सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
26 Aug 2019 - 7:18 pm

३: नार्कण्डा ते रामपूर बुशहर

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति १: प्रस्तावना

सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति २: शिमला ते नार्कण्डा

२९ जुलै! ह्या प्रवासाचा दुसरा दिवस. आज नार्कंडावरून रामपूर बुशहरला जायचं आहे. काल नार्कंडाला चांगला आराम झाला. रात्री पाऊसही झाला. २७०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर रात्री काही त्रास झाला नाही. आजचा टप्पा तसा सोपा आहे, कारण आज चढाव अजिबात नाही आहे. उलट मोठा उतारच आहे. सकाळी चहा- बिस्कीट आणि केळ्याचा नाश्ता करून रेस्ट हाऊसवरून निघालो. नार्कंडामध्ये अनेक घर आणि दुकानांवर 'ॐ मणि पद्मे हुं' मंत्र पताका दिसत आहे! सकाळचे आठ वाजले असूनही अंधार आहे आणि खूप धुकं आहे. पाऊस थांबला आहे, पण उजेड फारच कमी आहे. खाली ढग दिसत आहेत. नार्कंडाच्या लगेच पुढे उतार सुरू होतो. उतार सुरू झाल्या झाल्या रस्ता ढगांच्या समुद्रात हरवून गेला. व्हिजिबिलिटी अगदीच कमी आहे. जेमतेम दहा पावलांवरचं दिसतं आहे. सायकलचा टॉर्च लावला. सगळी वाहनं लाईट व इमर्जन्सी लाईट लावूनच जात आहेत. असा अंधुक उजेड त्रासदायक असतो. रात्रीचा पूर्ण अंधार असेल तरी तो चालतो एक वेळ. हळु हळु भुरभुर पाऊस सुरू झाला व थंडी वाढली. तेव्हा चेह-यावर मास्क लावलं. पेडल मारण्याची गरज तर अजिबात नाही आहे. हा उतार आता सरळ शतद्रू अर्थात् सतलुज येईपर्यंत सुरू राहील!

रस्ता जसा खाली खाली जातोय, तशी भिती वाटते आहे! अंधार आणि ढग! आणि तीव्र उतार. थोडा उतार परवडतो, पण जर तीव्र आणि सलग उतार असेल तर सायकल नेणं कठीण होतंच आणि रिस्कीही होतं. मध्ये मध्ये थांबत राहिलो. दोन्ही ब्रेक्स आलटून पालटून वापरत राहिलो. वेग नियंत्रणात ठेवला.

सुरुवातीचा एक तास खूपच भारी गेला. अगदी अंधारातलं सायकलिंग झालं. हळु हळु ढग वर राहिले. सव्वा तासामध्ये सोळा किलोमीटर खाली आलो. आणि मग खाली चांगलं उजाडलेलं दिसलं. दूर डोंगरामध्ये पिवळ्या ऊन्हात नाहलेले गाव आणि घरही दिसले! एका जागी सफरचंदाचं झाड रस्त्याच्या बाजूलाच दिसलं! नंतर आकाश मोकळं झालं. रस्त्याच्या जवळच एक हॉटेल आहे. गंमत म्हणजे घराच्या छतावर हे हॉटेल आहे! रस्त्याच्या एका बाजूला पर्वत आणि दुसरीकडे दरी! सायकल सुरक्षित जागी लावून नाश्ता केला. नाश्ता करताना अगदी समोर पुढचा खाली उतरणारा रस्ता दिसतो आहे. काल भेटलेले दोन सायकलिस्ट तिथून उतरताना दिसले! त्यांनीही काल नार्कंडालाच मुक्काम केला असणार.


सफरचंदाचं झाड!

पुढेही उतार सुरूच आहे. एकदा एका विदेशी सायकलिस्टचा ब्लॉग वाचला होता. मी जो उतार उतरतोय तो तो विरुद्ध दिशेने चढून गेला होता! रामपूर ते नार्कंडा तो सायकलीवर गेला होता! इथे रस्ता ३६ किलोमीटरमध्ये १९०० मीटर चढतो किंवा उतरतो! मला उतार असल्यामुळे ते कष्ट नाही झाले. अर्थात् नंतर पुढच्या दिवसांमध्ये मला परत ही उंची चढावी लागेलच. रस्त्यावर एक बोर्ड दिसला- सतलुज नदी के प्रथम दर्शन! पर्वतामध्ये नागिणीसारखी सळसळत वाहणारी ही नदी! आता हा रस्ता शतद्रू अर्थात् सतलुजपर्यंत खाली उतरेल आणि मग तिच्या सोबतीनेच पुढे जाईल. सतलुज जशी जवळ येते आहे, उतार संपतोय तसं गरम व्हायला लागलं. आता तर ऊनही पडलं आहे. जोपर्यंत उतारामुळे चांगला वारा लागत होता, तोपर्यंत मास्क ठेवलं. अनेक झरे, छोटे पूल ह्यामधून पुढे गेल्यानंतर कुठे गर्जना करणा-या नदीजवळ रस्ता आला! काय तीव्र प्रवाह आहे, काय गर्जना आहे! किती तीव्र फोर्स आहे! इथून एक रस्ता मंडी आणि कुल्लुकडे जातो.

सपाट रस्ता आल्यानंतर थोडं बरं वाटलं. आता तीव्र उताराची भिती नाही. इथून रामपूरपर्यंत आता जवळजवळ सपाट रस्ता आहे. पण परत वेगळाच त्रास सुरू झाला. पहिली गोष्ट म्हणजे २७०० मीटर उंचीवरून सरळ ८०० मीटर उंचीवर येणं ही मोठी बाब आहे. कारण दोन्ही उंचीवरचं पर्यावरण वेगळं असतं. आता इथे सफरचंद आणि देवदार असे झाडं नाही तर मैदानी झाडं आहेत! निसर्गाच्या दृष्टीनेही १९०० मीटर उंचीचा फरक मोठा असतो. शरीराला ह्या फरकाशी जुळवून घ्यायला जरा वेळ लागणार. शिवाय आता फारच गरम होत आहे. इतक्या वरून इतकं खाली आल्यानंतर होणारच! आणि जवळूनच नदी वाहत असल्यामुळे दमटपणाही फार आहे. त्यामुळे थकल्यासारखं झालं. थोड्या वेळाने एका हॉटेलवर आलू पराठा घेतला. रामपूर आता फक्त २८ किलोमीटर दूर आहे. मी हे अंतर सोपं जाईल असं मानत होतो, पण उष्णता आणि दमटपणामुळे इथेही अवघड गेलं. शिवाय मध्ये मध्ये थोडे चढही आहेत. हिमालयात रस्ता सपाट असा नसतोच! थोडा चढत तरी राहतो किंवा उतरत तरी राहतो. काल भेटलेले दोन सायकलिस्ट परत एकदा भेटले. शतद्रूची सोबत सुरू राहिली! मोठ्या खडकांमध्ये कोसळणारी खळखळणारी गर्जना!


शतद्रू!

पुढच्या प्रवासाला जास्त वेळ लागला. आणि नंतर इतर गरम झाल्यामुळे घामाने आंघोळ झाली. दुपारी दोन वाजता रामपूर बुशहरला पोहचलो. इथे ASHI अर्थात् Association for Self Help Institute in India संस्थेशी संपर्क झाला होता. त्यांच्यासोबतच HIRD अर्थात् Him Institute of Rural Development सोबतही संपर्क झाला होता. रामपूरमध्ये ह्या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी स्वागत केलं आणि माझी मुक्कामाची सोय केली. पारंपारिक हिमाचली पद्धतीने हार घालून माझं स्वागत करण्यात आलं! इथे विनोद शर्मा भेटले. ही ASHI संस्था आरोग्यावर विशेष प्रकारे काम करते. HIRD ग्राम विकासावर काम करते. आराम केल्यावर त्या संस्थांच्या परिसरात एक छोटा कार्यक्रम झाला. बुशहरी टोपी देऊन माझा परत एकदा सत्कार झाला! मला माझ्या उपक्रमाविषयी बोलण्याची संधी मिळाली. बीडीओसुद्धा होते त्या कार्यक्रमात. माझ्या मोहीमेबद्दल थोडक्यात सांगितलं, मंथन फाउंडेशनविषयी माहिती दिली. सायकलचा अनुभव, सायकलिंगमध्ये असलेला मॅसेज ह्यावर बोललो. संस्थेच्या सदस्यांसोबत थोडं बोलणं झालं. इथल्या महिला जास्त सुरक्षित आहेत, असं त्यांच्या बोलण्यावरून जाणवलं. माझ्या रूटवर पुढेही संस्थांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासंदर्भातसुद्धा सगळ्यांना सांगून ठेवलं.

आज नार्कंडापासून रामपूर बुशहरपर्यंत ६५ किलोमीटर सायकल चालवली. सहा तासांपेक्षा थोडा कमी वेळ लागला. नंतर फारच गरम होत आहे. माझी राहण्याची सोय रेस्ट हाऊसमध्ये केली आहे. सतलुज जवळच आहे, पण मध्ये झाडं आणि दरी आहे, त्यामुळे दिसत नाही. परंतु तिची गर्जना सतत सोबतीला आहेच! रामपूर बुशहर! खूप वाचलं होतं, ऐकलं होतं ह्या गावाबद्दल. पण कशामुळे माहित नाही, पण मला हे गाव खूप विचित्र वाटतंय. असं वाटतंय की, हे हिमालयात नाही तर दुसरीकडेच कुठे तरी आहे! अगदी सपाटीवरच्या शहरामध्ये गरम हवा असते तसं वाटतंय इथे! हिमालयाच्या निसर्गातला एक खरंच विचित्र बिंदू आहे हे स्थान. शिमला आणि नार्कंडाला उंची २७०० मीटर इतकी वाढली होती, पण इथे ती ८२१ मीटर इतकी कमी होते. अर्थात् सगळीकडे सुंदर डोंगर आहेतच. संध्याकाळीसुद्धा काही वेळ गरम वाटत आहे. हवामानात इतका बदल झाल्यामुळे थोडा वेळ ताप आल्यासारखंही वाटलं. नंतर मग मस्त आराम केला. उद्या किन्नौर जिल्हा सुरू होणार आणि आता रस्ता सतत वर चढत जाणार...


आजचा रूट मॅप


तीव्र उतार आणि नंतर थोडे चढ

पुढील भाग- सायकलीसंगे जुले किन्नौर- स्पीति ४: रामपूर बुशहर ते टापरी

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

जीवनमानक्रीडाअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Aug 2019 - 12:27 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचतो आहे
पुभाप्र
पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2019 - 5:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! हिमालयाच्या डोंगराळ भागात सायकलवरून फेरफटका... आणि तोही स्वास्थ्य आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन... मारण्याच्या तुमच्या उत्साहाला सलाम !!

लाहोल आणि स्पितीमध्ये भटकंती करायची इच्छा आहे, तुमच्या लेखांमुळे तिची सतत आठवण होत आहे.

मार्गी's picture

28 Aug 2019 - 11:32 am | मार्गी

धन्यवाद सर!