दोसतार - २३

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
2 Aug 2019 - 10:15 am

मागील दुवा :http://misalpav.com/node/44712

ज्ञानेश्वर माउली... ज्ञान राज माउली तुकाराम " त्यानी वारीत वारकरी नाचतात तशी पावलेही टाकली.
त्यांच्या आसपासच्या दोन तीन वर्गांनी त्यांचे अनुकरण केले
आमच्या सहलीला आता " शाळेची शिस्तीत निघालेली मुले, प्रभात फेरी , गणपतीची मिरवणूक, कुठल्याशा महाराजांची पालखी , आणि वारी" असे काहिसे संमिश्र स्चरूप आले होते.
या घोषणांच्या नादात आम्ही गावाबाहेर कधी आलो आणि यवतेश्वरच्या हिरव्यागार रस्त्याला कधी लागलो ते समजलेही नाही.

यवतेश्वर तसे गावाच्या अगदी जवळचे ठिकाण. गावाबाहेर यवतेश्वराच्या डोंगरावर असलेले शंकराचे मंदीर. इथे जायची वाट मात्र झकासच. या रस्त्याला जेथे सुरवात होते तेथे गावातले शेवटचे घर लागते. यवतेश्वराच्या डोंगराच्या कडेने एक वळवणाचा रस्ता वर डोंगरावर चढत जातो. उजव्या बाजूला खाली आख्खा गाव दिसतो डाव्या बाजूला डोंगर साथ करत असतो.आणि त्यातुन एक काळाशार डांबरी रस्ता वळत वळत वरच्या बाजूला चढ चढत असतो. अगदी चित्रात तेली खडूने रंगवून दाखवतोना तसे.
आमची शाळेची मिरवणूक या रस्त्याला लागली. गावातली घरे वगैरे आता संपली होती. चढ चढल्यामुळे असेल किंवा त्या हिरव्यागार डोंगरावर आल्यामुळे असेल पण आमच्या घोषणा भजन गाण्याच्या शेवटी एक एक वाद्य थांबावे तसे एक एक करत बंद पडले. कुणी घोषणा दिल्या तरी फारतर त्याच्या जोडीदार नाईलाज म्हणून त्याला की जय वगैरे म्हणात होता. चढ जसा वाढला तसे थोड्यावेळाने तेही थांबले. चढ चढताना इतका दम लागत असेल माहीत नव्हते. चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत पहिल्या आलेल्या गड्याला पण इतका दम लागत नसेल. काही बोलायला गेले की ते बोलायच्या अगोदर छातीत नुसती फासफुस होत होती. सगळ्यांची हीच अवस्था. मुलींनी तर माघारच घेतली होती. रस्त्याच्या कठड्याच्या दिसेल त्या दगडावर टेकल्या होत्या. रस्ता पाऊस पडल्यामुळे ओला होता नाहीतर त्यानी रस्त्यावरच फतकल मारायला कमी केले नसते. आम्ही दमलो नाही असे दाखवत होतो. पण ते दाखवून ही दम लागला. शाळेतून जे दोन दोनच्या जोड्या करून ओळीत निघालो होतो ती ओळ दोन बिंदू जोडून एक रेषा बनते, वरून ठिपके जोडून चित्र बनवा या अवस्थेला आली होती. भूमितीच्या तासातून थेट चित्रकलेच्या तासाला आल्यासारखी.
आम्ही सगळेच थांबलो. पुढे गेलेले मागे आले. मागून येत होते ते एस टी स्टँडला प्लॅटफॉर्मला गाड्या लागतात तसे आम्ही होतो तिथे येवून थांबले. दार उघडल्यावर प्रवाशांची झुंबड उडाली नाही इतकाच काय तो फरक. खाली बसलो .जरा दम खाल्ला. तसे एक एक चित्र दिसायला लागले. गवताने हिरवागार झालेला डोंगर , मधूनच दिसणारी लाल माती , वर आभाळात धुरकट काळे पांढरे ढग, पावसाने स्वच्छ धूवून काढलेला काळाशार रस्ता. डोंगराच्या कडेला वरुन वहात येणारे काचे सारखे स्वच्छ पाणी ,दमल्यामुळे आमचे आवाज बोलणे बंद झाले होते. त्यामुळे आत्ता एरव्ही कुणीही न सांगताही एकदम शांतता पसरली . आत्तापर्यंत आमच्या घोषणा आणि भजनाच्या गदरोळात त्या वहात येणार्‍या पाण्याचा आवाज ऐकू येत नव्हता. बैलांच्या गळ्यात बांधलेली असतात ना तसे शंभर घुंगरु एकदम वाजवले तर येईल तसा वहात्या खळ खळ आवाज येत होता . कानाला वार्‍याच्या वहाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. वर आकाशात कोणतातरी पक्षी ओरडत होता. मग दरीत एक छोटा पक्षी शिट्टी वाजवत काहीतरी बोलत होता. दरीतून गावातल्या कुठल्यातरी देवळातून " निजरूप दाखवा हो " ऐकू यायला लागले. कुठल्याशा शेतात शेतकरी बैलांना हॅ हॅ हॅ थ्रुवा.... करत पुढे हाकलत होता. त्या बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज इतक्या दुरूनही ऐकू येत होता. मग काही वेळाने हे सगळे आवाज बंद झाले उरला फक्त वार्‍याचा आवाज. अचानक तोही बंद झाला . एक कसलासा अगदी शांतता पसरली. इतिहासाच्या तासाला एकदा पाटणच्या शाळेत " कृष्णदेवरायच्या काळात इतक्या सुधारणा झाल्या " या प्रश्णाला उत्तर देताना गण्या म्हणाला होता " की कृष्णदेवरायाच्या काळात भयाण शांतता पसरली होती त्यामुळे त्याच्या काळात इतक्या सुधारणा झाल्या" तशी शांतता पसरली. ती भयाण मात्र वाटत नव्हती. उलट आतुन उत्साह वाटत होता. आपल्या मनात एखादे कारंजे आहे आणि ते अचानक सुरू झाले असून कधीही बाहेर पडेल असे वाटत होते. उगाचच वारा पीत उड्या माराव्या , डब्यातली खिचडी सगळ्याना वाटून टाकावी, किंवा मग नाहीतर मग एकदम गप्प बसून सगळे आवाज कानात साठवून घ्यावे. असे वाटत होते. कानाला फुलपाखराच्या उडण्याचाही आवाज ऐकू येईल इतकी शांतता होती. पाटणची आज्जी याला शांततेचा आवाज असे म्हणायची. हवेत कसलासा गोड उत्साही वास पसरलेला होता. गच्च ओल्या मातीचा, चुरडलेल्या हिरव्या गवताचा, दवण्याच्या फुलांचा , घाणेरीच्या पानांचा , पेरुच्या झाडाचा,पिंपळाच्या कोवळ्या तांबूस सोनेरी पालवीचा. आईने डोके तीच्या पदराने पुसल्यासारखा ……. नेहमीच्या चंदन मोगरा केवडा यापेक्षाही खूप वेगळा. उत्साही गंध होता.
हा असा वास आला की कोकराप्रमाणे खूप उड्या माराव्याशा वाटतात. आम्हाला सगळ्यांनाच तो अनुभव येत होता. पण आपण बोललो तर त्या शांततेच्या आवाजाचा भंग होईल म्हणून कोणी बोलत नव्हते. सगळ्यानाच हे सगळे आवाज ऐकायचे होते. आम्हालाच काय पण शाळेतल्या सरांना देखील इतक्या शांतत्तेची सवय नसावी. आम्ही इतके शांत का हे पहायला भोसेकर सर पुढे गेलेले मागे आले. सगळी मुले काहीही न बोलता डोळे मिटून बसली होती. शेवटी सरांना रहावले नाही त्यांनी फुर्र्र करत शिट्टी वाजवली. आणि कंदीलाची काच फुटावी तशी ती शांतता फुटली.
"अरे काय झाले रे…….. " का थाम्बलाय? "
सरांच्या प्रश्णाला उत्तर द्यायची पण कोणाची इच्छा नसावी. कारण कोणीच बोलले नाही. मला वाटले की मी एकटाच तिथे आहे आणि बाकीचे सगळे पुढे निघून गेलेत. डोळे उघडायची इच्छा नव्हती. त्या मस्त शांततेच्या तंद्रीतून बाहेर यायला नको वाटत होते. . डोळे उघडुन पाहिले तर सगळ्यांची अवस्था माझ्यासारखीच. सरांनी उगाच शिट्टी फुंकली. " कशाला ओ वाजवलीत शिट्टी सर. मस्त वाटत होते. एकदम शांत." अज्या देशपांडे पुटपुटत होता. त्याने सगळ्याच्या मनातली बोलली असल्यासारख्या सर्वांनी माना डोलावल्या.
"अरे काय झाले , बोलत का नाहिय्ये कुणी" एरवी तासाला शंभर वेळा गप्प बसा म्हणणारे आमचे शिक्षक आज आम्ही बोलत का नाही हे विचारत होते. आम्हाला बोलायचे असते तेंव्हा हे गप्प बसायला सांगतात आणि आज शांत बसून शांततेचा आवाज ऐकायचा आहे तर हे बोलायचा आग्रह करतहेत.. शाळा म्हणजे हेच. आम्हा विद्यार्थ्याना जेंव्हा जे करायचे असते नेमके त्याच्या विरुद्ध सरांना वागायचे असते. शिक्षण हे नेहमी असेच का असते? शिक्षक दिनाच्या भाषणात हे मी सांगणार आहे. माधुरी कुणालातरी सांगत होते.
" अरे काय झाले सगळे गप्प का आहात.? दमलाय का?
हो म्हणायची इच्छा सगळ्यांचीच होती. पण सरांच्या भितीने सगळे नाही म्हणाले. गेल्या वर्षी एन सी सी च्या परेडला एका दमलेल्या कॅडेटला त्याने दमलोय म्हणाला म्हणून ग्राउंडला वीस फेर्‍या मारायला लावल्या होत्या असे ऐकले होते. आम्ही दमलोय म्हणालो असतो तर इथे भोसेकर सरांनी वीस वेळा यवतेश्वर चा रस्ता धावायला लावला असता. यवतेश्वरला वीस वेळा यायला आमची हरकत असायचे कारणही नव्हते. पण तो शांततेचा आवाज धावत पळत असताना ऐकूच आला नसता. मला खात्री आहे की भोसेकर सरांनी तो शांततेचा आवाज जन्मात कधी ऐकलेला नसावा. नाहीतर त्यांनी शिट्टीचा फुर्र आवाज आवाज करत आमची शांतता मोडलीच नसती. भोसेकर सरच काय पण शाळेतल्या कुठल्याच सरांनी तो आवाज कधी ऐकलाच नसेल. शाळेत सदैव मुलांची कलकल शांत करताना ओरडून गप्प बसा म्हणण्यातच त्याची शांतता पळून जात असेल .
अरे काय झाले गप्प का आहात ? अजून पुढे चालायचे आहे. पुढे एक धबधबा आहे. त्याच्या जवळ आपण आपला पहिला थांबा घेवू.
त्या नंतर यवतेश्वर फक्त दहा मिनीटांच्या अंतरावर आहे.धबधब्याचे नाव ऐकल्यावर एक एक करुन उठायला लागले. पुन्हा दोन दोन च्या जोडीत जोडलो गेलो.
मागे कोणी राहिले नाही ना ,हे पहाण्याची जबाबदारी सरांनी टंप्या आणि एल्प्याला दिली. सरांनी आपल्याला जबाबदारी दिली याचे त्या दोघांना आश्चर्य वाटले. दंगा मस्ती करत चालणारे टंप्या आणि एल्प्या परेड करत चाललोय असे चालू लागले. त्यांच्या हाततल्या डब्याच्या पिशव्या खांद्यावर रायफल धरावी तसे उभ्या धरून ते टेचात चालायला लागले.

सरांनी यवतेश्वर दहा मिनीटांच्या अंतरावर आहे असे संगितलंय. अंतर मोजायचे एकक मिनीटात कसे ? अव्याने हळु आवाजात महेशला विचारलेली शंका आख्या शाळेला ऐकू गेली.. खिक्ककन हसू फुटले तरीही महेश काय उत्तर देतो याची उत्सुकता होतीच.
" अरे मला तीच शंका आहे. आपण दहा मिनीटात जेवढे अंतर कापतो तितके अंतर असेल हे"
पण दहा मिनीटात म्हणजे चालत दहा मिनीटे की बसने दहा मिनीटे? आणि समजा चालत असेल तर हळू चालत की भरभर एकदम धावल्यासारखे चालत?
महेशच्या उत्तराने अव्याची शंका मिटायच्या ऐवजी त्याला नवीन शंका सुचू लागल्या होत्या. अव्याच्या धबधबा येणार्‍या शंकांना उत्तर देण्यापेक्षा दहा मिनीटे चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

सदस्य११'s picture

2 Aug 2019 - 11:45 am | सदस्य११

मस्त...खूप सुरेख चित्रदर्शी वर्णन करता तुम्ही. वाचताना तिथे प्रत्यक्ष गेल्यासारखे वाटते.

विजुभाऊ's picture

2 Aug 2019 - 12:17 pm | विजुभाऊ

धन्यवाद

माकडतोंड्या's picture

2 Aug 2019 - 4:28 pm | माकडतोंड्या

कंटाळा आला वाचताना

सुधीर कांदळकर's picture

3 Aug 2019 - 6:26 pm | सुधीर कांदळकर

आवडले.

आई चेहर्‍यावरची रांगोळी पाहात होती .....
शांततेचा आवाज....
शिक्षण हे नेहमी असेच का असते ....

हे खास आवडले.

लंपनची आठवण आलीच.

जालिम लोशन's picture

3 Aug 2019 - 7:58 pm | जालिम लोशन

छान

सुचिता१'s picture

5 Aug 2019 - 2:01 pm | सुचिता१

अप्रतीम!! पुढील भाग लवकर टाका ही विनंती ़

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2020 - 5:13 pm | चौथा कोनाडा

किती सुंदर !

गवताने हिरवागार झालेला डोंगर , मधूनच दिसणारी लाल माती , वर आभाळात धुरकट काळे पांढरे ढग, पावसाने स्वच्छ धूवून काढलेला काळाशार रस्ता. डोंगराच्या कडेला वरुन वहात येणारे काचे सारखे स्वच्छ पाणी ,दमल्यामुळे आमचे आवाज बोलणे बंद झाले होते. त्यामुळे आत्ता एरव्ही कुणीही न सांगताही एकदम शांतता पसरली . आत्तापर्यंत आमच्या घोषणा आणि भजनाच्या गदरोळात त्या वहात येणार्‍या पाण्याचा आवाज ऐकू येत नव्हता.

बैलांच्या गळ्यात बांधलेली असतात ना तसे शंभर घुंगरु एकदम वाजवले तर येईल तसा वहात्या खळ खळ आवाज येत होता . कानाला वार्‍याच्या वहाण्याचा आवाज ऐकू यायला लागला. वर आकाशात कोणतातरी पक्षी ओरडत होता. मग दरीत एक छोटा पक्षी शिट्टी वाजवत काहीतरी बोलत होता. दरीतून गावातल्या कुठल्यातरी देवळातून " निजरूप दाखवा हो " ऐकू यायला लागले. कुठल्याशा शेतात शेतकरी बैलांना हॅ हॅ हॅ थ्रुवा.... करत पुढे हाकलत होता. त्या बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज इतक्या दुरूनही ऐकू येत होता. मग काही वेळाने हे सगळे आवाज बंद झाले उरला फक्त वार्‍याचा आवाज.

अतिशय चित्रदर्शी ..... व्वा क्या बात हैं !
ही लेखमाला प्रचंड रमवतेय !

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2020 - 5:20 pm | चौथा कोनाडा

पुढील भाग :
दोसतार - २४