किंकर सेन्सेई

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
26 Jun 2012 - 10:43 pm

आयुष्यात अनेक लोकांशी आपल्या ओळखी होतात, भेटीगाठी होतात. त्यापैकी काही खास व्यक्तींशी झालेली भेट ही आपल्या मागल्या जन्माच्या पुण्यसंचितामुळेच झाल्याची जाणीव होते. तर काही जणांशी आपली भेट होणे किंबहुना 'गाठ' पडणे हा दैवी संकेत वा ईश्वरी संकेत असतो. त्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. अंधारात चाचपडताना अचानक त्यांच्या रूपाने एक प्रकाशाची तिरीप येते आणि अंधार विरून आयुष्य एका वेगळ्याच प्रकारे दृष्टिगोचर होते. माझ्या आयुष्यात किंकर सेन्सेईंची (सेन्सेई म्हणजे शिक्षक) भेट होणे हा एक नक्कीच दैवी संकेत होता.

मी जपानच्या पहिल्या व्यावसायिक दौर्‍यानंतर परत आलो ते जपानी शिकण्याची खूणगाठ मनाशी बांधूनच. पुणे विद्यापीठात जपानी भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेणे हे त्यावर्षीची प्रवेशप्रक्रियेची तारीख उलटून गेल्यामुळे जमले नाही. त्यादरम्यान सिंबायोसिसमध्ये जपानी भाषेच्या एका कोर्सची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे असे कळले आणि प्रवेश घेतला. ऑफिसमध्ये मित्रांना त्याची माहिती देत होतो तोच एक अनोळखी मुलगा ते ऐकुन पुढे आला (मनोहर जोशी, जो पुढे माझा चांगला मित्र झाला) आणि माझ्याशी जपानीत बोलू लागला, मला ओशाळल्यासारखे झाले. मी त्याला म्हणालो, 'अरे आजच प्रवेश घेतलाय. मला काही कळत नाहीयेय तू काय म्हणतो आहेस ते'. त्यानंतर त्याने मला तो जपानी व्याकरणाचे मराठी पुस्तक वाचून अभ्यास करतो आहे असे सांगितले. मी खुर्चीतून पडलोच ते ऐकून, जपानी व्याकरणाचे मराठी पुस्तक? दुसर्‍या दिवशी तो ते पुस्तक घेऊन आला. माझ्यासाठी ती अलीबाबाची गुहाच होती. पुस्तक दाखवून मला त्याने तो त्या लेखकाकडे जपानी भाषेच्या शिकवणीकरिता जातो असे जेव्हा मला सांगितले तेव्हा मला काय बोलावे तेच कळेना. अक्षरशः आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन असे मला झाले. मग त्याने त्या पुस्तकाचे लेखक किंकर सेन्सेई आहेत आणि ते पुणे विद्यापीठात शिकवतात हे सांगितले. त्याच्याकडून मी किंकर सेन्सेईंचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करायचे ठरवले. त्या दरम्यान माझा सिंबायोसिसमधला कोर्स पूर्ण होत आला होता. तो कोर्स अगदीच मूलभूत होता आणि मला माझ्या जपानी भाषा शिकण्याच्या 'बकासुरी भुकेपुढे' अगदीच किरकोळ वाटत होता.

किंकर सेन्सेईंना फोन करून मी त्यांना शनिवारी किंवा रविवारी भेटू शकतो का असे विचारले त्यावर फोनवरून ते म्हणाले, 'शनिवारी भेटू, विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये येऊन मला भेट.' बरं म्हणून फोन ठेवला खरा पण एक भला थोरला प्रश्न डोक्यात फेर धरून नाचू लागला, बॉटनी डिपार्टमेंटचा आणि जपानी भाषेचा काय संबंध? त्यांनी मला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटायला का बोलावले असेल? त्या प्रश्नांबरोबरच एक दडपणही होते, एका जपानी व्याकरणाच्या पुस्तकाच्या लेखकाला भेटण्याचे. शनिवारी विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये त्यांना दिलेल्या वेळेच्या आधीच जाऊन थडकलो. तिथल्या कचेरीत चौकशी केल्यावर मला बाहेरच्या दालनात वाट बघायला सांगितले. मी तिथे लावलेली बॉटनीच्या संशोधकांची चित्रे बघण्यात मशगुल झालो होतो तोच कानावर एक एकदम मृदू आवाज पडला, 'ब्रिजेश?' मागे वळून पाहिले तर पन्नाशीची प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची एक व्यक्ती माझ्याकडे हसर्‍या चेहेर्‍याने बघत होती. हीच माझी आणि किंकर सेन्सेईंची पहिली भेट!

ते मला बाहेर असलेल्या बागेत घेऊन गेले. बाहेर आल्यावर त्यांनी शांतपणे एक सिगारेट काढून शिलगावली आणि दोन बोटांच्या बेचक्यांत धरून मस्त झुरके घेत माझ्याबरोबर गप्पा मारू लागले. बोलण्याची पद्धत एकदम एका मित्राशी बोलल्यासारखी, एक आपुलकी आणि ओलावा असलेली. माझे सारे दडपण गळून पडले. मीही मग जरा धीट होऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारू लागलो. त्यांनी गप्पांच्या ओघात माझ्याकडून माझी जपानी भाषेची आतापर्यंत शिकलेली माहिती काढून घेतली व म्हणाले, 'ब्रिजेश, हे बघ माझ्या क्लासमध्ये रानडेचे विद्यार्थी सांक्यु (जपानी परीक्षेची एक पायरी) साठी येतील, त्यांचा पुणे विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स पूर्णं झालेला असेल. त्यांना कमीत कमी १०० एक कांजी येत असतील, तुला तर एकही कांजी येत नाही. ते सर्व विद्यार्थी कॉलेजातली मुले असतील, तू एक नोकरीपेशा माणूस, तुला त्यांच्याबरोबर बसून कमीपणा वाटेल. कसे करायचे?' मी काकुळतीला येऊन त्यांना म्हणालो, 'तुम्हीच मार्ग सांगा'. ते म्हणाले 'माझ्या पुस्तकातले १३ धडे क्लासला येण्याच्याआधी पूर्ण करावे लागतील, ते करून आलास तर तुझा निभाव लागेल. बघ ठरव तू काय करायचे ते.' असे म्हणून माझा निरोप घेऊन ते निघून गेले. मी घरी येऊन ते धडे संपवण्याचा धडाका लावला. साधारण २-३ आठवड्यांनंतर मी त्यांच्या कमला नेहरू पार्कजवळच्या क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला गेलो. ते भेटल्यावर मी त्यांच्याशी मोडक्यातोडक्या जपानीत सुरु झालो आणि त्यांना, 'तुम्हाला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटलो होतो, प्रवेश घेण्यासाठी आलो आहे' असे सांगितले. त्यांच्या चेहेर्‍यावर आश्चर्यमिश्रित भाव होता. त्यांनी मला क्लासचे टाईमटेबल सांगून पुढच्या सोमवारी क्लास सुरू होतो आहे असे सांगितले.

सोमवारपासून क्लास चालू झाला आणि किंकर सेन्सेई ही काय चीज आहे ते कळू लागले. हा माणूस हाडाचा शिक्षक. चेहेर्‍यावर कायम हास्य. त्यांच्याशी जेवढा काळ प्रत्यक्ष संपर्क होता त्या काळात त्यांच्या चेहेर्‍यावर कधीही एक आठी बघितली नाही की रागावलेले बघितले नाही. जपानी भाषेबद्दल अतिप्रचंड प्रेम, आदर आणि आपुलकी. त्या भाषेवरच्या प्रेमामुळेच त्यांना इतके सहज सुंदर शिकवता येत असावे. कांजी शिकवताना त्या कांजीतले सौंदर्य शोधायला त्यांनी शिकवले. कांजीमधले मूलभूत आकार ज्यांना 'बुशु' म्हणतात ते समजून घेऊन कांजी कशी अभ्यासावी ते त्यांनी शिकवले. एकदा एका रविवारी ते सर्वांसाठी त्यांच्याकडचे ब्रश घेऊन क्लासमध्ये आले आणि वर्तमानपत्र, ब्रश आणि पाणी वापरून कांजी काढायचा सराव कसा करायचा हे प्रात्यक्षिकासहित शिकवले. मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर असलेले सेन्सेई जपानी कांजी खडूच्या साहाय्याने ज्या नजाकतीने फळ्यावर काढीत ते बघताना असे वाटे की जणू काही एक चित्रकार कुंचल्याच्या साहाय्याने एका कॅनव्हासवर एखादे चित्र चितारतोय.

जपानी उच्चारांबाबत ते भयंकर कडक आहेत. कोणी चुकीचा उच्चार केला की, 'श्शी, काय घाणेरडा उच्चार!' अशी त्या बोलणार्‍याची बोळवण करायचे. त्यांचे त्यावरचे एक उदाहरण ठरलेले असायचे. मी धनकवडीला राहतो हे वाक्य 'मी धनक वडीलारा हतो' असे तुटकपणे बोलल्यावर कसे वाटते ते एकदम साभिनय करून दाखवायचे. त्या साभिनय समजावून सांगण्यात इतका प्रामाणिकपणा असायचा की प्रत्येकजण आपल्याकडून पुन्हा अशी उच्चारांच्या चुका होऊ नये असे मनाशी ठरवून टाकायचा. त्यांच्या उच्चारांच्या बाबतीतल्या उच्चपणाच्या एका घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे. एकदा क्लासमध्ये एक जपानी व्यक्ती आली होती. ती व्यक्ती 'सॉफ्टब्रीज सोल्युशन्स' ह्या कंपनीत इंग्रजी शिवण्याच्या कामावर होती. पुण्यातून त्या कंपनीत गेलेल्या मुलांचे जपानी उच्चार एवढे स्वच्छ आणि सुस्पष्ट कसे असा त्यांना प्रश्न पडला होता. त्यांनी त्यावर जरा सखोल चौकशी केल्यावर त्यांना असे कळले की किंकर सेन्सेईंकडे शिकलेल्या मुलांचे उच्चार असे स्वच्छ आणि सुस्पष्ट आहेत. त्यामुळे कोण हा मनुष्य भारतात राहून इतके मनापासून अस्लखित जपानी शिकवतो आहे हे बघण्यासाठी ते आमच्या क्लासमध्ये आले होते. हे सर्व त्यांनीच आम्हाला सांगितले. त्यावेळी त्यांचे आणि किंकर सेन्सेईंचे जपानी भाषेतून जे काही संभाषण झाले ते ऐकताना आम्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून गेली होती. ते बोलणे आम्ही कानांनी आणि डोळ्यांनी अक्षरशः प्राशणं करत होतो. जपान - पुणे विद्यापीठ ह्यांच्या काही प्रोग्राम अंतर्गत भारतात येण्यार्‍या तरुण पिढीतील जपानी विद्यार्थ्यांना त्यांचे उच्चार कसे सदोष आहेत ते दाखवून देण्याइतके जपानी भाषेवर असलेले प्रभुत्व आणि पात्रता असलेला माझ्या माहितीतला एकमेव हाडाचा शिक्षक म्हणजे किंकर सेन्सेई.

त्यांच्या क्लासमध्ये असल्यावर आपण शिकण्यासाठी इथे आलोय आणि एक प्रचंड प्रज्ञा असलेला भाषापंडीत आपल्याला एक भाषा शिकवतोय असे कधी वाटायचेच नाही. क्लासमध्ये एकदम खेळीमेळीचे वातावरण असायचे. उत्तरे देताना कोणी काही शेंडी लावायचा प्रयत्न करतोय ते चटकन त्यांच्या लक्षात यायचे. त्यावर ते त्यांच्या टिपीकल शैलीत म्हणायचे, 'संध्याकाळची थंडगार हवा आणि किंकरांच्या डोक्यावर बेल, फुल वाहा'. कोणी काही मोठ्या आवाजात वादविवाद करायचा प्रयत्न करून वातावरण तापले की अजिबात न रागावता हसर्‍या चेहेर्‍याने त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडायचे, 'प्रेम... प्रेम... प्रेमाने बोला'. एखादा विद्यार्थी जरा जास्तच आगाऊ असला की त्याला त्यांच्याकडून 'अतिरेकी' ही पदवी मिळायची. मी बर्‍याच वेळा 'अतिरेकी' झालेलो आहे. पण सेंसेईंचे आमच्या बॅचमध्ये माझ्यावर जरा जास्तच प्रेम होते. त्यामुळे माझे अतिरेकीपद लयाला जाऊन मला महामहोपाध्याय ही पदवी त्यांनी बहाल केली होती. व्याकरणातल्या एखाद्या पॅटर्नवर कोणाच्यातरी शंकेचे निरसन करताना चर्चा सुरु झाली की, 'हं, महामहोपाध्यायांचे काय मत?' असे मिश्कीलीने विचारायचे. क्लासमध्ये बर्‍याच वेळा चर्चा करून समजावून देताना विषयांतर व्हायचे त्यावेळी कोणत्याही विषयावर ते परखडपणे कितीही वेळ बोलू शकत. मूळ मुद्द्यापासून लांब गेलो हे त्यांच्या लक्षात आले की 'असोsss' असे म्हणून मूळ चर्चेकडे, गाडीने सटकन रूळ बदलावे तसे वळायचे. कोणी टोप्या लावायचा प्रयत्न केला की 'नारहोदोsss, नारहोदो नेsss' असे म्हणत हसरा चेहेरा करून असे काही डोके हालवायचे की समोरचा ओशाळून त्याला आपली चूक लगेच समजून यायची. त्यांना जपान बद्दल आणि जपानी भाषेबद्दल अपार प्रेम. मी अलीकडच्या काळात जपानला जाऊन असल्यामुळे त्यांना काही न पटणार्‍या गोष्टी सांगितल्या की 'अशक्यsss' असे जोरात म्हणून त्यांचे एक नेहमीचे आणि आवडते उदाहरण सांगायचे, 'तुम्ही रेल्वे फलाटावर उभे आहात, गाडीची वेळ ९:३० आहे, बरोबर ९:३० ला डोळे बंद करून पाय उचलून पुढे टाका तो गाडीच्या उघड्या दारातून आत पडलाच पाहिजे, असा आहे जपान!' त्यांच्या तोंडून जपानबद्दलचे आणि तिथल्या अनुभवांचे किस्से ऐकणे म्हणजे खुद्द व्यासांच्या तोंडून महाभारताचे किंवा वाल्मीकीच्या तोंडून रामायणाचे कथाकथन ऐकण्यासारखेच असते.

माझ्यावर त्यांचा जरा जास्तच जीव असल्यामुळे त्यांच्याबरोबर एकदा 'बैठक' करायची माझी खूप इच्छा होती. त्यांना एकदा धीर गोळा करून तसे विचारलेही. त्यावेळी माझ्या खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, 'जरी तू माझा विद्यार्थी असलास तरी एक नोकरपेशा व्यक्ती आहेस त्यांमुळे काहीच हरकत नाही.' हे ऐकल्यावर मला जो काही आनंद झाला होता तो शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. त्यांच्याबरोबरच्या 'बैठकी'च्या वेळी असंख्य विषयांवर गप्पा व्ह्यायच्या. त्यावेळी स्वतःच बोलत न राहून समोरच्याचे बोलणे मन लावून ऐकून समोरच्याला जिंकून घ्यायची एक विलक्षण पद्धत आहे त्यांची. दुसर्‍यांदा जपानवरून आल्यावर त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी परत एकदा त्यांच्याबरोबर 'बैठक' जमवण्याचा योग जुळून आला त्यावेळी ते जे म्हणाले ते आजही हृदयात कोरून ठेवले आहे, 'ब्रिजेश, आपले नाते आता गुरु-शिष्य ह्या नात्याला पार करून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे, गुरुला आपल्या शिष्याची प्रगती बघण्यात एक वेगळाच आनंद असतो, तु आणि तुझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी तो मला मिळवून दिला ह्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे.' साधेपणाने जगणारा हा मनस्वी माणूस सगळे आयुष्य जपानी भाषेवर प्रेम करत ती शिकवण्यासाठी खर्च करत आलेला आहे. मी जपानवरून त्यांच्यासाठी साकेची एक दुर्मिळ बाटली घेऊन आलो होतो, ती बाटली घरी न नेता तिथेच लगेच क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी वाटून टाकली ह्यातच त्यांच्या साधेपणाचे सार आहे.

त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय बॉटनी होता (त्यामुळे मला त्यांनी मला सुरुवातीला बॉटनी डिपार्टमेंटमध्ये भेटायला बोलवले होते). समुद्र शैवालावर पोस्ट डॉक्टरल रिसर्च करायचे असे जेव्हा त्यांनी ठरवले तेव्हा जपानमध्ये त्यावर खूप संशोधन झाले आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी जपानला जायचे निश्चित केल्यावर ती भाषा यायला पाहिजे म्हणून ती भाषा शिकण्याची तयारी त्यांनी केली.

त्या अभ्यासापासून सुरू झालेला जपानी भाषेचा त्यांचा प्रवास, जपानमध्ये राहून जपानी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, जपानच्या नागोया विद्यापीठात पोस्ट डॉक्टरल रिसर्च करताना प्रतिष्ठेची 'मोम्बुशो स्कॉलरशिप' मिळवणे (१९८२-८३), पुणे विद्यापीठात जपानी भाषेच्या अभ्यासाची पाळेमुळे खोल रुजवणे, डॉ. दामल्यांबरोबर पुण्यात जपानी शिक्षकांची एक संघटना (Japanese Language Teachers' Association, JALTAP) उभी करून तिचे 'प्रेसिडेंट' पद भूषवणे, असंख्य मराठी विद्यार्थ्यांना जपानी शिकणे सोपे जावे म्हणून 'सुलभ जपानी व्याकरण (भाग १-२)' हे पुस्तक लिहिणे आणि अतिशय आत्मीयतेने जपानी शिकवणे असा आजतागायत सुरू आहे.

आज मला जे काही थोडे फार जपानी समजते (असे मला वाटते) ते या हाडाचे शिक्षक असलेल्या किंकर सेन्सेईंमुळेच! म्हणूनच माझ्या आयुष्यात त्यांची भेट होणे, त्यांच्याशी ऋणानुबंध जुळणे, त्यांच्याशी असलेले नाते गुरु-शिष्याच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक पातळीवर येणे हे सर्व एका दैवी संकेतानुसार झाले असे मी मानतो.

साहित्यिकप्रकटनलेख

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

26 Jun 2012 - 11:34 pm | शिल्पा ब

ओळख आवडली.

Chandu's picture

13 Aug 2019 - 10:03 pm | Chandu

पूर्वीच्या काळी पुण्यात नारायण पेठेमध्ये माती गणपती जवळ जोशी किंकर क्लासेस होते त्यापैकीच हे किंकर सर का?

शैलेन्द्र's picture

27 Jun 2012 - 12:07 am | शैलेन्द्र

ओळख आवडली, किंकर आजही आहेत का डिपार्ट्मेंटला?

नाही, सेन्सेई ५ वर्षांपूर्वी रिटायर झाले.

-(किंकर सेंसेईंचा गाकसेई) सोकाजी

खेडूत's picture

27 Jun 2012 - 12:43 am | खेडूत

परिचय आवडला!

मुक्त विहारि's picture

27 Jun 2012 - 2:09 am | मुक्त विहारि

मस्तच...

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2012 - 2:50 am | प्रभाकर पेठकर

मस्त लेख. फक्त मधे मधे आलेल्या जपानी शब्दांचे मराठी अर्थ दिले असते तर आम्हा पामरांना कांही अर्थबोध झाला असता.

रेवती's picture

27 Jun 2012 - 4:52 am | रेवती

वाह! छानच.

सहज's picture

27 Jun 2012 - 6:37 am | सहज

लेख आवडला.

मराठमोळा's picture

27 Jun 2012 - 6:50 am | मराठमोळा

मस्त अनुभव हो सोत्रि,
अनुभव मांडणी + व्यक्तीचित्रण आवडले. :) फारच आत्मीयतेने लिहिलय. ( त्यामुळे खोडकरपणा करणार होतो तो करत नाही )

५० फक्त's picture

27 Jun 2012 - 7:55 am | ५० फक्त

मस्त लिहिलं आहेस रे, आवडलं. आणि व्यक्ति परिचयापेक्षाही तुझ्यातला विद्यार्थी जास्त आवडला, नाहीतर आम्ही...

पैसा's picture

27 Jun 2012 - 8:40 am | पैसा

जपानी गुरुजींची छान ओळख करून दिलीस सोत्रि!

विंजिनेर's picture

27 Jun 2012 - 8:58 am | विंजिनेर

आपटेरोडवरच्या मिचिको तेण्डुलकर-सेन्सेईची पण अशीच ओळख करून द्या

<<आपटेरोडवरच्या मिचिको तेण्डुलकर-सेन्सेईची पण अशीच ओळख करून द्या

आपटे रोड म्हणजे त्या पुण्यात असतात का? मी शिवाजीपार्क दादरला असतात असं ऐकलं होतं.

स्वारगेटला, मुकुंदनगरमधे जालतापचे आॅफिस आहे तिथे त्यांचा पत्ता मिळेल.

>>स्वारगेटला, मुकुंदनगरमधे जालतापचे आॅफिस आहे तिथे त्यांचा पत्ता मिळेल.
धन्यवाद.

आॅफिसमधे केवलेसेन्सेईं बद्दल चौकशीकरा त्या तुम्हाला पुर्ण सहकार्य करतील.

प्रचेतस's picture

27 Jun 2012 - 9:08 am | प्रचेतस

व्यक्तिचित्रण आवडले.

स्पंदना's picture

27 Jun 2012 - 11:02 am | स्पंदना

खुपच छान ओळख.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2012 - 11:33 am | मिसळलेला काव्यप्रेमी

+१

उदय के&#039;सागर's picture

27 Jun 2012 - 12:08 pm | उदय के'सागर

खुपच छान माहिती, ओळख आणि गुरूप्रेम :)

आजपर्यंत फक्त आई-बाबा/काका/मामा किंवा त्या वयाच्या (त्या जनरेशन च्या) लोकांकडुनच ऐकलं होतं कि त्यांच्या काळातले शिक्षक किती एकनिष्ठ आणि मनापासुन शिकवणारे होते (थोडक्यात फक्त व्यवसाय किंवा नोकरी म्हणुनच शिकवायचं अशी मानसिकता नसलेले) . पण आपल्या ह्या काळात / जनरेशन मधे पण असे शिक्षक आहेत हे ऐकुन खुप बरं वाटलं... खरंच!

हेवा वाटतो तुमचा कि तुमच्या कडे एका शिक्षकाबद्दल एवढा छान अनुभव आणि आठवणिंचा साठा आहे जो तुम्हि तुमच्या मुलांबरोबर शेअर करु शकता (जसं आज आपले आई-वडिल त्यांच्या शिक्षकांबद्दल सांगतात) :)

jaypal's picture

27 Jun 2012 - 1:29 pm | jaypal

स्वाती दिनेश's picture

27 Jun 2012 - 5:35 pm | स्वाती दिनेश

ओळख आवडली, आपल्या गुरुबद्दल खूप आत्मीयतेने लिहिलेले जाणवले.
स्वाती

वॉव सोत्रि!
मस्त लिहिलंत आपल्या जपानी भाषा-शिक्षकाबद्दल.
जपानी भाषा शिक्षकाचं आपल्या मनातलं स्थान अगदी उत्त्तम प्रकारे व्यक्त झालंय.
कोणत्याही भाषा शिक्षकाने ज्या विचारांच्या पार्श्वभूमीवरून अध्यापन कार्य करावं असं मला वाटतं, तुमचे किंकर सेन्सई त्याच पार्श्वभूमीवरून आणि अपेक्षित उच्च पातळीवरून भाषेच्या विद्यादानाचं काम करत होते हे जाणून नतमस्तक झालो आहे.
आपल्या एका शिक्षकाची आम्हाला सुंदर ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

स्मिता.'s picture

27 Jun 2012 - 7:23 pm | स्मिता.

लेख आणि सेन्सेईंची ओळख आवडली. वर अनेकांनी लिहिलंय तसं गुरूंबद्दलचा आदर, आत्मियता शब्दा शब्दात दिसून येतेय.

अवांतरः हलकटपणा नाही तर एक प्रामाणिक प्रश्न पडला की हे सेन्सेई मराठी बोलतात की त्यांची इंग्रजी/जपानीतली वाक्य तुम्ही मराठीत लिहिली आहेत?

एक प्रामाणिक प्रश्न पडला की हे सेन्सेई मराठी बोलतात

व्ही. एन. किंकर हे पुण्यातले मराठी सद्गृहस्थ आहेत त्यामुळे ते मराठीच बोलणार. हा प्रश्न का पडावा हे कळले नाही.

अवांतरः हलकटपणामुळेच एक प्रामाणिक प्रश्न पडला की लेख पूर्ण न वाचताच प्रतिसाद दिलात की काय? ;)

- (हलकट) सोकाजी

आंबोळी's picture

27 Jun 2012 - 9:18 pm | आंबोळी

सोत्री. लेख, परिचय खुपच आवडला!

पण मलाही स्मितासारखाच प्रश्न पडला होता.
तुम्ही सर्व ठिकाणी किंकर सेन्सेई अस लिहिल्यामुळे मला तर ते जपानी ग्रहस्थच वाटले. वर तुम्ही त्यांचे केलेले वर्णनही ते एक पुण्यात स्थाईक झालेले जपानी आहेत या आम्च्या गैरसमजाला पुष्टी देणारे आहे. (हसरा चेहरा, मृदू व्यक्तीमत्व वगैरे). शिवाय किंकर हे अडनावही जपानी शब्दासारखे वाटले सुरवातीला... अर्थात त्याला जोडलेल्या सेन्सेई शब्दामुळे तसे वाटत असेल.

सोत्रि's picture

27 Jun 2012 - 10:04 pm | सोत्रि

ओह्ह,

हा मुद्दा ध्यानात नव्हता आला. तसे वाटले असेल तर ती माझी चुक! :(
आता तुम्ही वरच्या प्रतिसादाला बुच मारल्यामुळे माझे अवांतर काही संपादित करता येत नाहीयेय म्हणून स्मिताची ही इथे जाहिर माफी मागतो त्या अवांतरातल्या हलकटपणाबद्दल. एक डाव माफी द्या स्मितातै _/!\_

पण तरीही म्हणून

(हसरा चेहरा, मृदू व्यक्तीमत्व वगैरे).

ह्यामुळे ते भारतीय नसून जपानी आहेत असे वाटणे हे जरा अतिशयोक्त आहे असे वाटत नाही का? भारतीय माणसं अशी असू शकत नाहीत का ?

- (हसरा चेहरा असलेला भारतीय) सोकाजी

स्मिता.'s picture

27 Jun 2012 - 11:02 pm | स्मिता.

एक डाव माफी द्या स्मितातै

अहो सोत्रि, अशी जाहीर माफी मागून मला अवघडल्यासारखं करू नका. माफी मागणे हे मिपाकरांच्या स्वाभावाच्या फारच विरूद्ध वर्तन आहे :P

माझ्या बाजूचे स्पष्टिकरण आंबोळी यांनी आधीच दिलेले आहे. किंकर हे नाव अगदीच अपरिचित असल्याने किंकर सेन्सेई हे जपानीच नाव वाटले तसेच लेखातही ते मराठी/पुणेकर असल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने गैरसमज झाला. लेख संपूर्ण वाचलाय बरं का ;)

साबु's picture

14 Aug 2019 - 4:17 pm | साबु

मला पण ते जपानी ग्रुहस्थ पण पुण्यात स्थायिक झालेले ..असे वाटले.

छान व्यक्तीपरिचय.

ही कांजी म्हणजे जपानी लिपी काय हो? कारण आत्तापर्यंत कपड्याना करतात ती एकच कांजी (स्टार्च) माहीत होती त्यात "वर्तमानपत्र, ब्रश आणि पाणी वापरून कांजी काढायचा सराव कसा करायचा हे प्रात्यक्षिकासहित शिकवले" हे वाक्य वाचून अजूनच गोंधळ झाला.

मृत्युन्जय's picture

28 Jun 2012 - 11:34 am | मृत्युन्जय

मस्त. ओळख आवडली.

मृत्युन्जय's picture

28 Jun 2012 - 11:35 am | मृत्युन्जय

मस्त. ओळख आवडली.

मदनबाण's picture

28 Jun 2012 - 12:04 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)

किंकर सेन्सेई बद्दल मी माझ्या सेन्सेई कडून कायमच ऐकत आलो आहे. आज त्यांचा संपूर्ण परिचय मराठीत वाचून खूप आनंद झाला.

सुंदर ओळख. त्यांच्याबद्दल फार ऐकलं आहे.
त्यांची पुस्तके फार सुंदर आहेत!

फोलपट's picture

5 Aug 2019 - 11:26 pm | फोलपट

खूप छान लेख. किनकर सेन्सेई नाव वाचताच 20 वर्ष मन मागे पोचले. रानडे मधे जापानी शिकत असताना यांचे नाव फार आदराने घेतले जायचे. दुग्ध शर्करा योग असा की एका कार्यक्रमात आमच्या क्लास मधे येणे झाले. पुर्ण वातावरणावर कब्जा करून गप्पा मारत चेष्टा मस्करी करत वेळ कसा गेला कळलेच नाही. ते व्यक्तीमत्व कायमचं स्मरणात राहिले. इतके की आज नुसते नाव वाचताच quick retracing of memories झाले. धन्यवाद.. कांजी मुळं खरं तर भितीने जापानी सुटलं... तुमचा लेख वाचून त्यांचं पुस्तक आणावे म्हणते. अर्ध्यावर सोडले लेख काम पूर्ण करावे च म्हणते.

सोत्रि's picture

6 Aug 2019 - 6:52 am | सोत्रि

कांजीची भिती बाळगू नका, पुस्तक आणा आणि सुरू करा अभ्यास परत! गाम्बात्ते कुदासाई!

- (गाकसेई) सोकाजी

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 4:27 am | तमराज किल्विष

पुस्तकांची नावे व किंकर यांचे पुर्ण नाव दिलं तर छान होईल.

सुलभ जपानी व्याकरण (भाग 1 आणि 2)

व्हि. एन. किंकर

- (गाकसेई) सोकाजी

तमराज किल्विष's picture

9 Aug 2019 - 7:19 am | तमराज किल्विष

धन्यवाद सर.

जॉनविक्क's picture

9 Aug 2019 - 10:45 am | जॉनविक्क

किंकर शब्दाने कुतूहल चाळवले गेले म्हणून धागा वाचायला घेतला आणि...

व्यक्तीचित्रण वाचून मन अजून प्रसन्न झाले.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 7:34 am | तमराज किल्विष

सोत्रि जी आपणास वेळ मिळेल तसे जपानी भाषेची तोंडओळख, जपानी कथा, लोककथा, कला, जीवनमान याविषयी मिपावर अवश्य लिहा.

गामा पैलवान's picture

15 Aug 2019 - 11:58 pm | गामा पैलवान

सोत्रि,

व्यक्तिचित्रण आवडलं. श्री. किंकर हे एक ज्ञानी व खेळकर व्यक्तिमत्व दिसतंय.

एक अवांतर विनंती आहे. जपान व जपानी ही नावं इंग्रजीतनं आलेली आहेत. इंग्रजीतही ती मूळची नाहीत. युरोपात जपान हा शब्द आणला तो पोर्तुगीजांनी. पोर्तुगीज भाषेत यपान ( = iiapan) हा उच्चार japan असा लिहिला जाऊ लागला. पोर्तुगीजांना मलयभाषिक व्यापाऱ्यांनी जेपांग ( = jepang) असा काहीसा उच्चार सांगितला होता म्हणे. निदान विकी तरी असं म्हणतो.

एकंदरीत हा प्रकार इंग्रजीतनं (डोळे झाकून ?) मराठीत आला आहे. तर जपान ला मराठीत प्रतिशब्द काय असावा? मी निपुण वा निपुणदेश असा सुचवतो. तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.

सोत्रि's picture

16 Aug 2019 - 10:41 am | सोत्रि

जपानचं नाव निहोन किंवा निप्पोन असं आहे.

日本 - निहोन, 日 - सूर्य आणि 本 - आरंभ, मूळ
म्हणजे उगवत्या सूर्याचा देश.

निप्पोनचा अपभ्रंश होत होत जपान झालं असावं!

- (निहोंगो नो गाकसेई) सोकाजी

अनिंद्य's picture

16 Aug 2019 - 10:52 am | अनिंद्य

परिचय आवडला.