मुझे नींद न आएssss

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
5 Sep 2019 - 1:40 pm

निद्रादेवी साधारणपणे मला प्रसन्न असली तरी क्वचित तिची अशीही एक वेगळीच तऱ्हा दिसते..

त्या दिवशी सगळं नेहमीप्रमाणे घडलं होतंं. रात्री माझं जेवण वेळेवर झालं होतं. मुलाशी,सुनेशी,नातवाशी गप्पा झाल्या होत्या. टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या मालिका बघून झाल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे माझ्या गादीवर आडवी झाले होते. एफ एम गोल्ड वरची लता,रफीची जुनी गाणी ऐकून झाली होती.
आता झोपावं असा विचार करुन मी रेडिओ बंद केला. अंगावर पांघरुण घेत एसी सुरु केला. आता झोप येणं स्वाभाविकपणे अपेक्षितच होतं.

अर्धा तास झाला, झोप नाही. मग एक तास झाला, पण झोप काही येईना. का बरं झोप येत नाहीये? सगळं तर रुटीनप्रमाणे झालंय. दिवस कसा छान गेलाय. मग झोप का येत नाहीये?

बाथरुमला लागलीय का? हो! चल ऊठ. जाऊन ये. जाऊन आले. गादीवर पडले पण झोप नाही. मग ठरवलं,सरळ उठूया आणि पुस्तक वाचूया. मग एक रटाळ,कंटाळवाणं फिलॉसॉफीवरचं पुस्तक घेतलं. वाचायला सुरुवात केली. एरवी त्या पुस्तकाची दोन पानंही मला वाचवत नाहीत. ते पुस्तक कुणाला तरी गिफ्ट म्हणून द्यायचा विचार मी पक्का केलाय.(माझ्या वयाकडे बघून, मलाही एकीनं ते गिफ्टच दिलंय). त्या पुस्तकाची मी चक्क ३५ पानं वाचली. पण झोपेचं नाव नाही.

मग म्हटलं, लोळत राहून उपयोग नाही. बसून काहीतरी करूया. भरतकाम करुया. मी-किती बरं?- हाsss दीड वर्षापूर्वी एक बेडशीट भरायला घेतलंय. उलटी टीप आणि अळीचा टाका. त्या टाक्यांचा आणि त्या डिझाईनचा मला इतका कंटाळा आला की मी दीड वर्षात त्या भरतकामाला हात म्हणून लावला नाही. तेच भरतकाम हातात घेतलं. म्हटलं , चांगले तीन,चार छाप भरु म्हणजे त्याचा वीट येईल आणि झोप येईल. पण छे ,झोप म्हणून नाही.

का झोप येत नाहीये? ऍसिडिटी झालीय का? वाटत नाही. पोट फार भरलंय का? तडस लागलीय का? नाही?

वजन आणखी वाढलं तर कंबर आणि गुडघेदुखी आणखी वाढेल म्हणून भुकेपेक्षा दोन घास कमीच खा, असा डॉक्टरांचा सल्ला असल्याने धास्ती घेऊन भुकेपेक्षा सात आठ घास कमीच खाल्लेत आपण. मग काय झालं? संध्याकाळी उशीरा चहा प्यायले का? नाही. सध्या पुन्हा एकदा मी डाएटवर असल्यानं (कितव्यांदा बरं?......जाऊ दे) ग्रीन टी,आणि तोही चार वाजताच प्यायले आहे.

शेवटची शक्यता म्हणून नाईलाजानं मी स्वतःला विचारलं,आपण या वयात आता कुठे प्रेमात पडलोय का? प्रेमात पडलं की असं होतं. पण छे,वयपरत्वे प्रेमात पडण्याचाही संभव नव्हता. जुनं प्रेम आठवतंय का? 'धडधड वाढते ठोक्यात'होतंय का? नाही. अगदी एकही कारण चेक करायचं सोडलं नाही. त्या मानसिक थकव्याने तरी झोप येईल म्हणून.

मग झोप यावी, वेळ जावा, थकायला व्हावं म्हणून काय काय केलं!

कपड्यांचं कपाट आवरलं.
रायटिंग टेबलचा ड्रॉवर आवरला.(त्यात निम्मं सामान नातवाचं होतं)
रिटर्नस् फाईल करायला द्यायचे होते म्हणून इन्कमटॅक्सचे सगळे कागद नीट लावले. (तीन चारच तर होते. मेलं रिफंड मिळण्यापुरतं रिटर्न फाईलिंग तर आहे पेन्शनर अवस्थेत).

डोक्याला तेल लावलं. मसाज केला.

हातापायांना मालीश केलं.

अगदी रोजचा व्यायामही केला. स्थिर सायकलवर माफक झेपेल तितकं सायकलिंग (कंबर, पाठ यांच्या आरोग्यासाठी), योगासनं, प्राणायाम! शेवटी मनाच्या आरोग्यासाठी डोळे मिटून ध्यान केलं. पण नो यूज. ध्यान करताना एकच विचार मन एकाग्र होऊ देत नव्हता तो म्हणजे 'झोप का येत नाहीये?

वयपरत्वे झोप कमी होते म्हणतात. म्हणजे आपण चक्क वयस्कर झालो की काय? (मी सोडून कोणालाच असा प्रश्न पडत नाही)

हे विधान खोटं पाडण्यासाठी तरी झोप येऊ दे आणि आपण अद्यापि साठीतच आहोत, म्हणजे "तितक्याशा"म्हाताऱ्या नाही हे सिद्ध होऊ दे. असंही वाटून गेलं.

मग सरळ टीव्ही लावला. त्यावर टेलिशॉपिंग त्याच त्या रीरीरीरीपिट जाहिराती दाखवत होते. फक्त २९९९ रुपयांत संपूर्ण डिनर सेट आणि सोबत नजर सुरक्षा कवच पेंडंट मोफत आणि लगेच फोन करुन ऑर्डर दिली तर केस उगवण्यासाठी हेअर ऑइलची एक हजार रुपये मूळ किमतीची एक बाटलीही मोफत, अशी आकर्षक ऑफर बघत बसले. एक तरुण मुलगा आणि मुलगी "वॉव, ये तो कमाल है, आप क्या सोच रहे है? अभि फोन उठाईए" वगैरे चीत्कारत होते. त्यांचा उत्साह पाहून अखेरीस आपलं वय झालं हे मी मान्य केलंच.

तरी मेली झोप नाही ती नाहीच. पहाटेचे साडेपाच वाजलेले या डोळ्यांनी पाहिले. मग सरळ बेसीनपाशी गेले. दात घासले.
मस्त गरम पाण्याचा शॉवर घेतला. सुती उबदार कपडे घालून गादीवर अंग टाकलं. गाढ झोप येतेय न येतेय तोच पाच मिनिटांनी माझा मुलगा धाडकन दार उघडून माझ्या खोलीत आला. मला गदागदा हलवत काळजीच्या स्वरात त्यानं विचारलं, "आई,तुला काही होतंय का? सात वाजले. इतक्या उशीरापर्यंत तू कधीच झोपत नाहीस. बरं वाटत नाहीये का?"

मी वैतागून म्हटलं, "काही होत नाहीये मला! ही मी उठलेच बघ!"

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

5 Sep 2019 - 5:38 pm | दुर्गविहारी

छान लिहीलाय अनुभव. कित्येकदा कोणतेही कारण नसताना झोप येत नाही हे खरे आहे. अर्थात यावर रामबाण उपाय म्हणजे जे. कृष्णमुर्ती, ओशो वगैरे मंडळींची पुस्तके वाचणे किंवा निशांत, रझीया सुलतान असल्या कलाकृती बघणे. तातडीने झोप येते. ;-)

जालिम लोशन's picture

5 Sep 2019 - 10:10 pm | जालिम लोशन

दुपारची झोप जास्त झाली असेल. अशा वेळी सरळ ऊठायचे आणीा मिपावर ऊत्खनन करुन जुने लिखाण वाचायचे. एकदम रामबाण ऊपाय.

चांदणे संदीप's picture

19 Sep 2019 - 4:07 am | चांदणे संदीप

मी आत्ता तेच करतोय. :)

लेख आवडला हेवसांनल. :)

Sandy

यशोधरा's picture

5 Sep 2019 - 10:20 pm | यशोधरा

भारीएस आज्जी तू!

जॉनविक्क's picture

5 Sep 2019 - 10:20 pm | जॉनविक्क

दुपारी झोप जास्त झाली की रात्री झोपेचे तीन तेरा वाजलेच समजा

आजी's picture

11 Sep 2019 - 1:56 pm | आजी

दुर्गविहारी-छान प्रतिक्रिया

जालीम लोशन - तुम्ही सुचवलेला उपाय करून पाहिला पाहिजे.

यशोधरा- हा हा. पण "भारी"म्हणजे फिजिकली नाही हं.

जॉनविक्क-खरंय.

वाचक आणि प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

लेखनावरुन तरी आजी आजी वाटतं नाहीत ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

विजुभाऊ's picture

17 Sep 2019 - 7:48 pm | विजुभाऊ

हा हा हा झकास. मस्त लिखाण.
हे माझे काही झोप येण्यासाठीचे प्रयोग
http://misalpav.com/node/1699