वैशालीतला उपमा आणि सुदाम्याचे पोहे

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
17 Aug 2019 - 6:48 pm

शनिवारवाडा, सिंहगड, म्हात्रे पूल, बिडकरची मिसळ या प्रमाणेच वैशाली हे पुणेकरांचे एक अत्यंत आदरांचे स्थान आहे. वैशालीतला उपमा खात आणि फर्ग्युसन वर नजर ठेवीत कित्येकांनी तारुण्यात बहार आणली. अशांनी वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे स्वाभाविक आहे पण एका तीन वर्षाच्या मुलाने वैशालीच्या उपम्याचा अभिमान दाखविणे जरा जास्तच होते. दादरला माझ्या मैत्रीणीच्या बहिणीचे लग्न होते. मुलाकडली मंडळी पुण्यातली होती. सकाळी नाष्टा सुरु होता. एक साधारण तीन वर्षाचा मुलगा रडत होता. मी त्या मुलाच्या आईला विचारले
"मुलगा का रडतो आहे?"
"भूक लागली त्याला."
"उपमा तयार आहे द्या त्याला"
"तो खात नाही असला उपमा, त्याला फक्त वैशालीतलाच उपमा हवा."
तीन वर्षाच पोरग ते त्याला चड्डीत शी झाली ते धड कळत नाही त्याला काय वैशालीच्या उपम्याची चव कळते? दोन थोबाडीत लावा खाईल गपपुप असा हिंसक विचार माझ्या मनात आला. पुढचा वरपक्ष म्हणून मी गप्प बसलो. माझ्या मैत्रीणीचा भाऊ अशी बिकट परिस्थिती हाताळण्यात तरबेज होता. तो आत गेला आणि एका प्लेटमधे उपमा घेउन आला.
"घे बेटा खा. तुझ्यासाठी खास वैशालीतून उपमा आणलाय."
त्या मुलाने दादरमधे तो उपमा पुण्यातल्या वैशालीतला उपमा समजून खाल्ला. अभिमानासाठी पुणे जरी बदनाम झाले असले तरी इतरही काही कमी नाही. मटण खाणार तर सावजीचे, मिसळ खाणार तर मामलेदाराची, बिर्याणी खाणार तर पॅराडाइसची असा अभिमान दाखविणारे प्रत्येक शहरात असतात किंबहुना प्रत्येक शहराची आपली अभिमानाची जागा असते. माझी मैत्रीण सुद्धा काही कमी नव्हती. मी तिला विचारले.
"अग जेवणात मेनु काय आहे?"
"अरे मेनु काय विचारतो परांजपेचे कॅटरींग आहे."
"परांजपेंचे कॅटरिंग असले म्हणजे मेनु विचारायचा नसतो असा काही नियम आहे का?" असल्या तार्किक प्रश्नांना अशा लोकांच्या लेखी काही किंमत नसते. हि मंडळी त्यांच्याच विश्वात हरविलेली असतात.

काय म्हटले यापेक्षा कुणीसे म्हटले याला अधिक महत्व आहे हे पुल उपरोधाने सांगून गेले पण लोक तेच खर माणून चालतात. पुलंच्या नावांचा वापर करुन कित्येकानी आपली पोळी शेकून घेतली. आजही व्हाटस अॅपवर अर्धे विनोद आणि कविता पुलंच्या नावाने खपविले जातात. असे का होते व्यक्तीच्या कलेपेक्षा त्या व्यक्तीचे नांव का मोठे होते. कलेकडे ती कला कुणाची आहे यापेक्षा त्याकडे एक कला म्हणून का पाहिले जात नाही? मी काही फार मोठा अभ्यासक वगैरे नाही परंतु मला जे नमुने भेटले त्यावरुन मला साधारणतः दोन कारणे दिसली. पहिले कारण म्हणजे जोखीम नको. साधा एखादा मराठी सिनेमा बघायचे घ्या. मराठी मनुष्य जेवढा लग्न करताना विचार करीत नाही तेवढा विचार मराठी सिनेमा बघायला जायच्या आधी करतो. सिनेमागृहात तीन तास सिनेमा बघण्यात त्याला अनोळखी व्यक्तीसोबत आयुष्य काढण्यापेक्षा जास्त जोखीम वाटते. कसा आहे, कॉमेडी आहे कि सिरियस, कोण आहेत, कुठे रिव्हू आला आहे का? वगैरे वगैरे. तीच गोष्ट पुस्तक वाचण्याची शंभर दोनशेचे पुस्तक घ्या, आठवडा वेळ घालवून वाचा मग पुस्तक चांगले निघाले नाही तर. त्या वेळात आम्ही आमच्या घरावर एक मजला चढवला असता. जोखीम टाळण्यासाठी मग नावांचा आधार घेतला जातो. समीक्षक, ब्लॉगर हि मंडळी असली जोखीम पत्करुन कुणाचे नाव मोठे करण्यात यशस्वी झाली असतात आणि स्वतःचे पोट सुद्धा भरत असतात.

दुसरे म्हणजे स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न. माझा कसा अभ्यास आहे किंवा माझी रसिकता कशी पोहचलेली आहे हे दाखवून देण्याचा फुकाचा अट्टहास. अशी मंडळी त्या नावांशी तुलना करुन सतत कुणाला तरी झोडून काढीत असतात. मी असल काही ऐकतच नाही रे मी फक्त जगजीत ऐकतो, तू काही सांगू नको हल्लीच्या लेखकांच मी तुला सांगतो पुल गेल्यापासून मराठीत विनोदाला दर्जाच उरला नाही, किशोरकुमार म्हणजे किशोरकुमार बाकी सारे नकलाकार, अरे कचोरी खायची असेल तर शेगावलाच जायचे नाहीतर खाउच नये. वीस रुपयाची कचोरी खायला पाचशे रुपयाचे टिकिट काढून मुंबईहून शेगावला जाणे परवडनार आहे का? हे असे काही होणार नाही हे त्यालाही माहीत असते आपल्यालाही, याच भांडवलावर अशांची रसिकता पोसलेली असते. यांना फार कळत असेही नाही. एकदा एका टिव्हीवरील कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी मन उधाण वाऱ्याचे गायले. एक लगेच सुरु झाला कचरा करतात रे ही मंडळी आपल्या गाण्यांचा, ओरीजनल काय गायल होतं. मूळ गायक कोण आहे हे माहीत नसते पण प्रतिक्रिया मात्र जोरात ठोकून देतात.

खर म्हणजे काही नांवे इतकी मोठी असतात कि त्या नावांची गुलामगिरी मनुष्य आनंदाने आयुष्यभर पत्करेल परंतु त्यांच्या कलाकृतीचा आस्वाद घेताना इतरांना का जोडे हाणायचे. मुळात कोणत्याही कलाकृतीचा आनंद घेताना ती कलाकृती काय आहे कशी आहे हा विचार करुन तिचा आनंद घ्यायला हवा. ही अमुक एका व्यक्तीची कलाकृती म्हणून न बघता त्याकडे एक कलाकृती म्हणून बघून त्याचा आस्वाद घ्यायला हवा. प्रत्यक्षात मात्र तुम्हा आम्हा सर्वाचीच गत त्या तीन वर्षाच्या मुलासारखी झालेली असते. उपम्याचीच काय रव्याची सुद्धा चव धड कळत नाही पण हट्ट मात्र वैशालीतलाच उपमा हवा हा असतो. त्या सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी उघडून त्यातल्या पोह्याची चव चाखल्याशिवाय त्यात विश्व निर्माण करायची ताकत आहे हे कळणारे कसे? कृष्णाने जर द्वारकादास मिठाईवाला किंवा हस्तीनापूरी पोहे हे असेच पोहे किंना मिठाई खाणार असा आग्रह ठेवला असता तर त्याला सुदाम्याच्या पोह्यातली दुर्मिळ चव कधी कळली असती का? त्या चकचकीत दुनियेत पुरचुंडीला स्थाम नव्हते ते दिले ते कृष्णाने. सुदाम्याचे पोहे हे नाव अमर झाले. जी नावे व्हायची ती होउन गेली आता उद्याची नावे घडवायची असेल तर सुदाम्याच्या पोह्यात दडलेल्या नावीन्याचा ध्यास घ्यायला हवा. हे सांगायला, लिहायला जितके सोपे तितके प्रत्यक्ष आचरणात आणायला कठीण आहे. माझी तर नेहमीच गल्लत होत असते. तेंव्हा मी मनाशी ठरवतो वैशालीतला उपमा खा, मनसोक्त खा पण त्यासोबत अधूनमधून त्या सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी उघडून बघ, एखाद्या वेळेला काही वेगळीच चव सापडेल आणि आयुष्यभराची ठेव देउन जाईल.

मित्रहो
https://mitraho.wordpress.com/

कलामुक्तकविचार

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

17 Aug 2019 - 7:05 pm | सोत्रि

मस्त...मस्त!

- (पुरचुंडी उघडून बघणारा) सोकाजी

यशोधरा's picture

17 Aug 2019 - 7:13 pm | यशोधरा

आवडले.

nishapari's picture

17 Aug 2019 - 7:23 pm | nishapari

मस्त ..

एकदा एका टिव्हीवरील कार्यक्रमात शंकर महादेवन यांनी मन उधाण वाऱ्याचे गायले. एक लगेच सुरु झाला कचरा करतात रे ही मंडळी आपल्या गाण्यांचा, ओरीजनल काय गायल होतं. मूळ गायक कोण आहे हे माहीत नसते पण प्रतिक्रिया मात्र जोरात ठोकून देतात.

खूप हसले आणि संदेशही पटला ...

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 10:31 am | मित्रहो

कदाचित आज कुणी असा प्रश्न विचारनार नाही. हल्ली शंकर महादेवन यांनी मराठीत बऱ्यापैकी गाणी गायली आहेत. तेंव्हा फार कमी गाणी होती. साधारण २००७ कि २००८ मधली गोष्ट आहे ही.

उगा काहितरीच's picture

17 Aug 2019 - 7:43 pm | उगा काहितरीच

एक नंबर !

लेख आवडला आणि पटलाही.

मनाशी ठरवतो वैशालीतला उपमा खा, मनसोक्त खा पण त्यासोबत अधूनमधून त्या सुदाम्याच्या पोह्याची पुरचुंडी उघडून बघ, एखाद्या वेळेला काही वेगळीच चव सापडेल आणि आयुष्यभराची ठेव देउन जाईल.

हे अगदी मनातलं बोललात तुम्ही.

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2019 - 8:55 pm | धर्मराजमुटके

छान लिहिले आहे. मानवाने एकाची तुलना दुसर्‍याशी करण्यापेक्षा स्वता:ची स्वतःशी केली तर तो नक्कीच प्रगती करु शकेल.

नाखु's picture

17 Aug 2019 - 9:06 pm | नाखु

इथेच मिपावर काही लेखांना सुद्धा,लेखक कोण आहेत हेच पाहून प्रतिसाद मिळत असतात.
या उपर अमुकची सर तमुकला नाही अशी गळेकाढू वृत्ती मिपाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आहेच.

त्यामुळेच ठराविकच गणपती या गल्लीचा राजा,त्या गल्लीचा राजा म्हणून मिरवत असतेत.

आणि फुकट फौजदार, सल्लागार याच राजांच्या पालखीचे भोई असतेत.

पुरचुंडी असलेल्या बहुसंख्य वाचकांपैकी एक पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

बरं मग एखादा फोटुच ठोकायचा ना! दादरचा उपमा वैशालीचा म्हणून कसा काय खपला? दोघांचाही जेमतेमच असणार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2019 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

जॉनविक्क's picture

17 Aug 2019 - 10:59 pm | जॉनविक्क

काय कळलच नाय :(

- (पुरचुंडी उघडून बघणारा, पण वैशालीचाच उपमा खाणारा) जॉनविक्क

महासंग्राम's picture

18 Aug 2019 - 12:09 am | महासंग्राम

वैशालीचा उपमा खायला मिळाला नाही म्हणून चक्क लेख बाब्बो :)

महासंग्राम's picture

18 Aug 2019 - 12:14 am | महासंग्राम

बाकी कृष्णाने ते पोहे सुदाम्याने आणले म्हणून खाल्ले
त्या ऐवजी दुसऱ्या कोणाचं नाव असतं तर खाल्ले असते का हा प्रश्न उरतोच आणि याचं उत्तर तो श्रीकृष्ण जाणो

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 10:34 am | मित्रहो

गोपालकाला, दहीहांडी खाणाऱ्या कृष्णाने ते पोहे कुणीही आणले असते तर खाल्ले असते असा एक अंदाज आहे. सुदामाच हवा होता असे काही नाही.

सर्वसाक्षी's picture

19 Aug 2019 - 12:23 pm | सर्वसाक्षी

मला माहित असलेल्या कथेनुसार कृष्णाने ते पोहे आपल्या जिवलग मित्राने आणले होते म्हणून खाल्ले, पोहे म्हणून नाही. त्याने धिरडं आणलं असतं तरीही तितक्याच आनंदाने खाल्लं असतं
एखाद्या गोष्टीचा स्वाद घेताना तुलना नकळत होतेच, ते स्वाभाविक आहे. मात्र अमुक खायचं तर अमक्याकडेच असा दुराग्रह नसावा.

जॉनविक्क's picture

19 Aug 2019 - 9:37 pm | जॉनविक्क

कृष्णाने ते पोहे कुणीही आणले असते तर खाल्ले असते असा एक अंदाज आहे. सुदामाच हवा होता असे काही नाही.

खिक्क ! अहो पोहे सोडा मंचाव सुप जरी सुदामाने दिले असते तरी कृष्णाने ते तल्लीन होऊन पिले असते. पदार्थ काय आहे हा मुद्दाच नाही हो तो कोणी दिला ते महत्वाचे होते.

थोडक्यात वैशालीचा उपमाच न्हवे तर पोहे, चहा अथवा गेलाबाजार ग्लासात ओतलेले पाणीही प्रचंड चविष्ट असते हेच यातून धागा लेखकाला म्हणायचे आहे. लोक उगाच मुद्दा भरकटुन वैयक्तिक आकस अथवा आकलन क्षमतेनुसार धागा भरकटनारी चर्चा झोड़त आहेत.

मिपा बरेच काही आहे आणि विरोधाभासी हा हीएक त्यातलाच गुण .

नाखु's picture

20 Aug 2019 - 11:01 am | नाखु

सुद्धा तोंडसुख, वृत्ती वर घ्या तुलनेला किंवा माज दाखवायला जो जिन्नस, पदार्थ घेतला त्यावर नको.

ही कमी लेखण्याची वृत्ती,यत तत्र सर्वत्र आहे.
त्याला एकाच शहराशी/शहरवासीयांना जोडून जी अक्कल दिवाळखोरी दाखविली जाते ती नुसतीच कृतघ्नपणा नाही तर मानसिक करंटेपणा आहे.

रोखठोक शहरी नाखु बिनसुपारीवाला

धागा लेखकाने वैशालितला उपमा खाणे हे सुदामाचे पोहे कृष्णाने खाण्यासारखेच पवित्र अन प्रसिध्द वर्तन आहे असे स्पष्ट सोदाहरण दिले असता कोणाला याचा त्रास होत असेल तर तो त्यांचा असलेल्या आकस तथा आकलन क्षमतेचा परिपाकच होय. मिपा बरेच काही आहे आणि विरोधाभासी सुध्दा.

जालिम लोशन's picture

18 Aug 2019 - 12:35 am | जालिम लोशन

छान

कुमार१'s picture

18 Aug 2019 - 7:42 am | कुमार१

आवडले.

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 11:03 am | मित्रहो

धन्यवाद कुमार१, जालिम लोशन, महासंग्राम, जॉनविक्क, म्हात्रे काका, कंजूस काका, नाखु,धर्मराज मुटके, उगा काहीतरीच, nishapari, यशोधरा, सोत्रि
वैशालीतला उपमाचा किस्सा २००१ साली घडला होता. नमुने आजही सापडतात. काही दिवसापूर्वी एक भेटला होता तो सुरेश भटांना भटसाहेब म्हणायचा कधी भेटला नव्हता. भारी केस होती.
काही प्रमाणात ही प्रवृत्ती सर्वात दडलेली असते. मी सुद्धा पुस्तक विकत घ्यायच्या वेळेला खूप विचार करतो आणि नावे माहीत असलेली पुस्तके घेतो. काही नाव असलेल्या पुस्तकांनी खूप निराशा केली फाइव्ह पॉइंट समवन नंतरचे चेतन भगतची सारी पुस्तके. The White Tiger, Q&A, मराठीत सुद्धा अशी नावे आहेत. नाव माहीत नसली तरी खूप आवडली आणि नंतर प्रसिद्ध झालेली चेतन भगतचे फाइव्ह पॉइंट समवन, राम चरण यांचे Execution, पुलंच्या नेहमीच्या पुस्तकांपेक्षा वेगळे असे खिल्ली. मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास पण छान होते पण मिपावरील जाणकारांनी सांगितले होते. एकदा कुठला तरी पिक्चर बघायला गेलो असताना टिकिट मिळाले नाही म्हणून फुकरे (पहिला) बघितला प्रचंड आवडला.

यशोधरा's picture

18 Aug 2019 - 11:34 am | यशोधरा

मला त्या लहानग्याचे कवतुक वाटतेय! इतक्या लहान वयात त्याला वैशालीचं स्थान आणि रुची महात्म्य कळलेलं होतं! त्याला त्याच्या वयानुसार समजावून उपमा खाऊ घालणारे पण ग्रेट. तिथल्या गोतावळ्यात आणि बघ्यांत त्यांना लहान मुलांची मानसिकता ठाऊक असावी.

कोणत्याही बाबतीत नवीन काही अजमावून बघायला काहीच हरकत नाही, किंवा नाविन्याचा सोस, कवतुक असणे हे चांगलेच आहे की, पण जे प्रस्थापित झाले आहे, तेही काही अंगभूत गुणांमुळे झालेले असते, ह्या सत्याला सुद्धा नजरेआड करायला नको.

कपिलमुनी's picture

18 Aug 2019 - 2:16 pm | कपिलमुनी

3 वर्षाची झाली की पुण्यातील मुले
"आमच्या वेळी असे नव्हते, पूर्वीचे पुणे राहिले नाही"

असे म्हणायला शिकतात, पुढच्या वर्षी हे बाळ आता काय वैशाली मध्ये आधीसारखा उपमा मिळत नाही म्हणेल :)

चूक. आमच्या वेळी हा डायलॉग मातेच्या उदरात शिकावा लागतो.

नाखु's picture

18 Aug 2019 - 2:22 pm | नाखु

चितळ्यांची बाकरवडी जालसम्राट आणि हिणकस शेराशिरोमणी जन्माच्या आधिपासून दर्जा राखून आहे.

आणि ते आमचीच घ्या असा कुणालाही आग्रह सुद्धा करीत नाहीत पण नसलेल्या गोष्टी त्यांना चिटकवून मनातील भडास, मळमळ काढायला चितळे, गाडगीळ सोपे आहेत.

प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गावातील पदार्थांचा अभिमान असणे गैर नाही.

नगरी पुणेकर पिंपरी चिंचवड ग्रामवासी पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

हो, त्या बाबतीत पुण्याला आणि पुणेकरांना थोडे तरी श्रेय मिळायला हवे. पुण्यात यायचे, राहायचे, पुण्याला कर्मभूमी मानायची तयारी नसली तरी, बनवायचे, आणि पुण्याला आणि पुणेकरांना शिव्या घालायच्या, हा पुणेकर नसलेल्यांचा जन्मसिद्ध अधिकार बनून गेला आहे.

तरी पुणे तिथे हे तरी कशाला उणे, ह्या नव्या नियमानुसार पुणे सगळ्यांना आपलेसे करून घेतेच आहे.

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 3:05 pm | मित्रहो

नाव कमवायला मेहनत लागते १०० टक्के सहमत. आजही चितळ्यांच्या बाकरवडीला तोड नाही. नाव टिकवायला अधिक मेहनत लागते. असे असले तरी नाव असनाऱ्या व्यक्तीची कला नेहमी श्रेष्ठच असेल असे नाही. कधी नाव असनाऱ्यांमुळे नाव नसनाऱ्यांवर अन्याय होत असतो. एका व्हाटसअॅप ग्रुपवर याच लेखावर प्रतिक्रिया देताना एकाने सांगितले कि दरवेळेला काहीतरी नाव असलेल्या संगीतकारामुळे मदनमोहन यांना कधीही फिल्मफेअर मिळाला नाही.
कधी कुण्या मोठ्याचा मुलगा लगेच संधी. नाव दुसऱ्याचे असते त्याचे नाही. एका क्षेत्रातली नाव वापरुन दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश. उदा. कट्यारमधे शंकर महादेवनएवजी कुणीही शोभला असता पण निर्मात्यांनी शंकर महादेवन या नावाचा वापर गेला. तीच गोष्ट वृत्तपत्रात लिहिणाऱ्या चित्रपट तारकांविषयी म्हणता येईल. यात त्यांच्या नावाचा वापर कुणी दुसरा करतोय. अर्थात पैसे मोजले असतीलच.
मी मागे वाचले होते अमेरिकेत नवीन इंग्रजी लेखकाला कमीत कमी तीन पुस्तकांची संहिता असेल तरच संधी देतात. कारण सरळ पहिल्या पुस्तकाने नाव कमावयचे ज्यात खरी मेहनत असते नंतर त्याचा फायदा घ्यायचा. ते त्या दर्जाचे नसले तरी त्याचा फायदा होते. आपल्या इथेही चेतन भगत, अमिष यांच्याबाबत तेच झाले. दुसऱ्या तिसऱ्या वेळेला त्यांनी तितकीच मेहनत घेतली होती हे खात्रीने सांगता येत नाही. चेतन भगतची नंतरची पुस्तक सुमार दर्जाचीच होती.

कुमार१'s picture

18 Aug 2019 - 11:31 am | कुमार१

'मणी मंगळसूत्र' या चित्रपटाबद्दल थोडे. पूर्वी टिव्ही वर लागत असे पण मी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. हे नाव आणि ' नवरा, बायको, सासू, कुंकू, चुडा, नवस …' असे काहीही नावात असले की मी त्याचा धसकाच घेतो !

पण एकदा धीर करून तो पाहिला आणि काय सांगू ? एकदम छान. आशय, विषय, कलाकार एक नंबरी !

जरूर पहा.

> हे नाव आणि ' नवरा, बायको, सासू, कुंकू, चुडा, नवस …' असे काहीही नावात असले की मी त्याचा धसकाच घेतो ! > हा हा हा :D :D हे भारीय! आणि +१.

उपेक्षित's picture

18 Aug 2019 - 12:42 pm | उपेक्षित

लेख पटला आणि आवडलाही.
तुमच्या लेखामुळे पुण्यात जोगेश्वरी येथे राहणार्या माझ्या एका आत्त्याचा किस्सा आठवला, मी लहान होतो तेव्हा आम्ही कर्वेनगर ला चाळीत राहायचो आणि रक्षाबंधनला हि माझि अत्त्या बाबांना राखी बांधायला आली होती तेव्हा जेवायला आईने घरीच चक्का बांधून श्रीखंड केले होते पण हि बयां आम्ही फ़क़्त चितळेयांचेच श्रीखंड खातो असे म्हणून बोट सुद्धा लावले नाही श्रीखंडाला. आईला खूप वाईट वाटले होते कदाचित रडलीही असेल आई.
असो, खूप अवांतर केले तुमच्या धाग्यावर.

जॉनविक्क's picture

18 Aug 2019 - 1:07 pm | जॉनविक्क

लहान मुलांचा हट्टीपणा समजून घेईनही, पण जाणते जेंव्हा झक मारतात तेंव्हा....

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 7:13 pm | मित्रहो

याला अभिमान नाही दुराभिमान म्हणतात. अशा प्रवृतींची चीड येते. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

नाखु's picture

18 Aug 2019 - 8:07 pm | नाखु

अतिशय मूर्ख प्रकार आहे पण त्याकरीता अमूक अमूक ब्रॅण्ड वर आक्षेप घेणे तितकेच मूर्खपणाचे आहे, मुळातच त्या व्यक्तीला (आत्त्याला) श्रीखंड खाण्यात स्वारस्य नव्हते तर श्रीमंती किंवा मिजास दाखविण्यात जास्त रस होता आणि श्रीखंड हे एक निमित्त झाले.

असे भुक्कड लोक जागोजागी भेटू शकतात.
म्हणजे त्यांना तुम्ही सांगितले मी फलाण्या ठिकाणी बसनेच गेलो तर ते मी ओला,उबेरशिवाय जात नाही असं सुनावतील.

अंथरुण पाहून पाय पसरण्याची कला अवगत असलेला आणि भुक्कड स्वभावाची शहरांशी सांगड घालण्याचा कृतघ्नपणा न करणारा वाचकांची पत्रेवालाच नाखु

जव्हेरगंज's picture

18 Aug 2019 - 1:29 pm | जव्हेरगंज
पद्मावति's picture

18 Aug 2019 - 6:05 pm | पद्मावति

खुप मस्तं लिहिलंय.

मित्रहो's picture

18 Aug 2019 - 7:20 pm | मित्रहो

धन्यवाद एमी, जव्हेरगंज, पद्मावति

किसन शिंदे's picture

18 Aug 2019 - 7:56 pm | किसन शिंदे

व्वा! लेख आवडला आणि पटलासुद्धा.

टर्मीनेटर's picture

19 Aug 2019 - 1:46 pm | टर्मीनेटर

छान लिहिलंय! पटलं आणि आवडलही.

नूतन's picture

19 Aug 2019 - 5:47 pm | नूतन

लेख आवडला

मित्रहो's picture

19 Aug 2019 - 6:43 pm | मित्रहो

धन्यवाद नूतन, किसन शिंदे, टर्मीनेटर आणि सर्वसाक्षी

सुबोध खरे's picture

20 Aug 2019 - 12:17 pm | सुबोध खरे

बाकी वैशालीतील "उपमा" एकंदर "जेमतेमच" असतो.
केवळ स्थान माहात्म्य ठीक आहे.
वैशाली हॉटेल हे कधी पदार्थांच्या चवीसाठी प्रसिद्ध नव्हतेच तर तिथे फुलणाऱ्या फुलांच्या ताटव्या साठी आणि बागेत कितीहीवेळा बसलो तरी हाकलून न देण्यासाठी प्रसिद्ध होते.

संध्याकाळी सहा पासून रात्री अकरा पर्यंत त्या बागेत बसून आम्ही जॅम क्लब सँडविच पासून हॉट बोर्नव्हिटा पर्यंत सर्व पदार्थ चाखले आहेत.

एक काळ (१९८३-१९८७) असा होता जेंव्हा तेथील एस बी डी पी( शेव बटाटा दही पुरी) हि चविष्ट होती.

तिचं एस पी डी पी( सेव पोटॅटो दही पूरी) असे धेडगुजरी नाव झालं आणि त्याची चव उतरली.

बाकी सवाई गंधर्वला गेला नाहीत तर तुमची अभिरुची निम्न आहे असे हि ऐकलेले आहे आणि मी फक्त भीमसेनच ऐकतो >बाकी सर्व ठीकच आहेत. कोण उगाच रात्रभर तेथे बसणार? मी आपला सकाळी आठ वाजता उठून भीमसेन ऐकायला जातो.
या बाकी सर्व मध्ये श्रीमती मालिनी राजूरकर, पंडित फिरोझ दस्तूर, पंडित जयतीर्थ मेवुंडी इ होते.

मी नम्रपणे विचारले कि आपण गाता का किंवा किती शिकला आहात?

त्यावर नाही हे उत्तर.

असो.

कालाय तस्मै नमः