“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !”
हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा recipient आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!!
एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो. रात्रीचा दिवस करून वाचलं आणि एका रात्रीत खूप काही बदललं. मागे एकदा किमी काटकरची मुलाखत वाचली होती. (बरोबर आहे, तीच किमी ! हिंदी “टारझन” सिनेमात जिच्यापेक्षा टारझनच्या अंगावर जास्त कपडे होते ना ती !) ती म्हणाली होती की ‘हम’ सिनेमात अमिताभची हिरॉइन झाल्यावर लोक तिला ‘किमी’ ऐवजी ‘किमीजी’ म्हणू लागले. तसं, ‘दुनियादारी’ वाचल्यावर, “गपे xxxच्या ! अजून दुनियादारी…..” हा डायलॉग म्हणायचा अधिकार मिळाला. आता ‘दुनियादारी’ची स्टोरी वगैरे सांगत नाही कारण तो ह्या लेखाचा उद्देशच नाही. ‘चिकन सूप’ चाखून ताटातल्या झणझणीत रश्याची नक्की चव नाही कळत !
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!
कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !
‘दुनियादारी’मधे श्रेयस तळवळकर मुख्य पात्र आहे पण ‘धासू रोल’ म्हणजे, एस.पी. कॉलेजमधला टेरर, ‘डीएसपी.’ ! दिग्या एस. पाटील !! जसं, रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ मध्ये ‘सत्या’भोवती कथा फिरते पण ‘धासू रोल’ आहे ‘भिखू म्हात्रे’! सुशिंनी कादंबरीतलं ‘डीएसपी’ हे character ज्या कुणावरून तरी साधारणपणे घेतलं होतं ते शांत आणि मवाळ दिसणारे-बोलणारे गृहस्थ एकेकाळी ‘टेरर’ होते?
अर्थात दुनियादारीत शिव्या, रोमान्स, मारामारी, एस.पी. कॉलेजचा कट्टा, दारू, इतकंच काय श्रेयस, दिग्या, मिनू, रेखा, शिरीन, साई, अश्क्या, एम.के.श्रोत्री वगैरे सगळी फक्त ‘साधनं’ आहेत...कादंबरीचं ’साध्य’ नाही !! आपल्याला मारझोड करणाऱ्याची ओळख सांगताना नित्या म्हणतो “दिग्या त्याला काही करू शकणार नाही. ‘नितीन सदाशिव घोडके’ मधला तो माणूस ‘सदाशिव’ आहे रे !” असं अंगावर येणारं वाक्यं दुनियादारीतच आहे !
ऑर्कुटवर ‘Suhas Shirvakar’ नावाची कम्युनिटी आहेच पण नुकतीच ‘duniyadari’ ही community सापडली! Yes, आपल्या आवडत्या पुस्तकाची दुनियादारी !! मी तर त्या कम्युनिटीतल्या बऱ्याच मेंबर्सना (अजून तरी) ओळखतही नाही. कोण कुठले हे लोक? वेगवेगळ्या वयांचे, ठिकाणांचे, मतांचे आणि विचारांचेही !! पण सगळ्यांच्या मनाच्या एका सुगंधी कोपऱ्यात कुठेतरी ‘दुनियादारी’ कायम आहे.
‘दुनियादारी’नं तुम्हाला ‘बि’घडवलं असेल तर नक्की सांगा कारण आपण-तुपण गाववाले !!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर: मध्यंतरी धम्याशी व्यनिवर गप्पा करताना आमचं या लेखाबद्दल बोलणं झालं होतं.
तो म्हणाला होता की मिपावर 'दुनियादारी'चे (आणि सुहास शिरवळकरांचे) पंखे / एसी आहेत म्हणून इथे हा लेख :)
--------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 6:38 am | प्राजु
कॉलेज जीवनाचा पुन:श्च अनुभव घ्यायचा तर दुनियादारीला पर्याय नाही.
तू परिक्षणही छान लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Apr 2009 - 6:41 am | रेवती
बरं झालं हा लेख टाकलास.
मी नाही वाचलं अजून.
आता मिळवून वाचते.
धन्यवाद.
रेवती
20 Apr 2009 - 7:05 am | संदीप चित्रे
आणि नाही मिळालं तर सांग... मी देईन.
20 Apr 2009 - 4:49 pm | रेवती
धन्यवाद संदीप.
रेवती
20 Apr 2009 - 6:51 am | रामदास
ल्याब्ररीत शोधतो आता.
20 Apr 2009 - 7:35 am | सागर
अरेरे.... अजून नाही वाचलेत? जरुर वाचा रामदासजी....
दुनियादारी एक पुस्तक नाही तर अनुभव आहे. नक्की वाचून पहा.
दुनियादारीनंतर सुहास शिरवळकरांचे भक्त व्हाल :)
(सुशि प्रेमी) सागर
20 Apr 2009 - 11:35 am | आनंदयात्री
>>दुनियादारीनंतर सुहास शिरवळकरांचे भक्त व्हाल
=))
20 Apr 2009 - 7:01 pm | देवदत्त
लायब्ररीत नाही मिळाल्यास मला सांगा. माझ्याकडे आहे हे पुस्तक.
20 Apr 2009 - 6:58 am | टारझन
मॅन... यू गेव्ह अ ब्रेक टू माय हार्ट ... दुनियादारी वाचून संपल्या नंतर डोळे अक्षरश: ओलावले होते यार ... आईशप्पथ ... आजपर्यंत लै पुस्तकं वाचली .. पण दुनियादारी इतका इनव्हॉल्व्ह कशातंच नाय झालो .. सारख शिरीन-श्रेयस एकत्र होतील का ? डिएसपीला त्याचं प्रेम पुन्हा भेटेल का ?असं वाटायचं .. आणि तो एम.के.श्रोत्री .. त्याची वेळेच्या अनुशंगाने गायली जाणारी गाणी ... काय बोलणार राव ... दुनियादारी दिलखुलास हसवते , रोमांचही आणते ... प्रेमभावनेच्या गुदगुल्याही करते .. आणि शेवटी बेक्कार रडवते राव ...
आपल्याला झोपेतून उठून पण दुनियादारीचे कोणत्या पेज वर कोणते डायलॉग आहेत ते लक्षात होते ...
आता परत वाचणार ...
चित्रे सायेब .. चांगलं नाय केलं राव .. एकतर सोम्मार .. आता दिवसभर आमच्या मनात एम.के.श्रोत्री रडणार
हॅट्स ऑफ टू "दुनियादारी"
20 Apr 2009 - 7:04 am | संदीप चित्रे
मला माहिती नव्हतं रे तुला 'दुनियादारी' इतकं आवडतं
आता मित्रा दिवसभर 'एम. के. श्रोत्री' होण्यापेक्षा 'उन्मेष जोशी' हो... कसं? :)
20 Apr 2009 - 7:44 am | सागर
हॅट्स ऑफ टू "दुनियादारी"
१००% सहमत
दुनियादारीएवढा काळजाला हात कोणत्याच पुस्तकाने नाय घातला
साईनाथ तो भुजंग... हा हा हा :)
20 Apr 2009 - 7:09 am | मुक्तसुनीत
लेख आवडला. "रमो व्हिस्को नहीं तो खिस्को !" च्या आठवणी ताज्या झाल्या ....इतरांनी तपशील मांडलेले आहेतच.
दुनियादारी हे एक पुस्तक नसून , बेहोषीचा एक मौसम आहे इतकेच म्हणता येईल. आज त्या गतकालीन बेहोषीबद्दल थोडी गंमत वाटते , आणि अशी बेहोषी अनुभवास येत नाही याची किंचित खंतसुद्धा. "दुनियादारी"कडे आयुष्याचा एक छोटा तुकडा गहाण आहे :-)
20 Apr 2009 - 11:42 am | मनिष
शब्दशः सहमत....पण आता परत वाचले तर ते इतके आवडेल का अशी एक शंकायुक्त भितीपण वाटते... :(
- मनिष
21 Apr 2009 - 1:16 pm | नंदन
सहमत आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Apr 2009 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार
असंख्य पारायण झाली आहेत आणी अजुन चालु आहेत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
20 Apr 2009 - 4:35 pm | मेघना भुस्कुटे
एकदम सहमत.
अशी भीती जवळजवळ सगळ्याच झपाटणार्या पुस्तकांबद्दल वाटते म्हणा. तरी ती ती पुस्तकं थोरच.
खूप दिवसांनी 'दुनियादारी'ची आठवण झाली. सोबत 'कोवळीक', 'काचेचा चंद्र', 'असीम' 'सनसनाटी', 'पाळंमुळं' आणि मंदार पटवर्धन, दिनेश सायगल, फिरोज इराणी, अमर विश्वास - सॉरी बॅरिस्टर अमर विश्वास, बॅरिस्टर दीक्षित ही सगळी मंडळीपण आठवली. मजा आली!
20 Apr 2009 - 4:54 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत. साला, आपला मराठीतला अर्ल स्टॅनले गार्डनरच सुशि म्हणजे.
बिपिन कार्यकर्ते
20 Apr 2009 - 7:29 am | दशानन
नाही वाचले, आता वाचायला हवे, अरे कोणी पाठवू शकेल का पुस्तक ?
:)
20 Apr 2009 - 2:29 pm | सागर
तुमच्या खरडवहीत काहीतरी घोळ आहे. दिसत नाही.
मी पाठवू शकेन. विरोपाने पत्ता द्या...
खुलासा: "दुनियादारी"ची डिजिटल प्रत नाहिये माझ्याकडे. मी हे प्रत्यक्ष पुस्तक पाठवण्याबद्दल बोलत आहे. माझ्या खरडवहीतील डिजिटल प्रतीच्या मागणीवरुनच दुनियादारी किती प्रसिद्ध आहे हे कळते... असो... जर मला दुनियादारीची डिजिटल प्रत मिळाली तर नक्की सर्व वाचकांना उपलब्ध करुन देईन.
धन्यवाद
सागर
20 Apr 2009 - 12:11 pm | स्वाती दिनेश
खव मध्ये मेसेज लिहिता येत नाहीये..:(
स्वाती
20 Apr 2009 - 11:33 am | स्वाती दिनेश
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं
अगदी अगदी..
सुनीतराव म्हणतात त्याप्रमाणे "दुनियादारी"कडे आयुष्याचा एक छोटा तुकडा गहाण आहे
स्वाती
20 Apr 2009 - 12:26 pm | सागर
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं
१०० टक्के सहमत... मी त्या भाग्यवंतांपैकी एक आहे :)
माझ्या नशिबाने वाचनाची आवड आधीपासूनच असल्यामुळे "दुनियादारी" लवकर शिकलो :)
20 Apr 2009 - 3:08 pm | मदनबाण
अल्फा टिव्ही मराठी (अत्ताच झी-मराठी) या वाहिनी वर दुनियादारी ही मालिका लागायची...मी फार आवडीने आणि न चुकता ही मालिका बघायचो...या अश्क्या ची भुमिका मला फार आवडली होती. अजुन पुस्तक वाचले नाही पण मिळाल्यास नक्की वाचीन.
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
20 Apr 2009 - 3:30 pm | सागर
सुहास शिरवळकरांचे वैयक्तीक मत या मालिकेबद्दल अतिशय वाईट झालेले होते.
दुनियादारीच्या सशक्त कथानकाची या मालिकेने पार वाट लावली होती. सुहास शिरवळकरांनी ही खंत त्यांच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेतही व्यक्त केली आहे.
मालिकेने न्याय नाही दिला असेच मी ही म्हणेन. मी जास्त नाही पाहिली पण ३-४ भाग पाहिले होते. आत्त्ताही कोणत्यातरी वाहीनीवर चालू आहे पण कधी ते माहीत नाही..
पण दुनियादारीची झलक येण्यासाठी ही मालिका पुरेशी आहे :)
20 Apr 2009 - 4:59 pm | बिपिन कार्यकर्ते
मालिकेचं सादरीकरण अतिशय भंगार होतं याबाबत मी पण सहमत आहे. कादंबरी वाचली नाहीये पण मालिका फसली आहे यात वादच नाही. उगाच कोणी तरी चार हौशी कलाकार एकत्र येऊन काही तरी करत आहेत असं वाटतं. शतपटीने चांगली करता आली असती.
आज प्रसिद्ध झालेले बरेच कलाकार त्यात अगदी लहान वगैरे दिसतात. गंमत वाटते. शर्वरी जमेनीस वगैरे तर खूपच लहान दिसते. आणि संजय नार्वेकर पण बराच तरूण दिसतो.
बिपिन कार्यकर्ते
20 Apr 2009 - 5:01 pm | मेघना भुस्कुटे
सहमत. मालिका कम्प्लीट गंडली होती. एकदम पचका होता तो कादंबरीचा.
21 Apr 2009 - 6:13 am | संदीप चित्रे
पुस्तक जरूर मिळवून वाच बिपिन...
तू 'शाळा'ची पारायणं केलीयत म्हणून खात्रीनं सांगतोय 'दुनियादारी' तुझ्या पुस्तकांच्या कपाटात असायला हवं :)
21 Apr 2009 - 7:22 am | बिपिन कार्यकर्ते
हो रे, पण आता जालावर असेल तरच वाचायला मिळेल. नाही तर पुढच्या भा.भे.त
बिपिन कार्यकर्ते
20 Apr 2009 - 6:35 pm | संदीप चित्रे
मुक्तसुनीत --
काय पर्फेक्ट शब्दांत सांगितलंत 'दुनियादारी' काय चीज आहे ते :)
मेघना, सागर, परा --
तुम्हीही 'दुनियादारी' पारायण करणारे दिसताय :)
मनिष --
बिनधास्त पुस्तक वाचायला घे पुन्हा, मी नुकतंच काही महिन्यांपूर्वी भारतातून आणलं आणि इतकया वर्षांनी पुन्हा वाचूनही कॉलेज संपून खूप वर्षे झाली असं अजिबात वाटलं नाही.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
20 Apr 2009 - 6:50 pm | मनिष
अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’, जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले। :(
21 Apr 2009 - 6:58 am | मुक्तसुनीत
अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’, जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।
अहमद फराझ यांनी बाकी काही नसते लिहिले तरी चालले असते :-) अशाच प्रकारची भावना एका संस्कृत श्लोकात व्यक्त झाली होती म्हणतात. आपल्या शांताबाईंनी पहा कसा तो अलगदपणे मराठीमधे आणलेला आहे :
सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे
मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे
ती न असता उरात, स्वप्न ते न लोचनी... :-)
मनीष , स्मरणरंजनाइतकीच , गोष्टींवरची भूतकाळाची पुटे काढून , त्यांचे सत्यस्वरूप समजून घेण्याची प्रक्रियाही रोचक असू शकते. असे करणे काव्यात्म नसेल बहुदा, पण श्रेयास्पद ठरू शकते.
21 Apr 2009 - 7:12 am | मेघना भुस्कुटे
यावर नवा धागा हवा, मुक्तसुनीत.
21 Apr 2009 - 7:20 am | बिपिन कार्यकर्ते
मुसु, मनावर घे बाबा....
फराजचा तो शेर पण तूच सांगितला होता, आणि आता शांताबाईंच्या ओळींबरोबरचे साम्यपण तूच लक्षात आणून दिलेस. आता चूपचाप एखादा लेख टाक बघू...
बिपिन कार्यकर्ते
21 Apr 2009 - 11:12 am | मनिष
'मुसु'नी जिथे फराज ह्यांच्या शेराविषयी लिहिले होते, तो धागा मिळू शकेल का?
21 Apr 2009 - 11:09 am | मनिष
अगदी १०१% मान्य! पण ही प्रक्रिया जशी रोचक तशीच मानसिकदृष्ट्या त्रासदायकही असते बर्याच वेळा... :(
20 Apr 2009 - 6:56 pm | चतुरंग
सुशिंची इतर जवळजवळ सर्व वाचली आहेत पण हे वाचायचं राहून गेलंय रे! आता मिळवायलाच हवं!!
(लायब्ररीतून घरी येता येता रस्त्यातच मी २५-३० पानं संपवलेली असायची!)
चतुरंग
20 Apr 2009 - 7:00 pm | देवदत्त
सुंदर पुस्तक. वाचताना कॉलेज जीवन समोर दिसत होते. अल्फावरील मालिका मला आवडली होती. मी पुस्तक पहिल्यांदा वाचले ते गेल्या वर्षी. तेव्हा कळले 'दुनियादारी' काय चीज आहे ;)
दुनियादारी एक पुस्तक नाही तर अनुभव आहे.
पूर्ण सहमत. वाचताना वाटले हे पुस्तक मी कॉलेज मध्ये असताना वाचावयास पाहिजे होते. :(
20 Apr 2009 - 7:10 pm | शक्तिमान
मी हैद्राबाद मध्ये असतो.. इथे असेल कोणाकडे तर मज्जाच!
कारण अजुन २-३ महिने पुण्यात चक्कर टाकणे जमणार नाहीये मला.
21 Apr 2009 - 10:39 am | ऋचा
छा लिहिल आहेस.
दुनियादारेची किती पारायण केलीत हे पण आठवत आही आता :)
पण योग्य वेळेतच वाचली... कॉलेज संपल्यावर दुनीयादारी वाचण्यापेक्षा कॉलेज मधेच दुनीयादारी वाचल पाहीजे...तरच त्याचा फील येतो :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
21 Apr 2009 - 12:51 pm | सागर
ऋचा, मी थोडा असहमत आहे. मला वाटते की तुम्हाला कदाचित फील पेक्षा अनुभवाबद्दल म्हणायचे होते का?.
कॉलेज संपल्यावर दुनीयादारी वाचण्यापेक्षा कॉलेज मधेच दुनीयादारी वाचल पाहीजे...तरच त्याचा फील येतो
अगदी तसे नाही काही.... मी कॉलेज सोडून १२ वर्षे झाली पण आजही दुनियादारी वाचताना मला तोच फील येतो... :)
एका बाबतीत पूर्णपणे सहमत आहे की कॉलेजमधे असताना दुनियादारी वाचली गेली तर ती मजा अनुभवता येते
अनुभव घेणे नाही जमले तरी दुनियादारी वाचताना फील येतोच येतो
- सागर
21 Apr 2009 - 1:06 pm | प्रकाश घाटपांडे
वाचल पाहिजे म्हणजे वाचल नाही हे सांगायची भीति / लाज वाटते. अनेकांच्या तोंडातुन दुनियादारी विषयी ऐकल आहे. भयकथा लिहिणारा सुहास शिरवळकर हा वेगळा वाटावा असे हे पुस्तक आहे असे मान्यवरांकडुन ऐकले आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
21 Apr 2009 - 1:29 pm | पर्नल नेने मराठे
मला पन हवय वाचाय्ला...कोनि देइल का?
चुचु
22 May 2009 - 3:43 pm | विशाल कुलकर्णी
ओहो, कॉलेजच्या आठवणी जागवल्यास मित्रा. १२ वीला असताना परिक्षेच्या बायोलॉजीच्या पेपरच्या आदल्या दिवशी वाचलं होतं दुनियादारी. परिणाम बायो त उडालो. त्यानंतर ट्रॅक बदलुन डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं आणि बायो आयुष्यातुन बाजुला पडलं. दुनियादारी मात्र तोपर्यंत आयुष्याचा एक घटक बनलं होतं. आजही अस्वस्थ वाटायला लागलं, कंटाळा आला की मी सुशिचं दुनियादारी नाहीतर जातायेता काढतो. त्यातला "ट"मरेल कुठं सारखा पीजे देखील अजुनही पोट धरुन हसवतो.
धन्स यार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
31 May 2009 - 6:32 pm | संदीप चित्रे
>> आजही अस्वस्थ वाटायला लागलं, कंटाळा आला की मी सुशिचं दुनियादारी नाहीतर जातायेता काढतो
क्या बात है... जियो मित्रा :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
31 May 2009 - 8:32 pm | अनंत छंदी
दुनियादारी प्रकाशित झाल्याझाल्या वाचली होती, अर्थात तेव्हा माझे कॉलेजचे दिवस सरले होते. तरीपण पुन्हा तो माहोल अनुभवण्याचा आनंद मिळाला. माझ्या संग्रही असलेली दुनियादारीची प्रत मित्राला वाचायला देण्याचा वेडपटपणा केला. आणि त्या मित्राने ती प्रत चक्क ढापली की हो! आता ही चर्चा बघितल्यावर पुन्हा एक प्रत संग्रही असावी प्रकर्षाने वाटायला लागले आहे.
15 Sep 2010 - 9:58 am | Pain
हे किंवा त्यांचे कुठलही पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे का ?
15 Sep 2010 - 11:03 am | चिगो
दुनियादारी... क्या बात है? माझ्या आयुष्याचा तर कुठला ना कुठला तुकडा "सुशिं"च्या पुस्तकांशी गहाण तरी आहे नाही तर उपकृत तरी...
भयकथा लिहिणारा सुहास शिरवळकर हा वेगळा वाटावा असे हे पुस्तक आहे असे मान्यवरांकडुन ऐकले आहे.
कोण हो हे मान्यवर? सुशिंनी भयकथा सोडूनही आणखी कितीतरी लिहीले आहे.. वाचुन बघा म्हणा त्यांना..
11 Sep 2013 - 12:15 am | संदीप चित्रे
स्वतःच आपल्या लेखाचा धागा वर आणण्यासाठी ही प्रतिक्रिया देतोय.
हा लेख मिपावर २००९ साली मी प्रकाशित केला होता.
मध्यंतरीच्या काळात मिपावर नवीन आलेल्यांसाठी 'दुनियादारी' चित्रपटाच्या निमित्ताने हा धागा वर आणतोय :)
15 Sep 2013 - 1:04 pm | सागर कोकणे
संदीप, तुमच्या ब्लॉगवर हा लेख वाचला होता पूर्वी.
उत्तम लिहिले आहे.
माझ्या ब्लॉगवरून काही दुनियादारीबद्दल-
http://majhyamanatalekaahee.blogspot.in/2013/01/blog-post.html