मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा.
मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ.
दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क. मंग काय बाबा खूष, पोटयले बटे डॉक्टरत करतोच, आईपण, माया सोन्याला काय खाऊ घालू, अन काय नाई, आईचात लाळ लईच वेगळा असतो ना रे बा. मी पण तोपर्यंत, काय मार्क मिळाले म्हणून, चण्याच्या झाडावरच नाही, तर पार ढगात जाऊन पोहोचलो होतो. अकरावीले काय अभ्यास करतात काबे? आता डायरेक्ट बारावीच मोडून काढतो लेकले. आजूबाजूला असलेलेल्या सगळ्यांकडे पाहत, “हूं.. हा काय बे हुशार, आपल्याले तर डिस्टिन्शन हाय.” अस मनातच बोलाच. बारावीले होतो तरी ढगांतुन उतराचं नाव नाई. त्यात आपल्या बाबाले आत्मविश्वास लै, पोट्याले जनरल सायन्स दिले म्हणजे कस, डॉक्टर नाय तर इंजिनिअर तर हायच.
बर ह्यात अजून एक भर म्हणजे, दहावी नंतर कोवळ्या ओठांवर मिश्या फुटाले लागल्या होत्या, मंग काय, या वयात पिच्चरचा शौक लागणार नाही, त मी तरुण कसला? नेमका त्या टायमाले एक्दम नवीन हिरो शाहरुखखान, या हिरोचा, "डर" सिनेमा, थिएटर मध्ये धूम करून रायला होता. तसा माया आवडीचा हिरो बिग बी अन चॉकेलेटी हिरो आमिरखान (द परफेक्शनिस्ट). तरी “आपला दिल आधीपासून लय मोठा.” त्यात अजून एक हिरो मावणार नाई अस कधी शक्य होत का रे भाऊ? शाहरुखखान “बाजीगर” पिक्चर पासूनच, सुपरस्टार बनाच्या मार्गावर लागला होता, पण मले, अन मायासारख्या कित्येकाले, प्रेयसीचे नाव घेतांना अटकणारा ”क् क् क् क् क् क् ....... किरण." या त्याच्या सॉलिड डायलॉगने लय म्याट करून टाकलं होत. दिवसातून शंभरदा तरी, हे असं “क् क् ....... किरण” नामजप, मायासारखे भक्त कराले लागले होते.. अंगात काळा रेनकोट, रेनकोटची उभी कॉलर, डोळ्यावर प्रभात थिएटरच्या, रस्त्यासोमोरील गॉगलच्या हातगाडीवरून, चाळीस रुपयात घेतलेला काळाकुट्ट (एक्दम मोतीबिंदू झाल्यावर डॉक्टर देतात तसा) गॉगल घालून, हातात क्रिकेटची बॅट, नाय त मंग आईन, ताईच लक्ष नसतांना झाडू घेऊन, जशी काय ही आपली गिटार, असा आपला हुलीया करत "जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन” नाई त मंग, “तू मेरे सामने, मै तेरे सामने” अस गाण म्हणण्यात टाइम कसा जायचा समजतच नसे. "राहुल नाम तो सुना ही होगा" हा त्याचा अजून एक डायलॉग. मंग आरशापुढे जाऊन आपण पण “श्रीकांत, नाम तो सुना ही होगा” अस म्याटावाणी बोलाच (पायलत गल्लीच्या कोण्या काळ्या कुत्र्यान पण हे नाव कदी आईकल नोत. ...जाऊद्या.) शाहरुखचे सगळे केस, असे कशे समोर येते बे? मग आपण पण, तशी केसांची स्टाईल करू लागलो, फक्त मले सोडल तर, बाकीच्या सगळ्याले मी शाहरुख त नाई पण जॉनी लीव्हर नक्की वाटत असन. बाबा त मले कितीदा “अबे झिपऱ्या वाण्याच्या” म्हणून आवाज द्याचे. जनमल्यापासून माये केस कुरळे, बरोबर माया बाबासारखे, वादळ जरी आलं तरी, हू का चू न करणारे, ते कशे शाहरुखखानच्या केसासारखे सॉफ्ट आणि समोर येईल? अन तेव्हा केसांची स्ट्रेटनींगचा पण शोध कोणी लावला नोता .अशा या शाहरुखखानच्या जलव्याने, मी बारावीत हाय, हे पण मी भुललो होतो.
अस करत, कधी बारवी आली आणि कधी गेली, मले समजलंच नाही. ते म्हणते ना "जा जा रे पेपर, मास्तर के पास, आयेगी दया तो करेगा पास" अशी आपली स्टेज आली होती. कोणी विचारल, “क्या रे, कैसा गया पेपर?” “कुछ नही यार, ये दरवाजे से आया, अन वो दरवाजे से गया." शॉर्टकट मध्ये सांगू त, या कुलदिपकान चांगलेच दिवे लावले, हे आतापर्यंत कम अकल्येच्या लोकाले पण समजल होत. बाबांच्या स्वप्नातला डॉक्टर, कंपाऊंडर बननेके भी लायक नाही था. लायक नही, नालायक है ये, अस स्वप्नं मोडल्यान बाबाले वाटलं असणं काय? काय माहीत!! बाबाचा, आईचा, राग त्याचा जागी बरोबरच होता अन तुमच्या प्रश्नाच उत्तर हेच "म्हणून मी, इंजिनिरिंग ऍडमिशनला एकटा उभा होतो.”
बर मी माये लय गुणगान केले, पण, इतके पण कमी मार्क नव्हते रे भाऊ, त बारावीले फर्स्ट क्लास होता. मग नक्की किती टक्के पडले असणं? हे त कट्टपाने बाहुबली को क्यो मारा? या प्रश्नापेक्षाही पडलेला डेंजर प्रश्न, आता तुमच्यासाठी हाय. त फर्स्ट क्लासच्या दोन्ही बॉर्डरच्या अधात, मधात मी कोठेतरी बुचकळ्या खात होतो हे नक्की. मग त्याचा अंदाज किती अन काय लावायचा तो तुमचा तुम्ही लावा रे बावा.
|| सूचना ||
माया छोट्या दोस्तानो, तुम्ही जर चुकूनमाकून ही गोष्ट ऐकून रायले असान, तर कृपा करून माया अनुभवाले तुमचा बनवू नका. याले लॉकडाऊन काळातली एक गंमत जंमत गोष्ट समजा. तुम्ही लय हुशार, अन शहाणे. तसेच राहा, माय अनुकरण करू नका.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
23 May 2020 - 9:11 am | श्रीकांतहरणे
सा सं ना विनंती,
चुकून दोन वेळा प्रकाशित झालेय . एक भाग कृपया उडवावा."
श्रीकांत हरणे