बाळू (भाग ४ - शेवट)

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
30 Mar 2009 - 3:42 pm

बाळू (भाग १) http://www.misalpav.com/node/6882
बाळू (भाग २) http://www.misalpav.com/node/6900
बाळू (भाग ३) http://www.misalpav.com/node/6907

बाळू आता स्लॅब च्या कामावर जाउ लागला. आमचे नविन घर आम्ही जेंव्हा बांधत होतो त्याच्या स्लॅब च्या कामावर बाळूला मन लाऊन काम करताना माझ्या सासर्‍यांनी पाहीले. सासर्‍यांनी त्याला आमच्याकडे तू काम करशील का म्हणून विचारले तेंव्हा स्लॅब चे काम बंद असताना येण्याचे त्याने कबुल केले.

७ ते ८ दिवसांनी बाळु आमच्याकडे कामाला आला आणि जादू झाल्याचा भास आम्हाला झाला. घराभोवतीचा सर्व परीसर स्वच्छा लखलखीत झाला, झाडांच्या मुळांवर मातीचे ढीग पडले, सगळी छोटी मोठी झाडे पाण्याने सुखावली होती. सगळ्यांना खुप समाधान वाटले होते त्याच्या कामाने. माझ्या सासर्‍यांनी त्याला पगाराचे १०० रु. देउन २० रु. खुषीने अजुन दिले. पण त्याला ते किती होते ह्याचा हिशेब कळत नव्हता. तो सारखा विचारत होता. हे किती माझ्या पगाराचे कुठले ? मग त्याला समजाउन सांगितले की त्याला वरचे २० रु. बक्षिस दिले आहेत तेंव्हा तो खुप खुष झाला. उद्या येतो म्हणुन भोळ्या आनंदाने घरी गेला. आता तो रोज आमच्याकडे येऊ लागला. त्याचे काम आजूबाजूचे शेजारी बघत होते. ते पाहून अजुन १, २ घरांत तो मधुन मधुन कामाला जाऊ लागला. सगळीकडे त्याला डिमांड वाढु लागले आणि मुल शाळेत जायला लागली तेंव्हा पगारात भागत नसल्याचे त्याने सासर्‍यांजवळ बोलून दाखवले. त्या दिवसा पासुन सासर्‍यांनी त्याचा पगार दिवसा १५० रु. इतका केला. आता तो महीन्याला ४५०० पर्यंत कमवायला लागला आहे (वर कमाई वेगळीच) . त्याच्या बायकोच्या हातात तो सगळी कमाई देतो. ती घर चालऊन मुलांना हायस्कुल मध्ये शिक्षण देत आहे. वर कमाई शिल्लक ठेवत आहे. शिल्लक ठेवलेल्या रकमेतून बाळूने घराला लागुन एक खोली अजुन बांधून ती खोली भाड्याने दिली आहे. त्याचे महीन्याचे ३५० रु. भाडे तो घेतो. त्याला आपले भाग्य परत रुळावर आल्याचे वाटू लागले. त्याने आता स्लॅब चे काम पण सोडून दिले. कारण त्यात ढोर मेहनत जास्त होती आणि रात्री बेरात्री कधीही कामावर जायला लागायचे.

आमच्याकडे आला की त्याला अजुनही सकाळचा चहा नाश्ता, आम्ही देतो. दुपारी १२ च्या सुमारास माझी सासू त्याला उन्हात तापलेला पाहून सरबत देते, दुपारी जेवणातले काहीतरी ( तो डबा आणतो) आणि पुन्हा संध्याकाळी चहा नाश्ता आम्ही त्याला देतो. काही ठिकाणी त्याला चहा सुद्धा मिळत नाही. त्याला आमच्या बद्दल आपुलकी आहे. सासूला तो आई हाक मारतो,मला आणि जावेला वैनी, आमच्या नवर्‍यांना भाऊ आणि लहानांना नावाने हाक मारतो. सासर्‍यांना बाबा हाक मारायचा. माझे सासरे २ वर्षा पुर्वी वारले ऍटॅकने, जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी बाळू कडून मॉलिश करुन घेतली होती. दुसर्‍या दिवशी बाळूने जेंव्हा त्यांचा पार्थिव देह पाहीला तेंव्हा अगदी स्वतःचा बाप गेल्याप्रमाणे आक्रंदून रडला. कारण माझ्या सासर्‍यांनी त्याला आर्थीक आणि माणूसकीचा आधार दिला होता. अगदी आमच्या घरचाच तो सदस्य झाला आहे. घरात तो कुठेही वावरला तरी आम्ही त्याच्यावर पहारा ठेवत नाही. तसा तो कामाशिवाय घरात येतच नाही. एक दिवस माझ्या सासूची कानातली कुडी बगिचात फुल तोडताना पडली होती. सासू आणि आम्ही सगळ्यांनी खुप शोधली पण ती कुणालाच मिळाली नाही, पण बाळू केर काढत असताना त्याला ती कुडी पानाखाली सापडली. त्याने ती लगेच सासूबाईंकडे आणून दिली.

तो आमच्या कडे आल्यामुळे त्याच आता घर हळूहळू सजायला लागल. आम्ही आमच्या जुन्या घरातला सोफा, मिक्सर, शोकेस, फिल्टर त्याला काही महिन्यांच्या अंतरावर देऊ लागलो. पहिलाच त्याला आम्ही मोठी वस्तू म्हणून मिक्सर दिला त्यावेळी न सांगता मोबदला म्हणून संध्याकाळी ६.३० पर्यंत काम करू लागला. आम्ही त्याला काहीच मागितले नव्हते मिक्सरच्या बदल्यात. तो का एवढा वेळ थांबतो हे आम्हाला कळेना. सासुने त्याला विचारले तेंव्हा मिक्सर दिल्याचे उपकार फेडतो अशी भावना त्याने व्यक्त केली. सासूला त्याची दया आली आणि त्याला ५० रु. जास्त देऊन घरी पाठवले. आम्ही तुला ते आपुलकीच्या नात्याने देतो हे त्याला समजावले. तसे आम्ही त्याला मधुन मधुन मुलांचे, आमचे जुने कपडे त्याला देतो. जुनी भांडी देतो. शिल्लक खाऊ, सणासुदीचे सगळ्या पदार्थांची ताजी पुडी त्याला देतो. त्यात तो खुष असतो.

कामा बद्दल सांगायच तर आम्हाला आता त्याची खुप सवय लागली आहे. डस्टबीन मधला कचरा आता त्याच्याशिवाय कोणी टाकत नाही. घराच्या काचा पुसायचे जणू त्याने कॉन्टॅक्ट्च घेतले आहे. तोच हल्ली टेरेस झाडतो. गरज पडली तर दुकानावर जाऊन किरकोळ सामान आणतो. अगदी किचनही कधीतरी वरपासून धुवुन काढतो. झाडांना जोपासण्याच काम तर त्याचच. पण अगदी हरकाम्या झाला आहे.

तो जेंव्हा थोडे काही बोलतो तेंव्हा त्याच्या बोलण्यातून त्याच्या बायको बद्दलचा अभिमान दिसुन येतो. अगदी एखादी ग्रॅज्युएट किंवा अधिक शि़क्षण त्याच्या बायकोने घेतलय असा ताठा त्याच्या बोलण्यातून वाटतो. "मी असा अनपढ, सगळ तिच बघतीया, म्हणून आमच जमत ! तिच बाजार बघतीया. पोरांचा अभ्यास बी तिच घेतीया, पोर मला दाखवितात अभ्यास बाबा बरोबर हाय का बघ मी वा मस्त करुन तिच्या कड धाडतो ! असे उद्गार तो अभिमानाने काढतो.

त्या दिवशी साफसफाई करत होता आमच्या हॉलची, म्हणजे कोळीष्टक वगैरे काढण्याचे काम तोच करतो. आमच्या झुंबरवर एक बुलबुल पक्षाने घर करुन मधुन मधुन यायचा. तो साफ करत असतानाच नेमकी त्याला बुलबुल झुंबरावरच्या घरट्यात दिसला. त्याने त्याला पकडले आणि विचार करू लागला. बुलबुलचा आवाज ऐकुन आम्ही सगळे बाहेर आलो. बाळू सुन्न झालेला बघुन बुलबुल त्याला चावला असेल अस आम्हाला वाटल. आम्ही त्याला विचारल तेंव्हा तो कळवळून म्हणाला " त्याला बी वाटतय त्याच घर आसाव, निवांत कुठतरी पडून र्‍हाव., मी त्याले रानात सोडून येतू" . बाळूच्या ह्या वाक्यानी आम्हाला समजले की तो ज्या परीस्थितीतून गेला त्या परीस्थितीची जाणिव त्याला आहे. तो विसरला नाही.

*** स्माप्त***

कथा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

30 Mar 2009 - 4:03 pm | प्रमोद देव

छान लिहीलंय. पण अर्धवट वाटतंय. अजून येऊ दे की.
स्लॅप....स्लॅब म्हणायचे आहे काय तुम्हाला?

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

दशानन's picture

30 Mar 2009 - 4:18 pm | दशानन

खरोखर छान लिहले आहे !

JayGanesh's picture

30 Mar 2009 - 4:17 pm | JayGanesh

जागु ताई,

प्रयत्न बाकी मस्त...

छान लिहले आहेस,

पण कथेचा उद्देश कळला नाही,

''ताटातल संपल, पण पोट रीकाम'' असे वाटले.

गणेश

माया's picture

30 Mar 2009 - 4:41 pm | माया

हा भाग अजुनच छान झालाय.

यशोधरा's picture

30 Mar 2009 - 7:45 pm | यशोधरा

चारही भाग आवडले. अगदी साधा भोळा जीव आहे हा बाळू.

अमोल खरे's picture

30 Mar 2009 - 8:09 pm | अमोल खरे

असे नोकर ( गोष्ट काल्पनिक नसेल तर ) मिळणं ही अतिशय रेअर गोष्ट आहे. पण नेपाळी लोक असे असतात खरे. आमच्या सोसायटीत एक नेपाळी गुरखा होता. कधीही दिवाळी मागत नसे. बाबाच त्याला जबरदस्तीने दिवाळी द्यायचे. हे वर्णन वाचुन आठवलं.

सँडी's picture

30 Mar 2009 - 8:26 pm | सँडी

जागु, खुपच छान लिहिलसं!
बाळु आवडला, आणि त्याच्या प्रामाणिक पणा ला वाखाणणारे , त्याला आपलं माणुस म्हणुन वागवणारं आपलं कुटुंबही भावलं.

प्राजु's picture

30 Mar 2009 - 9:19 pm | प्राजु

अशी माणसं मिळणं मुश्कीलच..
खूप आवडलं हे व्यक्तिचित्रण.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

31 Mar 2009 - 12:02 pm | जागु

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
मी कथेत थोडी भर टाकली आहे. कृपया प्रतिसाद द्यावा.

सूहास's picture

31 Mar 2009 - 4:24 pm | सूहास (not verified)

फार छान !!

सुहास..
भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर ||
जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||

योगी९००'s picture

4 Apr 2009 - 3:01 pm | योगी९००

छान लिहिले आहे..

एक वाक्य थोडे खटकले...दुसर्‍या दिवशी बाळूने जेंव्हा प्रेत पाहीले तेंव्हा अगदी स्वतःचा बाप गेल्याप्रमाणे आक्रंदून रडला.... प्रेत ऐवजी पार्थिव देह असे जर लिहिले तर जरा चांगले वाटेल.

खादाडमाऊ