|| गे आये ऑलिम्पिकामाते ||
बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा !
दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा |
आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत. ह्या खेळांक महामारी, असुरक्षा, अपघाता पासून दूर ठेवा... आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात तं दूर करा वो महाराजा !
कोनत्यापन देशाच्या कोनापन खेळाडूनी गेली पाच वर्षं आणि आयुष्यभर जीव तोडून मेहनत केली असेल... त्यांच्या देशाचं नाव उंचावायला, त्यांच्या खेलांमध्ये सगल्यांत चांगला होऊक ज्यांनी कोनी घाम गाळला असेल.... त्यांच्या कष्टांना फळ द्या वो महाराजा !
आमचे झील बजरंग पूनिया, नीरज चोप्रा, सौरभ चौधरी... आमची हॉकी खेलनारी पोरां... सार्यांनी खूप मेहनत केली असा... त्यांच्या हाताला यश द्या. सिंधू, मेरी कोम, विनेश फोगाट, दीपिका कुमारी, मनू भाकर ह्या आमच्या चेडवांक सोन्या - रुप्या - काश्यात मढवा वो महाराजा !
२०६ देशांची ही खेलनारी पोरां मानवजातीचो भविष्य हत. नेमबाजांचे आणि तीरंदाजांचे नेम बसूदे, धावनार्यांची धाव सुसाट सुटूदे, कुस्तिगीरांची - बॉक्सरांची ताकद अफाट वाढूदे, पोवनारे मासोळीगत पोवूदे, संघांमध्ये ताळमेळ असूदे. जुने विक्रम मोडूदे, नवे पराक्रम घडूदे. आजून वेगात, आजून उंच आणि आजून ताकदवान होताना ह्या खेलांच्या निमित्तानी जगातल्या सगल्या चांगल्या - चुंगल्या लोकांना एकत्र येन्याची आणि प्रेमाने राहान्याची बुद्धी द्या वो महाराजा !
होय महाराजा!!
जे.पी.मॉर्गन
२३ जुलै २०२१
प्रतिक्रिया
23 Jul 2021 - 9:23 am | सुखी
होय महाराजा!!
23 Jul 2021 - 9:47 am | सौंदाळा
गाऱ्हाणे आवडले.
किती ऑलिंपिक विक्रम, जागतिक विक्रम, कोणत्या देशाला किती पदके, मैदानी क्रीडाप्रकार, हॉकी, नेमबाजी यावर विशेष लक्ष्य असेल.
23 Jul 2021 - 10:21 am | गुल्लू दादा
जाणकारांनी वेळोवेळी या धाग्यावर पदकं, विक्रम याविषयी सतत माहिती पुरवावी ही नम्र विनंती.
23 Jul 2021 - 10:29 am | कंजूस
सांभाळून राहा रे महाराजा.
23 Jul 2021 - 2:01 pm | तुषार काळभोर
व्हय म्हाराजा!!
(परत कोरोनाचं सावट दिसायला लागलंय. स्पर्धा निकोप पार पडू दे. भारतीय खेळाडूंना पाच-धा गोल्ड अन धा-वीस शिल्वर-ब्रान्झ मिळू दे अशी एक प्रार्थना!)
23 Jul 2021 - 3:15 pm | टवाळ कार्टा
व्हय म्हाराजा!!
23 Jul 2021 - 4:58 pm | गॉडजिला
यावेळी आपले बहुतांश खेळाडू पदक जिंकतील अथवा सगळेच होपलेस जातील... असा होरा आहे
23 Jul 2021 - 4:58 pm | सरिता बांदेकर
व्हय महाराजा
23 Jul 2021 - 11:43 pm | सुक्या
होय महाराजा!!
_/\_
गाऱ्हाणे आवडले.
7 Aug 2021 - 7:13 pm | तुषार काळभोर
ऑलिम्पिकामातेने मॉर्गन रावांचं अन समद्या मिपाकरांचं गाऱ्हाणं ऐकेलेलं आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये वन टू का फोर करत येक सोन्याचं, दोन चांदीची अन् चार कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवलेला आहे.
मीराबाईच्या रुपेरी यशाने सुरू झालेल्या भारताच्या टोक्यो प्रवासाची सांगता निरजच्या सोनेरी यशाने झाली...
सगळ्या पदक विजेत्यांचे, सहभागी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, तिथे बरोबर गेलेल्या सपोर्ट स्टाफचे, इथे सर्व सोई पुरवणाऱ्या विविध क्रीडा संस्थांचे आणि मिपाकरांचे दणदणीत अभिनंदन!!
व्हय म्हाराजा!!
7 Aug 2021 - 7:28 pm | चांदणे संदीप
आजि सोनियाचा दिनु! (आयला, हे काहीतरी भलतंच वाटतंय! ;) )
सं - दी - प