सुख म्हणजे काय असतं?

चंद्रकांत's picture
चंद्रकांत in जनातलं, मनातलं
9 Aug 2021 - 10:45 am

आजचं जग सुखी आहे का? असा प्रश्न तुम्हांला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? काही क्षणभर विचार करतील. काही जण काही आठवतंय का म्हणून स्मृतीचे कोपरे कोरत राहतील. काही तर्काचे किनारे धरून पुढे सरकतील. काही अनुमानाचे प्रवाह धरून वाहतील. काही निष्कर्षाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर दिसणाऱ्या उत्तरांच्या धूसर आकृत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील. काही काहीही करणार नाहीत. काही प्रश्नच बनून राहतील किंवा आणखी काही...

खरंतर हा प्रश्नच एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. कुणी म्हणेल, आजचं काय विचारता, जग कधी सुखी होतं हो? अन् कुणाला ते सुखी वगैरे असल्याचं वाटत असेल, तर सुखाच्या त्याच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, हे एकदा तपासून बघायला हवं. हे असं काहीसं म्हणण्यात वावगं काहीही नाही. जगाचं असणंनसणं तात्पुरतं बाजूला राहू द्या. निदान आपलं स्वतःपुरतं जग तरी सुखाचं आहे का? बहुदा नसेलच म्हणा. कोणी सांगत असेल की, आहे ना सुखी! अगदी आकंठ आनंदात आहोत हो आम्ही. आनंदी राहण्याकरिता आवश्यक असलेलं सगळंच तर आहे आमच्याकडे. कुणी असं काहीसं सांगत असेल तर ते म्हणणं प्रत्येकवेळी पूर्ण सत्य असेलच असं नाही. कारण सत्य अन् तथ्य यात अंतर असतं. समजा असलं तसं, तरी सुखाच्या व्याख्या त्याला पूर्णपणे कळल्या नसाव्यात किंवा अंतरी नांदणाऱ्या समाधान नावाच्या अनुभूतीचे अथपासून इतिपर्यंत असणारे कंगोरे आकळलेले नसावेत.

बंगलागाडीमाडीत कुणास सुख, समाधान वगैरे गवसत असेल तर ते काही वावगं नाही. पण ते काही एक आणि केवळ एकमेव नसतं अन् तेवढ्या आणि तेवढ्यापुरतं थांबतही नसतं. त्याचा प्रवास निरंतर सुरू असतो, नावं तेवढी सातत्याने बदलत असतात. खरंतर सुख हा शब्दच मुळात सापेक्षतेची वसने परिधान करून विहार करीत असतो. कोणाच्या सुखाच्या संकल्पित संकल्पना काय असतील, हे सम्यकपणे कसं सांगता येईल? त्यांची सुनिश्चित परिमाणे असती तर दाखवता आलं असतं की, हे तुझ्या समोर जे दिसतंय ना, यालाच सुख वगैरे म्हणतात म्हणून.

सुख आणि समाधान हे शब्दच मुळात पर्याप्त समाधानाचे निदर्शक नाहीत. त्यांचं असणं अनेक किंतुना आवतन देणारं असतं अन् नसणंही बऱ्याच प्रवादांना जन्म देणारं असतं. कोणाला कशातून समाधान गवसेल, हे सांगणेही असेच अध्याहृत. कोणाला कणभर मिळून सुखाचा अर्थ गवसेल, पण कुणाच्या पदरी मणभर पडूनही सुख म्हणजे काय असतं, ते सापडणार नाही. सुख-समाधानच्या परिभाषा प्रासंगिकतेचा परिपाक असतात. म्हणूनच की काय परिस्थितीने पदरी पेरलेल्या पळांनी त्या निर्धारित होत असाव्यात. निकषांच्या निर्धारित नियमात त्यांना अधिष्ठित नाही करता येत.

पारतंत्र्यात असताना प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय वाटते अन् स्वातंत्र्य हाती लागलं की, त्याचे सोयिस्कर संदर्भ शोधले जातात, हेही तेवढेच खरे. स्वातंत्र्य शब्दाचे प्रत्येकाचे अर्थ वेगळे अन् अन्वय प्रत्येकासाठी निराळे असतात. व्यक्तीसाठी असणारे त्याचे निकष समूहासाठी सुयोग्य असतीलच असं नाही. काळाचा हात धरून ते चालत येतात. काळच त्याचे परिणाम अन् परिमाणेही निर्धारित करत असतो.

प्रश्न केवळ सीमित नसतात, त्यांचं असणं जेवढं वैयक्तिक, तेवढंच वैश्विकही असतं. ते कोरभर भाकरीचे असतात, तसे चतकोर सुखाचे असतात. चिमूटभर आस्थेचे असतात, तसे ओंजळभर समाधानचेही असतात. आर्थिक असतात तसे जातीय, धार्मिक, राजकीय अभिनिवेश समोर उभे करणारेही असतात. त्यांचं वाहतं असणं अनाहत आहे. अखंड मालिका सुरु असतेच त्यांची. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित करावी कशी? करावी कोणी? गुंतागुंत निर्माण करणारे हे प्रश्न समोर आहेतच.

खरंतर माणूस हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? आणि सांगावे तरी कोणी? जगाची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? याबाबत फारतर अपेक्षा करता येतात. सक्ती नाही करता येत कोणाला. खरं तर हेही आहे की, अशा प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण

समाजविचारलेख

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Aug 2021 - 3:02 pm | चंद्रसूर्यकुमार

बघा पटते का--

happiness

प्रसाद गोडबोले's picture

10 Aug 2021 - 3:11 pm | प्रसाद गोडबोले

काहीही

जसं हृदयाचं काम रक्त पंप करणे आहे , जसं फुफुसाचं काम रक्तात ऑक्षिजन मिसळवणे आहे, जसं पोटाचं काम अन्न पचवडे आहे , तसेच मेंदुचं काम विचार करणे आहे . विचार करायचं थांबलं तर ती सीरीयस मेडीकल कंडीशन असेल अन पेशंट ला ताबडतोब डॉक्टरांकडे पळवावे लागेल.

=))))

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Aug 2021 - 3:20 pm | चंद्रसूर्यकुमार

एकहार्ट टोलीचे 'द पॉवर ऑफ नाऊ' वाचा.

प्रसाद गोडबोले's picture

10 Aug 2021 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

एकहार्ट टोलीचे 'द पॉवर ऑफ नाऊ' वाचा.

पण हे पुस्तक वाचलं की डोक्यात विचार येतील नै का ? आणि तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?

तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहे ! मग कशाला वाचायचं ?

तुमच्या व्याखेनुसार डोक्यात विचार न येणें हाच आनंद आहेे हे पटण्यासाठी...

आपण ऐकलेले वाचलेले अनुसारतोच असे नाही पण जे पटले आहे ते आपसूक प्रवृत्तीचा भाग बनते.

उदा:- आईने कितीही सांगीतले विस्तावापासून लांब रहा, तरी बालकाच्या मनाला ते तो पर्यंत पटत नाही की जो पर्यंत त्याला चटका बसत नाही अन एकदा का तो बसला की पुढच्या वेळी आईने सांगायची गरज उरत नाही इतकेच न्हवे आई योग्य तेच सांगते हेही पटते व पुढील प्रसंगी मन निमूटपणे सांगितलेले योग्य आहे ते ऐकले पाहिजे या वस्तुस्थतीचा स्वीकार करते...

म्हणूनच मन निर्विचार असणे आवश्यक हे म्हणणे वाचायला न्हवे उमजून यायला पुस्तकं वाचा...

एका काट्याने दुसरा काटा काढून दोन्हीं काटे फेकून द्यायचे.

प्रसाद गोडबोले's picture

10 Aug 2021 - 11:16 pm | प्रसाद गोडबोले

गॉडजिला's picture

11 Aug 2021 - 3:05 pm | गॉडजिला

...

गॉडजिला's picture

11 Aug 2021 - 3:09 pm | गॉडजिला

आता तुमचां प्रतिसाद थोडा वस्तारून लिहता का ?

संपूर्ण समजला नाहीच...

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2021 - 6:26 pm | चौथा कोनाडा

छान.
समर्थांनी म्हटलेच आहे:
जागी सर्व सुखी असा कोण आहे
विचारी मना तूच शोधून पाहे.

मनाला विचारी म्हटलंय इथेच सर्वकाही आले !