दोसतार - ५७ ( अंतीम भाग)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
27 Jun 2020 - 10:15 am

रात्री झोपताना बरेच वेळ झोपच येत नव्हती. डोळे मिटले की डोळ्यासमोर मुलांनी गच्च भरलेले मैदानच येत होते.
मॅच हरलो तरी खूप मजा आली. मुख्याध्यापक सरांनी सहावी ब आणि आमच्या टीमला त्यांच्या घरी चहा चे निमंत्रण दिले. सर्वांचे अभिनंदन केले.
पुढचे बरेच दिवस मॅच शिवाय वर्गात दुसरा विषयच नव्हता.

मागील दुवा http://misalpav.com/node/47081

वार्षीक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला की पुन्हा एकदा यवतेश्वराची सहल करायचीय. सगळ्यांना घेऊन. एल्प्या टंप्या योग्या राजा मंदार , महेश आंजी , गौरी , संगीता , दाम्या , अज्या , सुन्या सगळ्यांनी जायचय. आठवी ब ची सहल.
पण या वेळेस धबधबा नसणार . चालायचं प्रत्येक वेळेस धबधबा कसा असेल. लख्ख कडकडीत ऊन असणार.
हे आज ठरवतोय. आज पहिला पेपर आहे. गणीताचा. पेपर कोणताही असू दे भीति नाही वाटत. गणीताच्या पेपरला जाताना घरातून बाहेर पडतानाच ऐनवेळी पोटात मुरडा येतो तसे काहीच होत नाहिय्ये. अगोदर तक्रार असायची की गणीताचा पेपर अगोदर का ठेवतात म्हणून . गणीताचा पेपर अगोदर असला की तो अवघड जातो. आनि बाकीच्या विषयांचा अभ्यास करताना डोक्यात तेच चक्र फिरत रहातं. अभ्यास झालेला असला की कसे एकदम पिसासारखे वाटते. वर्गात सगळे पेपर लिहीताहेत. कोणीच कुणाला " ए चौथ्याचं उत्तर काय रे. किंवा ती आकृती दाखव की. असे कुजबुजत नाहिय्ये. निम्म्या वर्गाचा पेपर सोडवूनही झालाय. टंप्या आणि एल्प्याचा सुद्धा.
त्या शिक्षक दिनानंतर सगळंच बदललं. स्वतःला नीट कळावं म्हणून वर्गात सगळे एकमेकांना शिकवायला लागले. अभ्यासाची ही पद्धत कधीच कुठे शिकवली नव्हती.
सरांना शंका विचारायला वर्गात बरेच हात वर यायला लागले.
मुख्याध्यापक सरांच्या घरी त्या दिवशी झालेल्या चहापाना नंतर एल्प्या आणि टंप्याही खूप बदललेत. त्यांना आता कोणीही गेल्या वर्षी नापास झालेले म्हणत नाही.

शेवटचा पेपर भूगोलाचा. या वर्षीचं भूगोलाचं पुस्तक मी रद्दीत नाही टाकणार. इतकी छान माहिती देणारं पुस्तक रद्दीत कोण टाकेल.
शेवटचा पेपर आहे. पाटणच्या शाळेत शेवटच्या पेपर नंतर मधल्या चौकात मारामारी असायची. वर्षभर शिल्लक राहिलेली मारामारी पूर्ण करायचा दिवस. जुने हिषेब पुढच्या वर्षात न्यायचे नाहीत. तू मला त्या दिवशी दोन टोले दिले होते. मी तुला एकच दिला होता. शिल्लक राहिलेला टोला आज मी तुला हाणणार. किंवा तू दंगा करत होतास त्यामुळे सरांनी मला छड्या मारल्या. आता मी तुला दोन धपाटे घालणार. इतका साधा सरळ सोप्पा विषय. ज्याला टोले द्यायचे ठरवलय तो कोणत्या रस्त्याने जातो ते माहीत असतंच. आपन दबा धरून लपून बसायचं फक्त तो येताना दिसतोय का ते पहायला एखादा बारक्या गडी रस्त्यावर ठेवायचा. त्या बारक्यानेही खबरदरी घ्यायची की तो जो कोण येणार आहे तोआला आहे हे सांगताना एकटाच येतोय का आणखीन दोघे तिघे सोबत आहेत. ते पण सांगायचं.
दोघेतिघे असतील तर शक्यतो लपलोय त्या आडोश्या च्या बाहेर यायचंच नाही. अर्थात हे प्रत्येक वेळेस चुकायचंच. लपलेला कोणालातरी दिसणारच. मग त्याला हाक मारून पाठीत थाप मारून बाहेर काढायचा. कसा पकडला म्हणून हातावर छान दणदणीत टाळी द्यायची. मग शाळेसमोरच्या दुकानातून लिमलेटच्या केशरी गोळ्या नाहीतर श्रीखंडाच्या गोल गोळ्या घेऊन सगळ्यांना देणार. मारामारीचे सगळे हिषेब त्या केशरी साखरेत वाहून जाणार.
येणारा तो एकटाच असेल असं कधीच व्हायचं नाही. त्यामुळे एकटाच असला तर काय हा प्रश्नच यायचा नाही.
शेवटचा पेपर सोमवारी आहे. शनिवारी असता तर बरे झाले असते. निदान रविवार ची सुट्टी मिळाली असती. आता पेपर आहे म्हंटल्यावर रविवार असला तरी अभ्यासाला बसावे लागतेच की.अगोदरच शेवटचा पेपर म्हणजे अभ्यासापेक्षा बाकीचेच सगळे सुचत असते. तरी बरंय भूगोलाचा पेपर आहे. पुस्तकावर थोडी नजर फिरवली. टुंड्रा प्रदेशातल्या एस्कीमोंच्या बर्फाच्या घराची चित्रे पाहिली. मजा आहे नाही एस्किमोंची. तिथली लहान बाळे तहान लागली की घराच्या भिंती चाटत असतील. आणि खेळायला घसरगुंडी खेळत असतील. तिथली मुले भूगोल शिकताना आपल्या मुलांची मजा आहे म्हणत असतील खेळायला भरपूर मुले आहेत. शाळेत मैदाने आहेत. शेतातून फिरताहेत. रस्त्यावरून धावताहेत. भूगोलात फरक आहे म्हणून तर अभ्यास करायला मजा येते.
शेवटचा पेपर आईने सांगीतलय सगळ्या मित्रांना उद्या सकाळी नाश्त्याला घरी बोलव. कुणाला कुणाला बोलवायचं टंप्या आणि एल्प्या तर आहेतच. राजा मोरे, अज्या दामले , महेश ,मंदार , शर्मिला, संध्या , गौरी ,संगीता सुन्या , रवी , इंदू , मीना , बुटका अन्या , संज्या , अरविंद , योग्या माधुरी , सुषम. वैजू, सुम्या सगळेजण घरी आलेत. घरात नुसता दंगा चाललाय. आख्खा वर्ग भरलाय. मॉनिटर शिवाय. गप्प बसा सांगणारे कोणी नाहीये. घरात बाहेरची खोलीच काय पण सगळं घरच भरलय .आईने सगळ्यांसाठी पोहे आणि सरबत केलंय. मी कोणाची तरी वाट पहातोय. सगळे एकदम विनाथांबा एस्टी ची गाडी सुटावी तसे सुसाट सुटलेत. धम्माल हसताहेत. गाणी म्हणताहेत. टाळ्या वाजवताहेत. माझे लक्ष्य नाहिय्ये. मी कोणाची तरी वाट बघतोय. समोरून आंजी आणि शुभांगी येताहेत. शुभांगी. लिंबू पिवळ्या रंगाचा छान ड्रेस आहे. आणि त्यापेक्षाही ती डोळे बारीक करत खूप छान हसतेय. मला एकदम टुंड्रा प्रदेशात गेल्या इतकं गार वाटतय. आंजीच्या हातात कसलासा फुलांचा गुच्छ आहे.आणि शुभांगीच्या हातात एक रंगीत कव्हर चे एक कसलेसे पुढके आहे.
आंजी आल्यावर संगीता आणि माधुरी उठून उभ्या रहिल्या. त्यांनी एकमेकींच्या कानात काहितरी सांगितले. आणि एकदम जोरजोरात फिदी फिदी हसायला लागल्या. या पोरीना हसायला काही कारण लागत नाही. त्या दोघी चौघी हसल्या म्हणून शर्मिला वैजू संध्या ही उठून उभ्या राहिल्या. आंजी तर थेट स्वैपाकघरात गेली.
स्वैपाक घरातून ताटात गुलाबाची सुट्टी फुले आणि ते कागदाचे रंगीत पुडके घेवून आली. आईही बाहेर आलीये. संज्याने त्याच्या पिशवीतून कॅमेरा बाहेर काढलाय. त्याने कॅमेरा आणलाय हेच माहीत नव्हते. मला ठेवून सग़ळे उभे राहिलेत. शुभांगी आंजीने केलेले ते ताट घेवून समोर येते. माझ्या हातात एक गुलाबाचे फूल देते. सगळे टाळ्या वाजवतात. अंजी ने ते रंगीत कागदाचे पुडके माझ्या हातात दिले. संज्या फोटो काढतोय. प्रत्येक जण माझा हात हातात घेवून एकेक फूल देतोय. कोणी मला मिठी मारतोय. मला कळतच नाहिय्ये काय चाललय ते. माझा वाढदिवस आज नाहिय्ये. काही. तो पुढच्या महिन्यात येतो. आणि वाढदिवस काय असा साजरा करायचा असतो का. तिथीने वाढदिवस असता तर आईने ओवाळले असते की.
मी भांबावलेला . मला तसा पाहून टंप्याने मला एका खुर्चीत बसवलेय. सगळे जमिनीवर जागा मिळेल तिथे बसलेत. संध्या उभी रहाते. आणि भाषण सुरू करते.
" माझ्या वर्ग मित्र मैत्रीणीनो. आज मी तुमच्या समोर उभी राहून जे दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती" संध्याने बोलायला सुरवात केल्यावर ती काय बोलते ते ऐकायला सगळे शांत बसलेत.
आपला मित्र वर्षभर आपल्या सोबत आहे. या या वर्षात आपण बरेच काही शिकलो. शाळेत खूप धमाल केली.
संध्या बोलत होती. मला संदर्भ लागत होते. बाबांचा दोन दिवसंपूर्वी आईला फोन आला होता. त्यांची बदली दिग्बोई की दिब्रुगड अशा कुठल्या तरी लांबच्या गावी झाली होती. आम्ही आता बाबांसोबत रहायला जाणार होतो. नववीसाठी मला तिकडच्या शाळेत अ‍ॅडमिशन घेतली होती. आईने हे मला मुद्दाम सांगितले नव्हते. मला प्रश्न पडलाय जे मलाच माहीत नव्हते मग ते यांना कसे समजले? हां परवा आंजीची आई आईला बाजारात भेटली होती. सगळे मित्र भेटावेत म्हणून आईने हा सर्वांचा निरोप घ्यायचा सेंडऑफ चा कार्यक्रम आखला होता.
खूप काहीतरी आपल्या हातातून निसटून चाललंय असे वाटतय. एकदा लहान असताना गुहागरला गेलो होतो तिथे समुद्राच्या लाटांनी मुठीत पकडलेली वाळू निसटून जात होती तसं काहीतरी.
संध्या चं भाषण झालं ती खाली बसली त्या अगोदरच माधुरी उभी राहिली तिने कविता म्हणायला सुरवात केली , श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. येवतेश्वर ची पावसातली सहल समोर दिसायला लागली. सुषम ने टाळ्या वाजवत ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार सुरू केले. तीचे संपतय तोच इंदू ने "लेकर पिला पिला थैला पत्र बांटने आता " कविता म्हणायला सुरवात केली.
कोण गातय कोण टाळ्या वाजवतय कोण हसतय. कोण हसताना लोळतय. कोण उभा राहिलाय. कोण बसला, कोण लोळतोय, कसलेच बंधन नाही.
आंजीची आई हातात दोन पिशव्या घेऊन आलीये. तीने पिशवीत सर्वांसाठी पुरी आणि बटाट्याची भाजी आणली आहे. दुपार कधी झाली ते समजलेच नाही.
आम्ही सगळे भिंतीला पाठ लावून एका चौकोन केलाय. सगळे जेवताहेत. वदनी कवल , या कुंदेंदू तुषार हार धवला …. शाळेत म्हणायचो त्या सगळ्या प्रार्थना म्हणतोय. मस्त अंगत पंगत जमली आहे.

धडक थडाक धडक थडाक. आगगाडी एका लयीत धावतेय. दिग्बोई की दिब्रुगड च्या दिशेने. बाहेर अंधार आहे. मधूनच लांबवर छोट्या छोट्या गावांचे दिवे लुकलुकताना दिसताहेत .माझ्या मनात कालची पंगत जागीच आहे. माधुरी गातेय टंप्या काहितरी हसत हसत सांगतोय. संज्या फोटो काढतोय. शुभांगी ने छान मोगर्‍याचा गजरा घातलाय. संध्या भाषण करतेय. सुषम कविता म्हणतेय. कोणीतरी वदनी कवल म्हणतोय. एल्प्या हसताना नुसताच मान डोलावतोय. दुपारच काय पण तो अख्खा दिवस संपूच नये वाटतय. तो दिवस संपला नाहिय्येच मुळी. माझ्या मनात अजूनही जागा आहे. डोळे मिटले की सगळे समोर लख्ख दिसतेय. कालचा दिवसच कशाला शाळेचे आख्खे वर्ष दिसतय.शाळेतला पहिला दिवस , पावसाने कडाड करून दिलेली विजेची टाळी , आपीचे झुरळ , टम्प्यचा डबा , चित्रकलेचा तास , प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताचे गीत, भांडणारी आंजी , एल्प्याचे जुळवलेले पुस्तक , भाटे सरांचा गणीताचा तास, हसणारी शुभांगी , सोनसळे सरांनी शिकवलेली कविता , संस्क्रूत ची गोष्ट , कबड्डीची मॅच , मुख्याध्यापक सरांच्या घरचा चहा समारंभ , गाडीच्या खिडकीबाहेर गावे मागे पळताहेत.माझ्या डोळ्यासमोर एकेक आठव्णींची चित्रे पळताहेत.
तिकडे दिब्रुगड का दिग्बोई ला कसली शाळा असेल काय माहीत. तिथे नवे मित्र असतील का? नवे एल्प्या टंप्या सुम्या संज्या असतील का? काय माहीत.मला रडू येतेय. आगगाडीच्या डब्यातल्या त्या अंधारातही रडताना दिसायला नको म्हणून मी डोळे मिटतो. मिटल्या डोळ्यांसमोर सगळी चित्रे पुन्हा पुन्हा डोळ्या समोर नाचताहेत. कसलीच शिस्त न पाळता.

(समाप्त)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सातार्‍याच्या शाळेतल्या आठवी "ब" मधल्या कथानायकाचे मनोगत वाचायला फार आवडले. सुरेख मालिका.
संपलं असा भाव न येता अनिश्चित तरीही नवीन प्रारंभाचं सूतोवाच केल्यानं शेवटही आवडला. नवे गाव, नवे मित्र, ....अशा या नव्या कोर्‍या अनुभवविश्वात संचार करायला जाणार्‍या कथानायकाला शुभेच्छा!

प्रचेतस's picture

27 Jun 2020 - 11:43 am | प्रचेतस

खूप आवडली ही मालिका. शेवट एकदम खास.

गवि's picture

27 Jun 2020 - 12:27 pm | गवि

भारी हो विजुभाऊ.

शेवटचा भाग आला की सलग वाचायची असं म्हणून वाट पाहिली. तरी अधेमधे वाचलं गेलंच. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jun 2020 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौ, सलग असे वाचलं नै अधे-मधे वाचतच होतो.
नंबर एक लिहिते राहा.

०दिलीप बिरुटे

दोसतारचा नवीन भाग येणार नाही म्हणून वाईट वाटतंय. ही मालिका पूर्ण फॉलो केली नाही तरी अधून मधून एखादा भाग वाचला तरी छान वाटायचं. लंपन आठवायचा तुमच्या लिखाणातून. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

आनन्दा's picture

27 Jun 2020 - 4:21 pm | आनन्दा

केवळ आणि केवळ निःशब्द!!

कोणत्या शब्दात भावना व्यक्त करू सुचतच नाही..
आम्ही या अश्याच शाळांमध्ये मोठे झालो,

ही लेखमाला संपल्याचे खूप दुःख झाले आहे आता हे त्रिकुट परत भेटायला येणार नाही म्हणून..

लवकर पुस्तक काढा, माझ्या मुलीला वाचायला देणार आहे मी..

किमान ईबुक तरी काढाच काढा.

आता परत पहिल्यापासून वाचणार....
संपादक मंडळ , जर विजुभाउंची परवानगी असेल तर मि पा पुस्तक बनवा....

वामन देशमुख's picture

29 Jun 2020 - 12:03 am | वामन देशमुख

विजुभाऊ,

ही लेखमालिका लिहून माझ्यातल्या (किशोरवयीन) वाचकावर तुम्ही किती उपकार केलेत हे कदाचित तुम्हाला कळणार नाही. प्रत्येक एपिसोडला जरी प्रतिसाद दिले नसतील तरी मी त्यांचं अनेकदा वाचन केले आहे.‌ जणू काही माझ्याच शाळेतलं हे वर्णन आहे असं वाटायचं.

खरंतर ही मालिका कधीच संपू नये असं वाटायचं पण हिंदू तत्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे, ज्याची सुरुवात झाली आहे त्याचा शेवट कधी ना कधी होणारच.

लिखाणातील शब्दरचना, व्याकरण इत्यादीतील उणिवा दूर करून एक पुस्तक छापायला हवं. मनावर घेऊन हे काम करा.

-(आठवीतला विद्यार्थी) वामन

वामन देशमुख's picture

29 Jun 2020 - 12:05 am | वामन देशमुख

नवीन गावच्या नवीन शाळेतल्या नवीन मित्रांच्या नवीन गप्पागोष्टी आणि अजून एक नवीन मालिका... केव्हा सुरू करणार?

विजुभाऊ's picture

2 Jul 2020 - 10:40 am | विजुभाऊ

नक्की.

king_of_net's picture

29 Jun 2020 - 4:54 pm | king_of_net

पहिल्या पासुन फॉलो केलि हि मालिका....
शेवट हि खुपच छान आहे!
वामन यांनी सांगितल्या प्रमाणे, चुका दुरुस्त करुन, एक सलग पुस्तिका तयार करा...

लॉरी टांगटूंगकर's picture

29 Jun 2020 - 7:15 pm | लॉरी टांगटूंगकर

खूप भारी लिखाण आहे. पुस्तक मस्ट.
सर्व बालपण सातार्‍यात, कास, यवतेश्वर, भैरोबा, जरण्डेश्वरकडेच फिरत घालवल्याने खास रिलेट झालं.
प्रत्येक भाग सावकाश व्यवस्थित वाचलेला होता. खूप धन्यवाद. लिहीत रहा..

योगविवेक's picture

29 Jun 2020 - 11:11 pm | योगविवेक

अनुभवायला मिळाला पाहिजे म्हणजे या सविस्तर लेखमालेचा वाचकवर्ग सुखावेल.

विजुभाऊ's picture

2 Jul 2020 - 6:28 am | विजुभाऊ

धन्यवाद.
पुस्तक काढायचे मनावर घतलय. पुस्तकात स्केचेसही असावीत असा विचार करतोय.
ही कथामाला लिहीताना फारच अनियमीतपणा होत गेला. पण तरीही मिपकारांनी प्रत्येक वेळेस तो नजरेआड केला.
मला प्रोत्साहन दिले. काही सूचना ही दिल्या.
मालिका लिहीताना बरेच काही शिकलो. त्याबद्दल केंव्हातरी लिहीनच.
तूर्तास तरी सगळ्या मिपाकरंना खूप धन्यवाद. खरेतर घरातल्या लोकांना धन्यवाद म्हणायचे नसते तरीही.
पण तुमच्या सर्वांमुळे हे इतके लिखाण करू शकलो.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2020 - 11:02 am | टर्मीनेटर

आधीचे काही भाग वाचले होते आणि आवडलेही होते.
आता परत सर्व भाग सलग वाचतो!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jul 2020 - 11:35 am | ज्ञानोबाचे पैजार

अतिशय आवडली,
परत परत वाचायला आवडेल
पैजारबुवा,

सुधीर कांदळकर's picture

11 Jul 2020 - 7:41 am | सुधीर कांदळकर

मस्त, सुंदर, आकर्षक, भावस्पर्शी माला. आवडली हेवेसांनल. पुन्हा सलग वाचायला जास्त मजा येईल.

धन्यवाद.

श्वेता२४'s picture

11 Jul 2020 - 3:58 pm | श्वेता२४

विश्वास बसत नाही. ही लेखमाला नियमित वाचायचे. प्रत्येक वेळी प्रतिसाद दिलाच असं नाही. पण मनात या लेखमालेची खास जागा आहे. यातील पात्रे अगदी माझेच सवंगडी असल्यासारखे वाटायचे. एका निरागस भावविश्वाची सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद विजुभाऊ. शेवट वाचताना डोळे नकळत पाणावले. याचे पुस्तक झाले तर एक प्रत मी नक्की घेणार माझ्या मुलासाठी!

विजुभाऊ's picture

3 Aug 2020 - 10:45 am | विजुभाऊ

धन्यवाद सर्वांना _/\_

विजुभाऊ's picture

5 Jul 2021 - 9:12 pm | विजुभाऊ

सम्ग्राम , श्वेता , वामन देशमुख , किंग ऑफ नेट
आनंदाची बातमी.
"दोसतार" पुस्तक म्हणून या महिन्यात प्रकाशित करतोय.
इतर डिटेल्स वेगळा धागा म्हणून काढतो.

वामन देशमुख's picture

5 Jul 2021 - 9:23 pm | वामन देशमुख

वाट पाहतोय पुस्तकाची...

वामन देशमुख's picture

5 Jul 2021 - 9:24 pm | वामन देशमुख

संपादक मंडळास विनंती - सदर लेखमालिकेची अनुक्रमणिका वगैरे तयार करून तिला व्यवस्थित रूप द्यावे.

गुल्लू दादा's picture

5 Jul 2021 - 9:26 pm | गुल्लू दादा

अभिनंदन विजुभाऊ.

संग्राम's picture

6 Jul 2021 - 12:49 am | संग्राम

अभिनंदन !
अधिक माहितीची वाट पाहतो आहे ...
शुभेच्छा !

विजुभाऊ's picture

6 Jul 2021 - 11:01 pm | विजुभाऊ

http://www.misalpav.com/node/48987
पुस्तक या महिन्यात प्रकाशीत करतोय