दोसतार - २४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
26 Nov 2019 - 9:18 pm

मागील दुवा http://misalpav.com/node/44978

चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.

धबधबा दिसणार या विचारानेच सगळे पुन्हा ताजेतवाने झाले. गेलेला चा दम परत आला . मलूल झालेल्या फुग्यात पुन्हा हवा भरल्यावर दिसावा तसे आमचे चेहरे पुन्हा चमकू लागले. केवढा मोठा असेल , किती उंचावरून पाणी पडत असेल. त्या पाण्यात जाता येईल का? अशा अनेक शंका मनात येऊ लागल्या. पाटणला असताना दिवाळीच्या किल्ल्यात दवाखान्यातलया सलाईनच्या बाटलीने कारंजे करायचो. ती सलाईनची रिकामी बाटली मिळायला आम्हाला भरपूर शोधमोहीम करायला लागायची. सर्वात अगोदर जुना पसारा काढायचा. घरातल्यांचा डोळा चुकवून तो पसारा काढायला लागायचा. सिंहगडावर तानाजीचे मावळे चढावेत तसे माळ्यावर चढायचे. कसले कसले डबे . मोडून अर्धे उरलेल्या केरसुण्या, पुन्हा कधीतरी लागतील म्हणून गुंडाळी करून ठेवलेले रेनकोट , गणीतातच ऐकायला मिळतात तसल्या फुटक्या बादल्या. कसल्याशा बरण्या, घमेली फावडी , सुकलेल्या रंगाचे डबे , वाळून कडक झालेले ब्रश अशा अनेक समस्यांतून मार्ग काढत माळवदावर कुठेतरी एकदम मागे ठेवलेल्या बोचक्यात नाहीतर खोक्यात बांधुन ठेवलेल्या त्या पसार्‍यात खजीनाच सापडायचा. मागच्या वर्षी नवे घेतलेले पण आता बंदूक मोडलेले मातीचे सैनीक, पगडीची टोके उडालेला मावळा, एक हात तुडलेला पैलवान , शिंगे मोडलेले मातीचे बैल, भिंती चेपलेली कागदाची घरे, रंग गेलेलीकिल्ल्याची विटकी कागदी तटबंदी, त्यावर ठेवायच्या तोफा. चाके हरवलेल्या प्लास्टीकचे ट्रक , किल्ल्याखालच्या गावात विहीर म्हणून वापरलेली पावडरची गोल डबी, काय काय सापडायचं तो खजीना पहाताना! उत्खननात ऐतीहासीक गाव सापडावे तसे व्हायचे. सैनीकांच्या मोडलेल्या बंदुकांचे तुकडे शोधायचे. चेपलेल्या घरांच्या खिडक्या पुन्हा उघडतात का ते पहायचे, विहीरी च्या रहाटाच्या काड्या शोधायच्या , चाके नसलेल्या ट्रकला उलटसुलट करून वास्तपूस करायची. या सगळ्यात आपण नक्की काय शोधायला आलोय तेच विसरायला व्हायचे. आज्जीची हाक आली की समजायचे आपण मागचा अर्धा तास किंवा दोन तास माळवदावर च आहोत. तो काढलेला पसारा पुन्हा भरून ठेवल्यावर खाली उतरताना आठवायचे की आपण त्या पसार्‍यात किल्यातल्या कारंजासाठी सलाईनची बाटली शोधायला आलोय म्हणून. मग पुन्हा एकदा तो ऐतीहासीक ठेवा माळवदावरच्या जमीनीवर यायचा. त्यात कुठेतरी सलाईनची प्लास्टीकची पांढरी नळी दिसली की त्या गोष्टीतल्या लाकुडतोड्या ला देवाने त्याची खरी कुर्‍हाड काढून दिल्यावर झाला असेल तितका आनंद व्हायचा. नेमकी सलाईनची काचेची बाटली मात्र त्या खजिन्यात नसायची. अर्धा मुर्धा का होईना तो ऐवज हातात आलेला असायचा. तो घेऊन खाली उतरण्या अगोदर काढून ठेवलेला पसारा पुन्हा खोक्यात ठेवणे हे महाजिकीरीचे काम . जेवढ्या वस्तु त्यातून काढल्या त्या पेक्षा कमी वस्तूंनी खोके भरून जाते. ही जादू कशी होते तेच कळत नाही.
कदाचित बाहेर आलेल्या खेळण्याना आपण बाहेर आलो म्हणून आनंद होत असेल आणि त्याना खोक्यात पुन्हा जायचे नसेल म्हणून ते तसे करत असतील. बाकावर तिसर्‍या मुलाला बसू द्यायचे नसेल तर हात पाय पसरून दाटीवाटी झाल्यासारखे दाखवतो ना तसे .
किल्ला करणार्‍या मुलांची टोळीच त्या चाफोळी रस्त्यावर फिरत असायची. तिथल्या प्रत्येक दवाखान्यात सलाईनची रीकामी बाटली आहे का विचारत बसायचो. बहुतेक दवाखान्यातले कंपौंडर आम्हाला हाकलूनच द्यायचे . बरोबर आहे. पाटणसारख्या गावात मोजून चार दवाखाने, त्यातूनही सलाईन लावावे इतके आजारी पेशंट असे किती असणार. त्या पेक्षा किल्ला करणारी मुलांची संख्या कितीतरी जास्त . प्रत्येक जण त्या दवाखान्यात जाऊन सलाईनची बाटली आहे का विचारणार . अगोदरच पेशंटच्या आजाराने आणि डॉक्टरांच्या येण्याजाण्याने त्रासलेले ते दवाखान्यातले लोक इतक्या मुलांच्या "सलाईनची बाटली आहे का ?" या एकाच प्रश्नाला उत्तर देताना कावल्यासारखे होणारचकी. मग डॉक्टरांच्या ओळखी काढून एखादी बाटली कुणाला तरी मिळायची.
ज्याला सुईसकट सलाईनची बाटली मिळायची त्याला गणपतीच्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची ढाल मिळाल्याचा आनंद . बाकीचे इतर कुठे सलाईनची बाटली मिळतेय का ते शोधणार. दवाखान्यात कोणीही पिशवी घेवून जाताना दिसला की काहीजण त्याला विचारणार " कोण आजारी आहे का? सलाईन लावणार आहे का? त्याने सलाईन लावणार नाही म्हंटले की आमचे चेहरे पडणार.
गण्या तर मला म्हणायचा की लोक पाटणला लोक सलाईन लावण्या इतके आजारी पडत नाहीत. सरकारने लोक सलाईन लावण्या इतके आजारी पडतील या साठी काहीतरी करायला हवे . म्हणजे मग मुलांना किल्ल्यात कारंजासाठी सलाईनच्या बाटल्या मिळतील. या साठी आपण सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा टिळकांनी लिहीला होता तसा एक खरमरीत अग्रलेख की काय ते लिहू या म्हणून. टोकदार अग्रलेख लिहीयचा म्हणून पेन्सीली टोपाझच्या ब्लेडने टोकदार करून ठेवल्या पण शाळेत अजून अग्रलेख लिहायला शिकवले नव्हते त्यामुळे गण्याला तो कसा लिहीतात हे माहीत नव्हते. शिकवले की पहिला अग्रलेख तोच लिहायचा. हे आमचे नक्की होते.
सुईसकट ज्याला सलाईनची नळी आणि बाटली मिळायची त्याच्या किल्ल्यातले गोल विहीरीतले कारंजे करायचा. पाणी भरलेली सलाईनची बाटली जितकी उंच टांगू तितके कारंजे उंच उडते. ज्याला नुसतीच नळी मिळायची तो किल्ल्यातल्या गुहेतून चिखलाच्या पन्हाळीतून ती प्लास्टीकची नळी फिरवायचा आणि एखादा पाण्याचा पाट दाखवायची. पाणी जेथून पडणार ती जागा धबधबा मानायची. इतकी बारीक धार की नीट उजेड नसेल तर धबधबा दिसायचापण नाही.
पाटणला पावसाळ्यात डोंगरावरून ओहोळ पडताना दिसायचे. पण त्याच्या अगदी जवळ जाऊन कधी पाहिलेच नाहीत. इथे धबधबा प्रत्यक्षात दिसणार , नुसता दिसणार नव्हे तर त्याच्या पाण्याला हात लावायला मिळणार. शेजारच्या कादमकाकू एकदा गोकाक की कुठे तरी गेल्या होत्या. तेंव्ह्या त्या धबधब्या बद्दल आईला सांगत होत्या. उंचावरून म्हणे पाण्याची धार पडतच नाही. नुसते थेंब पडतात. फुर्रर्र केल्यासारखे. तुषार की कायतरी म्हणतात त्याला आपण जवळ गेलो नाही तरी ही ते तुषार आपल्याला लांबूनच भिजवतात. या धबधब्यात ही असली तुषाराची जादू होती की नाही माहीत नाही. पण नसावी. कारण तसे असते तर भोसेकर सरांनी सगळ्याना त्याबद्दल सांगीतले असते.
धबधबा जवळच आहे म्हंणल्यावर सगळे पुन्हा तराट चालू लागलो. तो घाटातला चढ नसल्यागतच झाला. धबधबा दहा मिनीटाच्या ऐवजी पाचव्या मिनीटालाच दिसायला लागला.
हिरव्या कच्च गवता तून डोकावणारा एक काळा मोठ्ठा दगड. दगड कसला आडवातिडवी पुढे आलेली भिंत . त्यावरून पांढरे शुभ्र पडणारे पाणी. … दगडावर पांढरीशुभ्र साडी वाळत घातल्यासारखे. हिरवे कच्च गवत लाल माती ,काळा मोठा दगड आणि त्यातून दिसणारे पांढरे शुभ्र पाणी…. काहीतरी मजेशीर दिसत होते. काय ते नक्की सांगता येत नाही. पण काहीतरी एकदम भारी. आपण अगदी थेट चित्रात जाऊन बसल्यासारखे वाटत होते .
पोटात जत्रेतल्या पाळण्यात बसलो की वरून खाली येताना होते तसे होत होते खूप हसावेसे , हुंदडावेसे वाटत होते. कोवळे लुसलुशीत गवत पाहिल्यावर गाईच्या वासरालादेखील असेच काहीसे होत असेल. म्हणूनच तर ती एकदम हुंदडत सुटतात. कोणी एकमेकाना सांगत नव्हते पण आम्हाला सगळ्यानाच तसे वाटत असावे. सगळे खुदूखुदू हसत होतो. दात थंडीमुळे हुडहुडत होते की हसल्यामुळे तेच समजत नव्हते. धबधबा रस्त्यपासून काही फारसा दूर नव्हता. खरेतर वरच्या कुठल्यातरी कड्यावरून पडणार्‍या पाण्यामुळे च तो धबधबा तयार झाला होता. रस्त्याच्या कडेचा एक छोटासा ओहळ ओलांडला की धबधब्याच्या दगडाला हात लावता आला असता. सगळ्यात अगोदर एल्प्या ने तो ओहळ ओलांडला. त्याच्या उंचीमुळे त्याने सहज एका ढांगेत ओलांडला. डब्याची पिशवी शेजारच्याच एका कोरड्या जागे बाजूला ठेवत त्याने ओंजळ हाताची केली धबधब्याचे ओंजळीत घेतले आणि आमच्या अंगावर उडवले.
पाण्याचे थेंब चेहेर्‍यावर पडले. शॉक बसावा तसे झाले. इतके गार आणि उत्साही पाणी. अंगातून काहीतरी मजेशीर पळत गेले . इतका वेळ खुदुखुदु हसत होतो त्याचा देवळातली मोठी घंटा वाजवावी तसा आवाज झाला. एल्प्याचे अनुकरण करत ज्याना ढांगा टाकत ओहोळ पार करता आला ते सगळेच पलीकडे धबधब्याजवळ गेले. टंप्याने पळत येवून ढांग टाकायचा प्रयत्न केला पण तो सपशेल फसला. त्याने टाकलेली ढांग ओहोळाच्या पलीकडे पडायच्या ऐवजी बरोब्बर ओहळाच्या धारेच्या मधोमध पडली. टंप्या पडायचाच पण तो कसाबसा एका झाडाच्या फांदीला पकडत सावरला. थब्बाक आवाज करत पाण्याचे एक मोठे कारंजे उडाले ते थेट त्या ओहोळाच्या या बाजूला उभे असलेले भोसेकर सरांच्या अंगावर. सरांना पूर्ण अंघोळ घालूनच ते पाणी खाली आले. सर दचकले. मला वाटले आता भोसेकर सर टंप्याला पाठीत एक टिंबा ठेवून देणार. पण काय झाले काय माहीत, सर एकदम हसू लागले. आमचा दंगा पाहून त्यांनाही बहुतेक धबधब्यात खेळावे वाटले असावे. भोसेकर सरांना हसता येते हे आम्हाला कुणालाच माहीतच नव्हते. सर पण ढांग टाकून धबधब्याच्या बाजूला आले. त्यांनी धबधब्याचे पाणी ओजळीत घेत स्वतःच्या चेहेर्‍यावर सपकारले. मग ते पाणी प्याले. आणि आणखी हसायला लागले. हसताना त्यांचा चेहेरा एकदम बालवाडीतल्या मुलासारखा दिसत होता. डोळे लकाकत होते. त्यानी सगळ्याना त्या बाजूला बोलावले. म्हणाले प्यारे पाणी बघा तरी कसे मस्त ताजे पाणी आहे . पाण्याची बाटली न घेता थेत ओंजळीने प्यायचे.
मी टंप्याच्या हात धरत ओहोळाच्या त्या बाजूला आलो. धबधब्याच्या पाण्याचे तुषार आता आमच्या अंगावर येत होते. दगडावर पडल्यावर पाण्याचा कसलासा खिसफीस खिसफीस आवाज येत होता . आत्तापर्यंत पाणी किती गार आहे ते समजले होते त्यामुळे पाण्याच्या धारेत ओंजळ धरल्यावर अगोदर बसला होता तसा शॉक बसला नाही. ओंजळीतले ते पाणी तोंडात घेतले. आहाहाहा... जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती.
प्रत्येकजण ते पाणी प्याला. ताजेतवाने की काय तसे झालो.
तेथून पाय निघत नव्हता पण आत आम्हाला यवतेश्वरला पण पोहोचायचे होते..
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

27 Nov 2019 - 4:30 pm | वामन देशमुख

ओ विजुभाऊ,

चार महिने होत आले हो मागचा भाग वाचून. आता भराभर लिहा पाहू. दोसतारचे पुढचा भाग यायला वेळ लागला तर मी पूर्वीचेच भाग पुन्हा पुन्हा वाचतो राव!

- (बालक) वामन देशमुख

मी ही मालिका वाचायची थांबवली. लिंक तुटते.
आता सगळी पूर्ण झाली की पहिल्यापासून वाचून काढेन.

विजुभाऊ's picture

28 Nov 2019 - 9:28 am | विजुभाऊ

वामन आणि यशो
तुमचे आक्षेप मान्य आहेत. मलाही ही कथामालीका पूर्ण करायची आहे.
सवड मिळेल तसे लिहीतो. पण वाचक म्हणून तुमची उत्कंठा आणि मधे गेलेला बराच वेळ पाहून होणारी चिडचीड समजते .
या पुढचे भाग लवकरात लवकर लिहून टाकेन असे प्रॉमिस करतो.

सुधीर कांदळकर's picture

28 Nov 2019 - 8:48 am | सुधीर कांदळकर

मस्त चित्रदर्शी - आवडला. टोपाझ ब्लेड - अनेक रम्य आठवणी जाग्या झाल्या. टोपाझमुळे ‘शार्प एज इरॅस्मिक’च्या विविध भारतीवरच्या बॉबी तल्यारखानच्या जाहिरातीसकट.

जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती.

छानच.

माळ्यावरच्या वस्तूत गुंतणे, डब्यातल्या वस्तू पुन्हा डब्यात न मावणे. ज्यासाठी माळ्यावर चढणे झाले त्या वस्तूसाठी पुन्हा माळ्यावर चढावे लागणे - एकदम झकास.

मस्त लेखांकाबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

अगदी प्रकाश संतां लेखची भाषा! छान

अगदी प्रकाश संतांची लेखाची भाषा! छान लिहीले आहे.

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2020 - 5:25 pm | चौथा कोनाडा

धबधब्याच्या अनुषंगाने लिहिलेल्या दिवाळीचा किल्ला, सलाईनची बाटली, ब्लेड ..... एकदम भारी आठवणी आहेत !
धबधब्याच्या जवळ पोहोचल्यावरचे वर्णन खुप सुंदर !

विजूभाऊ, अप्रतिम लेखन !

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2020 - 5:27 pm | चौथा कोनाडा

पुढील भाग :
दोसतार - २५