अवघाचि संसार - कल्याण

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
20 Oct 2021 - 1:48 pm

आधीचे भाग
अवघाचि संसार-हिंदळे

अवघाचि संसार- हिंदळे-२

अवघाचि संसार- जांभुळपाडा

रामचा निरोप घेऊन मजल दरमजल करीत हरभट हिंदळ्यात पावते झाले तेव्हा एक नवीनच समस्या त्यांच्यापुढे उभी राहिली होती. त्यांच्या अपरोक्ष गोंद्याने जोर करून त्यांच्या अर्ध्या बागेचा ताबा घेतला होता. तात्पुरते कुंपण वगैरे घातले होते. मुख्य म्हणजे एक बारमाही विहीर यामुळे त्या भागात गेली होती.भागीरथीबाई खमक्या होत्या म्हणून आणि गावकऱ्यांच्या रेट्यामुळे त्याने घराला हात लावला नव्हता इतकेच. त्यामुळे हरभट गावी पोचल्यावर तातडीने त्यांनी हालचाली सुरु केल्या.पहिले त्यांनी चार शहाणी माणसे बरोबर घेऊन गोंद्याला समजवायचा प्रयत्न केला.पण त्याचे आपले एकच तुणतुणे --माझ्या बापाने लखोबानें बांधलेला गोठा तू तोडलास आणि बाग लावलीस.ती जमीन मूळ आमचीच आहे.ती मी ताब्यात घेतली तर काय चुकले? मुळात ज्या पूर्वापार घरात तू राहतो आहेस त्यावरही माझा अर्धा हक्क आहेच. तो मी इतके दिवस सांगितला नाही इतकेच.पण आता मी गप्प बसणार नाही वगैरे वगैरे. थोडक्यात गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. त्यामुळे हा प्रयत्न सोडून देऊन हरभट ताबडतोब तालुक्याला धावले आणि सरकार दरबारी तक्रार नोंदवली. लगोलग वकिलांकडे जाऊन यातून काय मार्ग काढता येईल त्याची चौकशी केली. जिथे बळ कमी पडते तिकडे युक्तीचा वापर करावा लागतो. हरभट तोच मार्ग धुंडाळू लागले. यथावकाश पोलीस आले आणि त्यांनी चौकशी पंचनामा वगैरे केला.साक्षी घेतल्या. अर्थात गोंद्याने आपल्या बाजूने खोटे नाटे साक्षीदार जमवले होतेच. कदाचित पोलिसांनाही चिरीमिरी दिली असेल. कारण फारसे काहीच निष्पन्न न होता एक दोन ठिकाणी नोंदी करून पोलीस परतले. आधीची एक केस कोर्टात चालू होतीच आता ही दुसरी सुरु झाली. हरभट कधी गावात तर कधी तालुक्याला ,कधी कोर्टात तर कधी पोलीस ठाण्याला असे फेऱ्या मारू लागले. या सगळ्या प्रकरणामुळे भागीरथीबाईंनी हाय खाल्ली आणि अंथरूण धरले.इकडे जांभूळपाड्याला रामचे शिक्षण चालूच होते, त्यामुळे वरील सगळ्या गोष्टीची कल्पना हरभटांनी त्याला दिली नाही.

दिवस आठवडे महिने सरकत राहिले. आणि एक दिवस बोडस गुरुजींकडे एक निमंत्रण आले. कल्याणच्या सुभेदार बिवलकरांकडे मोठा नवचंडी याग योजला होता. आणि त्यासाठी तिथे अनेक पुरोहितांची गरज होती. त्यामुळे सगळ्या वेदपाठ शाळांना आणि परिचयातील पौरोहित्य करणाऱ्या लोकांना ते निमंत्रण गेले होते. महिना दोन महिने तिथे राहून, मुख्य पुरोहितांना यागाचे कार्य सिद्ध करायला मदत करायचे होती. अर्थातच बोडस गुरुजींचे नावही त्यात होतेच. आता सुभेदार बिवलकर म्हणजे वजनदार असामी.त्यांच्या निमंत्रणाला नाही म्हणणे म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखे. पण सध्या बोडस गुरुजींचे वय आणि तब्येत बघता इतका प्रवास आणि दीर्घ मुक्काम त्यांना झेपणारा नव्हता. शिवाय इथल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे झाले असते. बराच विचार केल्यानंतर त्यांना एक उपाय सुचला. राम आणि काही विद्यार्थ्यांचे शिक्षण पुरे होता आले होते. अजून काही महिन्यात ते सगळे दशग्रंथी ब्राम्हण म्हणून मान्यता पावले असते. स्वतः जाण्यापेक्षा या विद्यार्थ्यांना पाठवले आणि गुरुजींची तब्येत बरी नसल्याचे सांगितले की झाले. हा उपाय बोडस गुरुजींना आवडला. त्याप्रमाणे त्यांनी बिवलकरांचे उपाध्ये आगलावे गुरुजींना पत्र टाकून कळवले आणि सर्व जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवचंडी यागाची संथा द्यायला सुरुवात केली. बऱ्याच दिवसांनि कुठेतरी जायला मिळणार आणि तेही पाहिले कमाई होणार म्हणून अर्थातच मुलेही खुश होती. दिलेले पाठ झटझट घोकत होती. अखेर ठरल्या दिवशी
बैलगाडी दारात उभी राहिली आणि राम बरोबर अजून तिघेजण कल्याणला जायला निघाले. पनवेल, तळोजे, नितलस, अशी गावे घेत वाटेत श्री मलंगनाथांचे दर्शन घेऊन आणि केतकर कुटुंबाकडे एक रात्र मुक्काम करून पोरे कल्याणला पोचली.

कल्याणला बिवलकर सुभेदाराच्या वाड्यात तर भलतीच धामधूम उडाली होती. एक तर मोठे प्रस्थ , त्यातून नवचंडीसारखे मोठे कार्य घरात असल्याने जणू काय सगळा गावच तिथे लोटला होता. गावोगावीचे पुरोहित, आचारी ,पाणके ,हरकामे, येणाऱ्या जाणाऱ्या मंडळींचे आगत स्वागत करणारे, हिशोबाचे बघणारे कारकून असे एक ना अनेक लोक तिकडे सतत जात येत होते. साध्या गावातून प्रथमच शहरात आलेली ही मुले पहिले जरा बावरली. पण बोडसांचे शिष्यगण आहेत म्हटल्यावर त्यांचा भाव वधारला.मुख्य पुरोहित आगलावे गुरुजी, लेले शास्त्री, काळे गुरुजी, अभ्यंकर शास्त्री यांनी सांगितलेली कामे करता करता मुले लवकरच रुळली. तसेही या सगळ्यांना कामाचे वावडे नव्हतेच. सकाळी ५ वाजल्यापासून आन्हिके उरकून होमाला जी सुरुवात होई ती दहा वाजेपर्यंत. मग जेवण आणि थोडी विश्रांती झाल्यावर पुन्हा दुपारचे काही विधी. त्यानंतर मात्र जो तो आपापल्या उद्योगाला मोकळा असे. गावातले लोक घरी परत जात. तर पाहुणे लोक ओसरी, कट्टे, पार अशा सोयीच्या जागी जमून गप्पा टप्पा करत वेळ घालवत. राम आणि त्याच्या बरोबरच्या मित्रांना मात्र गाव बघण्याचा उत्साह असे. ते जरूरीपुरते सामान बरोबर घेऊन कधी बाजारपेठ, पारनाका ,दूधनाका इथे फिरत तर कधी रेतीबंदर किंवा दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन सूर्यास्त बघत.कधी वाडेघर,उंबर्डे बाजूला मोर्चा वळवत तर कधी भुईडोंगरीवर जात. असे मस्त दिवस चालले होते. सकाळी जुन्या लोकांकडून बरेच काही शिकायला मिळत होते तर सायंकाळी मित्रमंडळींच्या सहवासात काही धडे मिळत होते. म्हणता म्हणता महिना होत आला आणि बिवलकरांकडील नवचंडी यागाची सांगता झाली. सगळ्या मंडळींना भरघोस दक्षिणा ,कपडे वगैरे देऊन बोळवण केली गेली.बाकी लोकांनाही ज्याच्या त्यांच्या मानपानाप्रमाणे मिळाले.मुलांची कल्याणचा निरोप घेण्याची वेळ आली. ही चलाख मुले सगळ्यांच्या नजरेत भरली होती. आगलावे आणि लेले गुरुजींचे या मुलांबरोबर भावनिक नाते जुळले होते. ते पुन्हा पुन्हा मुलांना आग्रहाने परत यायचे बजावत होते. मुलांनाही कल्याण आवडले होते. असे मोठे शहर , तेथील माड्या, गाडी घोडे, वाडे हुडे ,सरळ आखलेले रस्ते आणि तरीहि टिकवलेले गावपण सुंदरच होते. शेवटी भरल्या डोळ्यांनी या सर्वांचा निरोप घेऊन मुले बैलगाडीत बसली.

गाडी शहराबाहेर पडली आणि पनवेलच्या दिशेने धावू लागली. बैलांच्या गळ्यातील घुंगराच्या तालावर रस्ता भराभर मागे जात होता. वाटेत दुपारच्या जेवणाचा थांबा घेऊन गाडी पुढे निघाली. मात्र काही वेळाने आभाळ भरून आले आणि पावसाची चिन्हे दिसू लागली. दिवस सरत्या पावसाचे होते त्यामुळे त्यात कोणालाच काही विशेष वाटले नाही. पण बघता बघता आकाश काळेकुट्ट होत गेले आणि लक्खकन वीज चमकून पावसाला सुरुवात झाली. पहिले भुरभुर पडणारा आणि हवासा वाटणारा पाऊस हळूहळू जोर धरू लागला. गाडीच्या पुढे पावसाच्या धारांनी पडदा धरल्यामुळे दहा फुटावरचे दिसेनासे झाले.तरीही गाडीवान बैलांना चुचकारून कसे बसे पुढे नेता होता. मात्र एका ठिकाणी गाडीची चाके चिखलात रुतली ती निघेचनात. बैलांना मारमारूनही गाडी बाहेर निघेना म्हणून शेवटी निरुपायाने सगळेजण खाली उतरले आणि जोर लावून गाडी बाहेर काढली. विजांमुळे बैल बुजायला लागले होते आणि या अशा भयंकर पावसात पुढे जाणे तसेही धोक्याचे ठरले असते . त्यामुळे सर्वानुमते जवळच एक धर्मशाळा बघून त्यांनी मुक्काम टाकला. रात्रभर पावसाचे थैमान चालूच होते. वारा किंचाळत सगळीकडे सुसाटत फिरत होता. गुडूप अंधार आणि हाडापर्यंत पोचणाऱ्या गारव्याने मंडळींना नीटशी झोप लागलीच नाही. पहाटेचे झुंजूमुंजू झाले आणि गाडीवानाने बाहेर जाऊन अंदाज घेतला. पावसाचा दणका जरा कमी झाला होता पण थांबला नव्हताच. मात्र दिवस उजाडल्याने रस्ता नीट दिसू लागला होता. त्यामुळे त्याने गाडी जोडली आणि प्रस्थान ठेवले. वाटेत ठिकठिकाणी पावसाने झालेली लोकांची वाताहत दिसत होती. बऱ्याच घरात आणि शेतात पुराचे पाणी शिरले होते. उभी पिके आडवी झाली होती. घरे कोसळली होती. जिथे तिथे लोक उंचावर सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन बसले होते. वर्तमानाची भीती आणि भविष्याची चिंता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती. काडी काडीने जमविलेले संसार उघड्यावर आले होते. गुरे ढोरे बेवारस फिरत होती, काही वाहूनही गेली असतील.पण त्यांना शोधायला माणसांच्या अंगात त्राणच उरले नव्हते.

संध्याकाळ पर्यंत गाडी जांभूळपाड्याजवळ पोचली तरी दृश्य बदलले नव्हते आणि पाऊसही थांबला नव्हता.थकली भागलेली मुले जांभूळपाड्यात पोचली आणि समोर दिसणाऱ्या दृश्याने त्यांचे काळीज थरकापले. सगळीकडे चिखल राडा झाला होता. ठिकठिकाणी फक्त पडक्या घरांचे आणि वाड्यांचे अवशेष उरले होते. मातीची घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. अजूनही साताठ फूट पाणी सर्वत्र भरले होते. वाहून जाणारी गुरे कुठे कुठे झुडपांचा आश्रय घेऊन वाचली होती तर कुठे त्यांचे मृतदेह दिसत होते. आठ दहा दिवसांपुरवी ज्या गावातून आपण निघालो ते हेच का? असा त्यांना प्रश्न पडला. महत्प्रयासाने त्यांनी बोडस गुरुजींचे घर शोधून काढले पण तिथे केवळ काही खुणाच उरल्या होत्या.घराचा आणि घरातील माणसांचा काहीच पत्ता नव्हता. मुले वेड्यासारखी गावात फिरत राहिली. दिसेल त्या ओळखीच्या अनोळखीच्या अशा सर्वांना विचारात राहिली. पण सगळेच जण आपापल्या दुःखात, कोण कोणाचा ठाव सांगणार? अखेर दिवसभर इकडे तिकडे फिरूनही काही ठावठिकाणा न लागल्याने नाईलाजाने सगळे महादेवाच्या मंदिरात येऊन बसले. पुढे काय करायचे याचा काहीच पत्ता लागत नव्हता. आजूबाजूच्या अंधार पेक्षा त्यांच्या मनातला अंधार गडद होत चालला होता. आपल्याला मोठ्या आपुलकीने शिकवणाऱ्या बोडस गुरुजींचे काय झाले असेल? त्यांचे कुटुंब वाचले असेल का? असल्यास ते कुठे गेले असतील? की पुरात सगळेच वाहून गेले? घरातील इतर नोकर, गुरेढोरे यांचे काय झाले? त्यांचा तपास कसा लागेल? आपण आता पुढे काय करावे? असे अनेक प्रश्न सगळ्याभोवती फेर धरून नाचत होते. एक दोन दिवस अशाच अस्वस्थतेत गेले आणि शेवटी नाईलाजाने सगळ्यांनी आपापल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला.(क्रमश:)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

कोणता काळातील कथा सांगत आहेत साहेब?

आनन्दा's picture

21 Oct 2021 - 7:07 am | आनन्दा

मस्त जमतंय..
फक्त ते नवचंडी यागाचे बघा..

नवचंडी याग करायला जास्तीत जास्त 10 ब्राह्मण आणि 1 दिवस पुरतो.

हा नुसता चंडियाग म्हणालात तर सोपे होईल.
सारखा 30दिवसांचा नवचंडी याग दाताखाली येत होता वाचताना.

काळ ऊर्फ टाईमलाईन जरा विस्कळीत होते आहे. म्हणजे काही घटना निवांत तपशीलवार (कथेचे सौंदर्यस्थळ) आणि मधेच अचानक एकदम बरेच काही दोन चार वाक्यात घडून जाते.

शिवाय सुरुवातीला महिना- दोन महिने तिथे राहून याग चालणार त्यात मदत करण्याचा उल्लेख आहे. एका महिन्यात याग संपन्न झाला आहे. शेवटी आठ दहा दिवसांपूर्वी जांभूळपाड्यातून (कल्याणला यज्ञासाठी) निघालो असा उल्लेख आहे.

हे सर्व किरकोळ आहे. पण प्रकाशनपूर्व एका सलग वाचनाने सहज टाळता येईल.

कथा फारच आवडल्याने इतके लिहीले.

प्रचेतस's picture

21 Oct 2021 - 9:07 am | प्रचेतस

हा भाग सुरेख, मात्र कथेला एकदमच वेगळे वळण लागले आहे. जांभूळपाडा ८० का ९० च्या दशकात पुरामुळे संपूर्ण उध्वस्त झाला होता त्याची आठवण आली.

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Oct 2021 - 12:19 pm | राजेंद्र मेहेंदळे

आपण सर्वजण इतके आपुलकीने आणि बारकाईने वाचुन मला सुचना करताय ही माझ्या लिखाणाला मिळालेली पावतीच समजतो. धन्यवाद.

संपादक मंडळींना विनंती करतो की "नवचंडी" च्या जागी "चंडी" असा बदल करावा. आणि शेवटच्या परीच्छेदात "आठ दहा दिवसांपुर्वी" च्या जागी "महिन्यापुर्वी" असे करावे.

काळ साधारण १८९०-९५ पर्यंत आला आहे. जसे सुचत जाईल तसे लिहितो आहे, त्यामुळे कधी कधी पाल्हाळ होत आहे तर कधी थोडक्यात उरकल्यासारखे. हे कबुल. तरीही काही एक फ्रेम् वर्क डोक्यात तयार आहे त्यानुसार कथा पुढे जात आहे.

अवांतर- आपले सगळ्यांचेच आयुष्य थोड्याफार फरकाने असेच असते नाही का? आज घडणारी एखादी छोटीशी घटना किवा प्रसंग आयुष्याची दिशा बदलु शकतो. किवा नवीन धड्याला सुरुवात होउ शकते. एखादा अपघात, गुन्हा, नैसर्गिक किवा राजकीय आपत्ती, थोर माणसाची प्रभावशाली भेट असे काहीही आयुष्याचा प्रवाह अकल्पितरित्या बदलु शकतो. तसेच इथे गोष्टीतही...

श्वेता व्यास's picture

21 Oct 2021 - 12:19 pm | श्वेता व्यास

हा भाग वाचून आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

टर्मीनेटर's picture

21 Oct 2021 - 4:17 pm | टर्मीनेटर

वाचतोय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कुमार१'s picture

24 Oct 2021 - 1:31 pm | कुमार१

आयुष्याचा प्रवाह अकल्पितरित्या बदलु शकतो.

>>
अगदी.

चौथा कोनाडा's picture

24 Oct 2021 - 5:34 pm | चौथा कोनाडा

बाप रे, या भागात एकदमच कलाटणी मिळाली की !

बोडस गुरुजींचे काय झाले असेल? त्यांचे कुटुंब वाचले असेल का? असल्यास ते कुठे गेले असतील? की पुरात सगळेच वाहून गेले? घरातील इतर नोकर, गुरेढोरे यांचे काय झाले? त्यांचा तपास कसा लागेल?


आम्हालाही उत्सुकता लागली.
पुढचा भाग वाचनाच्या प्रतिक्षेत !