिंड नाही आणि भांडवल नाही. नोकरी करावी तर जे शिकलो त्याचा इथे उपयोग नाही अशा कात्रीत तो अडकला.

शेवटी काही एक विचार करून एक दिवस तो हरभटांना म्हणाला "बाबा, मला इथे करमत नाही. मी परत जातो आणि काही कामधंदा करता येतो का बघतो." "अरे पण तिकडे जांभूळपाड्याला उरलेय काय?" हरभट म्हणाले . ते ही खरेच होते म्हणा. ना तिथे गाव उरले होते ना गुरुजी. आणि शिक्षणही जवळपास पूर्ण झाले होते. राम पुन्हा विचारात पडला. आणि विचार करता करता त्याच्या मनात कल्याणचा पर्याय आला. कल्याण मोठे शहर होते,नुकताच तिथे राहून आल्यापासून त्याच्या ते मनात भरले होते.शिवाय तिचे ज्या काही ओळखीपाळखी झाल्या होत्या त्यापैकी कुणीतरी मदत करण्याची शक्यता पडताळून पाहता आली असती. रामचा विचार हरभटांनाही पटला आणि त्यांच्या संमतीने रामने लेले शास्त्री ,काळे गुरुजी अशा २-३ जणांना पत्रे टाकली. आठ पंधरा दिवसात पत्रांची उत्तरे आली. कल्याण मोठे शहर होते इतकेच नव्हे तर आसपासच्या अंबरनाथ, आंबिवली,नेतिवली,नारिवली,कुशीवली अणजूर, अनगाव ,भिवंडी या गावांशी कल्याण जोडलेले होते आणि तिकडेही पौरोहित्य करणारे लोक काही ना काही कामासाठी लागत असत. त्यामुळे आणि कामे भरपूर होती.त्यासाठी रामसारखा शिकलेला आणि चुणचुणीत मुलगा कोणालाही हाताखाली असलेला आवडला असता. एकदा होकार आल्यावर राम लगेच तयारीला लागला. आई आजारी असल्याने यावेळी साग्रसंगीत तयारी करून देणे मुश्किल होते. पण पडल्या जागेवरून सूचना देऊन, आणि काही पदार्थ शेजारपाजार हुन मागवून भागीरथी बाईंनी त्याची तयारी करून दिली. पण मनाची तयारी करणे सगळ्यात मोठे काम होते. शहरात गेलेला मुलगा आता परत येणे शक्य नाही, हे त्या माउलीने मनोमन ओळखले होते. तसे ते हरभटांनीही ओळखले होतेच, फक्त ते चेहऱ्यावर दाखवीत नव्हते इतकेच. हो ना करता करत निघायचा दिवस उजाडला. आईने हातावर दिलेले दही खाऊन आणि आईवडिलांच्या पाया पडून राम निघाला. गावातून बाहेर पडताना यावेळी पहिल्या वेळची धाकधूक मात्र नव्हती. उलट मिळवलेल्या ज्ञानाच्या भरवशावर काहीतरी करून, मिळवून दाखवण्याची उर्मि मात्र होती.

टप्प्या टप्प्याने प्रवास करत राम अखेर कल्याणला येऊन पोचला.त्याने येण्याची तारीख पत्राने अगोदरच कळविली असल्याने फार त्रास झाला नाही.सुरुवातीचे काही दिवस पारनाक्याला लेले शास्त्रीच्या वाड्यात त्याची सोय झाली. तसेही एकट्या माणसाला राहायला किती जागा लागणार? एक मोठी खोली त्याला पुरेशी झाली. वाड्यात एक विहीर होती त्यावर पाणी शेंदून पहाटे अंघोळ करायची, मग आन्हिके उरकून कामाला बाहेर पडायचे.कधी लेले शास्त्रीबरोबर, तर कधी काळे गुरुजींबरोबर, तर कधी अजून कोणाबरोबर असे करता करत राम कल्याणात चांगलाच रुळला. हा कष्टाळू मुलगा सगळ्यांना आवडू लागला. लेले शास्त्रीचें तर राम शिवाय पानच हालेनासे झाले. दर आठ पंधरा दिवसात घरी एक पत्र टाकून राम आपली खुशाली कळवत असे. त्यात कधी इकडच्या गमती जमती लिहीत असे, तर कधी गावाची येणारी आठवण असे. एकुणात रामचा कल्याणात चांगला जम बसला आहे आणि त्याच्या मनासारखे झाले आहे हे वाचून हरभट आणि भागीरथीबाईंना संतोष वाटायला लागला. एक दोन वेळा हरभट स्वतः कल्याणला येऊन रामची खुशाली बघून गेले , आणि त्यावेळी लेले शास्त्रीनी केलेल्या रामच्या वारेमाप स्तुतीमुळे त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले. रामची कमाई आता चांगलीच वाढली होती त्यामुळे तो स्वतंत्र घर शोधायच्या मागे लागला. सिद्धेश्वर आळीतल्या पाटणकर नावाच्या माणसाचे घर त्याला पसंत पडले. हे तिपाखी घर रस्त्याला लागून होते, शिवाय पुढच्या बाजूला दिंडी दरवाजा ,झाडे, मागे अंगण , विहीर असे ऐसपैस होते. रामने ते घर विकत घेतले.

अशातच एकदा हरभट कल्याणला आलेले असताना लेले शास्त्रीनी रामच्या लग्नाचा विषय काढला. रामसारखा कष्टाळू, निर्व्यसनी, होतकरू तरुण खरा त्यांनाच जावई म्हणून आवडला असता पण त्यांना त्याच्या वयाची उपवर मुलगी नव्हती. परंतु त्यांचे एक स्नेही होते त्यांची मुलगी गोदावरी त्यांना रामसाठी योग्य वाटत होती. अनायासे हरभट कल्याणला दोन चार दिवस राहणारच होते, त्यामुळे मुलगी बघायचा कार्यक्रमही करता आला असता. फार सायास न करता सर्व जुळून येत होते, त्यामुळे राम ची संमती जाणून घेऊन हरभटांनी मुलगी बघायला होकार दिला. एकदा सर्वजण तयार आहेत म्हटल्यावर लेले शास्त्रींनी उत्साहाने आपल्याच घरी सगळ्या मंडळींना बोलावले. बघण्याचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडला. मुलगा मुलगी दोघात खोड काढण्यासारखे काही नव्हतेच. पत्रिका,गोत्र,नाड सगळे जुळत होते. त्यामुळे दोन्ही बाजूकडून होकार झाला आणि एका सुमुहूर्तावर जवळच्याच त्रिविक्रमाच्या देवळात राम व गोदूचे लग्न लागले. तब्येतीची तक्रार असतानाही मनाचा हिय्या करून भागीरथी बाई मुलाच्या लग्नासाठी हट्टाने कल्याणला आल्या होत्या. लहानगी पण चुणचुणीत गोदू सून म्हणून त्यांना फार आवडली.तिचे लाड करताना दिवस भराभर उडून चालले होते. लग्नात आपल्या गळ्यातील बोरमाळ आणि नाकातील नथ काढून भागीरथी बाईंनी सुनेला दिली. ही नथ त्यांच्या सासूबाईंनी त्यांना लग्नात दिली होती, ती पुढच्या पिढीकडे सोपवून भागीरथी बाई कृतार्थ झाल्या. शिवाय रामचे नावे घरही त्यांना खूपच पसंत पडले. मुलगा आता गृहस्थाश्रमी झाला होता.जबाबदारीने वागू बोलू लागला होता. गावात त्याला मान होता. कुठल्याही आईबापाला अभिमान वाटेल असेच हे सगळे होते. पण आयुष्य आडवळणी खेड्यात काढलेल्या भागीरथी बाईंना काही दिवसानंतर मात्र कल्याणला करमेना. कोकणातील शुद्ध हवा ,पाणी,आपली गाई गुरे, ओळखीचे शेजारी पाजारी ह्यांची त्यांना आठवण येऊ लागली. शिवाय मुलाच्या नवीन संसारात आपली अडचण कशाला? हा विचारही त्यात होताच. त्यामुळे हरभटांच्या मागे लागून त्यांनी आपली परतीची योजना केली. खरेतर म्हाताऱ्या आईवडिलांना गावी एकटे ठेवायला राम तयार होत नव्हता. शिवाय इकडे घरही बऱ्यापैकी मोठे असल्याने तशी काही अडचण नव्हती. पण कोर्ट केस,इतर शेती आणि बागेची कामे, तब्येतीच्या तक्रारी एक ना दोन करणे देऊन हरभट अखेर भागीरथी बाईंना घेऊन गावी परतलेच.

जसजसा राम आपल्या संसारात गुंतत गेला तसे तसे त्याचे हिंदळ्याला जाणे कमी कमी होत गेले. कधी जाणे झालेच तर ओढीने जावे असे तिकडे काहीच उरले नसल्याची जाणीव त्याला होई.गावाचा चेहरा मोहरा बदलू लागला होता. मागच्या पिढीतले लोक अस्तंगत होत चालले होते.लहानपणीचे सगळे सवंगडी पोटापाण्यासाठी त्याच्या सारखेच सर्वत्र पांगले होते. प्रत्येक वेळी अनोळखी लोक भेटू लागले होते.मधल्या काळात गोंद्यासुद्धा वारला असल्याने कोर्टाच्या केसमध्येही काही दम उरला नव्हता.त्याचा मुलगा म्हणजे रामचा चुलतभाऊ फार काही करणाऱ्यातला नव्हता. एकीकडे चांगले बसलेले बस्तान आणि दुसरीकडे म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी अशा कात्रीत राम सापडला. इकडे कल्याणला रामच्या सुखी संसाराची वेल बहरू लागली. यथावकाश त्याला आणि गोदावरीला गोपाळ आणि मुकुंद अशी दोन मुले झाली. मुलांच्या संगोपनात आणि कामकाजाच्या धकाधकीत दिवस ,महिने, वर्षे उलटली. मधल्या काळात सततच्या आजारपणाने खंगून गेलेल्या भागीरथी बाईंना देवाज्ञा झाली. आता मात्र एकट्या राहिलेल्या वडिलांना आग्रह करून रामने कल्याणला आणले. हिंदळ्यातून निघताना हरभटांनी काळभैरवाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तिथल्या गाभाऱ्यातील थंडावा अनुभवला. शंभो चा नाद केला. नंदीला कुरवाळले. देवळाच्या पायऱ्यांवर बसले. ओवऱ्यातून, कोनाड्यांमधून फिरले. आता ही कदाचित शेवटचीच भेट. पुन्हा इथे येणे होते की नाही कोण जाणे. आपले पूर्वज इथे राहिले, फळले, वहिवाट केली, बागा लावल्या ,घरे बांधली, माड पोफळी रोपल्या, मुलांप्रमाणे जगवल्या. ते सगळे आता इथेच सोडून जायचे. या कल्पनेने त्यांना गलबलून आले.पण दुसरीकडे रामची खटपट ही त्यांना दिसत होती. त्याचा संसार बहरला होता, तो सोडून त्याला इकडे ये म्हणणे वेडेपणाचेच ठरले असते. शेवटी आपले दुःख बाजूस सारून आणि पुन्हा पुन्हा भरलेल्या डोळ्यांनी मागे बघत बघत हरभट हिंदळ्यातून राम बरोबर निघाले.(क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

24 Oct 2021 - 5:38 pm | संजय पाटिल

छान...
शेवटी डोळे भरून आले!

हा भागही सुरेख. काळाचा प्रवाह मात्र झपाटून वाहिलाय ह्या भागात.

पाषाणभेद's picture

24 Oct 2021 - 9:06 pm | पाषाणभेद

वाचतोय.

अथांग आकाश's picture

25 Oct 2021 - 7:44 am | अथांग आकाश

कथा छान पुढे सरकते आहे! ह्या भागात वेग वाढला!!
0

विंजिनेर's picture

25 Oct 2021 - 11:17 am | विंजिनेर

छान लिहिलंय. हाही भाग जमलाय - अचानक वाढलेला वेग दिसला म्हणून "उरकून टाकू नका" म्हणून मुद्दाम दम द्यायला लॉगिन केले :)

सौंदाळा's picture

25 Oct 2021 - 11:27 am | सौंदाळा

हेच म्हणतो

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Oct 2021 - 12:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

शेवटचा परीच्छेद पुढच्या भागात टाकायला हवा होता असे वाटतेय

चौथा कोनाडा's picture

26 Oct 2021 - 1:16 pm | चौथा कोनाडा

बाप रे, या भागात खुपच घडामोडी झाल्यात !

हिंदळ्यातून निघताना हरभटांनी काळभैरवाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तिथल्या गाभाऱ्यातील थंडावा अनुभवला. शंभो चा नाद केला. नंदीला कुरवाळले. देवळाच्या पायऱ्यांवर बसले. ओवऱ्यातून, कोनाड्यांमधून फिरले. आता ही कदाचित शेवटचीच भेट. पुन्हा इथे येणे होते की नाही कोण जाणे. आपले पूर्वज इथे राहिले, फळले, वहिवाट केली, बागा लावल्या ,घरे बांधली, माड पोफळी रोपल्या, मुलांप्रमाणे जगवल्या. ते सगळे आता इथेच सोडून जायचे. या कल्पनेने त्यांना गलबलून आले.

हे वाचताना मलाही कातर व्ह्यायला झाले !

सुंदरच लिहिता आहात. आता प्रतिक्षा पुढच्या भागाची !

कुमार१'s picture

26 Oct 2021 - 3:24 pm | कुमार१

कथा छान चालू आहे

उत्तम. लवकर लिहा पुढचे भाग. उत्सुकता आहे. त्या वातावरणात घेऊन जाणारी कथा.