पावसाळी रात्र. आणि एक सिगारेट.
मोकळा बसस्टॉप. छत्री. बाकड्यावर पसरलेले ईवलुशे पाण्याचे थेंब. आणि घोंघावता वारा.
चिंब भिजलेली मुलगी कुठुणतरी पळत येते.
'माय गॉड' म्हणून म्हणून मान हलवते. तिची छाती धपापून जाते. आणि सिगारेटचं वलंय काढत मी तिथून चालू लागतो. छत्रीसोबत बरसत्या पाण्याच्या धारा घेऊन. खळाळत्या पाण्यातून वाट शोधत.
चिंब भिजलेली मुलगी आता बसस्टॉपवर एकटीच अडकली आहे. रात्र पावसाळी आहे. ये जा करणाऱ्या मोटारींचे पुढचे दिवे तिची साथ करत आहेत. पर्समधल्या छोट्याश्या बाटलीतून ती पाणीही पिली आहे. तिच्या कपाळावर थोडा घामही जमा झाला आहे. ती स्वतःला सावरते. उशिरा का होईना पण ती घरी पोहोचते.
रस्ता. अरूंद गल्ल्या. वडाचं झाड. पाण्याची डबकी. आणि लगबगीची सकाळ.
चिंब भिजलेली मुलगी सकाळी उठते. केरकचरा काढते. आणि सुंदरसा गजरा तिच्या केसात माळते.
मग ती धावपळ करत डबा बनवते. आणि ऑफिसला सुटते.
चिंब भिजलेली मुलगी दिवसभर कामात गढून जाते. कधी ती डबा खातही नाही. तर कधी उपाशी राहते.
एवढी मोठी बॅग घेऊन ती ट्रेनने प्रवास करते. मग ती थकते. आणि पर्समधल्या बाटलीतलं थोडं पाणी पिते.
चिंब भिजलेली मुलगी मला रोज दिसते. रिक्षातून उतरताना ती मान खाली घालते. मग घरी येऊन ओक्साबोक्शी रडते. चरफडत राहते. रात्र तिच्या डोळ्यात साठते. उघड्या डोळ्यांनी ती फॅन वाढवून झोपते.
रिकामा बसस्टॉप. आणि एक सिगारेट.
चिंब भिजलेली मुलगी धावत पळत येते आणि मान खाली घालून निघून जाते. घरी जाऊन ती एकामागोमाग एक दिवे पेटवते. आणि रात्रभर गाणी ऐकत झोपते.
सकाळी ती उशिराच उठते. ऑफिसला सुट्टी टाकून टिपटॉप जीन्स घालते. चिंब भिजलेली मुलगी बेकरीतले तिचे आवडते पॅन्ट्री केक खाते. बाल्कनीत बसून ती नवीनच आलेला सिनेमा पाहते. चिंब भिजलेली मुलगी हरवून जाते. आभाळ तिच्या डोळ्यात दाटत राहते. मग ती एखादा एसएमएस पाठवते.
पॉश फर्निचर असलेल्या त्या कॅफेटेरीयात चिंब भिजलेली मुलगी समोरच बसलेली आहे.
"सॉरी, माझं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे" म्हणत सिगारेटची वलंयं काढत मी तिथून निघून जातो.
कॅफेटेरीयातल्या एसीत चिंब भिजलेली मुलगी आता गारठत चालली आहे.
प्रतिक्रिया
27 Mar 2020 - 6:18 am | कंजूस
या महिन्यातली गोष्ट?
27 Mar 2020 - 6:55 am | प्रचेतस
खास जव्हेरटच
27 Mar 2020 - 9:31 am | विजुभाऊ
या जव्हेरभाऊ ला एकदा भेटून विचारायचं आहे असे एकदम भिडणारे लिखाण कुठून आणतोस म्हणून .
27 Mar 2020 - 2:15 pm | बिपीन सुरेश सांगळे
खास जव्हेरटच - प्रचेतस +१
31 Mar 2020 - 11:37 am | श्रीरंग
पर्समधल्या छोट्याश्या बाटलीतून ती पाणीही पिली आहे.
अरेरे