विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो.
मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते!
रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै. पूर्वी मी नोकरीच्या निमित्तानं खूप हिंडायची. मला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायचे. त्यातून लिखाणाचे जर्मस् मिळायचे. आता नोकरी थांबली तसं हेही थांबलं. मोठमोठ्या लेखक कविंची सुद्धा "मधुघटचि रिकामे पडती घरी"अशी अवस्था होते मग मी किस झाडकी पत्ती!
लिहिणं थांबलं. वेळ कसा घालवायचा हा मोठाच प्रश्न समोर उभा ठाकला. घरात चोवीस तास बाई मिळाली होती कामाला. ती मनाने चांगली असली तरी तिसरी पास. तिच्याशी कसल्या काव्यशास्त्रविनोदाच्या गप्पा मारणार? तिचं माझं जग वेगळं. गप्पांना मर्यादा पडत. सूनबाई, मुलगा नोकरीवर. घरात मी एकटीच. आसपासच्या घरातल्या स्त्रिया एक तर नोकरी करणाऱ्या किंवा माझ्यापेक्षा वयानं खूप लहान. माझ्या वयाच्या बायका कुठल्यातरी महाराजांचं किंवा स्वामींचं चरित्र वाचणाऱ्या. किंवा फारतर भिशीसाठी जमणाऱ्या. अर्थात कोणीच चुकीचं नव्हतं, पण एकूण मला माझ्या मनाजोगती मैत्रीण मिळेना. वेळ खायला उठायला लागला.
मग मी एक युक्ती केली. ठरवलं की आपला पूर्ण दिवस कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीनं बांधून ठेवायचा. रोजच्या दिवसाला एक रुटीन द्यायचं. ते रुटीन कसोशीने पाळायचं. म्हणजे आपण काहीच करत नाही, निष्क्रिय बसलो आहोत असं वाटणार नाही. रिकामा, पोकळ असलेला दिवस भरुन जाईल. ठरलं, मग मी एक रुटीन केलं. ते रुटीन निरर्थक गोष्टींनी भरलेले आहे, असं एरवी मला वाटलं असतं पण ते तसं वाटून घ्यायचं नाही असं मी ठरवलं.
सकाळी जाग येईल तेव्हा उठायचं. उगीच पहाटे पाच वाजता वगैरे उठून शरीराला अनावश्यक ताण द्यायचा नाही. मला झोप पुरी होऊन नैसर्गिकरीत्या जाग सकाळी सहा वाजता येते. उठल्यावर पहिलं आवरुन,एक तास योगासने,पंधरा मिनिटे, प्राणायाम आणि पंधरा मिनिटे सायकलिंग करायचं. गेले दोन तास."हाय काय नाय काय!"
मग मस्तपैकी आलं,गवती चहा घालून कामाच्या बाईकडून चहा बनवून घ्यायचा. तो प्यायचा. चहा मला मनापासून आवडतो. चहानंतर ब्रेकफास्ट. अल्पसा. उगीच वजन वाढायला नको! दिवसाला काही एक ध्येय असलं की तो वाया गेल्यासारखा , निरर्थक नाही वाटत. वजन वाढू द्यायचं नाही हेच ध्येय.
चहा पिताना बातम्या बघायच्या,वाचायच्या. चहा, ब्रेकफास्ट, बातम्या. गेले दोन तास! मग आंघोळ, वेणी,गेला पाऊण तास!"आता वाजले की बारा!" मग चक्क काय करायचं? यू वोंट बिलीव्ह. मग चक्क रामरक्षा, मारुती स्तोत्र, संकटनाशनस्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणायचं. आंघोळ करतानाच रामरक्षा सुरू करायची. ही स्तोत्रं आईनं आणि आजीनं लहानपणी शिकवली आहेत. मी फार श्रद्धाळू किंवा देवभक्त कधीच नव्हते. त्यामुळे या स्तोत्र म्हणण्यामागे ना श्रद्धा,ना विश्वास असं मला वाटे. फक्त त्यामुळे अजूनही आई, आजी जवळ आहेत असं मनाला वाटतं एवढंच! हीदेखील एक श्रद्धाच म्हणा.
तर, श्रद्धा नसताना का म्हणतो आपण ही स्तोत्रं? Just for time killing? आणि याचं "हो" असं उत्तर मी काहीसं शरमून आई, आजीला देते.
स्तोत्रं म्हणून झाल्यावर थोडा वेळ एक सवय पडलीय म्हणून टीव्ही सिरीयल बघते. मग जेवण. नंतर थोडंसं आडवं व्हायचं. आरामात अडीच वाजतात. नंतर साडेतीनपर्यंत वाचन. लायब्ररी लावलीय. त्याची पुस्तकं घरपोच येतात. झाली की संध्याकाळ! मग दूरस्थ जुन्या मित्र-मैत्रिणींना फोन. तेही वयस्क. मग फोनवर सगळं मिळून तासभर गप्पा. नंतर सायंप्रार्थना. वेगळी स्तोत्रं. मग टीव्ही , जेवण, झोप. गेला की नाही दिवस!
मी एक करते. मरगळल्यागत वाटू नये. फ्रेश वाटावं म्हणून मी घरात असतानाही जुने गबाळे कपडे घालण्याऐवजी चांगला नवीन फ्रेश रंगाचा सलवार, कमीज घालते. केस नीट विंचरते. गळ्यात , कानांत, हातात का दागिना घालते. नीट कुंकू लावते. ताजंतवानं वाटतं.
मी रिकामटेकडी नाही. असा एक पाॅझिटिव्ह फील आला मला!
अशी काही वर्षं गेली. आणि ह्या रुटीनचाही कंटाळा आला. तेव्हा ठरवलं की हेही रुटीन सोडायचं. व्यायाम करायचा नाही. देवाचं म्हणायचं नाही. डाएट करायचं नाही. आवडेल ते खायचं. मी तसं करायला लागले. आंघोळ करताना रामरक्षेऐवजी सरळ सिनेमातली गाणी म्हणायला लागले. आईस्क्रीम, केक खायला लागले. वजन वाढायला लागलं. सगळं रुटीन कसं सुखावह झालं. आणि अहो आश्चर्यम्! मी पुन्हा नव्यानं लिहायला लागले. मला थोडं फार का होईना सुचायला लागलं. मला लिखाणाला स्फूर्ती येण्यासाठी हिल स्टेशन, शांतता, गुलाब मोगरा वगैरे फुलं, ऐसपैस टेबल, रिव्हाॅलविंग चेयर, थर्मास मध्ये चहा, डावीकडून प्रकाश फेकणारा टेबल लॅम्प असलं काहीही लागत नाही. कुकरच्या शिट्ट्या, फोनच्या रिंगा, घरच्या मंडळींची बडबड, टीव्हीचा आवाज आणि डायनिंग टेबलवर साॅस, चटण्या, लोणच्यांच्या बाटल्यांच्या गचडीत कागद ठेवण्यापुरेशी जागा करुन मी लिखाण करु शकते. हा घ्या पुरावा! आत्ताच हे लिहिलंय ना! वाचणेबल झालंय का तेवढं सांगा.
प्रतिक्रिया
9 Aug 2021 - 11:37 am | गवि
रिटायरमेंटनंतरची टाईम मनेजमेंट ही कार्यालयीन टाईम मनेजमेंटपेक्षा वेगळ्या प्रकारची असते(उलट प्रकारची? वेळ कसा काढावा याऐवजी वेळ कसा घालवावा? :-) ) . निवृत्त झाल्यावर बरेच काही करण्याचे मनसुबे असूनही अनेक लोक प्रत्यक्षात रिकामेपणाचा अनुभव आल्याचे सांगतात. शरीरही साथ देत नसल्याने छंद जोपासणे, प्रवास हे जमतेच असे नाही. अगदी वाचनानेही डोळे थकतात असे अनेक वृद्ध लोक म्हणत असतात.
वृद्ध लोकांसाठी विरंगुळा, टाईम मनेजमेंट, कंसल्टन्सी किंवा काही occupancy निर्माण करणे हा पुढील काळात एक मोठे पोटेंशियल असलेला व्यवसाय म्हणून येऊ शकतो.
9 Aug 2021 - 12:15 pm | सुबोध खरे
आजी साहेब
तुम्ही लिहीत जा.
आम्ही वाचतोय.
असं साधं सरळ( स्वतः ज्ञानी असल्याचा अविर्भाव नसलेलं) लेखन आजकाल वाचायलाच मिळत नाही.
9 Aug 2021 - 12:30 pm | प्रचेतस
सहजसुंदर लेखन.
9 Aug 2021 - 1:42 pm | तुषार काळभोर
अर्थात!
वाचणेबल + आवडेबल देखील झालंय !
9 Aug 2021 - 2:08 pm | सौंदाळा
अजिबात कंटाळवाणा नाही
छान लेख.
आताचे रुटीन कधी बदलणार?
9 Aug 2021 - 2:32 pm | सोत्रि
सुंदर लेखन!
प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय!
- (वेळोवेळी रूटीनमधे बदल करणारा) सोकाजी
9 Aug 2021 - 2:38 pm | Rajesh188
माणसाला छंद असेल तर तो कधीच निवृत्त होत नाही..
निसर्गात फिरण्याचा छंद.
गाणी,खेळ,गप्पा ,मित्र मैत्रिणी जमा करण्याचा छंद असायला हवा..
निवृत्ती म्हणजे फक्त पगार येणे बंद.
आणि हीच वेळ असते आपल्याला जे हवे ते करण्याचे..
आयुष्य सुंदर आहे पण खूप कमी पण आहे.
त्याचा आस्वाद घ्या.
9 Aug 2021 - 4:52 pm | Bhakti
वाह आजी मस्तच!हरवलेलं लिखाण परत मिळाल!
9 Aug 2021 - 5:26 pm | सर टोबी
आजी माझे वयोमान अवघे साठ. म्हणजे नवथर म्हातारपणच म्हणाना. परवा प्रथमच ज्येष्ठ नागरिक असल्याचा पहिला वाहिला फायदा घेतला आणि लसीकरणाच्या रांगेतून बाहेर पडून मोजून अर्ध्या तासात सर्व उरकून बाहेर पडलो. तुम्हाला मी काही उपदेशपर सांगावे एवढा अधिकार नाही. पण, मन आणि शरीर भरपूर दमले कि बऱ्याच समस्या सुटतात. नवीन नवीन रुटीन शोधण्याची कटकट राहत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण आयुष्य कसे जगतो याचा विचारच करण्याचे त्राण राहत नाहीत. आपल्या आजूबाजूला किती तरी लोकं आपण हात पुढे केला कि आपली मदत स्वीकारायला तयार असतात. आपणच आपला वकूब बघून थोडं पुण्य गाठीला बांधावं.
9 Aug 2021 - 5:36 pm | सरिता बांदेकर
छान लिहीलं आहे. खरं सांगू जे लोक विचारतात की तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता त्यांची मला दया येते.खरं म्हणजे जरा आजूबाजूला बघितलं की खूप करण्यासारखं असतं असं मला एका बाईंनी सांगितलं होतं ज्यावेळी मी लवकर नोकरी सोडली तेव्हा आणि मला ते पटलं.
आजूबाजूची मुलं अभ्यासाला माझ्याकडे यायची. पाळणाघर बंद असेल तर तरूण मुलींना टेंपररी बेबी सीटर लागतो
कुणी वृदध आजूबाजूला असेल तर पेपर किंवा पुस्तकं वाचून दाखवता येतात.
मी तर लोकांना गोधड्या शिवून दिल्या तसेच ॲानलाईन कामं पण करून देते.
काहीही करता येतं फक्त डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं की लक्शात येतं अरे आपण हे केलं तर आपला पण वेळ जाईल आणि लोकांना मदत होईल.
तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत राहतो.
आवडतंय तुमचं लिखाण मला.
9 Aug 2021 - 6:27 pm | गॉडजिला
याचीच सुधारीत आवृत्ती म्हणजे अवेअरनेस. पण त्याबद्दल अवांतर करुन धाग्याचा रसभंग नाही करत...
मस्त लिखाण.
9 Aug 2021 - 9:06 pm | चौथा कोनाडा
व्वा, मस्त लिहिलंय !
(काहीही विशेष न लिहिता कसं गुंतवून ठेवायचं हे तुमच्या कडून शिकावं) :-)
आमच्या रिकामटेकडेपणाला (अर्थात रिटायरमेन्टला) बराच अवकाश आहे, पण तातपुरते रिकामपण आले तरी टाईमपासची चिंता नसते !
9 Aug 2021 - 11:42 pm | Jayagandha Bhat...
खूप आवडलं..
12 Aug 2021 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजी लेखन आवडलं. अनुभव थेत पोहचला. आपलं लेखन वाचून मलाही वाटलं की आफ्टर रिटायरमेंट काय करावं. मला किर्तनकार व्हावं. बापु-महाराजांसारखं प्रवचन करावं असं अनेकदा वाटलं बरा वेळ जाईल. असा विचार करुन अनेकदा स्वगत हसतो. आणखी एक, ज्योतिषीच मार्गदर्शन करावे, लोकांना भलं होईल असा एक आशावाद देत राहावे. ती एक चांगली स्टॅटर्जी वाटते. लेखन करावे, वाचन करावे, पुस्तके करावी असे वाटत नाही. आपण जे लिहितो त्या पेक्षा उत्तम लिहिणारे खुप आहेत. लिहिण्याचंही एक वय असतं, उत्साह असतो असं वाटतं. आपण उगाच इंदिरा संत कितीतरी उशीरा पर्यंत प्रेम कविता लिहित होत्या. अमुक लेखक अमुक वयापर्यंत लेखन करत होते. वगैरे हे मोटीव्हेशनसाठी बरं वाटत असलं तरी त्यातही काही राम नाही, असं वाटतं. आपलं लेखन प्रकाशकाकडे पाठवा, त्यांच्या सुचना सहन करा अनेक गोष्टी करुनही ते पुस्तक म्हणून स्वीकारतील असं नाही. किंवा आपण पैसे देऊन पुस्तक प्रकाशित करा यातही काही राम वाटत नाही. नौकरी लागली की खुप भटकंती करीन, असं ठरवलं होतं. नौकरीची कितीतरी वर्ष निघून गेली. भटकंती अजून बाकीच आहे. रुटीन निरर्थक काळ आणि माणसांचा अनुभव करोना काळात एक झलक बघायला मिळाली. बाकी, रुटीन कितीही ठरवले तरी ते रुटीन होत नाही. नवं काही तरी होतंच असतं, येत असतं आणि घडत असतं हेही मात्र कळले आहे.
आजी तुम्ही लिहित राहा. तुमचं लेखन नेहमीच आवडतं. आणि वाचून स्वत:कडे आणि आजुबाजूला काय आहे, ते बघता येतं त्याचा विचार करुन प्रतिसादातून मन मोकळं करायची सुरसुरी येते. धन्स.
-दिलीप बिरुटे
13 Aug 2021 - 10:47 pm | मदनबाण
लेख बहुतेक फोडणी घालता घालता लिहलेला दिसतोय ! :)))
आजी, असंच मस्त लिहित रहा !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"
14 Aug 2021 - 10:59 am | सस्नेह
लिहीत रहा, छानपैकी जगत रहा.
स्नेहा
18 Aug 2021 - 11:06 am | आजी
गवि-तुमचं म्हणणं खरंय.वृद्धांना वेळ घालविण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध करणे.हा येत्या काही काळात,रादर आत्ताच एक व्यवसाय होऊ शकतो.
सुबोध खरे-"माझं लेखन साधं,सरळ असतं "हा तुमचा अभिप्राय वाचून बरं वाटलं.
प्रचेतस-"सहज सुंदर लेखन". या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
तुषार काळभोर-"माझं लेखन वाचणेबल+आवडेबल झालंय?"धन्यवाद.
सौंदाळा-"आत्ताचं रुटीन कधी बदलणार?"बघू, कंटाळा आला की बदलेन.
सौत्रि-"प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय?"वा!हा तर माझा बहुमान आहे.
राजेश-"आयुष्य सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या." हा तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणेन.
Bhakti-मी मध्यंतरी लिहित नव्हते. आता लिहायला लागले आहे,हे तुमचं निरीक्षण करेक्ट.
सर टोबी-तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणण्यासारखा.
सरिता बांदेकर-तुम्ही तुमचा वेळ छानच घालवता. अभिनंदन.
गाॅडजिला-धन्यवाद.
चौथा कोनाडा-"माझं लेखन छान?"थॅंक्स.
Jayagandha-Thank you.
प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-विस्तृत अभिप्राय पाठवलात! दिलीपजी, तुम्ही उत्तम लिहिता असं प्रतिसादांवरुन दिसतं. तुमची खूप पुस्तकं प्रकाशित होऊ देत. तुम्ही कीर्तनकार व्हा. भटकंती करा. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत.
मदनबाण-आभारी आहे.
सस्नेह-धन्यवाद.