डिप्रेशन - भाग 2

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
14 Aug 2019 - 10:43 pm

डिप्रेशन विषयावर मायबोलीवर काढलेल्या धाग्यावर 2 - 3 प्रतिसाद लिहिले , तेच या धाग्यात इथे देत आहे ..

डिप्रेशन असलेल्या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून , थोडक्यात आपल्या आयुष्याच्या पॉजिटिव्ह बाजूकडे पाहून - अनेकांच्या तुलनेत आपण किती सुदैवी आहेत हे पाहून आनंदी राहावं असं बहुधा अनेकांना वाटतं .

साधारण याच विचारसरणीतून - " तुला काय कमी आहे ? घर - पैसाअडका आहे , देवाने धडधाकट शरीर दिलं आहे ... तुला माहीत नाही लोक कसे जगतात , धड डोक्यावर छप्पर नाही - कसल्या नोकऱ्या कराव्या लागतात - कसं भागवतात , अंध , हात नसलेली , पाय नसलेली माणसंही आनंदात राहतात - कोणी जीव द्यायचं म्हणत नाही ... आणि तुला सगळं आहे तर किरकिर करतो आहेस ... " अशी विचारसरणी उद्भवते , काहीजण बोलून दाखवतात , काहीजण मनात ठेवतात ...

डिप्रेशन ही चॉईसने स्वीकारलेली गोष्ट नाही . डिप्रेस राहायचं की डिप्रेशनमुक्त राहायचं ही गोष्ट त्या व्यक्तीच्या हातात असत नाही . साधी सर्दी किंवा डोकेदुखी सुद्धा आता डोकं दुखणं किंवा सर्दी पुरे असं म्हणून थांबवता येत नाही ..... औषध घेतलं नाही तर सर्दी किंवा डोकेदुखी आपापला टाईम पूर्ण करून मगच थांबतात किंवा दुसरा कुठलाही शारीरिक आजार उपचाराअभावी - पथ्याअभावी बरा होत नाही ... मग डिप्रेशन त्या व्यक्तीने आपलं आपण ठरवून बरं करावं ही अपेक्षा किती अवाजवी आहे , हे लोकांच्या लक्षात न येणं दुर्दैवी आहे ....

मान्य आहे की डिप्रेशन बरं होणं हे त्या व्यक्तीच्या विचारांच्या दिशा बदलण्यावरच अवलंबून असतं ... आणि योग्य ते समुपदेशन , जीवनशैलीत योग्य बदल , मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी करणं आदी अनेक गोष्टींनी हळूहळू ती बदलता येते ... पण डिप्रेस व्यक्तीना सुरुवातीला आपल्याला काही आजार आहे हे स्वीकारणं कठीण असतं आणि स्वीकारला तरी त्यातून ऍट विल बाहेर पडणं सहज शक्य नसतं ... विल पॉवर ही लागतेच पण डिप्रेशन मधून बाहेर पडणं ही एक प्रोसेस आहे , ठरवलं की आता डिप्रेशन बास - आता पॉजिटिव्ह गोष्टींकडेच पाहायचं फक्त .. की लगेच डिप्रेशन बरं झालं असं होतं नाही ... त्यासाठी वेळ , मेहनत आणि प्रयत्न करावे लागतात ... बाहेर पडण्याची इच्छा असूनही स्वतःचे विचार , वेदना कंट्रोल करता येत नाहीत ... रक्त भळभळणारी जखम असावी पण कुणाला दिसत नाही , दाखवता येत नाही , भरून येत नाही , मलमपट्टीही करता येत नाही अशी अवस्था असते ... ह्याहून खरोखरच्या शारीरिक वेदना परवडल्या असत्या असं वाटतं .. जगण्याची इच्छा हरवणं किंवा रोजच्या कामांचाही उत्साह न वाटणं हे कुणी ठरवून का ओढवून घेईल ? नॉर्मल होण्याची इच्छा असून होता येत नाही ... कुठलाही आजार फक्त ठरवून बरा होत नाही तेवढंच नैसर्गिक हेही आहे ... फक्त इतर आजारांचे उपचार आपल्याला माहीत असतात , या प्रॉब्लेमचा उपचार कसा करायचा हे बहुतेकांना समजत नाही त्यामुळे त्यात नाईलाजाने अडकून राहावं लागतं ....

हे मी गंभीर लेव्हलच्या डिप्रेशनबद्दल बोलत आहे ... ज्यांचं डिप्रेशन फार गंभीर नाही , डिप्रेशन हा आजार आहे हे ज्यांना समजलं आहे आणि त्यातून बरं होण्यासाठी जे प्रयत्न करण्यास तयार आहेत , त्यांना ठरवून पॉजिटिव्ह विचार करणं वगैरे शक्य आहे ...

मुळात ज्या डिप्रेशनग्रस्त लोकांना - हा आपल्याला आजार झाला आहे , निगेटिव्ह विचार हे केवळ या आजाराचा परिणाम आहेत , आजार बरा होणं आपल्या हातात आहे आणि तो बरा झाला की हे विचारही नष्ट होणार आहेत .. हे स्वीकारता येत नाही - समजत नाही ... त्यांच्याकडून विचाराची दिशा बदलण्याची अशी अपेक्षा करणं खरंतर अज्ञानातून आलेलं असतं .

ज्यांना समजलं आहे त्यांनाही ठरवून पॉजिटिव्ह विचार करणं कठीण जातं ..... तर जे मुळातच आजार आहे, हे मान्य करायला तयार नसतात त्यांच्यासाठी तर ती आणखीच कठीण गोष्ट असते .

दुसरा प्रश्न

दुसरे असे की अशा व्यक्ती खुप चिडचिड पण करु शकतात तेव्हा त्यांच्या जवळच्या व्यक्तींची ते सहन करायची मर्यादा संपू शकते. तेव्हा अशा परिस्थितीत त्यांनी किती सहन करायचं ? काय करायचं ?

याचं माझ्यामते उत्तर हे आहे -

गंभीर शारीरिक आजार होतात तेव्हा दैनंदिन कामकाजातून सुट्टी घेता येते .. सिकनेस लिव्ह असते .. डोकेदुखी - पोटदुखी सारख्या लहानसहान आजारांनाही एक - दोन दिवस विश्रांती घेता येते ... मुख्य म्हणजे हे आजार साधारण किती दिवसात बरे होणार हे माहीत असतं , उपचार चालू आहेत तेव्हा बरे होणारच हा दिलासा असतो ..

पण डिप्रेशनला टाईम फ्रेम नाही ... की 2 दिवसात किंवा 2 महिन्यात तरी बरा होईलच .. उपचार माहीत नसतात / मिळत नाहीत .. शिवाय शारीरिक आजारांसारखा नुसती विश्रांती घेऊन बरा होण्यासारखाही हा आजार नाही ... त्यामुळे दैनंदिन कामं , जबाबदाऱ्या यांच्याकडे त्या व्यक्तीला पाठ फिरवता येत नाही .....

जर कुठल्याही औषधाने डोकेदुखी थांबत नसेल , डॉक्टरांनीही सांगितलं - अमुक बिघाड झाला आहे पण याला उपाय नाही , शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे चान्सेस जवळपास शुन्य आहेत तर नाईलाजाने त्या व्यक्तीला डोकेदुखी स्वीकारावी लागेल आणि तिची सवय करून घ्यावी लागेल , आयुष्याच्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून शांत बसता येणार नाही .. पण सतत डोकेदुखीने त्या व्यक्तीला लहान लहान कामंही मोठ्ठं ओझं किंवा त्रास वाटू लागतील किंवा कामातला आनंद - समाधान नष्ट होईल .. कार्यक्षमता , सहनशक्ती , समजूतदारपणा कमी होईल ... छोट्या नेहमीच्याच कामात सगळी शक्ती खर्च होऊन जाईल , सगळी नेहमीची कामं विल पॉवरच्या जोरावर करावी लागतील ... अशा व्यक्तीची साहजिकच चिडचिड होईल आणि बाहेरच्यांवर तर राग काढता येत नाही त्यामुळे तो घरच्यांवर / जवळच्यांवर निघण्याची शक्यताच जास्त ... डिप्रेशनग्रस्त लोकांचंही हेच होतं . बायपोलार सारख्या प्रकारात ही चिडचिड अधिकच वाढते , समजून घेण्याची क्षमता खूप घटलेली असते ..

शारीरिक वेदनेत काय होत आहे हे रुग्णाला समजतं तरी , मानसिक वेदनेत आपल्याला धड काय होत आहे , सगळं अचानक एवढं कठीण - तापदायक का वाटू लागलं आहे समजत नाही मनाचा गोंधळ उडालेला असतो .. मानसिक आजार आहे मान्य करायला तयार नसतात , अपमान समजून , अज्ञानामुळे .... गोड - प्रेमळ शब्दात मानसिक आजार आहे , हे गळी उतरवणं आणि योग्य ट्रीटमेंटसाठी कबुली घेणं हाच मार्ग आहे ...

जवळच्या लोकांनी अशावेळी - रडणाऱ्या बाळामुळे जशी आपण आपली सहनशक्ती संपू देत नाही , त्याला शांत करण्याचे प्रयत्न करतो ती मनोभूमिका घ्यावी ... रडणाऱ्या बाळावर संतापून , ओरडून किंवा त्याला रडत ठेवून निघून जाण्यात अर्थ नसतो , तिन्ही गोष्टी बाळासाठी घातक .... सदर व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे याचा विचार करून ठरवावं आपल्याला काय जमणार आहे ते ... आपल्या मनःस्वास्थ्यासाठी त्या व्यक्तीला टाळायचं की त्याला सपोर्ट करून बरं व्हायला मदत करायची हे ज्या - त्या रिलेशनच्या क्लोजनेस वर अवलंबून आहे .... मित्रमंडळी टाळू तरी शकतात , जवळच्या नात्यांनी शक्यतो टाळू नये ... शेवटी मित्र किंवा नातेवाईक एका मर्यादेपर्यंतच मदत करू शकतात , बरं होण्यासाठी मानसिक परिश्रम त्या व्यक्तीलाच घ्यावे लागतात पण मित्र आणि कुटुंब त्याचं जीवन थोडं सुसह्य करू शकतात , ते त्यांनी शक्य असल्यास जरूर करावं .. कंटाळून पाठ फिरवू नये .. शारीरिक आजाराला जेवढया सहानुभूतीने वागू तेवढ्याच सहानुभूतीने त्या व्यक्तीकडे पाहिलं तर सहनशक्ती संपणार नाही ...

डिप्रेशन असलेले लोक ज्या हर्ट करणाऱ्या गोष्टी बोलू शकतात , भांडण उकरून काढू शकतात , आक्रस्ताळेपणा करतात ..... ज्याने आपल्याला वाईट वाटतं - मनस्ताप होतो .. त्याच्या 100 पट मनस्ताप 24 तास त्यांच्या मनात अविरत चालू आहे हे लक्षात घ्यावं . सतत 2 - 4 महिने डोकं किंवा पोट दुखत असलेला माणूस चिडचिड करणं आपण जसं समजून घेऊ तसंच यांची चिडचिड मनावर अजिबात परिणाम करून न घेता पाहावी .... समोरचा शांत राहिला की एका बाजूने किती चिडचिड करणार ? समोरच्याने वाद घातला की आगीला हवा घातल्यासारखं होतं ... समोरचा जर बर्फासारखा थंड ( आणि सपोर्टिव्ह सुद्धा . थंड याचा अर्थ त्या व्यक्तीच्या भावनांबद्दल सहानुभूतीशून्य - बेफिकीर नाही ) राहिला तर त्यांचा आवेश आगीला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे आपोआपच विझून जाईल ... आणि थोडं समजूतदारपणे ऐकून घेण्यासारखी मनस्थिती तयार होईल .... वाद घालण्याची चूक करू नये ... इथे त्याला चूक सिद्ध करणं किंवा तो कसा चुकतो आहे , आपलं कसं बरोबर आहे हे त्या व्यक्तीला पटवून देणं ( जे 2 नॉर्मल व्यक्तींच्या वादात / भांडणात मुख्य उद्दिष्ट असतं ) .. हे ध्येय ठेवायचं नाही , आपला मुद्दा निर्विवाद सिद्ध करणं हा या बाबतीत विजय नाही ... त्या व्यक्तीला बरं करणं हा विजय असणार आहे ...हे ध्येय ठेवून तिच्यासोबत वागायचं आहे .... त्यासाठी वादातले लहानसहान पराजय स्वीकारायला हरकत नाही .... मुळात त्या व्यक्तीची मनस्थिती जास्तीत जास्त शांत कशी राहील हे पाहावं .... तिच्यातल्या भांडणाच्या खुमखुमीला काही प्रोत्साहनच द्यायचं नाही ...

काही डिप्रेशन नसलेल्या व्यक्तीही रागाच्या भरात भयंकर काहीतरी बोलून जातात - पण शांत झाल्यावर त्यांची त्यांनाच लाज वाटते - तसं काही त्यांच्या मनात अजिबात नसतंच पण रागाच्या भरात जिभेवर काही ताबा राहत नाही .. तसंच डिप्रेशनग्रस्त लोकांच्या बाबतीत अधिक प्रमाणात घडतं .. जवळच्यांनी डोक्यावर बर्फ ठेवावा ... एखादा माणूस दारूच्या नशेत धमक्या देत असेल तर दुर्लक्ष करतात कारण नशा उतरल्यावर तो नॉर्मल होणार हे माहीत असतं तेवढंच डिप्रेशनग्रस्त लोकांच्या प्रचंड निराशावादी / बोचणाऱ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं , तो त्या आजाराचा नैसर्गिक परिणाम असतो ...

तिसरा प्रश्न

डिप्रेशनला ज्या हार्मोन्सचा अभाव कारणीभूत होतो ती नैसर्गिकरित्या अन्नापदार्थात आढळतात का म्हणजे अन्नातून त्यांचं सेवन करता येऊ शकेल ...

ही रसायनं नैसर्गिकरित्या काही अन्नपदार्थात आढळत असतील असं वाटत नाही ... एकूणच आहार संतुलित व पोषक करणं थोडीफार मदत करू शकतं ... काही जणांना डार्क चॉकलेटने तात्पुरता काही वेळापुरता मूडमध्ये फरक पडतो .... या रसायनांच्या निर्मितीसाठी मदत करणाऱ्या गोष्टींच्या अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा -

https://m.divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAG-nishigandha-vyavahare-wr...

सिमेंटच्या जंगलातून थोड्या वेळासाठी का होईना बाहेर पडून शुद्ध निसर्ग , कमी किंवा नगण्य गर्दी असलेल्या परिसरात वेळ घालवल्यास मनावरचा ताण कमी होऊन आवश्यक ती हार्मोन्स निर्माण होऊ शकतात निदान तात्पुरती तरी ... प्रत्येकाला सूट होणारे उपाय शोधणं भाग आहे .. कुणाला संगीताने प्रसन्न वाटेल तर कुणाला विनोदी मालिका / "चित्रपट पाहून तर कुणाला लांबवर चालायला गेल्यावर , एकाचा उपाय दुसऱ्याला उपयोगी ठरेलच असं नाही , आपल्याला कोणती गोष्ट शांत किंवा स्थिर - स्टेबल करते त्यानुसार निवड करावी त्या व्यक्तीने . व्यायामामुळे ही रसायनं झरतात असं वरच्या लिंक वरील लेखात म्हटलं आहे .. त्या व्यक्तीला राजीखुशी तिला सूट होईल असा व्यायाम करायला तयार करता आलं तर पाहावं ... व्यायामाची सवय नसेल तर सकाळी लवकर शुद्ध हवेत किंवा सायंकाळी चालायला जाणे हा एक चांगला पर्याय वाटतो ... सोबत असावी , एकट्याने अशा गोष्टी करण्याबद्दल या काळात अनिच्छा वाटू शकते ... सोबतीची गरज नसेल तर एकट्याला करू द्यावं ...

आहाराच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे या काळात म्हणजे डिप्रेशनचा त्रास होत असताना वजन कमी करण्यासाठी डाएट शक्यतो करू नये असं मला वाटतं ... आणि करायचंच असेल तर तज्ज्ञ डाएटीशिअन / फॅमिली डॉक्टर कडून नियोजित करून घ्यावं .. सकाळी ग्रीन टी किंवा चहा आणि मोजून 2 बिस्किटं , दुपारी दिड चपाती आणि भाजी आणि रात्री फक्त प्रोटीन पावडर घालून दूध ...असली स्वतःचं डोकं चालवून तयार केलेली अतरंगी डाएट कोणत्याही परिस्थितीत करू देऊ नयेत.... भात , गहू चपाती , दुधाचे पदार्थ - पनीर - चीज , अंडी , मांसाहार , भाज्या , डाळी - कडधान्य सगळं थोडं थोडं का होईना , योग्य त्या प्रमाणात शरीराला मिळेल असाच आहार असावा , शाकाहारी असल्यास प्रोटीनला योग्य तो पर्याय डॉक्टरना विचारून ठरवावा ... पण अर्धपोटी ठेवणारी डाएट अजिबात करू नयेत .... त्याने मुळातच बिघडलेला हार्मोनचा बॅलन्स अधिकच बिघडून सहनशक्ती फार कमी होते . पोटभरीचा पोषक संतुलित आहार असावा ....

जर माझ्या सांगण्यात काही चूक झाली असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांनी अवश्य दुरुस्ती करावी.

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

15 Aug 2019 - 12:05 am | जालिम लोशन

छान

जॉनविक्क's picture

15 Aug 2019 - 12:20 am | जॉनविक्क

दोसत १९७४'s picture

22 Aug 2019 - 10:19 pm | दोसत १९७४

डिप्रेशन हा खूपच बेक्कार आजार आहे. मी स्वतः यातून गेलेलो
आहे. आता ठीक आहे.

दोसत १९७४'s picture

22 Aug 2019 - 10:19 pm | दोसत १९७४

याच्यामध्ये मुख्य म्हणजे जवळच्या व्यक्तींना लक्षातच येत नाही की हा डिप्रेशनमध्ये आहे. आणि तिथूनच या आजाराची खरी सुरूवात होते.डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती तेव्हाच आपल्याला समजते जेव्हा तिने एखादी नोट पाठीमागे सोडून आत्महत्या केलेली असते

दोसत १९७४'s picture

22 Aug 2019 - 10:29 pm | दोसत १९७४

माफ करा. इंग्लिश शब्द वापरला
(नोट) चिट्ठी

यातून बाहेर पडल्याबद्दल आपलं अभिनंदन आणि पुढील निरामय मानसिक आरोग्यासाठी शुभेच्छा ...

* डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती तेव्हाच आपल्याला समजते जेव्हा तिने एखादी नोट पाठीमागे सोडून आत्महत्या केलेली असते *

जसजशी या आजाराबाबत जागृती होत जाईल तसं लोक हा आजार ओळखून उपचार / समुपदेशन घेण्याचा / त्या व्यक्तीला उपलब्ध करून देण्याचा मार्ग अवलंबतील अशी आशा आहे ... युरोपीय देशांमध्ये या आजाराबद्दल जागृती झालेली असल्याने तिथे डिप्रेशनग्रस्त व्यक्तींना योग्य ती ट्रीटमेंट उपलब्ध होण्याचं प्रमाण इथल्यापेक्षा खूप जास्त आहे ....

विनिता००२'s picture

23 Aug 2019 - 2:22 pm | विनिता००२

चांगले लिहीताय निशापरी :)

मी स्वतः डिप्रेशनमधून बाहेर आलेय, त्यामुळे तुम्ही म्हणताय ते लक्षात येतय.

तेव्हा मला सावरायला कोणीच नव्हते, ना नातेवाईक, ना मित्रमंडळी.
खरे तर मित्रमंडळी खूप आधार देतात, माझे मैत्रिणींशी खूप छान बाँडीग आहे, पण तेव्हा कोणीच काही ना काही कारणांनी संपर्कात नव्हते.
फक्त आणि फक्त मुलाकडे पाहून मेंदूत काहीतरी झाले आणि विचारधारा बदलली. नाहीतर मी तेव्हाच आत्महत्या केली असती.