धोंडोपंतांच्या आम्ही कोण पासून प्रेरणा घेऊन आणि (अर्थातच) केशवसुत,केशवकुमार इत्यादींच्या ओळी चोरून ही चारोळी समर्पित करतो...
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी
उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी
संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा
पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा
(कृपया र्हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत. चारोळी जरा बरी वाटली, तर आणखीन पुढे विस्तार करावयास हरकत नाही. उत्साह असल्यास कृपया शार्दूल-विक्रीडित न मोडता करावी)
प्रतिक्रिया
11 Feb 2008 - 10:35 pm | धनंजय
यत्नाने विरचून रचना शार्दूलविक्रीडितीं
देशी ओळख, घेइ अमुच्या उत्साहनावर्धना
आमचेही ह्रस्व दीर्घ पोटात घाला, म्हणजे झाले :-)
14 Feb 2008 - 7:55 pm | पुष्कर
तुमच्या पहिल्या प्रतिसादाने खरं तर माझाच उत्साह वाढला आहे. धन्यवाद..
11 Feb 2008 - 10:48 pm | पिवळा डांबिस
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही सदाचे रडे
धंदा सोडुनी शोधितो नोकरी ती कधी सापडे
परंतु परक्यांनी सुनविता बोल ते उर्मट खडे
हाडे मोडुनि ठेवितो भरता पापांचे तयांच्या घडे
:)))
जय महाराष्ट्र!
पिवळा डांबिस
12 Feb 2008 - 12:35 am | इनोबा म्हणे
याला म्हणतात चारोळी....वाह काय भारी आहे
डांबीसा चालू राहू दे रे!(तसे तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात,पण एकेरी उच्चाराने आम्हाला अधिक जवळीक वाटते)
जय महाराष्ट्र!
(कट्टर मराठी) -इनोबा
14 Feb 2008 - 8:07 pm | पुष्कर
वा! ही डांबीस पावती आपल्याला आवडली बरं का.
जय महाराष्ट्र
12 Feb 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
पुष्करराव, झकास कविता बरं का...!
पि डां ची कविताही आवडली..
तात्या.
अवांतर -
कृपया र्हस्व-दीर्घाच्या चुका काढू नका.त्या मला माहीत आहेत.
पुष्करराव, मिसळपाववर र्हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :)
तेव्हा र्हस्व-दीर्घाची चिंता न करता निडर होऊन लिहा. मी बघतो कोण तुम्हाला काय बोलतोय ते! :)
आपला,
तात्या ठाकरे!
अध्यक्ष, मराठी नवनिर्माण सेना! :)
--
आम्ही मायमराठीला शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मुक्त करण्यास कटिबद्ध आहोत!
14 Feb 2008 - 8:16 pm | पुष्कर
तात्या,
तुमचा प्रतिसाद स्वागतार्ह!
पुष्करराव, झकास कविता बरं का...!
"झकास" ही प्रतिक्रिया वाचून आश्चर्यचकित झालो. छोट्याश्या चारोळीला ही दाद मिळेल असं वाटलं नव्हतं.
मिसळपाववर र्हस्व-दीर्घाचे, व्याकरणाचे आणि प्रमाणभाषेचे फाजील कौतुक खपवून घेतले जात नाही! मिसळपाववर शुद्धीचिकित्सक नावाचा आचरटपणाही नाही! :)
माहीत आहेच. म्हणूनच मी मराठी आंतरजालावर पहिलं लिखाण मिसळपाववर केलं, त्यानंतर आत्तापर्यंत सतत मि.पा. वर येत असतो आणि काहीतरी तुटपुंजं लिखाण करत असतो. (आंतरजाल सुविधा मिळण्याबाबत अडचणी आहेत.) त्यामुळे वेळच मिळत नाही.
विष्णुगुप्त २ डोक्यात तयार आहे, पण कागदावर उतरत नाहिये. त्यामुळे परत माझी अवस्था "बोलायाचे कितीक आहे पण..." अशी झाली आहे. ("बोलायाचे कितीक आहे पण..." ही माझीच कविता आहे, मि.पा. वरचं माझं पहिलं लिखाण.... ही त्याची जाहिरात समजा हवं तर)
सध्या असं काहीतरी चारोळ्या वगैरे करून दिवस काढतो आहे.
-पुष्कर
12 Feb 2008 - 11:36 am | वडापाव
झकास!!!
व रहस्व-दीर्घाची काळजी करू नका.
निरंकुशः कवयः
16 Feb 2008 - 3:46 pm | पुष्कर
प्रिय वडापाव,
रहस्व-दीर्घाची काळजी करू नका.
अजिबात काळजी करत नाही.
तुम्ही असल्यावर कोणाची भिती आहे मला!
-पुष्कर (साहेब नव्हे)
12 Feb 2008 - 5:09 pm | सख्याहरि
तेच म्हणतो मी...
-सख्याहरी
12 Feb 2008 - 10:26 pm | धनंजय
बहुषु एकतां द्रष्टुं मिश्रितं वचनं श्रुणु ।
बहूंत एकता दावू मिसळू वचने बघा ॥
कमिवाशु वयो यस्य कवयः स निरंकुशः ।
यदृच्छा-पद-दातारा: कवयस्तु निरंकुशाः ॥
(अर्थ देऊन विरस करत नाही. [अशी गालावरच्या तिळाची आज्ञा.])
16 Feb 2008 - 4:03 pm | पुष्कर
मम कविता-लेखन-विषये एकं संस्कृत-वचनं पठित्वा अहम् अतीव उल्लसितोस्मि। (अत्र अहम् अवग्रहचिन्हम् टंकितुम् न शक्नोमि। क्षमस्व भगवन्!) शार्दूलविक्रीडिते न लिखिते अपि मया एषा कविता रोचिता।
भवताम् एक: मराठी-भाषायाम् लिखिता पंक्ति: अपि सुंदरास्ति। "मिसळू वचने" हे शब्द तर खूपच आवडले.
-पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:)
16 Feb 2008 - 7:31 pm | पिवळा डांबिस
अहो स्वघोषित,
पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:)
तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा|
श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा....
किंवा सबटायट्ल्स द्या...:)
-पिवळा डांबिस
21 Feb 2008 - 8:19 pm | पुष्कर
माझ्या एका संस्कृत उपप्रतिसादावरून एवढा गोंधळ! एवढा राग!
धनंजयरावांचा संस्कृत प्रतिसाद वाचून माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या (आता तुम्ही म्हणाल की त्या "सुप्त" च काय वाईट होत्या!). मला "अहो स्वयंघोषित....." वगैरे म्हणायची काही गरज नव्हती. आपण सगळेच जण मजेमध्ये काही फालतू बढाया मारतोच की! एखाद्या अस्सल मराठी प्रतिसादाखाली उगाचच "पुष्कर ठाकरे" किंवा एखाद्या माश्याच्या कालवणाच्या खाली प्रतिक्रियेमध्ये "पुष्कर मालवणकर" असल्या सह्या मारतोच की! हा सुद्धा तशातलाच प्रकार. तुम्हाला वाचून मी "माज करतोय" वगैरे वाटत असेल तर तो बालीशपणा समजून सोडून द्या ही विनंती.
दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली एक फॅडच निघालंय. कोणी संस्कृतमध्ये किंवा संस्कृतबद्दल काही बोललं, तर लगेच "छ्या छ्या! हे असलं सोवळ्या-ओवळ्यातलं आपल्याला काही पटत नाही बाबा.." असं म्हणून झिडकारायचं. शास्त्रीय संगीताबद्दल बोलायला लागलं तर 'हे काही आपल्याल काही कळत नाही बाबा, ते आ-ऊ नाही झेपत" असं म्हणून झिडकारायचं. अरे ते काय आहे हे समजून तर घ्या! शिवाय प्रत्येकाची आवड वेगळी. मला जे आवडेल, तेच तुम्हाला आवडेल असं नाही. त्यासाठी एकमेकांवर राग कशाला काढायचा?
डांबीसराव, 'श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी' हे खरं आहेच, म्हणून तर मी या मराठी जालविश्वात आनंदाने नांदायला आलोय. जरा थोडं वेगळ्या भाषेत बोललो म्हणून लगेच कान-उघाडणी केलीत! जाऊ द्या. तुमच्या भावना पोचल्या. यापुढे काळजी घेईन.
-स्वयंघोषित पुष्कर
21 Feb 2008 - 8:48 pm | सृष्टीलावण्या
श्री. बाळ सामंत नावाच्या सद् गृहस्थाने म.टा. मध्ये असे विधान केले की ते संस्कृतचा द्वेष करतात
आणि त्यांचा व संस्कृतचा अजिबात संबंध नाही. त्यावर एका संस्कृतप्रेमीने त्यांना फार मार्मिक उत्तर दिले...
तो म्हणाला, "तुमचा संस्कृत द्वेष कळला... पण तुमचा संस्कृतशी संबंध नाही हे मात्र खोटे कारण तुमच्या नावातील बाळ आणि सामन्त हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत."
आज ही प्रत्येक भारतीयाची आज्जी - भाषा संस्कृत आहे (त्याने मान्य केले नाही तरी ते सत्यच राहणार आहे...)
22 Feb 2008 - 12:09 pm | पिवळा डांबिस
मा. पुष्करराव,
तुमचा काहीतरी जबरदस्त गैरसमज झाला असावा असे तुमच्या वरील निरोपावरून वाटते. मी माझ्या निरोपात माझे स्वतःचे असे काहीही अपमानास्पद किंवा अप्रतिष्ठाजनक लिहिले आहे असे मला वाटत नाही.
अहो स्वघोषित,
पुष्करः (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:)
याबाबत म्हणाल तर तुम्हीच तशी स्वतःची सही वरती केली आहे व ती मी फक्त कॉपी आणि पेस्ट केली आहे. 'स्वघोषित' या शब्दाबद्द्ल म्हणाल तर ती शिवी नाही वा मराठी भाषेतील अपशब्दही नाही. ते सेल्फ (स्व) प्रोक्लेमड (घोषित) याचे मराठी भाषांतर आहे. मराठीतही तसा शब्दप्रयोग रूढ आहे. मी स्वतःहून तुम्हाला (एकः संस्कृत-(मूर्ख)-शिरोमणि:) म्हणण्याचा उद्धट्पणा करत नसून तुम्हीच स्वतःला तसे म्हटले आहे ते वाचकांना सूचित करण्याचा तो एक मार्ग आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला राग आला असेल तर तो तुम्ही स्वतःच केलेल्या स्वतःच्या वर्णनाचा यायला हवा, माझा नव्हे.
आता माझ्या उर्वरीत लिखाणासंबंधी,
तुमचा "अस्मात, कस्मात" मी नेणेचि गा|
श्री चक्रधरे निरूपीली म्हराटी, तिये पुसा....
किंवा सबटायट्ल्स द्या...:)
वरील दोन काव्यपंक्ति या महानुभावांच्या आहेत व जुन्या मराठीचे वाचन करणार्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा अर्थ हा आहे की "मला तुमचा 'अस्मात, कस्मात' काही समजत नाही (न येणेचि = नेणेचि गा) तेंव्हा श्री चक्रधरांनी निरुपण केलेली अशी जी मराठी आहे तिच्यातून सांगा." यात दुसर्या भाषेला तुम्ही म्हटल्याप्रमाणे 'झिडकारण्याचा' वगैरे संबंधच येत नाही. उलट स्वतःकडे अडाणीपण (नेणेचि) घेऊन केलेली ती एक विनंती आहे.
उद्या कोणी जर इथे कानडी किंवा बंगाली भाषेत काही लिहिलं तर आपण त्याला असं सांगूच ना की बाबा आम्हाला हे काही कळलं नाही, कृपया मराठीतून सांग. विशेषतः मि. पा. सारख्या "अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" हे ब्रीदवाक्य असलेल्या संकेतस्थळावर जर अशी मागणी झाली तर त्याचा इतका राग का यावा? तुम्ही संस्कृतात लिहीण्यावर आमचं काहीच म्हणणं नाही, आमची विनंती फक्त इतकीच होती की जर खाली मराठीतून अर्थ (सबटायट्ल्स) लिहिलात, तर आम्हालाही समजेल. केवळ आम्हीच असे म्हणतो असे नाही तर चार प्रतिक्रिया खाली जाऊन पाहिलेत तर विसोबा खेचरांनीही तीच भावना व्यक्त केलेली आहे!
असो! आमच्या निरोपातील शब्दयोजना व अर्थयोजना तुम्हाला आणि मुख्यतः इतर सर्व वाचकांना स्पष्ट करण्यासाठी हा लेखनप्रपंच! बाकी तुमच्या निरोपातील इतर मुद्द्यांवर (सोवळे-ओवळे, शास्त्रीय संगीत इत्यादि) वाद घालायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही कोणावरही रागवण्यासाठी मि. पा. वर येत नाही. क्वचित थट्टा करीत असू पण कोणाचीही कधी आम्ही 'कान उघाडणी' केल्याचे आम्हाला स्मरत नाही. सर्वस्वी अनोळखी अशा लोकांच्या मुलांना रागवायची आम्हाला गरज पडलेली नाही.
तुमच्या निरोपाला सविस्तर उत्तर देण्याचे कारण हेच की आमची प्रतिक्रीया वारंवार वाचूनही त्यात आम्ही तुमचा (किंवा इतर कोणाचाही) उपमर्द केला आहे असे आम्हाला वाटत नाही. आता वाचणार्याने स्वतःचा अपमान करूनच घ्यायचा हे ठरवले असेल तर गोष्टच वेगळी!
असो! हा विषय आता आमच्यासाठी संपला आहे.
-पिवळा डांबिस
23 Feb 2008 - 7:10 pm | पुष्कर
मला तुम्ही माझा "अपमान" केलाय वगैरे काही वाटलं नाही. 'कान-उघाडणी' ही मोठ्यांनी लहानांची करायची असते, ते तुम्ही योग्यच केलंत. त्यामुळेच तर मी 'यापुढे काळजी घेईन' अशी प्रांजळ कबुली दिली आहे. मी फक्त तुम्हाला माझा राग आला असेल तर तो दूर करायचा प्रयत्न केला.
आता 'स्वघोषित' बद्दल बोलायचं तर असं आहे- शाळेत एखाद्या छोट्या कारट्याने नाटकात शिवाजींचं काम केलं, आणि त्यानंतर कधीतरी शाळामास्तराने त्याला "अहो गोब्राह्मणप्रतिपालक, उठा" अशी हाक दिली, की त्यावरून लगेच समजतं की मास्तर त्याला झापणार आहे. मला तुम्ही 'अहो स्वघोषित' म्हणून हाक मारलीत तेव्हा अगदी तस्सच वाटलं बघा.
आता तुम्ही तो विषय संपवलाच आहे. मलाही त्याबद्दल फार पाल्हाळ लावायला नको आहे. पुन्हा भेटतच राहू.
16 Feb 2008 - 8:38 pm | धनंजय
वर काही प्रतिसादांत "कवयः निरंकुशः" असे म्हटले आहे.
त्याचा अर्थ
अनेक कवी धरबंध नसणारा आहे.
पहिल्या श्लोकाचा पहिला भावार्थ असा आहे.
हे अनेकाला एक म्हणून उल्लेख करणे हा "बहुतांत एकता" दाखवण्याचा प्रकार आहे काय? श्लोकाची दुसरी ओळ पहिल्या ओळीचे मराठी भाषांतर आहे.
त्याच श्लोकाचा श्लेष दुसरा अर्थ :
अनेकांमध्ये एकता बघण्यासाठी/दाखवण्यासाठी मिसळलेली वाक्ये ऐका/बघा. (आणि श्लोकात दोन भाषांतील वाक्ये मिसळलेली आहेत.)
---
दुसरा श्लोक :
नपेक्षा "कवयः" शब्दाचा अर्थ "अनेक कवी" असा न घेता, एकच "क-वय" असे आपण म्हणू शकतो.
"क"(म्हणजे पाण्या)सारखे ज्याचे वय आशु (सहज [वाहावत जाणारे]) आहे, तो क-वय धरबंध नसणारा आहे.
वाटेल तसे शब्द योजणारे (श्लेष - पावले ठेवणारे) अनेक कवी मात्र धरबंध नसणारे आहेत.
"एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" या शास्त्रवचनाच्या सारखे प्रतिसादाचे शीर्षक आहे. त्या शास्त्रवचनातही एक/बहु असा उल्लेख आला आहे, ही सौम्य गंमत.
17 Feb 2008 - 6:40 pm | पिवळा डांबिस
अहो आम्ही सबटायट्ल्सच्या संदर्भात केलेली सूचना पुष्करबाबासाठी होती, तुमच्यासाठी नव्हे! पुन्हा एकदा विरोपिकेचा मायना वाचल्यास हे ध्यानात यावे. पुष्करबाबा संस्कृत पद्यातून आता संस्कृत गद्यात उतरल्यामुळे केलेली ती गंमत होती....
तुम्ही तुमचा विरस कशाला होऊ देताय?
बाकी तुम्ही मराठीतून केलेले स्पष्टीकरण वाचल्यावर तुमचे संस्कृत लवकर समजते असे म्हणायची पाळी आलीय! आयला, काय तुम्ही काय, पुणे विद्यापीठामध्ये 'हेड ऑफ मराठी डिपार्टमेंट' आहात काय हो? :)
मराठी भाषेवर नितांत प्रेम असलेला,
पण मराठीच्या प्राध्यापकांची हाय खाल्लेला,
पिवळा डांबिस
15 Feb 2008 - 9:02 pm | सुधीर कांदळकर
मजा आली. फँटॅस्टिक. ग्रेट. या सर्व कविता प्रचलित वृत्तातीलच आहेत. आणखी येऊ द्यात.
18 Feb 2008 - 10:03 am | सृष्टीलावण्या
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
आभाराचा स्रोत : कविता
ही कविता सुद्धा शार्दूलविक्रीडित या
छंदात आहे का?
अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् ।
18 Feb 2008 - 10:47 am | चतुरंग
शार्दूलविक्रीडितच आहे.
चतुरंग
21 Feb 2008 - 8:39 pm | पुष्कर
माझ्या माहिती-प्रमाणे हे शार्दूलविक्रिडित नाही. कारण "येता मास जसा तताग चरणी शार्दूलविक्रिडित" असं त्याचं वर्णन आहे. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, जी ओळ मंगलाष्टकांच्या चालीवर म्हणता येईल, ती शार्दूलविक्रिडितात आहे असं समजावं. 'प्रारंभी विनती करू गणपती विद्या-दया-सागरा' हा श्लोक शार्दूलविक्रिडितात आहे.
पण मला व्याकरण ह्या विषयावर चर्चा करायला आवडणार नाही. तुम्ही एवढ्या छातीठोकपणे सांगताय, तर कदाचित तसं असेलही. माझं ज्ञान तोकडं आहे.
21 Feb 2008 - 10:04 pm | चतुरंग
"मातीत ते पसरले अतिरम्य पंख"च्या १४ मात्रांचं वृत्त निराळंच असावं कारण शार्दूलविक्रिडिताचे १९ मात्रांचे गणित जमत नाहीये.
चुकीबद्दल क्षमस्व.
मी वृत्त वैगेरे साफ विसरुन गेलोय आता, पुन्हा एकदा उजळणी करायला हवी.
चतुरंग
18 Feb 2008 - 6:20 pm | विसोबा खेचर
अहमपि संस्कृतेन लिखितुं च वक्तुं शक्नोमि । मया संस्कृतेन B.A. B.Ed. कृता । नैकवारं संस्कृतभारत्या: शिबिरे अपि उपस्थितोस्मि । भवान् मिलित्वा आनन्दमभवत् ।
अहो सृष्टीलावण्य, आम्हालाही समजेल असं काही लिवा की! तुमचं ते संस्कृत आमच्या पार डोक्यावरून जातंय बगा! :)
आपला,
(मिसळ चापणारा मराठी!) तात्या.
19 Feb 2008 - 6:44 am | सृष्टीलावण्या
अनेक संस्कृत भाषा संस्थांचे मानद अध्यक्ष, उपाध्यक्षपद भूषविणार्या अश्या तुम्ही हे लिहावेत? अरेरे, सूर्याला आपल्या उर्जेचा / प्रतिभेचा विसर पडण्याजोगे आहे हे.
19 Feb 2008 - 6:58 am | विसोबा खेचर
अहो कसला सूर्य, कसली ऊर्जा, अनं कसलं काय!
एका संस्कृत संस्थेच्या विश्चस्त पदाची माळ आमच्या गळ्यात पडली खरी, परंतु तीही आमच्याकडे असलेल्या थोड्याफार सांगितिक कौशल्यांमुळे!
झालं असं, की त्या संस्थेला एक संस्कृत नाट्यगीतांचा कार्यक्रम करायचा होता त्यामुळे कलाकारांची, साथीदारांची वगैरे जमवाजमव करण्याकरता आम्ही त्या संस्थेला मदत केली, त्या पुण्याईवर आम्हाला त्या संस्थेचं ट्रस्टी पद मिळालं इतकंच! एरवी आमचा संस्कृतशी काही संबंध नाही.
नाही म्हणायला, कालिदासच्या मेघदूताला स्वरबद्ध करण्याचा योग आला आणि तो कार्यक्रमही उत्तम झाला, परंतु तेव्हा सुद्धा आम्हाला कालिदासाने काय लिहून ठेवलंय, त्याचा मराठीत अर्थ काय?, हे चाल बसवण्यापूर्वी दहा दहा वेळा लोकांना विचारावं लागलं! एक गोष्ट मात्र खरं की कालिदासाचं मेघदूत हे मूलतःच अत्यंत लयबद्ध असल्यामुळे चाल बसवायला मात्र आम्हाला फारसे कष्ट पडले नाहीत!
असो, आचार्य डॉ श्रीराम भातखंड्यांसारखा देवमाणूस त्या संस्थेत आहे, तो मात्र आम्हाला सांभाळून घेतो आणि आमचं संस्कृतचं घोर अज्ञान हे 'झाकली मूठ...' राहतं! :)
तेव्हा, एखाद्या घराचा पोकळ वासा कसा असतो, तसं आमचं आहे! कुठलीही ऊर्जा वगैरे नसलेला पोकळ सूर्य! :)
आपला,
(विनाऊर्जेचा भास्कर!) तात्या.
:)
21 Feb 2008 - 10:53 pm | यनावाला
केवळ श्री.पुष्कर यांची कविता :
आम्ही कोण म्हणोनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी
उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी
संचारू मनसोक्त वायुलहरींवरती पुन्हा एकदा
पादाक्रांत करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा
ही शार्दूलविक्रीडित वृत्तात आहे.तसेच कवितेचा आशय ही उत्तम आहे. प्रतिसादातील कोणतीही कविता शा.वि. वृत्तात बसत नाही; असे दुर्दैवाने म्हणावे लागते.
......
शार्दूल विक्रीडितात १९ अक्षरे असतात.त्यांचे गण :म,स,ज,स,त,त,ग.(शेवटचे अक्षर गुरू.)
(मा सा जा स त ता ग येति गण हे शार्दूल विक्रीडितीं |)
अथवा: मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा | अशाच क्रमाने र्हस्व-दीर्घ अक्षरे हवीत. श्री.पुष्कर लिहितात "मंगलाष्टकांची चाल म्हणजे शार्दूल विक्रीडित"हे बरोबर आहे.(काही हौशी मंडळी स्वरचित मंगलाष्टके म्हणतात त्यांत फारच ओढाताण असते.)
.....
मातीत ते पसरले अतिरम्य पंख..(कवि ना.वा. टिळकः ...केवढे हे क्रौर्य !!..क्षणोक्षणि पडे..)
हे कडवे वसंततिलका वृत्तांत आहे...(जाणा वसंततिलका त,भ,जा,ज,गा,गीं..१४ अक्षरे.
ताराप भास्कर जनास जनास गा गा ) असो.
22 Feb 2008 - 7:06 am | ऋषिकेश
अजून एक फेमस उदा. :
"आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक", ही केशवकुमारांची कविता शार्दुलविक्रीडितातीलच :)
फार सुंदर कविता. तसंही सुनीत हा काव्य प्रकारही शार्दुलविक्रीडितातच लिहितात
चुकले असल्यास सांगा
-ऋषिकेश
22 Feb 2008 - 8:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संस्कृत कळत नाही पण चर्चा जोरदार चालू आहे, चालू द्या :)
आपला
वृत्त/मात्रा/संस्कृत/पासून कै मैल दूर असलेला
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे