या प्रकरणात दृष्टांत आणि सिद्धींविषयक भगवान रमण महर्षींचा अभिप्राय आपण जाणून घेणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
ध्यानधारणेमुळे होणारे अवांछित परिणाम काही वेळा साधकांना विस्मयचकित करतात. ध्यानावस्थेत असताना अकस्मात देव देवतांचे दर्शन झाल्याची, अद्भुत सुगंध दरवळल्याची तसेच क्वचित प्रसंगी अतिंद्रिय सिद्धी (उदा. सुदूर असलेल्या गोष्टींचे दर्शन होणे, इतर व्यक्तींच्या मनातले विचार ओळखता येणे, हवी ती वस्तू प्राप्त होणे इ. ) प्राप्त झाल्याची नोंद कित्येक साधकांनी करून ठेवलेली आहे. या दोन्ही गोष्टी प्रयत्नाने (हेतुपुरस्सर) साध्य करता येत असल्याचा दावा देखील काही योग साधकांनी केलेला दिसतो. विशिष्ट पद्धतीच्या योगिक प्रक्रियांनी सिद्धी प्राप्त करता येतात असे उल्लेख काही प्राचीन ग्रंथांमधे केलेले दिसतात. योगशास्त्रविषयक ग्रंथसंपदेत महर्षी पतंजलिंच्या 'योगसूत्र' या ग्रंथाला महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. योगसूंत्रांमधे अष्टसिद्धी प्राप्त होण्यात सहाय्यभूत ठरतील अशा योगिक प्रक्रियांचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
हेतुपुरस्सर दृष्टांत घडावेत किंवा सिद्धी प्राप्त व्हाव्यात या दिशेने प्रयत्न करण्यापासून श्री. रमण महर्षी त्यांच्या भक्तांना सातत्याने परावृत्त करत असत. दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत. भक्तांना दृष्टांत झाल्याची उस्फूर्त आणि अहेतुकपणे प्रचिती आली तर महर्षींनी ती अध्यात्मातल्या प्रगतीचा एक संकेत असल्याचे अपवादात्मक प्रसंगी मान्य केल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. अशा प्रसंगी दृष्टांत झालेल्या भक्ताला तो मानसिक पातळीवरचा क्षणभंगुर अनुभव आहे; तसेच असे अनुभव आत्मसाक्षात्काराच्या तुलनेत खालच्या प्रतलावरचे असल्याने दुर्लक्ष करण्याजोगे असल्याची जाणीव महर्षी न चुकता करून देत असत.
अवचितपणे सिद्धी प्राप्त झाली असता तिची भुरळ पडल्याने पथभ्रष्ट होण्याच्या संभाव्य धोक्याची रूपरेषा महर्षी समजावून सांगत असत. सिद्धी प्राप्त केल्याने अहंतेपासून मुक्ती न मिळता उलट अहंकार बळावण्याचीच शक्यता जास्त आहे असे महर्षी स्पष्टपणे बोलून दाखवत असत. सिद्धी प्राप्त करण्याची हाव आणि आत्मसाक्षात्कार या दोन गोष्टींमध्ये अंतर्विरोध असल्याने त्या एकत्र राहूच शकत नाहीत; त्या पैकी एका गोष्टीचीच निवड करावी लागते असे महर्षींचे ठाम मत होते.
आत्मस्वरूप प्रत्येक व्यक्तीच्या अत्यंत निकट आहे. ते चिरंतन आहे. त्या उलट सिद्धी मात्र सर्वार्थाने अनात्मस्वरूप, बाह्य जगात मिरवण्याजोग्या आणि अशाश्वत असे फसवे मृगजळ आहे. सच्चिदानंद स्वरूप ही सहजस्थिती आहे. सिद्धी प्रयत्नपूर्वक मिळवाव्या लागतात. अतिंद्रिय किंवा अतिमानस शक्तीं मनाला हव्याहव्याश्या वाटतात. त्या वश करण्यासाठी मनाला सतत सतर्क ठेवावे लागते. त्या उलट मनोनाश झाल्यावर स्वरूप आपोआप प्रकट होते. स्वरूपाचे सजग भान टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज नसते. सिद्धी अहंकाराच्या आश्रयानेच प्रकट केल्या जातात. स्वरूपबोध हा अहंकाराच्या पल्याडचा प्रांत असल्याने अहंतेचा नाश केल्यावरच त्याचा साक्षात्कार होतो असा उपदेश महर्षी सातत्याने देत असत.
प्रश्नः महर्षी पतंजलिंनी उल्लेख केलेल्या सिद्धी खरोखर अस्तित्वात आहेत की ती निव्वळ त्यांच्या मनोविश्वातली स्वप्नसदृश गोष्ट आहे?
रमण महर्षी: महर्षि पतंजलिंनी स्वत:च स्पष्टपणे नमूद केलेले आहे की सगळ्या सिद्धी मनोनिर्मित आहेत. त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गातला अडसर आहेत. ब्रह्मस्वरूप झालेल्या किंवा स्वरूप साक्षात्कार झालेल्या साधकाच्या लेखी त्या कवडीमोलाच्याही नसतात.
प्रश्नः तथाकथित बुवा आणि बापूंच्या (अतिंद्रिय) शक्तींविषयी आपले काय मत आहे?
रमण महर्षी: या शक्ती उच्च पातळीवरच्या असतील किंवा निकृष्ट पातळीवरच्या असतील, त्या मनोनिर्मित असतील अथवा अतिमानस स्थितीत अनुभवलेल्या असतील; ज्या व्यक्तीकडे अतिंद्रिय शक्ती आहे असे मानले जाते त्या व्यक्तीच्या संदर्भातच (पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ स्वरूपातच) त्यांचे अस्तित्व असते. (पारमार्थिक लाभ करून घ्यायचा असेल तर) अशा व्यक्तीचे मूळ स्वरूप काय आहे याचा तिला शोध घ्यावाच लागेल.
प्रश्नः अध्यात्मिक मार्गावर वाटचाल करत असताना मैलाचे दगड या स्वरूपात सिद्धी प्राप्त होत जातात, की सिद्धी आणि मुक्ती परस्परविरोधी गोष्टी आहेत?
रमण महर्षी: आत्मसाक्षात्कार होणे ही सर्वोच्च सिद्धी आहे. तुम्हाला क्षणभर जरी सत्यस्वरूपाचा साक्षात्कार झाला, तर तुमचे (सिद्धींच्या मोहात पाडून) अज्ञानाच्या खाईत लोटत असलेल्या मार्गांविषयीचे आकर्षंण कायमचे संपुष्टात येईल.
प्रश्नः मग सिद्धींचा उपयोग काय आहे?
रमण महर्षी: दोन प्रकारच्या सिद्धी असतात, त्या पैकी एक प्रकार आत्मसाक्षात्कारात विघ्न निर्माण करणारा आहे. मंत्रजप केल्याने, रहस्यमय गुणधर्म असलेल्या काही रसायनांचे सेवन केल्याने, कठोर तपश्चर्या केल्याने तसेच ठराविक प्रकारची समाधी लावणे साध्य केल्याने सिद्धी प्राप्त होतात अशी एक धारणा रूढ झालेली आहे. उपरोक्त पद्धतीने शक्ती प्राप्त करणे हे आत्मसाक्षात्कारासाठी उपयुक्त ठरणारे साधन नाही. उलटपक्षी अशा पद्धतीने सिद्धी प्राप्त झाल्या तरी तुम्ही अज्ञानाच्या गर्तेतच अधिक खोलवर रूतत जाल!
प्रश्नः मग या पेक्षा वेगळ्या प्रकारच्या (उपकारक) सिद्धी कशा असतात?
रमण महर्षी: तुम्हाला स्वरूप साक्षात्कार झाला तर तुमच्या ठायी निसर्गत:च असलेले आंतरिक सामर्थ्य आणि प्रज्ञान यांचे सहजस्फूर्त प्राकट्य होत जाणे असे या सिद्धींचे स्वरूप असते. स्वरूपसिद्धी प्राप्त होताना साधकावस्थेत घडलेल्या अत्यंत सहज, सुलभ आणि सात्विक तपश्चर्येची परिणती निसर्गतःच काही उपकारक सिद्धींमधे होते. या सिद्धी ईश्वरी कृपेच्या स्वरूपात आपल्या आपण (साधकाने जाणीवपूर्वक प्रयत्न न करताच) साधकाला मिळून जातात. प्रत्येक साधकाच्या प्रारब्धानुसार त्यांचे स्वरूप निरनिराळे असते. असे असूनही सिद्धी वश झाल्याने म्हणा किंवा त्या प्राप्त न झाल्याने म्हणा; परम शांतीत अचलपणे स्थित झालेला ज्ञानी तिळमात्रही विचलीत होत नाही. ज्ञान्याला स्वरूप साक्षात्कार झाल्यामुळे पक्के माहित असते की आत्मसिद्धी ही एकमेव शाश्वत सिद्धी आहे. आत्मसिद्धीच्या जोडीला विनासायास मिळत असलेल्या सिद्धी कुणालाही प्रयत्नपूर्वक मिळवता येत नाहीत. तुम्ही साक्षात्कारी स्थितीत असाल तेव्हाच अशा सिद्धींची साक्षात प्रचिती येते.
पुरवणी:
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत बाराव्या अध्यायाच्या सुरूवातीला आत्मसिद्धी/ सोहंसिद्धीचे काव्यात्म पद्धतीने वर्णन केलेले आहे. इथे समाविष्ट केलेल्या निवडक ओव्यांमधला 'योगसुखाचे सोहळे' ते 'समाधिबोधे निजविसी, बुझाऊनि' हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आई जगदंबेने बाळाला मांडीवर घेत त्याचे सोहंसिद्धीचे लळे पुरवावे, 'आधारशक्तीच्या' (कुंडलिनी) बळावर त्याचे संगोपन करावे, अनाहत नादाचा खुळखुळा वाजवावा, चिदाकाशाच्या पाळण्यात त्याला झुलवावे, सत्रावीचे स्तन्य द्यावे, प्रत्यकज्योतीने त्याला ओवाळावे, हातात मन पवनाची (प्राणशक्तीची) खेळणी द्यावी, आत्मसुखाची बाळलेणी लेववावी आणि समाधीचा बोध देत त्याला निजवावे अशा प्रकारचे हे एक नितांत सुंदर रूपक आहे. माऊलींनी त्या आधी गुरूंच्या कृपादृष्टीने वैषयिक वासना निर्विष होतात, त्यांची डंख करण्याची क्षमता संपते; तसेच प्रसादरसाचे कल्लोळ उठल्याने साधकाच्या जीवनातून शोकसंतप्त भावना कशी हद्दपार होते याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
*** सत्रावीचे स्तन्य - पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक आणि प्राण या सोळा कला आहेत. स्वरूपानंद किंवा अमृतकला ही सत्रावी कला मानली जाते.
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥
प्रतिक्रिया
24 Jun 2020 - 2:21 pm | मूकवाचक
24 Jun 2020 - 2:31 pm | शाम भागवत
_/\_
24 Jun 2020 - 5:54 pm | संजय क्षीरसागर
> असल्याने ?
काय बोल्तायं ?
हेच तर मी इतके दिवस सांगतोयं !
देवाचं नांव कुणी ठेवलं ?
आणि तिथे तर तुम्ही काय देवाच्या नांवावर काय वाट्टेल ते ठोकून देव - एक बहुआयामी आणि व्यापक संकल्पना
भक्तगणांच्या टाळ्या पण मिळवल्या आहेत !
इथे शाम भागवतांनी तुम्हाला नमस्कार केला आहे.
थोडक्यात, अशी दोलायमान स्थिती असतांना, नुसते भारंभार कॉपी / पेस्ट मारुन,
त्याचा न तुम्हाला उपयोग, न वाचकांना .
तस्मात, एक काही तरी ठरवा.
24 Jun 2020 - 6:03 pm | मूकवाचक
माझी लेखमालेबाबतची भूमिका प्रस्तावनेत मांडली आहे. ती इथे वाचता येईल - प्रस्तावना
गॉडमन यांच्या अनुक्रमणिकेशी सुसंगती ठेवत ग्रंथातील निवडक भागाचा अनुवाद करून तसेच पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंद या नाथपंथी संतांच्या लेखनातले काही संदर्भ घेत या पुस्तकाचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहे. महर्षींविषयी मराठी भाषेत फारशी पुस्तके उपलब्ध नाहीत, हे लक्षात घेता आंतरजालावर मराठीत उपलब्ध असलेल्या विशाल ज्ञानसागरात महर्षींविषयक माहिती उपलब्ध करून देण्यात खारीचा वाटा उचलणे इतकाच या लेखनामागचा उद्देश आहे. संदर्भासाठीचे साहित्य (रेफरन्स मटेरियल) स्वरूपाचे हे लेखन आहे हे स्पष्टपणे नमूद करत लेखनाचा श्रीगणेशा करतो.
24 Jun 2020 - 6:07 pm | शाम भागवत
यानंतर आमेन एवढंच म्हटलं तरी पुरते बर का.
:)
24 Jun 2020 - 6:44 pm | संजय क्षीरसागर
त्यापेक्षा तुमचा अजपा का ऐकत नाही ?
मग प्रतिसाद देण्याचे पण कष्ट नाहीत !
एकदम शांत झोप.
24 Jun 2020 - 7:08 pm | शाम भागवत
आमेन
24 Jun 2020 - 6:40 pm | संजय क्षीरसागर
तेच तर विचारतोयं :
रमण म्हणतात दृष्टांत हा मनाचा खेळ आहे आणि तुम्ही इथे दिमाखानं लेखमाला टाकतायं.
आणि तिथे देव या संकल्पनेवर भारंभार प्रतिसाद ठोकतायं.
एक काही तरी ठरवा !
थोडक्यात, तुम्ही देव मानत असाल तर या लेखमालेचा न तुम्हाला उपयोग, न इतर देवभोळ्यांना.
24 Jun 2020 - 7:10 pm | मूकवाचक
त्यांचा ईश्वर, भक्ती, समर्पणविषयक उपदेश इथे वाचा: भक्ती आणि समर्पण
24 Jun 2020 - 7:15 pm | शाम भागवत
च्च् च्च्
आमेन म्हणा नी पुढच्या भागाकडे वळा.
आम्हाला तुमचे पुढचे भाग वाचायचे आहेत.
24 Jun 2020 - 9:13 pm | संजय क्षीरसागर
मग उपदेशात ही उघड विसंगती का आहे ?
दृष्टांत आणि सिद्धी या दोन्ही गोष्टी मनोनिर्मित असल्याने त्यांचा आत्मलाभ होण्याच्या दृष्टीने उपाय होण्यापेक्षा अपाय होण्याचीच शक्यता कित्येक पटीने जास्त आहे ही बाब महर्षी सातत्याने निदर्शनास आणून देत असत.
24 Jun 2020 - 7:17 pm | शाम भागवत
पण त्यांच्या मोठ्या प्रतिसादाला असा एकोळी प्रतिसाद देणार असाल तर हरकत नाही. ;)
24 Jun 2020 - 7:22 pm | अभ्या..
नाही नाही म्हणत भागवतसाहेब तुम्हीही काही कमी नाही हं.
.
स्टॉक जबर आहे तुमचा काड्यांचा.
24 Jun 2020 - 7:35 pm | शाम भागवत
अहो, काय करणार.
पूर्वी असं काही करायला लागायचं नाही.
देवाचा धागा ३०० पार करेल आता. हाही त्याच वळणावर नको जायला म्हणून धडपड.
शेवटी सगळा माझाच स्वार्थ हो. मला पुढचे भाग वाचायचे आहेत. तेही लवकर.
सगा सरांची कृपा झाली खरडफळ्यावर. तीच वाटतोय आता इतरांना.
पण तुम्ही तेल नका बाॅ ओतू. धग सहन करायची आपली काय तेवढी कुवत नाही. ;)
24 Jun 2020 - 7:40 pm | अभ्या..
पण तुम्ही तेल नका बाॅ ओतू. धग सहन करायची आपली काय तेवढी कुवत नाही. ;)
नाय बॉ. आपली नाही ताकत तेल ओतायची पण. आम्ही आमच्या अज्ञानात सुखी हौत.
लढायला जिंदगी बस बस झालीय, इथे यीवून ते कशाला करु? चार घटका करमणूक इतकीच अपेक्षा म्या पामराची.
अस्तु
24 Jun 2020 - 7:43 pm | शाम भागवत
:)
_/\_
24 Jun 2020 - 7:34 pm | मूकवाचक
तर्क, प्रचिती, अभिरूची अशा अनेक गोष्टींनी जीवन समृद्ध होते, ते परिपूर्ण होते अशी खात्री असल्याने तर्काला आणि तर्कसंगतीला अवास्तव महत्व देणे मला मुळातच अमान्य आहे. मतमतांतरांच्या बाबतीत ताठर भूमिका घेत इतरांना नामोहरम किंवा निरूत्तर करण्यातही मला स्वारस्य नाही. त्यामुळे या भूमिकेशी विसंगत भूमिका घेण्यासाठी उद्युक्त करणार्या प्रतिसादांना मी उत्तर देणार नाही. तरीही महर्षी गीता या लेखात नमूद केल्याप्रमाणे मतमतांतरे व्यक्त होणे स्वागतार्ह असल्याने तसेच प्रत्येक मिपाकराची भूमिका माझ्यासारखीच असावी असा आग्रह नसल्याने माझ्या भूमिकेशी विपरीत भूमिका घेत दिलेल्या प्रतिसादांचेही स्वागतच आहे.
24 Jun 2020 - 7:37 pm | शाम भागवत
_/\_
24 Jun 2020 - 9:17 pm | संजय क्षीरसागर
ती लपवायला इतका गोलगोल प्रतिसाद कशाला ?
25 Jun 2020 - 1:19 am | अर्धवटराव
मनोनिर्मीत सिद्धी आणि काल्पनीक 'मी' ने मनाल शटडाउन वगैरे करण्यात बेसीक फरक असतो. हे कळणं फार काहि कठीण नाहि. पण.. असो :)
25 Jun 2020 - 9:35 am | प्रचेतस
मूकवाचकांनी दिलेली संयत उत्तरे अतिशय आवडली.
25 Jun 2020 - 10:05 am | सतिश गावडे
त्यांच्या बाबतीत कथनी आणि करणी मध्ये फरक नाही.
लेखमाला खूप छान चालू आहे. सारंच काही कळत आहे अशातला भाग नाही तरी संदर्भ माहिती होत आहेत.
25 Jun 2020 - 10:09 am | शाम भागवत
खरंय
25 Jun 2020 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार
लेखमाला खूप छान चालू आहे... वाचतो आहे... काही भाग समजायला वेळ लागतो आहे... पण ती माझ्या आकलनाची उणीव आहे
काहिही झाले तरी लेखमाला नेटाने पूर्ण कराच
पैजारबुवा,
25 Jun 2020 - 12:06 pm | कानडाऊ योगेशु
सहमत.
सिध्दीबाबत च्या गोष्टी अध्यात्मिक पुस्तकात वाचल्या होत्या.(बर्याच अध्यात्मिक पुस्तकात रूपककथा असतात त्यावाचायला आवडतात. बाकी इतका अभ्यास नाही.).
साधक तिथेच घुटमळतो असे बर्याच ठिकाणी वाचले.
ह्याबाबत स्वामी रामकृष्ण परमहंसां संबंधित एक कथा वाचली होती.
रामकृष्ण परमहंसाचे नाव होत होते तेव्हा आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी असाच एक साधु त्यांच्या आश्रमात यायला निघाला. जेव्हा जवळ आला तेव्हा मध्ये एक तलाव होता व पलिकडे रामकृष्ण उभे होते. आपली सिध्दता दाखवुन देण्याच्या उद्देशाने तो साधु सिध्दीच्या सहाय्याने पाण्यावरुन चालत रामकृष्ण परमहंसांच्या जवळ आला. रामकृष्ण परमहंसांने स्मित करत उत्तर दिले तू जे आत्ता केले त्याची किंमत २ आणे आहे.कारण पलिकडच्या नावाड्याने तुला दोन आण्यात तलाव पार करवुन दिला असता.
25 Jun 2020 - 3:17 pm | राघव
बरोब्बर! आणिकही काही प्रसंग आहेत, ज्यात समोरच्याची अशी अतिमानवी शक्ती त्यांच्या संपर्कात येऊन शांत होऊन जाते. ठाकूर म्हणतात, "समोरच्याच्या भल्यासाठी आईनं ती शक्ती इथं खेचून घेतली!".
अर्थात् सांगणारा व्यक्ती तेवढा नि:स्वार्थ असायला हवा! ते ठाकूर होतेत, त्यामुळे त्याबद्दल केवळ नमन !!
25 Jun 2020 - 11:58 am | राघव
लेखमाला खूप छान चाललीये! हाही भाग आवडला.
हे वाचून असे रूपक म्हटले तर ते बरोबर असेल काय? -
समजा एकाला एका इमारतीत १०० व्या मजल्यावर टेरेसवर जायचे आहे.
- तो पायर्या चढत जाऊ शकतो
- तो लिफ्टने जाऊ शकतो
- भिंतीवरून चढत जाऊ शकतो
- हेलीकॉप्टरने डायरेक्ट टेरेसवर उतरू शकतो
- [आणखीनही काही असू शकतील]
पण या सगळ्यात तो १०० मजले चढतोय/चढलाय हे बदलत नाही आणि त्या मजल्यावरून येणारा अनुभवही बदलत नाही.
आता ५०व्या मजल्यावरून दिसणारे दृष्य अत्यंत रम्य वाटल्याने, मोहित होऊन तो तिथंच थांबला तर? कुणीतरी त्याला जागे करेतोवर वा तो स्वतःहून जागा होईतोवर, तो १०० व्या मजल्यावर कधीच पोहोचू शकणार नाही.
25 Jun 2020 - 2:48 pm | शाम भागवत
जो १०० व्या मजल्यावर पोहोचलेला आहे. त्याला वरती येण्याचे सर्व मार्ग माहीत झालेले असतात, दिसत असतात. वरती येणारा प्रत्येक जण त्याच्या कुवतीप्रमाणे वरती येण्याच्या प्रयत्न करतोय हे त्याला कळत असते. हे वरती येण्याची धडपड करणारे प्रयत्नशील लोकं आपल्याकडून कधीही नाउमेद होणार नाहीत याची तो नेहमी काळजी घेतो. जरूर पडल्यास त्यांना त्यांची वरती येण्याची पद्धत लक्षात घेऊन मदत करतो.
पण ज्याला १०० व्या मजल्यावर पोहोचल्याचा भ्रम झालेला आहे, किंवा
१०० व्या मजल्यावर पोहोचल्यावर ज्याची तेथून घसरण झालेली असूनही, जो १०० व्या मजल्यावर असल्याच्या थाटात वावरतो त्याची परिस्थिती वेगळी असते.
तो इतरांकडून श्रेष्ठत्वाची अपेक्षेत जगत राहतो. पण तसं न झाल्यास, तो नेहमीच इतरांना किती रे तुम्ही अडाणी असे हिणवत राहातो. कारण आपली श्रेष्ठत्वाची प्रतिमा जपण्यासाठी त्याचेकडे “दुसऱ्यांना कनिष्ठ समजणे” एवढाच एकमेव पर्याय शिल्लक राहिलेला असतो. असा माणूस मला माझ्या गुरूंपेक्षांही जास्त कळते असे म्हणायला मागे पुढे बघत नाही.
25 Jun 2020 - 3:07 pm | राघव
ते आहेच म्हणा. आणि कदाचित जगात असे होणे इनेविटेबल आहे.
प्रत्येक मूर्खाला सुधारत बसणे हा स्वतःच एक मूर्खपणा आहे. ते एक प्रसिद्ध क्वोट आहे ना.. भावार्थ असा -
"असे लोकं तुम्हाला आधी स्वतःच्या मूर्खपणाच्या पातळीवर नेतात आणि मग तिथे तुम्हाला ते अनुभवाच्या जोरावर हरवतात!" असो.
पण मी सिद्धींच्या आणि प्रत्येक मार्गात येणार्या वेगवेगळ्या अनुभवांच्या अनुषंगाने मांडायचा प्रयत्न करत होतो.
१.
सिद्धी = ५० व्या मजल्यावरून दिसणारे रम्य/मोहक दृष्य
सिद्धीचा मोह = ते रम्य/मोहक दृष्य बघत राहण्याची अनावर ईच्छा
त्यामुळे १०० व्या मजल्यावर पोहोचण्याचं मूळ ध्येय दुरापास्त होतं.
तसंच २.
१०० व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी चोखळलेली वाट, तुम्हाला मार्गात येणारे अनुभव बदलवते.
त्यातच एकाच मार्गानं जाणार्या दोघांनासुद्धा दोन वेगवेगळे अनुभव येऊ शकतात.
अर्थात् शेवटी १०० व्या मजल्यावरून येणारा अनुभव सारखाच राहील.
25 Jun 2020 - 3:30 pm | शाम भागवत
मला जरा वेगळं सुचवायचं होतं.
मला म्हणायच होतं की ज्यांना हे कळलेय त्यांनी वाद घालत बसू नये. अलगद मार्ग काढावा.
काही तज्ञ लोकांच्या मते “काही काही वेळा आलेला चेंडू न परतावणे” हाच उपाय योग्य ठरतो.
तर काहीवेळेस चेंडू पॅडने आडवावा. बॅट फिरवू नये.
25 Jun 2020 - 3:41 pm | राघव
ओह्ह.. आत्ता कळले! :-)
25 Jun 2020 - 2:59 pm | सोत्रि
अतिशय चपखल रुपक आहे!
शेवटचा परिच्छेद हा तर कळस _/\_
- (शिडीवर असलेला) सोकजी
25 Jun 2020 - 3:09 pm | राघव
मी पण! :-)
25 Jun 2020 - 4:26 pm | मूकवाचक
शाम भागवत, संजय क्षीरसागर, प्रचेतस, सगा, राघव, सोत्रि, कानडाऊ योगेशु, ज्ञानोबाचे पैजार, अभ्या.. आणि अर्धवटराव यांना मनःपूर्वक धन्यवाद!
25 Jun 2020 - 4:36 pm | शाम भागवत
व्वा!!!!
याला म्हणतात, सगळ्यांवर प्रेम करणे!
_/\_