आता तिची दृष्टी परत मिळाली होती तिला
तिची भिरभिरती नजर शोधत होती
त्या राजकुमाराला
...
म्हणजे तिने तरी त्याला
आपल्या मनःचक्षु समोर असचं
रेखाटले होते
तरुण, लकाकणार्या निळ्या डोळ्यांचा
भुरभुरणार्या सोनेरी केसांचा
...
रोज पहाटे उठून
घराबाहेरच्या अंगणात
अंदाजाने फुलं वेचायची
चाचपडत,
अंधारामुळे नाही.. अजिबात नाही
अंधार तर तिचा जुना सोबती
तिची दृष्टी गेली बालपणी, तेव्हापासून
पण
कळी खुडली जाता कामा नये, हि भीती
....
एक दिवस अवचित या राजकुमाराची
अन् तिची गाठभेट झाली
अगदी कादंबरीतील प्रसंगासारखा तो प्रसंग
...
एका अंध लाचार फुलवालीची
प्रेमाने विचारपूस करुन
तिची सगळी फुलं एका झटक्यात विकत
घेतली होती त्याने
...
त्याच्या त्या मधाळ शब्दांनी
तिला मोहून टाकले
किती सहज त्याने आपलेसे केले
...
आज ती त्याला प्रत्यक्ष बघणार होती
त्याने वचन दिल्याप्रमाणे
तिची दृष्टी परत मिळवून दिली होती त्याने
...
त्याला शोधतांना
समोर एक भडंग, रस्त्यावर राहणारा
जगाने झिडकारलेला
गबाळा तरुण दिसला
...
त्याच्या करुण डोळ्यात पाहताच
तिला भरुन आलं,
नव्या तजेल डोळ्यात
झरकन पाणी तरारलं
.
तिला तिच्या राजकुमाराची
ओळख पटली होती
.
आता तिची दृष्टी परत मिळाली होती तिला
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१५/१०/२०१९)
(चार्ली चाप्लिन यांच्या सिटी लाईट्स या सिनेमाच्या कथेवरुन प्रेरीत)
प्रतिक्रिया
15 Oct 2019 - 10:34 pm | पद्मावति
आहा!! मस्तंच.
16 Oct 2019 - 3:03 pm | खिलजि
मला तुला बघायचंय
कधी झूम करून कधी अनझूम करून
पण तुझ्या कटकटीला म्यूट करून
फक्त तुझं निखळ सौंदर्य बघायचंय
फक्त मीच बोलेन , तुला मुभा नाही
मादक नजरा माझ्यावरती हेच काम तुझं
आस्वाद घेऊन देत मजला पूर्ण
चाहता आहे ग तुझा , भुंगा नाही
काढून ठेवल्या आहेत कैक प्रती
प्रत्येक प्रतीत तू वेगळी
हि या शाईची जादू कि अजून दुसरं काय म्हणावं
शृंगारिक चेहरा अन गालावर ती ,, हृदयद्रावक खळी
तुझ्या अपरोक्ष मी एकांतात फक्त तुझ्याशीच बोलतो
बरं वाटतं , तुला निमूटपणे ऐकताना बघून
तू समोर असली , कि मी निमूटपणे ऐकतो
नकोसं होतं , तुझ्या भविष्यवाण्या ऐकून
तुला वाटतं मी हे करावं अन ते करावं
कधी इकडे तर कधी तिकडे न्यावं
अगं मी हाडामासाचा प्रेमी आहे , स्पायडरमॅन नाही
म्हणूनच तुला मी तुझ्या छायाचित्रात बघतो
आणि निवांत तुझ्याशी गप्पा मारत बसतो
तू असतेस जशी मला हवी तशी
हसत नाहीस तरी निर्विकार , सोज्वळ रुपडं हवंहवंसं वाटतं
तू , मी आणि माझा एकांत , तिघेही एकरूप होऊन जातात
################################
या सुंदर कवितेला , एक नजराणा पेश केलाय ,, उत्सुर्फ बाहेर आलेला ..
एक हरवलेला कवी
सिद्धेश्वर विलास पाटणकर
16 Oct 2019 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
छान आहे तुमची रचना, फक्त माझ्या कवितेशी हि रचना कशी रिलेटेड आहे ते कळत नाहीये मला.
16 Oct 2019 - 4:01 pm | खिलजि
प्रेमाला अंतःचक्षूंनीच पाहता येते , बाह्यचक्षूंनी नाही ... माझंही माझ्या बायकोवर नितांत प्रेम आहे आणि पुढेही राहील .. पण मी नेहेमी तिच्यापासून जेव्हा लांब असतो तेव्हाच मला ती हवीहवीशी वाटते .. पण घरी पाऊल टाकलं कि पुन्हा तेच पाल्हाळ सुरु होते .. असं करा नि तस करा ..
आपल्या कवितेत एका अंध मुलीला अंतःचक्षूनि बघितलेले प्रेम आणि वास्तव यात फरक असला तरी तिने तो मनापासून स्वीकारलेला आहे . पण इथे माझी स्टोरी वेगळी आहे .. माझं तिच्यावर प्रेम आहे पण मी माझ्या तत्वांच्या आड ते येऊ देत नाही .. म्हणजेच मला प्रेम करायचंय पण इतर पाल्हाळाला बिलकुल थारा नाही .. प्रेम एके प्रेमच, दुणे काम नाही कि काहीच नाही .. आणि हे सर्व तिच्यासमोर शक्य नाही म्हणून हि रचना .. बोलतो तिच्याशी निवांत पण फक्त तिच्या फोटूसमोर , तिच्यासमोर नाही ..
17 Oct 2019 - 10:52 am | पाषाणभेद
मिकाची अन तुमची कविता छानच आहे. अन हे वरचे विवरण देखील आवडले.
17 Oct 2019 - 11:21 am | खिलजि
धन्यवाद पाभे आणि मिका शेट तुम्हालाही धन्यवाद .. आपल्या कवितेमुळेच तर हि कल्पना उत्स्फूर्तपणे बाहेर आलेली आहे .. अक्षरशः दोन ते तीन मिनिटात प्रसवली चक्क .. टाईप करायला जेव्हढा वेळ लागला तेव्हढाच .. पण फार हलकं हलकं वाटलं नंतर पेस्तवल्यावर .. मनातली काहीतरी जड लहर बाहेर गेली आणि मग एकदम निर्वात पोकळी .. त्या अंतरात्म्याला अनुरूप झाल्यासारखं वाटलं आणि अजूनही वाटतंय ... त्यामुळेच तुम्हाला अनंत धन्यवाद ... पाभे तुम्हालाही , कारण माझ्या विवरणाला , मीच साशंक होतो .. कदाचित अतिशयोक्ती असेल इतरांसाठी म्हणून पण तुमच्या पोचपावतीने तीही शंका दूर झाली ..
17 Oct 2019 - 12:36 pm | पाषाणभेद
नाही हो. काही विचार सर्वांमध्ये सारखेच असतात. तुम्ही त्याला शब्दबद्ध केलेत अन वाट करून दिलीत भावनांना.
16 Oct 2019 - 5:05 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता वाचताना सिटी लाईटसचीच आठवण येत होती.
कविता अर्थातच आवडली.
वाचताना मला खाली चिकटवलेला व्हिडीओ पण आठवत होता. भिती वाटत होती की या वळणाने जाते की काय तुझी कविता. पण नाही तु निराश केले नाहिस.
https://www.youtube.com/watch?list=RDHREBoilrMD4&v=HREBoilrMD4
पैजारबुवा,
17 Oct 2019 - 7:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे हुच्च आहे, माझी तोडकी मोडकी प्रतिभा इथपर्यंत पोहचुच शकत नाही. :)
16 Oct 2019 - 8:12 pm | गणेशा
नेहमी प्रमाणे एक उत्कृष्ट कविता ...
अगदी मनाला भिडली..
हो तशीच जशी तुझी 'प्रिय समुद्रा' होती तशीच...
तीच स्टाईल.. तसेच अंतंर्भुत करणारी.. तशीच मनात रुतणारी..
तु खुप छान लिहितो.. लिहित रहा... वाचत आहे..
17 Oct 2019 - 12:22 am | अत्रुप्त आत्मा
छान.
17 Oct 2019 - 9:44 am | चाणक्य
.
17 Oct 2019 - 8:56 pm | यशोधरा
मस्त.