माझं हॉटेलिंग..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
7 Jan 2020 - 12:05 pm

माझं लहानपण सांगलीत गेलं. बापटबाल आणि पटवर्धन हायस्कूल ह्या माझ्या शाळा. माझं कुटुंब साधं, बाळबोध. अशा घरात बाहेरचं खाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.तरीही मी हॉटेलात जाण्याचा पराक्रम केला.

मी मॅट्रिकला असतानाची गोष्ट! त्यावेळी सांगली गाव आजच्याइतकं विस्तारलेलं आणि पुढारलेलं नव्हतं. गजानन मिल, काळी खण, प्रताप टॉकीज हे गावाच्या बाहेर आहेत असे वाटे. हरभट रोड, कापडपेठ किंवा मेन रोड, गणपती पेठ आणि गाव भाग हेच मुख्य गाव. राममंदिर,ओव्हरसिअर कॉलनी हे भाग आजच्याइतके गजबजलेले नव्हते. गावात हॉटेल्स फारशी नव्हती.

आमच्या मॅट्रिकच्या परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि आम्ही म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणीने हॉटेलात जाऊन काहीतरी खायचं असं ठरविलं. घरी विचारणं, आईवडिलांची परवानगी काढणं हा एक मोठाच प्रश्न होता. मी भीतभीत आईला विचारलं. ती म्हणाली, "ह्यांना विचार". मग वडिलांना विचारलं. वडिलांनी भरपूर चौकशी करुन,नाईलाजाने, कशीबशी परवानगी दिली.

मग आम्ही हॉटेलात जायचं नक्की केलं. पण कुठल्या हॉटेलात जायचं ते ठरेना, कारण हॉटेल्सची माहितीच नव्हती. मग ठरलं एस.टी.स्टँडवर जायचं. स्टँडच्या हॉटेलात खायचं. गेलो दोघी. वेटर आला. मेन्यू कार्ड नव्हतंच. ते काय असतं,हेही आम्हांला ठाऊक नव्हतं. वेटरनं कायकाय 'गरम' पदार्थ आहेत, त्याची यादी म्हणून दाखवली.

"दो प्लेट बटाटेवडा लाना", मी सराईतपणाचा आव आणून सांगितलं.

आपण वेटरशी हिंदीत का बोलतो हे एक कोडंच आहे. वेटरनं बोटं बुचकळत दोन ग्लास एकाच हातात धरत आधी पाणी आणून ठेवलं आणि नंतर बटाटेवडा आणला. तो डाळीच्या पिठाचं जाडच्या जाड आवरण असलेला, 'गरम' नसलेला, कसलीही चव नसलेला, न सोललेली लसूण दातांखाली येणारा वडा आम्ही मिटक्या मारत खाल्ला. वेटरनं बोटं बुचकळून आणून ठेवलेलं पाणी प्यायलो आणि काउंटरवर पैसे देऊन ऐटीत बाहेर पडलो.

हे मी आयुष्यात केलेलं पहिलं हॉटेलिंग. त्यानंतर अगदी एकदाच मोठ्या भावासोबत अशाच एका हॉटेलात नाश्ता वगैरे करायला गेल्याचं आठवतं. त्यावेळी जेवणानंतर मी आमच्या दोघांच्याही डिशेस एकत्र करुन,आवरुन ठेवल्या जणू आत उचलून विसळायला घेऊन जाण्यासाठी! भाऊ हसायला लागला.

मी कॉलेजात गेले आणि माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई आमच्या घरासमोर राहायला आली. आजीचं आणि माझं जमायचं. आजी एकदा मला म्हणाली की,आता कालेजात जातीयस ना,मग जात असशील रोज कँटींगमधे चरायला! मी म्हटलं, "मुळीच नाही. तू बघशील, मी बी.ए.होईपर्यंत कॉलेजच्या कँटीनची पायरीही चढणार नाही". आजी म्हणाली की, "बघू बघू, तसं केलंस तर मी तुला एक बक्षीस देईन."

मी पीडी आणि एफवाय अशी दोन वर्षे खरोखरच कँटीनला गेले नाही. पण एसवायला मी कॉलेजच्या नाटकात काम केलं. आठ दिवसांत नाटक बसवायचं होतं. आम्ही सकाळी ९ते संध्याकाळी ६ प्रॅक्टीस करत असू आणि "सातच्या आत घरात" हजर होत असू. घरुन आणलेला डबा पुरत नसे. भूक लागायची. मग सगळेच कँटीनला जात असू. खात असू. तेव्हा आजीला दिलेलं वचन मी मोडलं. टीवायला मात्र पुन्हा वर्षभर मी कँटीनला गेले नाही. टीवायलाही मला नाटकात काम करशील का? असं सरांनी विचारलं होतं पण वडिलांनी परवानगी दिली नाही.
ते मला म्हणाले, "तुला नटी व्हायचंय की पी एच डी करायचंय? शेवटचं वर्ष आहे, अभ्यासाला लाग. काही नाटकात काम बीम करायचं नाही."
मी पीएचडी काही झाले नाही मात्र एमए नंतर जर्नालिझम केलं. कारण मला पत्रकारिता आवडत होती.

एमए आणि जर्नालिझम मी पुणे विद्यापीठात केलं. तिथं वैशाली हॉटेलात खूप वेळा गेलो. तिथला डोसा चवीला अप्रतिम असायचा. तिथे डोसा खाऊन स्वरविहार नावाच्या रेकॉर्ड लायब्ररीत जुनी गाणी ऐकायची हा आमच्या ग्रुपचा नित्यक्रम असे. त्या दिवसांत मी बरंच हॉटेलिंग केलं पण हॉटेलात त्यावेळी पदार्थ ठराविक आणि मोजके असत. नावं शुद्ध मराठीत असत. लक्षात यायला आणि लक्षात ठेवायला त्रास पडत नसे.

मग पुढं माझं लग्न झालं. मी आणि 'हे' ऊर्फ 'तो' पहिल्यांदाच एका बड्या हॉटेलात गेलो. तिथल्या वातावरणाचं, आजच्या भाषेत सांगायचं तर 'अँबियन्स'चं माझ्या मनावर इतकं दडपण आलं की काही विचारु नका. नवरा म्हणाला, "काय घेणार?" मी म्हटलं, "तू मागवशील ते". तो म्हणाला, "मेन्यू कार्ड बघ ना, आणि मग ठरव.”

मी मेन्यू कार्ड बघितल्यासारखं केलं आणि म्हटलं, "मला काही ठरविता येत नाहीये. तूच मागव ना!"

त्यानं जे मागवलं ते मी मुकाट्यानं खाल्लं.

त्यानंतर मी इतक्यांदा हॉटेलिंग केलं पण मी कधीही मेन्यू कार्ड बघितलं नाही. मला काय मागवायचं, मला काय आवडतं ते मला कधीही कळलं नाही. सांगता आलं नाही. मी कधीही एकटीच अशी हॉटेलात गेले नाही. जो/जी बरोबर असेल तो/ती जे मागवेल ते मी खाल्लं.

त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. आता मी ७० वर्षांची झाले. आता माझा मुलगा मला हॉटेलात नेतो. माझ्या मैत्रीणी नेतात. माझ्यासाठी ऑर्डर देतात. 'तिला हे आवडणार नाही', हे तेच ठरवितात. जे मागवलं जातं ते मी खाते.

पण गेल्या महिन्यात मात्र एक चमत्कार घडला. माझ्यात अचानक परिवर्तन झालं. मुलगा, सून म्हणाले, "मस्त बाहेर जेवायला जाऊ, एकदम मस्त हॉटेलात".
मी म्हटलं, "चल".

बरोबर नातूही होताच. मी ठरवलं, या खेपेला आपण मेन्यूकार्ड नीट वाचायचं, आपल्याला आवडेल ते, खावंसं वाटेल ते स्वत:हून ऑर्डर करायचं. आम्ही हॉटेलात गेलो. दाराशी एक पॉश कपड्यातला माणूस होता. त्यानं कमरेत वाकून नमस्कार करत आमचं स्वागत केलं. अदबीनं दार उघडलं. आम्ही आत गेलो. आतल्या एसीनं अंगावर सुखद गारवा पसरला. मी मूडमधे आले. एका टेबलाभोवती आम्ही बसलो. बसायला छान, मऊ कोच होते. मी मेन्यू कार्ड पुढे ओढलं. मुलाला थोडं आश्चर्य वाटलं. मेन्यू कार्ड खूप जड आणि जाड होतं. अनेक पानी. त्यात इंडियन क्विझिन, थाई क्विझिन, इटालियन क्विझिन, चायनीज् क्विझिन असे विभाग होते. हे क्विझिन बिझीन उच्चारही मी नंतर शिकून घेतलेत बरं का..!!

नॉनव्हेजचा वेगळा विभाग होता. समोरच्या अवाढव्य किमतींकडे दुर्लक्ष करत आणि 'यापेक्षा घरी पिठलं भात केला असता तर किती स्वस्त पडला असता' असा तथाकथित 'बायकी' विचार न करता मी मेन्यूकार्ड वाचायला सुरुवात केली. त्यात मला बरीच अनाकलनीय नावं आढळली. उच्चार माझ्या आकलनशक्तीनुसार! चूभूदेघे.. 'लगझानिया,पेस्तोफिश,जंबालया राईस,चिझ फोंड्यू, ब्रुशेटा,रेचियाडो, चिमीचांगा, बरीटोज, राटाटुईल, रीसोत्तो इ.इ.इ.

मी इंडियन विभाग उघडला. तेवढ्यात मुलानं मला विचारलं, "कोणतं सूप घेणार?" टोमॅटो सूपच प्रत्येक वेळी पिऊन पिऊन वीट आला होता. मी इंडियन विभाग बदलून इतर कुठेतरी बघायला सुरुवात केली.

नीट पाहून म्हटलं, "फ्रेंच ओनियन सूप". आता ह्या सूपमधे फ्रेंचांचा काय संबंध ते मला कळले नाही. पण मागवलंच. मुलगा म्हणाला, "वन बाय टू करुया. " मी म्हटलं, "का?" "तुला एकटीला एवढं जाणार नाही", इति मुलगा. पण मी कुणाचं ऐकायचं नाही, मनाप्रमाणे वागायचं असं ठरवलं होतं ना! मी म्हटलं, "जाईल. मला आज पोटभर सूप प्यायचंय." तो बरं म्हणाला. मग म्हणे, "स्टार्टर्स कोणती घेणार?" मी मेन्यू बघत एक नाव ठोकून दिलं. तर सुपामागोमाग एका लहानशा ग्लासात एक लाल रंगाचा पातळ पदार्थ आणि हळकुंडाच्या आकाराचा नळकांडीसारखा पदार्थ असे समोर आले. तो लाल रंगाचा पातळ पदार्थ म्हणजे एक तिखट गोड चटणी होती. आणि ते नळकांडं म्हणजे आत काहीतरी स्टफ करुन तळलेला एक पदार्थ होता. त्याचं नाव होतं व्हेज कुरकुरे. हा स्टार्टर. हे नाव मी नंतर आलेल्या बिलावरुन लक्षात ठेवलंय.

सूनबाई म्हणाली, "भाजी कुठली मागवूया?" मी कार्डावरचे एक नाव वाचले. ती म्हणाली, "आई,ही भाजी खूप तिखट असते. तुमच्या पोटात आग होईल." मग मी मला कळेलसं एक नाव सांगितलं, "काजू करी" तर मुलगा म्हणाला, "आई, काजूनं तुला पित्त होतं. नको खाऊस." मग मी पुन्हा मेन्यू बघून म्हटलं, "पनीर कोल्हापुरी". मुलगा म्हणाला, "ते खूप स्पायसी असतं.तुझ्या घशाशी येईल. जळजळेल". मी चिडून म्हटलं, "मरु दे माझं जळजळणं आणि पोटात आग पडणं! मी मागवेन ते मला खाऊ दे. मी अशी घाबरत बसले तर मला इथे येऊनही दहीभात किंवा प्लेन ब्रेड बटरच खावं लागेल".

"नंतर हे होतंय,ते होतंय म्हणत बसू नकोस", मुलगा पुटपुटला.

मग मी व्हेज खिमा मसाला, पनीर कोल्हापुरी आणि बटर रोटी असं जेवण सर्वांसाठी मागवलं. खाल्लं. एक लठ्ठसं बिल भरुन आम्ही उठलो. टेबलावर आम्ही मागवलेल्या मॉकटेल्सचे उर्फ शीतपेयांचे कमनीय ग्लासेस, बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या. त्याकडे बघताना मला सांगलीच्या एसटी स्टँडवरच्या कँटीनमधे ग्लासात बोटं बुचकळून ते टेबलावर ते ठेवणारा वेटर आठवला.

जीवनमानप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

7 Jan 2020 - 12:29 pm | वामन देशमुख

मस्त ल्हिवलंय आज्जीबै!

विनिता००२'s picture

7 Jan 2020 - 2:41 pm | विनिता००२

सुरेख! अजून सगळं आठवतंय हे चांगलेय :)

श्वेता२४'s picture

7 Jan 2020 - 2:56 pm | श्वेता२४

अतीशय साधं, सरळ. कसला अभिनिवेश नाही. छान वाटलंं. तुमचं खाण्यावर विशेष प्रेम नाहीसं दिसतंय. नाहीतर हॉटेलात गेल्यावर दुसऱ्याच्या मनाप्रमाणे पदार्थ खाणे आणि आपल्या मनाप्रमाणे हॉटेलिंग करायला इतकी वर्षे जावी लागणे हे घडले नसते.

किल्लेदार's picture

7 Jan 2020 - 4:56 pm | किल्लेदार

छान लिहिलंय... आवडलं.

खिलजि's picture

7 Jan 2020 - 5:11 pm | खिलजि

आजीनू मस्त लिवला असा ... माका मॉप आवडल्या गेलेला .. खय रवताव त्ये वाईच अमका बी कळू देका.. न्हाय म्हंजी भेटुक नाय असा .. मुंबईतला असणं तर जरा अमका बी बरा वाटताला..

Nitin Palkar's picture

7 Jan 2020 - 7:29 pm | Nitin Palkar

आजीबाई मस्त लिहिलीयत, तरी सूप वन बाय टू घ्यायला हवं होतंत असं मात्र वाटलं...असो. अशाच हॉटेलिंग करत राहा, आणि लिहितही राहा.

चांदणे संदीप's picture

7 Jan 2020 - 8:53 pm | चांदणे संदीप

खुस्स्सखुस्सीत लेखन!

सं - दी - प

मस्तच कि आज्जीबाई तुमचं "हॉटेलिंग".

मी नुकतीच भारतीय इंग्रजी बद्दल जिलबी पाडली होती त्यात ह्या "हॉटेलिंग" शब्दाबद्दल लिहिलं होतं.

त्याची झैर्रात
https://www.misalpav.com/node/45878

मुक्त विहारि's picture

8 Jan 2020 - 6:48 am | मुक्त विहारि

आवडलं.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Jan 2020 - 12:58 pm | प्रकाश घाटपांडे

उपवासाचे पदार्थ हॉटेलमधे कसे काय मिळतात हे मला एक कोडं होत. आमच्या घराच्या संस्कारात हॉटेलमधे खाणारे लोक हे वाया गेलेले असायचे.

सुधीर कांदळकर's picture

8 Jan 2020 - 3:21 pm | सुधीर कांदळकर

आवडले. धन्यवाद.

पुढच्या खेपेला दोनतीन कप आयरिश कॉफी प्या. म्हणजे नंतरचे पदार्थ जास्त चविष्ट लागतील.

वामन देशमुख-लेखन आवडलं हे वाचून आनंद झाला.

विनिता ००२-माझी मेमरी तशी बरी आहे. :)

श्वेता-माझं खाण्यावर प्रेम नाही हे बरोबर ओळखलंत. विशेषतः लहान वयात बाहेर जाऊन खाणे. साध्यासुध्या निम्न मध्यमवर्गीय घरात मी लहानाची मोठी झालीय.

किल्लेदार-थँक्स.

खिलजि-मी मुंबईत रहात नाही. तसंही नावगावविरहीत मुक्तपणे लेखन करते आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद.

नितीन पालकर-हं! मला हॉटेलिंग फारसं आवडत नाही.

चांदणे संदीप-धन्यवाद.

चामुंडराय-हॉटेलिंग शब्दाच्या अर्थावर तुम्ही पाठवलेली लिंक वाचली. एक सर्वस्वी वेगळा अर्थ कळला.

मुक्तविहारि-थँक्स.

प्रकाश घाटपांडे-माझ्याही घरात तसेच संस्कार होते.हॉटेलात जाणं चांगलं समजलं जायचं नाही.

सुधीर कांदळकर- हा हा हा, धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2020 - 3:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज जरा मिपा वाचत होतो म्हणजे दोनोळी पाहतो, चाळतो, आणि पुढे जातो. हॉटेलिंग शीर्षक पाहिलो, चाळलं आणि लेखनात रमलो.
केव्हा एकदा तुम्ही तुमच्या जेवणाच्या ऑर्डर्स वेटरला सांगाल असे झाले होते. पण तिथेही सुना आणि मुलगा आडवे आलेच होते.
बाय द वे, लेखनाची शैली सुरेख आहे. आवडते. मिपावर लिहिते राहा.

महिलांवर पुरुष आपल्या जेवणाच्या ऑर्डस लादतात असे माझं प्राथमिक मत आहे. मैत्रीणीला मात्र सांग गं काय पाहिजे ते म्हणतो आणि पत्नीला मात्र ग्रहित धरुन ऑर्डर्स सांगितल्या जातात असे वाटते. आणि समजा पत्नीने काही सांगितलंच तर ते कसं हानिकारक आहे, उरतं, चांगलं नसतं वगैरे सांगून तिच्या ऑर्डर्स नाकारल्या जातात असेही वाटते. पण, या लेखनावरुन काही काळजी घेतली पाहिजे असे वाटले.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

16 Jan 2020 - 7:32 pm | सुबोध खरे

दि बि सर

आमच्या कडे उलट असतंय बघा.

बायकोच ऑर्डर देते आणि भिकार निघाली डिश तर मी थन्ड असतो.

तसेही मला खायला कधीही काहीही चालतं.

तुषार काळभोर's picture

18 Jan 2020 - 10:43 am | तुषार काळभोर

मी आग्रह करतो बायकोला की तू काय हवं ते सांग. तर तिचं म्हणणं असतं, नको, तुम्हीच सांगा काहीपण.
आणि मग मी जे काही मागवेल ते एकतर प्रायोगिक (उदा चीज मशरुम मसाला!) आणि फसलेलं असतं. किंवा पनीर टिक्का / बटरमसाला सारखा नेहमीचा सर्वत्र सारख्या चवीचा पदार्थ असतो, जो सरळ चेहर्‍याने संपवला जातो.

कंजूस's picture

16 Jan 2020 - 8:04 pm | कंजूस

मिपावर जान आली तुमच्या लेखनाने.
सगळा तरुणवर्ग वाटसपच्या स्तुतीत रमल्याने इकडे फिरकत नाही.
पूर्वी तीनचार लेख लगोलग टाकल्यास तंबी मिळायची. आता दहा टाकलेत तरी कौतुक होईल.
लिहित राहा लिहित राहा लिहित राहा. काही नवीन नावे तरी कळतील डिशेसची.

नावातकायआहे's picture

17 Jan 2020 - 4:52 pm | नावातकायआहे

लिहित राहा.
पु. भा. प्र.

आजी's picture

21 Jan 2020 - 12:22 pm | आजी

प्रा डॉ दिलीप बिरुटे-मैत्रीणीला चॉईस विचारला जातो. बायकोला ग्रुहित धरलं जातं,हे तुमचं म्हणणं पटलं. मला घरची माणसं ग्रुहित धरत नाहीत पण मलाच ऑर्डर द्यायचा कंटाळा येतो. हॉटेलचा फील एन्जॉय करत आरामात बसायला आवडतं. तुम्हांला माझं लिखाण,शैली आवडते हे वाचून खूप आनंद झाला.

सुबोध खरे- तुमची बायकोच ऑर्डर देते?वा!किती छान!त्यांचे अभिनंदन.

कंजूस- "लिहित राहा"ह्या तुमच्या शब्दांनी मला लिहायला स्फूर्ती येईल.मनःपूर्वक धन्यवाद.

नावात काय आहे-लिहेन,लिहेन,लिहेन.थँक्स.