'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक

केदार भिडे's picture
केदार भिडे in जनातलं, मनातलं
19 Aug 2021 - 5:16 pm

अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.

पंढपूर येथील सुप्रसिद्ध विठ्ठल गोकुळातील श्रीकृष्णच असल्याचा विश्वास समग्र मराठी जनांत आहे आणि संतांनीही त्यांच्या वाङ्मयातून तसे व्यक्त केले आहे. मात्र तरीही विष्णूच्या पुराणप्रसिद्ध २४ अवतारांहूनही वेगळा, सहस्र नामांपासून वेगळा असल्याची जाणीव संतांनाही आहे. त्यामुळे या विठ्ठलाचे मूळ रूप काय आहे आणि त्यातून तो आजच्या उन्नत अवस्थेला कसा पोहोचला याचा शोध घेणे हा पुस्तकाचा उद्देश आहे.

१) देव-देवतांच्या उन्नयन प्रक्रियेचा शोध घेताना केवळ सनावळ्या, ताम्रपट, शिलालेख यावर अवलंबून राहून भागणार नाही. मौखिक स्वरूपात कथा, गाथा, गीते आणि स्थलपुराणे यांचाही उपयोग करून घेणे टाळता येणार नाही.

२) पंढरपूर विषयी तीन स्थलपुराणे उपलब्ध असून त्यातील स्कंदपुराणांतर्गत असल्याचा दावा सांगणारे पांडुरंगमाहात्म्य हे सर्वात जुने असून त्याची कालनिश्चिती हेमाद्रीपंडितापूर्वी (१३व्या शतकापूर्वी) असल्याचे ढेरे यांनी सिद्ध केले आहे. स्थलपुराणे ही मुख्यदेवतेच्या भोवती पावित्र्यव्यूह (Sacred Complex) उभे करण्याचे काम करतात, जसे की देवतांचे प्रकटन कसे झाले, महान भक्त कसे उदयास आले, परिसरातील अन्य देवतांशी संबंध इ. तर विठ्ठलाच्या वैष्णवीकरणाची प्रक्रिया ही १३व्या शतकापूर्वी पूर्ण झाल्याने ज्ञानेश्वरांपासून पुढच्या सर्वच संतांनी विठ्ठलाला विष्णुरूपात बघितले आहे.

३) विठ्ठलाच्या प्रकटनाची एकूण ४ निमित्ते स्थलपुराणात सांगितली आहेत. अ) दिंडीरवनात डिंडीरव नामक दैत्याचा वध विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण करून केला. ब) रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण गाई गोपाळांसह प्रथम गोपाळपूर या ठिकाणी आला आणि अन्य सर्व परिवार तिथेच ठेवून गोपवेषाने दिंडीरवनात रुक्मिणीकडे गेला. क) पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेने संतुष्ट होऊन त्याला वर देण्यासाठी कृष्ण गोपवेषाने त्याला दर्शन देण्यासाठी आला. ड) पद्मा नावाच्या एका युवतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिला वरदान दिले आणि मुक्तकेशी हे तीर्थ निर्माण झाले. प्रकटनाच्या या कथा म्हणजे पंढपुरात आधी अस्तित्वात असलेल्या देवतांना विठ्ठलकेंद्रित पावित्र्यव्यूहात समाविष्ट करण्याचे काम आहे असे लेखकाने दाखवून दिले आहे. ‘पुंडलिक आणि पुंडरीकेश्वर’ हे प्रकरण त्याकरता वाचावे.
संतांनीही विठ्ठलाचे वर्णन बालगोपाळ रूपात केले आहे आणि तो दिगंबर असल्याचे म्हटले आहे. पुंडलिकाच्या भेटीला तो पंढपुरात आल्याचेही मान्य केले आहे.

४) 'दिंडीरवनाचे रहस्य' आणि 'विठ्ठल, वेंकटेश, आणि वीरभद्र' ही पुढची दोन प्रकारणे मूलरूपाच्या शोधासाठी महत्वाची आहेत. दिंडीर हा शब्द चिंचेचे संस्कृत नाम असलेल्या तिन्तिड या शब्दावरून आल्याचे म्हटले आहे. दिंडीरवन हे चिंचेचे बन असले पाहिजे आणि तसे प्रत्यक्षात आहे. पंढपूर गावाजवळ दिंडीरवन नावाचे स्थान असून तिथे लखुबाईचे मंदिर आहे. ते चिंचेच्या झाडांनी वेढले आहे. आणि हीच रुसलेली रुक्मिणी असल्याची श्रद्धा आहे. दक्षिणेतील श्रीवेंकटेशाच्या प्रकटनकथेकडे ढेरे यांनी लक्ष वेधले आहे. विठ्ठलाप्रमाणे वेंकटेशही पुराणप्रसिद्ध अवतारात नाही तरीही तो बालाजी या नावाने ओळखला जातो आणि तो ही एक हात कंबरेवर ठेऊन उभा आहे विठ्ठलाप्रमाणे वेंकटेशही पत्नीची समजूत काढण्याकरता तिथे आला. वेंकेटेशाच्या एका माहात्म्यात वेंकटेश प्रथम चिंचेच्या झाडाखाली प्रकट झाल्याचे सांगितले आहे. याच ठिकाणी लेखकाने आपले लक्ष गवळी-धनगरांच्या विठ्ठल-बिरप्पा या जोडदेवांकडे वेधले आहे. विठ्ठल हा बीरप्पाचा भाऊ म्हणून कायम त्याच्यासोबत असतो आणि दोघांचीही पूजा पिंडीच्या स्वरूपात होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली हे विठ्ठल-बिरप्पा देवतांचे महत्वाचे केंद्र आहे. बिरप्पा प्रथम पट्टणकोडोली येथे चिंचेच्या झाडाखाली येऊन विसावला, विठ्ठलाची पत्नी पदूबाई रुसून चिंचेच्या झाडाखाली बसल्याची कथाही धनगरी परंपरेत अस्तित्वात आहे. याच जोडीतील बीरप्पाचे वीरभद्रीकरण (शंकराचाच एक अवतार) कसे झाले याचीही चर्चा या प्रकरणात केली आहे. एकूणच, विठ्ठल आणि वेंकटेश हे एकाच देवतेच्या उन्नत अवस्थेचे दोन वेगळे अविष्कार असल्याचे ढेरे यांनी स्पष्ट केले आहे.

५) 'आद्य मूर्तीचा शोध' हे खिळवून ठेवणारे प्रकरण स्वतंत्र वाचता येईल असेच आहे. संतांनी सांगितलेले दिगंबर रूप सध्याच्या मूर्तीत का नाही? छातीवर कोरलेला मंत्र का नाही? माढे येथील मूर्तीत ही दोन्ही लक्षणे का आहेत? याची चर्चा या प्रकरणात केली आहे. माढे येथील मूर्तीच्या छातीवरील मंत्र कूट रूपात आहे आणि त्याची आचार्य वि प्र लिमये यांनी दिलेली उकल वाचनीय आहे.

६) 'यादवांचा देव' हे शेवटून दुसरे प्रकरण पुस्तकातील सर्वात दीर्घ प्रकरण आहे. विठ्ठलाची प्रतिष्ठा वाढवणारी तीन राजघराणी म्हणजे देवगिरीचे यादव, कर्नाटकातील होयसळ आणि विजयनगर यांची मुळे गोपवंशीय (Pastoral tribes) आहेत याची चर्चा आहे. ही घराणी आजचा विठ्ठल आणि विठ्ठल-बिरप्पा जोडगोळीतील विठ्ठल यांच्यातला महत्वाचा दुवा आहेत. यादवांचा आद्यपुरुष दृढप्रहार (साधारण इस ८६०-८८०) याने गायीचे चोरांपासून संरक्षण केले आणि मग त्याला ग्रामरक्षकपद प्राप्त झाले अशी यादव वंशाची कथा आहे. याच प्रकरणात आदिरूपाची ठाणी या शीर्षकाच्या अंतर्गत गोपजनीय आदिम विठ्ठलाच्या स्थानांचा आढावा घेतला आहे. विठ्ठलाच्या प्रकटनकथेशी आदिरूपाचा संबंध अधिक विस्तृतपणे या प्रकरणात दिसून येतो. वर उल्लेखित पट्टणकोडोली येथेही यात्रेच्या निमित्ताने ज्येष्ठ भक्तांच्या पालख्या दिंड्या येतात, त्यांचे ठरलेले मार्ग, मानाचा क्रम आहेत हे विशेष सांगितले पाहिजे. १९५६ मध्ये विठ्ठलाच्या या मूळरूपाकडे दुर्गाबाई भागवत यांनी 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथातून लक्ष वेधले. दलऱी आणि गुंथर सोन्थायमर यासारखे विदेशी संशोधक याच दिशेने शोध घेण्यास प्रवृत्त झाले. दोघांच्याही संशोधनाचे संदर्भ पुस्तकात जागोजागी आहेत. देशी संशोधकांनी मात्र ही वाट चोखाळली नाही. दुर्गाबाई आणि सोन्थायमर या दोघांचेही ऋण ढेरे यांनी व्यक्त केले असून त्यांनीच दाखवलेली वाटत अधिक प्रशस्त केल्याची भावना लेखकाने व्यक्त केली आहे.

७) दोन महत्वाची वाक्य जशीच्या तशी देत आहे.
"आपल्या परंपरेचा इतिहास हा एक अद्भुत इतिहास आहे. अद्भुत अशा दृष्टीने की या परंपरेत प्रत्येक उत्क्रांतीचे सर्व टप्पे सुरक्षित राहतात. एखाद्या संकल्पनेची आदिमतेपासून अत्युच्च अवस्थेपर्यंत उत्क्रांती घडवल्यावरही तिचे आदिम रूप या परंपरेत नष्ट होत नाही तर जवळ जवळ जसेच्या तसे सुरक्षित राहते "
“नवागतांच्या पुर्वश्रद्धांची व्यवस्था लावण्याची ही प्रक्रिया भारतीय परंपरेत अनेक धर्मसंप्रदायांत घडलेली दिसून येते “
जैन धर्मात यक्ष-यक्षिणीचा प्रचंड संभार आहे त्याचे उदाहरण इथे ढेरे यांनी दिले आहे. जैन धर्मात सुरुवातीला व्यापारी समूहांनी त्यांचे अनुयायीत्व मोठ्या प्रमाणात स्वीकारले. यक्ष श्रेणीतील देव हे प्राधान्याने वाणीगजनांचे देव होत. त्यामुळे या वर्गाना धर्मात प्रविष्ट करताना यक्षांची सोय दैवतमंडळात लावणे गरजेचे आहे.

८) पुस्तकाचा विषय गंभीर असला तरी भाषा मधुर आहे. तरीही वस्तुनिष्ठतेला कुठेही धक्का पोहोचलेला नाही. आपल्या श्रद्धांची आदिम पाळेमुळे पाहून ‘आपलीच ओळख आपल्याला’ अशी भावना ग्रंथ वाचून झाल्यावर रेंगाळते. सखोल संशोधनावर आधारित लेखन वाचायचे असल्यास हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे.

९) Standing on the shoulders of giants या वाक्याप्रमाणे मी पूर्वी वाचलेल्या या संबंधित लेखांची यादी देत आहे.

https://www.misalpav.com/node/25208

https://aisiakshare.com/node/5367

https://aisiakshare.com/node/4564

https://www.aksharnama.com/client/article_detail/4398

धर्मइतिहासशिफारस

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

19 Aug 2021 - 5:27 pm | गॉडजिला

विठूमाऊलीच्या उगमा बाबत मनात नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आजवर मी महाराष्ट्रातील प्रख्यात कानडी दैवत इतकाच समज मनाशी बाळगला होता व विशेष अभ्यासही केला न्हवता आता आजुन रोचक महिती मिळेल असे वाटते, पुस्तकं अवश्य वाचेन.

ओळख आवडली _/\_

चौथा कोनाडा's picture

19 Aug 2021 - 5:44 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !

पुस्तकाधारित इतके मुद्देसुद महिती आहे की (अर्थात जेव्हढी आटोपशीर तेव्हढीच तपशिलवार) पुस्तक वाचण्याचीही गरज भासू नये !
खुप समर्पक सिनॉप्सिस !

केदार भिडे +१

अश्या प्रकारचे आणखी लेखन वाचायला आवडेल !
_/\_

केदार भिडे's picture

19 Aug 2021 - 5:50 pm | केदार भिडे

रा चिं ढेरे यांचे लेखन समजून घेण्याची पात्रता केवळ माझी.
परिचयात्मक लेखाची मूळ लेखनाशी काही तुलनाच नाही. त्यांचे मूळ पुस्तक वाचलेच पाहिजे. :-)

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2021 - 5:41 pm | चौथा कोनाडा

पुस्तक वाचण्याचीही गरज भासू नये !
असा जो प्रतिसाद लिहिला गेला ती जास्तीची उस्फुर्त दाद होती !

रा चिं ढेरे यांचे लेखन समजून घेण्याची पात्रता केवळ माझी.

असं काही वाटत नाही हा धागा वाचून. असो, आपली "प्रमाणिक भावना" अर्थातच आवडली.

प्रचेतस's picture

24 Aug 2021 - 9:13 am | प्रचेतस

उत्तम लेख आहे.
यादवांच्या देवावरून सांगावे वाटते, भिल्लम पाचवा ह्याच्या काळातील विठ्ठलदेवाच्या मंदिराच्या निर्मितीचा शिलालेख उपलब्ध आहे. ज्यात ह्या मंदिराचा उल्लेख 'लान मडू' (लहान देऊळ) असा केलेला आहे. रामदेवरायाच्या कारकिर्दीत ह्या मंदिराचा विकास होऊन भव्य स्वरूप उभे राहिले असावे जे आपल्याला चोऱ्याऐंशीच्या शिलालेखाद्वारे दिसते. रामदेवराय हा विठ्ठलाचा परमभक्त होता. ह्या भक्तीमुळेच महानुभव आणि रामदेवराय यांच्यात कट्टर वैर उत्पन्न झाले.

केदार भिडे's picture

24 Aug 2021 - 10:31 pm | केदार भिडे

एका होयसळ राजाचा शिलालेख देवळात आहेत, ज्यात 'पंडरगे' या ग्रामनामाचा उल्लेख आला आहे. त्यावरून माझा समज झाला की होयसळ राजानेच देऊळ उभारले.

वाह!
आपल्या श्रद्धांची आदिम पाळेमुळे पाहून ‘आपलीच ओळख आपल्याला’ अशी भावना ग्रंथ वाचून झाल्यावर रेंगाळते.
उत्कृष्ट लेख आहे.विठ्ठल विठ्ठल!!

केदार भिडे's picture

24 Aug 2021 - 10:32 pm | केदार भिडे

धन्यवाद

नागनिका's picture

25 Aug 2021 - 1:13 pm | नागनिका

ढेरे यांनी विठ्ठलाला क्षेत्रपाल म्हणले आहे. तसेच दक्षिणेकडील व्यंकटेश हे शैव स्थान असण्याची शक्यता आहे असे ते म्हणतात. तिसरा डोळा झाकण्यासाठीच व्यंकटेशाचे गंध एवढे मोठे लावलेले असते.

क्षेत्रपाल ही संज्ञा तशी पटत नाही, क्षेत्रपालांच्या मूर्ती आणि विठ्ठलमूर्ती यांच्यात प्रचंड भिन्नता आढळते. कंधारचा क्षेत्रपाल पहा. किंवा काही ठिकाणी क्षेत्रपाल हे यक्ष, वेताळ, भैरव अशा स्वरूपात देखील दिसतात, सर्वसाधारणतः मोठे डोळे, विचकलेल्या दाढा अशी लक्षणे दिसतात. गुरेढोरांवर देखरेख करणारा , त्यांचा प्रतिपाळ करणारा ह्याअर्थी मात्र विठ्ठलाचे रूप जुळते,