अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही..
कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं.
उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं. आपलं बाळ कधी म्हणजे कधीच काहीच 'पाहू' शकणार नाही हे समजल्यावर कोणाही सामान्य माणसाप्रमाणेच दोघेही उन्मळून पडले पण त्यातून सावरायची जिद्द सार्या कुटुंबानं धरली. आजी,आजोबा आणि इवलीशी ४ वर्षांची यशश्री.. सार्यांनीच मनूला आहे तस्झं स्वीकारलं आणि एवढेच नव्हे तर जगातलं सुंदर,उत्तम ते ते तिला मिळवून देण्यासाठी त्या सार्यांचीच धडपड सुरू झाली.
त्या इवल्याशा जीवाला २४ दिवस वयापासून ऑपरेशन्सच्या यातना भोगाव्या लागल्या आणि तिच्याबरोबरच त्या वेदना सहन कराव्या लागल्या सार्या सोमण कुटुंबाला. जन्मांध मनू मुकी बहिरी नाही ,बसू शकते म्हणजे चालूही शकेल.. ही शक्यता आणि मेंदू शापित नाही हे लक्षात आल्यावर केवढातरी आधार गवसला. डॉक्टरांच्या सूचनांप्रमाणे स्पर्शातून आणि आवाजातून सार्या घराची, घरातल्या माणसांची ओळख करून द्यायची. फळांफुलाचे वास आणि आकारावरून त्यांची ओळख, स्वयंपाकाच्या भांड्यातून झारा, पळी,पोळपाट,लाटणे इ.तून विविध आकारांची ओळख.. अशी तिला बाहेरच्या जगाची ओळख करून देणं सुरू झालं. रंगांची दुनिया तिच्यासाठी नव्हतीच,त्याला पर्याय शोधणं सुरू झालं.
तिला शाळेत घालायची वेळ आल्यावर अंधशाळेच्या मुख्याध्यापकांशी झालेल्या मुलाखतीतून 'नॅब'शी ओळख झाली. जणू अलिबाबाची गुहाच गवसली. तिची उत्तम प्रगती पाहता तिला अंधशाळेत न घालता सर्वसाधारण शाळेत घालण्याचा सल्ला सोमण कुटुंबाने मानला आणि मग सुरु झाला शाळेचा शोध, सर्वसाधारण मुलांच्या शाळांमधील प्रवेशाबाबतचे बरेवाईट अनुभव गाठीस बांधून एकदाचा प्रवेश निश्चित झाला. प्ले ग्रुप मध्ये ती चटकन रमली पण बॉल खेळण्यातली मजा तिला इतर मुलांप्रमाणे अनुभवता येईना. त्याला घुंगुरवाल्या चेंडूचा पर्याय आला. दिशाज्ञानासाठी ह्या घुंगुरचेंडूचा उपयोग होतो. नॅबच्या शिक्षिकांच्या मदतीने अशा अनेक गोष्टी समजू लागल्या. आठवड्यातून एकदा येऊन मनू आणि तिची आई दोघींनाही नॅबशिक्षिका शिकवू लागल्या.
पुढे बालवर्गात गेल्यावर तिची झालेली उपेक्षा,काही दिवसांनी तिला सार्यांनी आपल्यात सामावून घेणे,तिचा नाटकातला सहभाग अशा अनेक लहानलहान प्रसंगातून शिकणे चालू होते. रिक्षावाल्याने तिला पळवून न्यायचा केलेला अयशस्वी प्रयत्न,त्यातून तिला बसलेली भीती.. शाळेची लागलेली गोडी,लहान वयात रायटर म्हणून शाळेतल्या अथवा नॅबच्या शिक्षिकांनी केलेले काम तर ४थीपासून पुढे खालच्या वर्गातील रायटर ,पिकनिकला तिला घेऊन जाण्याचामित्रमैत्रिणींचा चंग आणि तिला दिलेला आत्मविश्वास.. अशा अनेक हकिगतींमधून मनू समजत जाते.
नॅबच्या शिक्षकांनी अनिता सोमणना नॅबचा कोर्स करण्याचा आग्रह धरला आणि त्याचा खूप मोठा फायदा त्यांना स्वत:ला अंधविश्व समजून घेण्यासाठी झाला. त्यांचे पुरेसे बोलके अनुभव आपल्याला वाचायला मिळतात.
मनूला उपजत असलेली सुरांची आवड पाहून तिला आधी कॅसिओ आणि नंतर सिंथेसायझर आणला तेव्हा हे सूर तिचे नुसते सोबतीच न राहता तिच्या जीवनाचे सुकाणू बनणार आहेत ह्याची कल्पना सोमण कुटुंबाला नव्हती. अनुपम खेरच्या शो मध्ये तिचा सहभाग आणि त्या शो दरम्यान प्रसाद घाडी ह्या 'बालश्री' शी झालेली ओळख,अकृत्रिम स्नेहातून समजलेली 'बालभवन' आणि 'बालश्री'ची माहिती एक नवीन आव्हान पेलण्यासाठी मनाची तयारी घाडीमावशीच करुन घेतात.
बालश्री हा पद्मश्रीच्या तोडीचा पुरस्कार! लेखनकौशल्य, विज्ञान,चित्रकला आणि सादरीकरणाच्या कला- गायन,वादन,नृत्य,नाट्य ह्या विषयांतील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिभा शोधून त्यांचा सन्मान 'बालश्री' पुरस्काराने केला जातो. बालभवन तर्फे मुले निवडली जातात. गाव,जिल्हा,राज्यपातळीवरून चाळणी होत होत देशपातळीवरची परीक्षा दिल्लीतील बालभवन मध्ये होते आणि केवळ २०,२१ मुलेच बालश्री पुरस्कारासाठी निवडली जातात. ही माहिती समजल्यावर मुंबईतील बालभवनला भेट देऊन फॉर्म भरण्यासाठीची पात्रता सिध्द केली . मनूने सादरीकरणाच्या कला हा विषय घेऊन, गायन प्रमुख विषय आणि वादन, नर्तन,नाट्य दुय्यम विषय घेतले आणि मग सुरू झाल्या अनेक परीक्षांची साखळी. शाळेतल्या परीक्षा,अभ्यास सारे सांभाळून ह्या परीक्षा देणं आणि त्यात अव्वल येणं आवश्यक होतं. तल्लख मनू ह्या अडथळ्यांच्या शर्यतीतून यशस्वी पार पडत देशपातळीपर्यंत पोहोचली. दिल्लीत झालेल्या लेखी परीक्षेत हिंदीत उत्तरे लिहायची असूनही तेथील मराठी लेखनिकाने सारी उत्तरे मुद्दामहून मराठीत लिहिली. तेथील अधिकार्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर योग्य कारवाई होऊन तिची उत्तरपत्रिका हिंदीत लिहवली गेली.
बालश्री पुरस्कार मिळाल्यावरचा आनंद आणि प्रत्यक्ष सोहोळ्याचे वर्णन तर पुस्तकात सविस्तर केले आहेच पण मनाला भावतो तो लहानग्या मनूचा आत्मविश्वास आणि लक्षात राहतो तिचा हजरजबाबीपणा. राष्ट्रपतींनी विचारले, " फिर कब आओगी दिल्ली?" तर ह्या चिमणीचे हजरजबाबी उत्तर "पद्मश्री लेने आउंगी।"
ह्या सार्या प्रवासाचा वेध,मनश्रीच्या,तिच्या आईवडिलांच्या भावना सुमेध वडावाला(रिसबूड) ह्यांनी मनश्री ह्या पुस्तकात शब्दांकित केल्या आहेत.पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते ती मनश्रीची आणि तिच्याबरोबरीने तिच्या आईची जिद्द! काही प्रसंगातील अनुभवांचा कटूपणा टाळण्यासारखा होता असे वाटले तरी एकंदरीतच हे पुस्तक झगझगीत प्रकाशाची अनुभूती देऊन जाते.
मनश्री- एका दृष्टिहीन मुलीची 'नेत्रदीपक' यशोगाथा
सुमेध वडावाला (रिसबूड)
राजहंस प्रकाशन
किं रु १६०/-
प्रथमावृत्ती- जून २००८
प्रतिक्रिया
7 Apr 2009 - 9:47 pm | रेवती
पुस्तकाची चांगली ओळख करून दिलीस स्वातीताई!
शारीरीक अपंगत्वावर मनू व घरातल्या सगळ्यांनी मात केली ती सामर्थ्यशाली मनामुळेच!
त्यांना कसा व किती त्रास झाला असेल, किती उपेक्षा पहिल्यांदा वाट्याला आली असेल याची
कल्पनाही करवत नाही. त्यांच्या जिद्दीला सलाम!
रेवती
7 Apr 2009 - 9:52 pm | प्राजु
स्वातीताई,
तुझ्या लेखानाचा हा आणखी एक पैलू.
उत्तम परिक्षण लिहिलं आहेस. खूप आवडलं.
या परिक्षणामध्येच मनूची , तिच्या आईची, कुटुंबाची धडपड इतक्या सुरेख लिहिली आहेस.. की हे पुस्तक मिळवावेच असे वाटते आहे.
खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Apr 2009 - 10:08 pm | नाटक्या
स्वातीताई,
फारच सुंदर परिक्षण केलं आहे. असंच एक पुस्तक मला आठवतं "उंच माणसांचे बेट" या नावाचं, विजया वाड आणि लिला जोशी यांनी लिहीलेलं आहे (लिला जोशी म्हणजे ठाण्यातील सुप्रसीध्द जोशी बाईंचा क्लास किंवा अभय कोचींग क्लासेस्च्या जोशी बाई). या पुस्तकात देखील जन्मत: किंवा अपघाताने आलेल्या अपंगत्वावर मात करून नियतीशी लढणार्या व्यक्तींची माहीती आहे. सुदैवाने या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी हजर होतो. त्या सोहोळ्याला लोकसत्ताचे तेव्हाचे संपादक श्री. माधव गडकरी उपस्थीत होते. हे ही पुस्तक अत्यंत सुंदर आहे. जोशीबाईंबद्दल लोकसत्तातच एक लेख प्रसिध्द झाला होता तो इथे वाचता येईल.
- नाटक्या
8 Apr 2009 - 3:44 pm | विकास
आत्ताच हाती ज्यांच्या शून्य होते वाचनात आले आणि काही दिवसांपुर्वी येथे लिहीलेही होते. आता त्याच संदर्भात हे नवीन पुस्तकाची छान ओळख झाली! धन्यवाद!
बाकी नाटक्या,
अचानक लीला जोशी बाईंचा उल्लेख करून जुन्या आठवणी जागृत केल्या. त्यांच्याबद्दलच्या लेखाच्या माहीतीबद्दल धन्यवाद!
7 Apr 2009 - 10:10 pm | अनामिक
खुप सुंदर परिक्षण... एका उत्तम पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!
शारीरीक अपंगत्वावर मात करून यश मिळवणार्या मनूसारख्यांकडे पाहीलं की आपला अहंभाव लगेच गळून पडतो. स्वतःला होणारा त्रास, पदरी पडणारी उपेक्षा या सगळ्यांवर मात करुन एक विशेष यश संपादीत करणे सोपी गोष्ट नव्हे. मनू आणि तिच्या कुटूंबाला माझा मानाचा मुजरा!
पुस्तंक नक्की वाचणार..
-अनामिक
7 Apr 2009 - 10:19 pm | नंदन
पुस्तकाची सुरेख ओळख करून दिली आहेस, स्वातीताई. मिळवून नक्की वाचेन. नाटक्या यांनी दिलेला दुवाही मस्त.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Jun 2010 - 11:30 am | वेदश्री
असेच म्हणते! जोशीबाईंचे पुस्तकही मिळवून वाचायचा जरूर प्रयत्न करेन. :)
8 Apr 2009 - 1:14 am | शाल्मली
स्वातीताई,
पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे.
सर्वप्रथम घरात मूल येणार म्हणून घरच्यांना नक्कीच आनंद झाला असेल.. परंतु प्रत्यक्षात समोर ठाकलं अनपेक्षित सत्य.. त्यांना आलेले अनेकविध अनुभव, अनेक अडचणी आणि त्यावर केलेली मात.. आणि नुसती मात असं नव्हे तर त्या मुलीने मिळवलेलं यश.. सगळंच विलक्षण आहे.
तिच्या पालकांच्या आणि तिच्या स्वतःच्या जिद्दीची खरंच कमाल आहे.
तू या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!
--शाल्मली.
8 Apr 2009 - 7:23 am | विसोबा खेचर
स्वातीताई,
पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे.
नेमके हेच बोल्तो..!
बाय द वे, मनश्री ने नावच मला खूप आवडतं! :)
तात्या.
8 Apr 2009 - 6:48 am | मदनबाण
उत्तम परिक्षण... :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
8 Apr 2009 - 6:56 am | समिधा
पुस्तकाचे खूप छान परीक्षण केले आहेस. आता ते पुस्तक लवकरात लवकर मिळवून वाचावेसे वाटत आहे.
खरच त्यांच्या जिद्दीला माझा पण सलाम....
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
8 Apr 2009 - 9:46 pm | क्रान्ति
सोमण कुटुंबीय आणि त्यांना सहकार्य करणा-या सगळ्यांना शत शत प्रणाम! स्वातीताई, खूप खूप धन्यवाद इतक्या चांगल्या पुस्तकाची सुरेख ओळख करून दिल्याबद्दल. अगदी अवश्य वाचेन आणि इतरांनाही सांगेन.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
8 Apr 2009 - 10:14 pm | संदीप चित्रे
यापेक्षा अधिक काय लिहू?
पुस्तक मिळवणं आवश्यक आहे.
8 Apr 2009 - 10:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर पुस्तक परिचय......!
9 Apr 2009 - 6:43 pm | स्वाती दिनेश
'मनश्री' वाचताना अनेकदा डोळे भरून आले, हा अनुभव तुम्हा सर्वांबरोबर वाटायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले आणि तिची ओळख करून दिली.
सर्वांना मनापासून धन्यवाद.
स्वाती
9 Apr 2009 - 6:48 pm | चतुरंग
पुस्तकाची ओळख परवाच वाचली होती. प्रतिक्रिया द्यायचे मागे पडले. ओळख वाचतानाही माझे डोळे भरुन आले तर पूर्ण पुस्तकाच्या वाचनाने काय होईल? अतिशय नेमकेपणाने तू ओळख करुन दिली आहेस.
पोटचा गोळा अपंग घेऊन वाढवणे म्हणजे रोजची विस्तवावरची चाल असते!
सुदैवाने मनश्रीचा मेंदू अपंग नाही हे केवढे भाग्य! त्या संपूर्ण कुटुंबाच्या जिद्दीला, त्यागाला, समर्पण भावनेला लाख सलाम.
पुस्तक नक्कीच वाचणार.
(नतमस्तक) चतुरंग
9 Apr 2009 - 7:55 pm | लिखाळ
स्वातीताई,
पुस्तकाची ओळख फारच चांगली करुन दिली आहेस.
त्या पालकांचे आणि मनश्रीचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच !
-- लिखाळ.
10 Apr 2009 - 4:24 am | बेसनलाडू
पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे.
(वाचक)बेसनलाडू
10 Apr 2009 - 7:02 am | मुक्तसुनीत
परीक्षण आवडले. स्फूर्तिदायी वाटले. "मेक एव्हरीडे काऊंट" या वाक्याची पुन्हाएकदा आठवण झाली. अनेक धन्यवाद.
3 Jun 2010 - 4:56 pm | स्वाती२
खूप सुरेख ओळख!
3 Jun 2010 - 6:49 pm | शुचि
पुस्तकाची ओळख फारच आवडली. किती धडाडीचे, सिंहाच्या काळजाचे, कर्तुत्ववान लोक असतात जगात. मनास उभारी देणारी यशोगाथा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
3 Jun 2010 - 8:04 pm | भानस
नेटकं परिक्षण, आवडले. त्यांच्या जिद्दीला सलाम.