आधीचे भाग
हरभटांनी अलिबागला जायला बोट पकडली. इतक्या दिवसांनी मुलाला भेटायला जाणार म्हणून भागीरथीबाईंनी त्यांच्या सामानात काय काय जिन्नस भरून दिले होते. खरेतर हरभटांच्या कपड्याची एकच पडशी होती आणि बाकीचे सामान सगळे रामसाठी दिलेल्या वस्तूंनीच भरून गेले होते. खरेतर भागीरथीबाईंना स्वतः च रामला भेटायची फार इच्छा होती, पण घराच्या सगळ्या रागाड्यातून त्यांचा पाय कुठे निघायला ? त्यामुळे त्यांनी ती कसर रामला द्यायच्या सामानात भरून काढली होती. काय नव्हते त्याच्यात? राजापुरी पंचे आणि धोतरपान घराच्या आंबापोळी,फणसपोळी,चिकवड्या,कुरडया,बेसनाचे लाडू, थंडीमध्ये कामी येईल म्हणून कोकमाचे तेल, घराचे साजूक तूप आणि असे बरेच काही. शिवाय बोडस गुरुजींच्या घरी देण्यासाठीच्या सामानाची पिशवी होती ती वेगळीच. आता हे सगळे सांभाळून न्यायचे एक मोठेच अवघड काम. पण पहिले बैलगाडीवाल्याच्या व नंतर बोटवाल्याच्या आणि हमालांच्या मदतीने हरभटांनी ते कसेबसे पार पाडले.
वाटेत देवगड,विजयदुर्ग,रत्नागिरी,जयगड,गुहागर,अंजनवेल,हर्णै ,हरिहरेश्वर,रेवदंडा असे थांबे घेत घेत बोट एकदाची अलिबागला पोचली. उतारूंची उतरण्यासाठी एकच धांदल उडाली. इथे बोटीचा जास्त वेळ थांबा होता. कारण एक तर मोठे बंदर असल्याने प्रवासी मिळण्याची शक्यता जास्त, आणि पुढे बोट खुल्या समुद्रातून मुंबईकडे जाणार असल्याने तेलपाणी वगैरे बघणे, नावाडी आणि कप्तान बदलणे हे सगळे जरूर होते. पण तसेही हरभटांना त्याच्याशी कर्तव्य नव्हते. त्यांचे सगळे लक्ष मुलाच्या भेटीकडे लागले होते. त्यामुळे त्यांनी भराभर सामान उतरवून घेतले आणि थोडा श्रम परिहार, पोटपूजा करून झाल्यावर किनाऱ्यावर थोडे दूर उभ्या असलेल्या बैलगाड्यांजवळ गेले. दोन तीन जणांशी बोलल्यावर त्यांना हवा असलेला रस्ता माहित असणारा गाडीवान त्यांना भेटला. आता अलिबाग ते जांभुळपाडा हा रस्ता फारच वळणावळणाचा आणि मध्ये जंगल असलेला होता. शिवाय मध्ये कार्ले खिंड लागत होती. त्यामुळे चढणीचा रस्ता पार करू शकतील असे जिगरबाज तगडे बैल आवश्यक होते. शिवाय मध्ये काही हातघाईची वेळ आलीच, तर गाडीवानही तसाच तयारीचा पाहिजे होता. असे सगळे मनासारखे झाल्यावर त्याच्याशी बोलून हरभटांनी व्यवहार पक्का करून टाकला.
बैलांचे चारापाणी झाले आणि त्यांच्या गळ्यातील घुंगराच्या खुळखुळ नादात गाडी निघाली. सावलीसाठी मागच्या बाजूला तट्टे सोडले होते. तोल सावरायला एक दोन गोंडे छतावरून सोडले होते. आत गादीची आरामशीर बैठक होती. सकाळपासुनच्या धावपळीमुळे अतिशय दमलेल्या हरभटांचा त्या घुंगराच्या तालावर कधी डोळा लागला त्यांना समजलेच नाही.त्यांच्या डोक्यातील विचारांचीच त्यांना स्वप्ने पडू लागली.राम कसा असेल?वर्षभरात वाळून गेला असेल कि तब्येत सुधारली असेल? उंची वाढली असेल का? दाढी मिशी फुटली असेल का? त्याचे शिक्षण पूर्ण होईतो त्याच्या लग्नाचे बघायला हवे. फार वेळ पाय मोकळा ठेवता काम नये. असे एक ना दोन. अर्धवट झोपेत असतानाच त्यांना बैलगाडीची गती कमी झाल्यासारखी जाणवली.पडदा बाजूला करून बाहेर डोकावले तर कार्लेखिंड चालू झाली होती. साहजिकच चढणीमुळे बैलांची दमछाक होत होती आणि ते नाकातून फुत्कार सोडू लागले होते. नशीबाने दुपार कलली होती त्यामुळे उन्हाचा जाच तितका नव्हता. शेवटी एकदाची खिंड पार झाली आणि गाडीवानाने पाण्याची सोय बघून गाडी थांबवली. हरभट सुद्धा जरा पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले. गाडीवानाने बैलांना चारापाणी केले ,तंबाखूचा बार भरला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. बैल चांगले दणकट होते त्यामुळे रस्ता वेगाने कापला जात होता.पण थंडीचे दिवस असल्याने अंधार लवकर पडू लागण्याचे चिन्हे दिसू लागली. सूर्य झरझर मावळू लागला. तशी गाडीवानाने हरभटांची परवानगी घेऊन पोयनाडला वस्ती करण्याची तयारी सुरु केली. त्याचा हा नेहमीच्या रहदारीचा रस्ता असल्याने मुक्कामही ठरलेले होते. त्यामुळे फारशी तोशीस न लागता पोयनाडला मुक्कामाची सोय झाली. अजूनही काही गाडीवान आपापल्या उतारूंना घेऊन तुटे मुक्कामाला आले असल्याने सोबतही होतीच.हरभटांकडे भागीरथी बाईंनी बांधून दिलेल्या दशम्या होत्या आणि तोंडी लावायला कांदा चटणी होतीच.गाडीवानाची त्याच्या भाईबंदांबरोबर वेगळी सोय असल्याने तो हरभटांना सकाळी ४ वाजता उठायची सूचना देऊन निघून गेला. यथावकाश जेवण वगैरे होऊन रातकिड्यांची किरकिर आणि डासांची गुणगुण ऐकत हरभट निद्राधीन झाले.
पहाटेच्या सुमारास पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येताच मुख मार्जन वगैरे करून हरभट तयार झाले तोवर गाडीवानाने गाडी जोडली होती. आजचा पल्ला लांबचा होता त्यामुळे उशीर करून चालणार नव्हते. लगबगीने सगळ्या गाड्या एक एक करून मार्गस्थ झाल्या. हरभटांची गाडीही बघता बघता आंबा नदी पार करून वडखळला पोचली. पुढे पेणला जेवण करून,तांबडशेत,खारपाडा असे करत करत गाडी पुढे चालली होती. आता रस्ता जास्त हिरवागार झाला होता. उजव्या हाताला कर्नाळ्याचा अंगठा आणि जंगल दिसू लागले होते. पण ना गाडीवानाला त्या दृश्याचा आस्वाद घ्यायला वेळ होता ना हरभटांना. त्यांना अंधार पडायच्या आत जांभूळपाडला पोचणे महत्वाचे होते. वाटेत अगदीच जरूर पडेल तिथे थांबत अखेर मंडळी दिवेलागणीच्या सुमारास जांभूळपाडला पोचली. सगळेच जण प्रवासाने थकले होते. धावून धावून बैल तर शिणले होतेच, पण गाडीत गचके खाऊन हरभटांचीही पाठ मोडली होती. अंगणात बैलगाडीच्या घुंगरांचा आवाज येताच पाठशाळेतील सगळी मुले अंगणात धावली.रामचे वडील येणार आहेत हे माहित असल्याने बोडस गुरुजींनी त्यांची राहण्याची सोय आपल्याच घरात केली होती. मुलांनी सामानसुमान उतरवून घेतले तोवर हरभटांनी गाडीवानाचे ठरलेले पैसे चुकते केले आणि त्याला निरोप दिला. बोडस गुरुजींनी त्यांचे स्वागत केले आणि प्रवास सुखरूप झाल्याची खात्री करून घेतली. जेवायला अजून थोडा वेळ होता त्यामुळे हातपाय धुवून आल्यावर हरभट आणि बोडस गुरुजी पडवीमध्ये गप्पा मारत बसले. एकुणात रामची शैक्षणिक प्रगती चांगली चालू आहे असाच बोडस गुरुजींचा सूर दिसत होता. त्यामुळे कुठलाही बाप जसा आनंदित होईल तसेच हरभटही झाले. जेवणानंतर आपल्या खोलीत रामशी गप्पा मारताना त्यांना अनेक नवलाईच्या गोष्टी समजत होत्या.त्यातून रामचे वाचन मनन वाढले आहे ही जाणीव त्यांना झाली. शिवाय त्याच्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास दिसत होता.त्यामुळे त्याला इकडे लांब शिकायला ठेवले ते बरेच झाले असे वाटून हरभट सुखावले.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीची आन्हिके उरकून हरभट तयार झाले तोवर मुलांचा अभ्यास सुरु झाला होता. बोडस गुरुजी तन्मयतेने त्यांना शिकवत होते आणि संथ घोकून घेत होते. हरभट आपल्या खोलीत असले तरी त्यांना सगळे ऐकू येत होते. एका लयीत सगळी मुले पाठ घोकत होती.कुठेही घाई गडबड किंवा चूक नव्हती. मागच्या दारी घरगडी गाई म्हशींचे दूध काढायचे काम करीत होते. एकजण विहिरीचे पाणी शेंदून नारळीना फिरवत होता. एकुणात घर भरलेले वाटत होते. दुपारची जेवणे झाली आणि शिळोप्याच्या गप्पा चालू असताना बोडस गुरुजींनी हरभटांकडे रामच्या लग्नाचा विषय काढला.तसा तो हरभटांच्याही मनात होताच परंतु त्याचे शिक्षण पूर्ण होण्याची ते वाट बघणार होते.बोडस गुरुजींना चलाख राम आवडला होता. तो लवकरच शिकून तयार होईल आणि आपल्या पायावर उभा राहील ही अटकळ त्यांनी बांधली होती. आणि आपल्या एका नातीसाठी त्यांनी मनातल्या मनात त्याची योजना करून ठेवली होती. आज हरभटांशी मोकळेपणाने बोलताना त्यांनी हे सर्व त्यांचा कानावर घातले. अर्थात घाई काहीच नव्हती.विचार करायला वर्ष दोन वर्षे वेळ होता. पण सूतोवाच करून ठेवले इतकेच. हरभट बघूया म्हणून त्यांच्या म्हणण्याला मान डोलावली.
काही दिवस जांभूळपाडला राहून पाली गणपतीचे वगैरे दर्शन घेऊन आणि रामला डोळे भरून बघून बोडस गुरुजींचा निरोप घेऊन हरभट परत निघाले. (क्रमश:)
प्रतिक्रिया
17 Oct 2021 - 12:15 am | सुचिता१
छान लय साधली आहे. लेखन शैली पण आवडली. पुलेशु!!!
17 Oct 2021 - 12:41 am | सुक्या
सुंदर .. ओघवती शैली ...
थोडे मोठे भाग टाकले तर अजुन मजा येईल ...
17 Oct 2021 - 9:11 am | पाषाणभेद
वाचतो आहे.
17 Oct 2021 - 9:20 am | प्रचेतस
ओघवते आणि उत्कृष्ट लेखन.
17 Oct 2021 - 6:58 pm | गवि
सहमत.
फार सुंदर. शांत प्रवाह असलेली आणि तरी उत्सुकता जागृत ठेवणारी लेखनशैली.
पुभाप्र.
17 Oct 2021 - 10:45 am | कंजूस
१९५० मधला काळ दिसतो आहे.
17 Oct 2021 - 4:42 pm | जेपी
आवडलं,!
17 Oct 2021 - 5:15 pm | ॲबसेंट माइंडेड ...
सुंदर.
18 Oct 2021 - 10:22 am | टर्मीनेटर
खूप छान चालू आहे कथा! किती खडतर प्रवास करावा लागत होता त्यावेळी लोकांना तेही समजतंय.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
18 Oct 2021 - 10:53 am | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद
18 Oct 2021 - 11:15 am | सौंदाळा
कथा मस्तच चालू आहे. पुढे काय होणार याचा आता तरी काहीच अंदाज येत नाहीये म्हणून उत्सुकता खूपच वाढली आहे.
पुभाप्र
18 Oct 2021 - 12:05 pm | श्वेता व्यास
छान चालू आहे कथा, पुभाप्र
20 Oct 2021 - 2:30 am | सुक्या
तुमच्या लिखाणात बारीक तपशील देण्याची तुमची हातोटी छान आहे. सहज म्हणुन सारी गावे गूगल मधे शोधुन रस्ता मॅप केला. आजच्या गतीमान जीवनात हे अंतर काही तासाचे आहे. त्याकाळी हेच अंतर पार करण्या साठी काय दिव्य करावे लागत असेल याची जाणीव झाली ...
मस्त . ..
20 Oct 2021 - 7:31 am | गवि
कथा काहीतरी वास्तव तपशील लक्षात घेऊनच लिहीली आहे हे कळत असूनही..
अधिक विचार करता..
पनवेलीजवळ असलेल्या गावात जाण्यासाठी अलिबागहून त्याकाळी इतका खडतर रस्ता किंवा वेळखाऊ प्रवास असेल तर त्याऐवजी थेट मुंबईस उतरुन पनवेल गाठणे अधिक सोयीचे पडले असते किंवा कसे असे मनात आले.
21 Oct 2021 - 10:16 am | सुबोध खरे
एक जांभुळपाडा हे गाव खोपोली पाली रस्त्यावर आहे आणि ते पालीच्या जवळ आहे. त्यामुळे तेथे जाणारा रस्ता हा पनवेल पर्यंत जात नाही तर अलिबाग वडखळ पेण वरून मंगरूळ वरून थेट जांभूळपाड्याला जातो
अर्थात दुसरा जांभुळपाडा न्हावा शेवा बंदराचे जवळ चिरनेर वरून जाताना लागतो परंतु हा पालीच्या गणपती मंदिरापासून फारच लांब आहे.
मूळ कथावस्तूला धक्का लागू नये म्हणून मी या तपशीलाकडे दुर्लक्ष केले होते.
22 Oct 2021 - 5:23 pm | चौथा कोनाडा
वाह, सुंदर .. ओघवती चित्रदर्शी लेखनशैली ...
चित्रं डोळ्यापुढं उभी राहतात.
⛴
बोटीचा प्रवास, अलिबाग ते जांभूळपाडा बैलगाडी प्रवास वर्नान आणी पाठशाळेतील वातावरण सुंदर रंगवलंय !