५: टापरी ते स्पिलो
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर
सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी
३१ जुलै! टापरीमध्ये सतलुजच्या गर्जनेसह जाग आली. कालचा सायकल प्रवास काय भन्नाट होता! आणि काय तो रस्ता! आजही तसंच सुरू राहणार. आता मन अगदी प्रसन्न आणि शांत आहे. एका दिवसात किती फरक पडला. काल भिती वाटत होती की, मी कुठे येऊन अडकलो आहे. तेव्हा समजावं लागलं होतं की, अरे तू तर थोड्याच दिवसांसाठी इथे असशील. इथले स्थानिक लोक व मिलिटरीवाले कसे राहात असतील, कसे रस्त्याच्या अनिश्चिततेला सहन करत असतील! काल हे स्वत:ला सांगूनच सायकल चालवली होती. पण आज स्वत:च्या नशीबाचं कौतुक वाटतंय की ह्या रस्त्यावर सायकल चालवण्याची संधी मिळाली! एका अर्थाने आयुष्यातली दगदग, अनेक प्रकारचे ताण- तणाव, सुरुवातीला शिक्षण आणि नंतर करिअरचा दबाव ह्यामुळे एका अर्थाने तारुण्य जगायचं राहूनच गेलं होतं! ते नव्याने जगण्याची संधी इथे मिळाली आहे! आज जायचं आहे स्पीतिला, जे जवळजवळ ५८ किलोमीटर दूर आहे. आजचा रस्ताही तुफानी असणार!
सकाळी चहा- बिस्कीटाचा नाश्ता घेऊन निघालो. आज मला किन्नौर जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे- रिकाँग पिओकडे जाणारा फाटा- पोवारी लागेल. इथून बहुतांश पर्यटक परत जातात. इथून पुढचा रस्ता तर भटके, ट्रेकर्स अशांचाच असतो. सतलुजच्या प्रवाहाच्या सोबतीने निघलो. कालच ह्या रोडवर ब्लास्टिंग झालं होतं. इथले रस्ते अतिशय अनिश्चित असतात. पावसाळ्यात तर डोंगर कोसळतो; सगळी माती रस्त्यावर येते. त्यामुळे रस्त्याचं बांधकाम हे इथे सतत सुरूच असतं. आणि त्यामुळेच मध्ये मध्ये बीआरओला ब्लास्टिंग करावं लागतं. रस्ता सतत नव्याने बनवावा लागतो, मोठा करावा लागतो; मलबा साफ करावा लागतो. पावसाळ्यामध्ये तर रस्त्यांची अजिबात शाश्वती नसते. टापरीच्या आधीचा माझा रस्ताही मी येण्याच्या एकच दिवस आधी बंद पडून सुरू झाला होता. ह्या सगळ्या स्थितीमुळे ह्या संपूर्ण प्रवासात खूप मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे आणि त्यामुळेही कठीण जातंय. पावसाचीही भिती आहेच. सुरुवातीला अगदी भुरभुर पाऊसही पडतो आहे. पण हा पाऊस अगदीच सुंदर- जणू वरून कोणी तरी अत्तर फवारत आहे असे थेंब बरसत आहेत! वा! अशा रस्त्यावरचा सतलुजचा एक व्हिडिओ इथे बघता येईल.
हळु हळु रस्ता आणखी बिकट होत जातो आहे. वारंवार कच्चे मातीचे पॅच लागत आहेत. अनेक डायवर्जन्स येत आहेत. नैसर्गिक बोगदे तर सुरूच आहेत. एका ट्रकला अशा बोगद्यामधून जाताना बघितलं. बोगदा इतका कमी उंचीचा आहे की, ट्रकला वरचे दगड लागू नयेत म्हणून कसं बसं अर्धाच रस्ता वापरत जावं लागलं. सगळ्याच वाहनांसाठी हा रस्ता दुर्गम आहे. टापरीच्या थोडं पुढे सतलुजवरील धरणाजवळून रस्ता जातो आहे. इथे जल विद्युत केंद्रही आहे. ह्याच धरणातून पाणी सोडण्याविषयीचा इशारा काल लोकांना सांगितला जात होता. हिमालयामध्ये अगदी पर्वत आणि दरीत असलेलं हे धरण! खरंच फारच अवघड जागी आहे! रस्ता सतत बिघडत जातोय. आणि रस्त्याला लागून असलेला डोंगरही आता नाजुक झालेला दिसतोय. अनेक ठिकाणी शूटिंग स्टोन्सचे इशारे आहेत. आणि तुम्ही फोटोमध्ये बघू शकता तसं हळु हळु हिरवा रंगच कमी होत जातोय आणि एक प्रकारचा करडा रंग- ग्रे शेड पूर्ण कॅनव्हासवर पसरते आहे. हळु हळु हिमालय मागे पडतोय आणि ट्रान्स- हिमालयन रिजन- हिमालयच्या पलीकडील प्रदेश- तिबेटचं पठार जवळ येतं आहे. आणि इथे भीषण वेगाने वारे वाहत आहेत! ह्याच कारणामुळे ह्या पर्वताचंही वायू- क्षरण झालं आहे. आणि काही काही ठिकाणी हे वारे मला दटावत आहेत, माझ्या सायकलीला ढकलतही आहेत! किती अद्भुत इथून जाणं आहे! आणि अशा रस्त्यावर सदैव हात धरून सोबत नेणारं बीआरओ! बीआरओला किती वेळा नमन करावं! BRO is the real big bro here!
पोवारीच्या अलीकडे नाश्ता केला. इथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. सतलुज नदीचा एक प्रवाह एका भूमिगत भुयारातून निघून मुख्य नदीला मिळत होता. नक्कीच हे एक नैसर्गिक भुयार असणार व इथे आता मानवी बोगदा बनवला गेला असावा. तीन दिवसांपासून सतलुज बघतोय, काय तो फोर्स, काय ती ऊर्जा! आणि सतलुजला येऊन मिळणारे अगणित जलप्रपात!! पोवारी छोटंच गाव आहे. जशी तिबेट सीम जवळ येते हे, तसे मिलिटरीचे युनिटस वाढत जात आहेत. जिथे कुठे संधी मिळेल, तिथे 'जय हिंद' म्हणून सैनिकांचं अभिवादन करतोय. तेसुद्ध हसून उत्तर देतात. पोवारीकडून रिकांग पिओकडे रस्ता जातो. इथून पुढे हा रस्ता आणखीनच निर्जन आणि सुनसान होत जाईल. रामपूर बुशहरच्या नंतर सातत्याने वाहनांची संख्या कमी होते आहे. आणि पोवारीनंतर वाहन फारच कमी दिसत आहेत. मध्ये मध्ये एखादी बस, ट्रक, काही टूरीस्ट गाड्या! आणि एकदाचा तो प्रसिद्ध फलक आला- आप विश्व के सबसे दुर्गम रस्ते से गुजर रहे हैं! Most trecherous road of the world! वा!
रस्ता जेव्हा दरीजवळून जातो व जेव्हा मोकळा डोंगर समोर असतो; तेव्हा फार तीव्र वारं येत आहे. आणि सतलुज माझ्या विपरित दिशेने वाहत जाते आहे, त्यामुळे हे वारंही माझ्या उलट दिशेला वाहतं आहे. म्हणजेच तीव्र हेड विंड! एका जागी मागच्या बाजूचा फोटो घेतला तेव्हा माझ्या मागच्या दिशेला हिमाच्छादित शिखर दिसलं! जसा हिमालय पार होतो आहे, तसे आता अनेक हिमाच्छादित शिखरसुद्धा मागे पडत आहेत. काय अद्भुत परिसरातून मी जातोय! जर ढग नसते तर आणखी रोमँटीक नजारे दिसले असते! आता ढग कमीही होत आहेत. सुरुवातीचा भुरभुर पाऊस सोडल्यानंतर पाऊसच लागला नाहीय. ढग अजून गेले नाहीत, पण मध्ये मध्ये नितळ निळं आकाश दिसतंय! व्वा! हळु हळु स्पिलो जवळ येतं आहे. आणि त्याआधी काल ब्लास्टिंग केलेली जागा येईल.
इथे आत्ताही अनेक बीआरओ मजूर आणि अधिकारी काम करत आहेत. काही ठिकाणी रस्ता आत्ताही अगदी अरुंद आहे. त्यातूनच ट्रक- बस जात आहेत. अश एका पॅचवरून जाताना ब्लास्टिंग नंतर उरलेले दगड, मलबा, पाणी व चिखल लागला. त्यात समोरचं चाक घसरलं! पण लगेचच हँडल सरळ केलं आणि वेगाने पेडल मारलं व सायकल पडण्यापासून वाचवली! अशा अडनीड रस्त्यामुळे सायकलवर बांधलेलं सामान लूज होतं आहे आणि त्यामुळे अशा अगदीच आडवळणावरही सायकल थांबवावी लागते आहे. अन्यथा हे पॅचेस असे आहेत जिथे थांबण्याची हिंमतच होत नाही! काही काही ठिकाणी रस्ता म्हणजे फक्त माती आणि धोंडे! फोटो घेतले आहेत ते अगदी कमी जागी घेता आले. कारण अशा पॅचेसवर नीट थांबण्याची जागाही कमी वेळेस आहे. रस्त्यावरचा एक फलक मात्र अगदीच भावला- जननी जन्म देती है एक बार, सुरक्षा जन्म देती है बार बार! ह्या पॅचवर अनेक ठिकाणी बीआरओचे मजूर आणि मॅकेनिक आहेत. त्यांच्यात बायका आणि मुलंपण आहेत! त्यांना इथे पाहून भिती वाटून गेली. ते लोक इथे कसे रहात असणार? रस्ता म्हणजे दरीच्या मध्ये असलेले धोंडे आणि माती! वर पर्वत आणि पलीकडे दरी! अशाच जागेत त्यांचे टेंट लावलेले असतात. कसे राहात असतील ते... ????
अशा डोंगरात जिथे कुठे जागा असेल, तिथे थोडी वस्ती आहे. छोटी छोटी गावंही आहेत. अशाच एका गावात परत एक नाश्ता केला. आता सगळ्या घरांवर- दुकानांवर आणि रस्त्यावरचे ब्रिज वगैरे जागीसुद्धा 'ॐ मणि पद्मे हुं' च्या प्रार्थना पताका लावलेल्या दिसत आहेत! तिबेट खूप जवळ येतं आहे. लोकांची चेहरेपट्टीही आता तिबेटी- लदाख़ी सारखी आहे (अशा चेह-यांना आपण अज्ञानातील चुकीमुळे चिनी म्हणतो). एका हॉटेलवालीचं नाव खूपच वेगळं होतं- संगीता लामा! इथे खरोखर हिंदु पंथाचा प्रभाव आणि तिबेटच्या बौद्ध धम्माचा प्रभाव एकमेकांमध्ये मिसळताना दिसत आहेत! जशी स्पीति नदी सतलुजमध्ये विलीन होते आणि तिच्याशी एकरूप होते, त्याच प्रकारे इथे तिबेटी बौद्ध प्रभाव हिंदु प्रभावामध्ये एकरूप होताना दिसतोय. आणि मी सतलुजकडून स्पीतिकडे जात असल्यामुळे मला हे उलट बाजूने दिसेल. हळु हळु हिंदु प्रभाव- हिंदु परिभाषा- हिंदु प्रतिकं तिबेटी बौद्ध प्रतिकांमध्ये मिसळत जातील. आता शिव मंदीरेही कमीच दिसत आहेत. काही थोडी आहेत, ती मिलिटरी- बीआरओने बनवलेली दिसतात. आणि हळु हळु ह्या मंदिरांचं रंग-रूप हेसुद्धा गोंपासारखंच बदलतंय! क्या बात है! एका जागी रस्त्यावरून एक वृद्ध स्त्री जाताना दिसली. तिने मला पाहिलं असावं, कदाचित माझ्या सायकलवरची मंत्र पताकाही बघितली असेल. एक क्षण तिला आश्चर्य वाटलं आणि तिने मला बघून हात जोडले. मीसुद्धा तिला नमस्कार केला. इथले स्थानिक लोकही तितकेच विलक्षण असणार, जितका विलक्षण इथला निसर्ग आहे.
अफाट नजा-यांच्या समवेत स्पिलोला पोहचलो. आज सुमारे १६०० मीटर वरून निघून २५०० मीटरच्या उंचीवर पोहचलो. रस्ता हळु हळु वर चढत असल्यामुळे कुठे त्रास झाला नाही. स्पिलोमध्ये येईपर्यंत बरचसं आकाश मोकळं झालं आहे! आता आकाश नितळ निळं होत आहे. इथे एका हॉटेलवाल्याकडे होम स्टे घेतला. हॉटेलवाल्यासोबत छान गप्पा झाल्या. हॉटेलच्या बाहेरच एक प्रेयर व्हील आहे. म्हणजेच आता तिबेट- स्पीति म्हणजे लदाख़सुद्ध- सुरू झालं आहे! त्याच मालिकेतला पहिला उपघटक! इथून सतलुज थोडी लांब आणि थोडी खाली वाहते आहे, त्यामुळे कानांना जरा हलकं वाटलं. खंत एकच वाटते आहे की, इथे मला लोकांसोबत संवाद असा फार करता येत नाहीय. हॉटेलच्या जवळ काही लोकांना भेटलो, माझ्या उपक्रमाविषयी सांगितलं. पण त्याहून जास्त सखोल चर्चा किंवा कार्यक्रम होऊ शकला नाही. अर्थात् आरोग्य व पर्यावरण ह्याविषयी मला अनेक गोष्टी बघता आल्या. आणि त्यावर लोकांसोबत अनौपचारिक प्रकारे बोलतोही आहे. बघूया पुढे काही कार्यक्रम होऊ शकतो का. पण सायकलिंगबद्दल आणि फिरण्याबद्दल मात्र इतकंच वाटतं- काय नशीब आहे माझं!
आजचा रूट मॅप
पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ६: स्पिलो ते नाको
अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग
प्रतिक्रिया
10 Sep 2019 - 9:29 am | यशोधरा
मस्त!
13 Sep 2019 - 10:12 am | प्रचेतस
रौद्र सौंदर्य आहे.
ह्या रस्त्यावरुन प्रवास करणे किती जिकीरीचे असेल ह्याची कल्पना येते आहे. कधी दरड पडेल सांगता येत नाही.
13 Sep 2019 - 1:13 pm | सुधीर कांदळकर
प्रथम प्रचिबद्दल. या वेळेस वर्णन कमी पण प्रचिनी भरपाई केलेली दिसते. सर्वात जास्त चांगले चित्र कोणते हे पाहात होतो. आणि ध्यानात आले की शब्द थिटे पडतील. निसर्गाचे रौद्रभीषण सौंदर्य, भव्यता, सारे काही कल्पनातीत. केवळ थरारक.
वर्णनात थरार आणि आशानिराशेचा खेळ जाणवतो. परफॉर्मन्सचे यश आपल्या डोक्यात गेले नाही. तब्येतीची चिंता तुमच्याबरोबर वाचकाच्याही मनात दाटून येते आहे.
प्रत्ययकारी हा एकच शब्द मनात येतो. धन्यवाद.
13 Sep 2019 - 1:59 pm | सुधीर कांदळकर
अतिशय कस लावणारा प्रवास. बीएसेफ जवानांना केलेले सलाम, स्थानिक स्त्रीने केलेला नमस्कार - विलक्षण अनुभव.
सर्वात कठीण रस्त्याची पाटी आणि जननी जनम देती ... पाटी. उत्कट केवळ अजोड अनुभव. नि:शब्द झालो.
आपण जगातल्या सर्वात भाग्यवानांपैकी एक आहात. अभिनंदन आणि धन्यवाद.
13 Sep 2019 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
विलक्षण प्रवास, विलक्षण अनुभव, मस्तं प्रकाशचित्रे... एक भारी रसायन तयार झाले आहे !!!
या भागाला भेट देणे बकेट लिस्ट मध्ये आहेच, पण विषेशतः..."आप विश्व के सबसे दुर्गम रस्ते से गुजर रहे हैं! Most trecherous road of the world!" हे वाचून आणि चित्रे पाहून... ते यादीमध्ये वर वर येत आहे !
14 Sep 2019 - 2:21 pm | मार्गी
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!! डॉ. सर आणि कांदळकर सरांचे विशेष धन्यवाद! हा अनुभव अवाक् करणारा होता, इतकंच म्हणेन!