ओळख!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
5 Nov 2020 - 12:06 pm

संदर्भः
लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं!
"अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते !
त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो!
परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात!
ह्या अनुषंगानं विचार होत असता, काही ओळी सुचत गेल्या. ती ही रचना. :-)

---

जगण्यामधली सहजता मी शोधत असतो!
मुखवट्यांची गरज कशाला? समजत नाही..

शिव्या-शाप अन् हेवे-दावे.. सवय जाहली..!
अवचित कुणी जर गोड वागला.. समजत नाही!

प्रत्येकाची आस खरे तर "दूध" मिळावे!
इतरांसाठी मनात "पाणी".. समजत नाही..

आनंदाला शोधत सारे वणवण फिरतो!
मग आठव केवळ दु:खाचा का? समजत नाही!

प्रेमाची ती नाती-गोती कितीक असती..
प्रेम फक्त का तिथे नसावे.. समजत नाही!

---

तेल-वात अन् ज्योत दिव्याची ओळख असते..
माणुसकीची ओळख का मग समजत नाही?

राघव

अद्भुतरसशांतरसकवितासमाज

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

5 Nov 2020 - 12:09 pm | प्राची अश्विनी

क्या बात!
प्रेमाची ती नाती-गोती कितीक असती..
प्रेम फक्त का तिथे नसावे.. समजत नाही
हे खासच!

राघव's picture

5 Nov 2020 - 12:18 pm | राघव

धन्स! तुझी रचनाही खूप सुंदर! :-)

Bhakti's picture

5 Nov 2020 - 5:31 pm | Bhakti

जगण्यामधली सहजता मी शोधत असतो!
मुखवट्यांची गरज कशाला? समजत नाही..
...अगदी .. सुंदर

चांदणे संदीप's picture

6 Nov 2020 - 12:33 pm | चांदणे संदीप

आवडली रचना.

सं - दी - प