'पागोळी वाचवा'-अंमलबजावणी

सुनिल प्रसादे's picture
सुनिल प्रसादे in जनातलं, मनातलं
1 Aug 2019 - 7:25 pm

'पागोळी वाचवा अभियान'

अंमलबजावणी करताना -

'पागोळी वाचवा अभियान' जसं जसं पुढे सरकत आहे, तसं तसं लोकांनी त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आमलात आणण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरवात केली आहे. एखाद्या गोष्टीचा विचार करणं, ती समजून घेणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं वेगळं. एखादी गोष्ट प्रत्यक्षात करायला सुरुवात केली की त्यातले बारकावे समोर येतात आणि काहीवेळा संभ्रमाच्या स्वरूपात आपल्यासमोर उभे ठाकतात.
'पागोळी वाचवा अभियान' ची अंमलबजावणी सुरू करणारे काही लोक ह्याचा अनुभव सध्या घेत आहेत. त्यांचे अनुभव आमच्याबरोबर विभागून (share) घेत आहेत आणि एकमेकांच्या विचारांच्या देवाण घेवाणीतून पुढे मार्गस्थ होऊन त्यांचं उद्दिष्ट पुरं करीत आहेत.

अभियानांतर्गत सुचवलेले मॉडेल उभे करण्याचे पुढीलप्रमाणे तीन टप्पे आहेत.

1. स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणतेही उतरत्या छपराचे घर किंवा इमारत असेल तर त्याच्या छपराच्या दोन्ही किंवा चारही बाजुंना अगोदर लावलेली नसतील तर पन्हळी लावून घेणे. सर्व बाजुंनी एकाच वेळी पन्हळी लावणे एखाद्याला शक्य नसेल तर अर्ध्या बाजुंना लावून घेणे. स्लॅबच्या घरांबाबत तो प्रश्न येणार नाही, कारण त्यांचे स्लॅबवरचे पाण्याचे आउटलेट घर बांधतानाच बाहेर काढलेले असतात.
2. त्या पन्हळींमधील आणि आउटलेट्समधून बाहेर पडणारे छपरावरचे पाणी पीव्हीसी पाईपने पाणी जिरवायच्या खड्ड्यापर्यंत नेणे, हा झाला दुसरा टप्पा.
3. आणि शेवटी, पाईपमधून वाहून आणलेलं छपरावरचं पाणी जिरवण्यासाठी 1मी×1मी×1मी लांबी, रुंदी,खोलीचा खड्डा खणणं, हा झाला तिसरा टप्पा.

खरं तर हे एव्हढं साधं आणि सोपं आहे. प्रत्यक्षात ते करायला सुरुवात केल्यावरदेखील पहिल्या दोन टप्प्यांपर्यंत कुणालाच काही अडचण येत नाही असं लोकांच्या सांगण्यावरून दिसतंय. परंतु खड्डा खणायची सुरवात झाली किंवा त्याचा विचार सुरू झाला की काही लोक संभ्रमात पडत आहेत. जे लोक अजूनही आपल्या जमिनीशी असलेली बांधिलकी जपून आहेत, त्यांना त्यांची जमीन पूर्णपणे ओळखीची असल्याने काहीच अडचण जाणवत नाही. परंतु काही लोकांच्या मनामध्ये खड्डा कसा खणावा आणि पुढे जाऊन तो कसा बांधावा ह्याविषयी संभ्रम निर्माण होत आहे असं आढळून येतंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जमीन आढळून येते. त्यामुळे खड्डा खणताना आणि नंतर तो बांधताना जरा काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्या बाबतीतले थोडे विवेचन पुढे केले आहे.

सर्वसाधारण काळजी घेण्याच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या जवळपास सर्वच खड्डयांना लागू होतील अशा पुढीलप्रमाणे आहेत.
1. खड्डा खणताना तो खालच्या बाजूला चारही बाजुंनी तीन ते चार इंचांनी निमुळता होत जाईल असा खणावा.
2. खड्डा जमिनीच्यावर शक्यतो वीट बांधकामाने बंदिस्त करून घ्यावा. दगड धोंड्यांवर माती चेपून केलेली बंदिस्ती अतिवृष्टीच्या वेळी वाहून जाण्याची शक्यता असते त्यामुळे खड्डयातील पाणी बाहेर वाहून जाऊन खड्ड्यामध्ये तयार होणारा दबाव कमी होऊन त्या ठिकाणचा जमिनीमध्ये पाणी जिरण्याचा वेग कमी होतो. विटांचे बांधकाम करताना ते दोन उभ्या एक आडवी असे न करता दोन्ही थर आडव्या विटांनीच बांधावेत, त्याने जास्त मजबुती मिळेल. गरजेनुसार त्याच्यावर अधिकचे बांधकाम करण्याची गरज जिथे लागेल तिथे नंतरचे बांधकाम सर्व साधारण पद्धतीने करावे.
बांधकाम करताना ते खड्डयाच्या वरच्या धारेच्या एक इंच आतमध्ये करावे आणि विटा व माती ह्यांच्यातील दीड दोन इंचाचा भाग मालाने ( मॉर्टर ) व्यवस्थित लिंपून घ्यावा. जेणेकरून पावसाच्या जोरदार माऱ्याने खड्डयाच्या धारा तुटण्यापासून वाचतील आणि माती खड्डयात पडणार नाही.

आता ठिकठिकाणच्या जमिनींच्या प्रकारानुसार काही ठिकाणी खड्डा तयार करताना काही विशेष काळजी घ्यावी लागेल किंवा काही बदल करावे लागतील.
1. घट्ट जमीन -
घट्ट आणि मध्यम स्वरूपाच्या घट्ट जमिनींमध्ये कोणतीही विशेष काळजी न घेता सांगितल्याप्रमाणे खड्डा करता येईल.
2. मऊसर जमीन -
मऊसर जमिनीवर जर थेट बांधकाम केले तर त्या बांधकामाला असलेला जमिनीचा आधार हा पावसाच्या पाण्याने जमीन मऊ होऊन कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे बांधकाम धोक्यात येऊन ते करण्याचा उद्देश विफल होऊ शकतो. अशा जमिनीवर बांधकाम करताना खड्ड्याच्या चारही बाजूंनी बांधकामाच्या खाली आठ ते नऊ इंच रुंदीचे कडाप्पे किंवा सिमेंटचे ढापे टाकावेत आणि त्यावर बांधकाम करावे, जेणेकरून ते टिकू शकेल.
3. ठिसूळ जमीन -
जमीन ठिसूळ असेल तर स्वतःच्या ताकदीवर ती उभी राहू शकत नाही. खड्डा खणायला घेतला तर चहुबाजूंनी तो ढासळत जाऊ शकतो. अशा ठिकाणी मात्र खड्डा चारही बाजूंनी तळापासून बांधून घेणे आवश्यक ठरेल. खड्डयाचा तळ मोकळा ठेवावा आणि बांधकामाच्या खाली चारही बाजुंनी आधारासाठी व्यवस्थित सोलिंग आणि काँक्रीट टाकून त्यावर विटांचे 'जाळीदार' बांधकाम करावे, जेणेकरून त्या जाळीतून खड्डयातील पाणी जमिनींमध्ये झिरपेल. त्यानंतर बाहेरच्या बाजूने खड्डा मातीने जमिनीच्या पातळीपर्यंत भरुन घ्यावा.
4. पाणथळ जमीन -
पाणथळ जमीन सुकी असतांनाच खड्डयाचे काम करावे. पाणथळ जमिनीत खड्डा करताना पावसाळ्यात त्या जमिनींमध्ये साठणाऱ्या पाण्याची अधिकतम पातळी लक्षात घेऊन खड्डयाचे बांधकाम त्या पातळीच्या वर जाईल ह्याची काळजी घ्यावी. एखाद्या वेळी बाहेरच्या पाण्याची पातळी वाढून ते खड्डयामध्ये गेले तरी काळजी करण्याचे कारण नाही.
5. जांभ्या कातळाची जमीन -
अशा प्रकारच्या जमिनींमध्ये काही ठिकाणी खड्डा खोदला जाऊ शकतो तर काही ठिकाणचा कातळ हा खूपच कठीण असतो. जिथे खड्डा खणणे शक्य आहे तिथे नेहमीसारखाच खाणावा. जिथे कठीण कातळ लागेल तिथे जमेल तितका परंतु किमान एक ते दीड फुटापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. अशा जमिनींमध्ये खड्डयातले पाणी जिरण्याचा वेग तुलनेने कमी होतो, त्यामुळे अशा ठिकाणचे बांधकाम जमिनीच्या वर जास्त उंचीपर्यंत करून घ्यावे. ज्या ठिकाणी पूर्ण खोली मिळाली आहे तिथे साधारण जमिनीवर दोन फूट आणि जिथे एक ते दीड फुटापर्यंत खाली जाऊ शकलो आहोत तिथे जमिनीच्या वर तीन ते साडेतीन फूट उंच बांधकाम करावे. ह्यामुळे जमिनीमध्ये जिरण्यासाठी पाण्याला पुरेसा वेळ मिळू शकेल.
6. काळ्या कातळाची जमीन -
काळ्या कातळाच्या जमिनीबाबत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.
वरील सर्वच ठिकाणी खड्डा खणताना आणि बांधताना स्थानिक गवंड्याचा सल्ला अवश्य घ्यावा.
खड्डया बाबतचे इतर तपशील 'पाण्याची शेती कशी करावी' ह्या लेखात व्यवस्थितपणे दिले आहेत.

सुनिल प्रसादे.
दापोली.
दि. 1ऑगस्ट, 2019.

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#RainwaterHarvesting
#PagoliWachawaAbhiyan

समाजलेखमाहिती

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Aug 2019 - 8:05 pm | मुक्त विहारि

मनापासून धन्यवाद. ...

इमारती पासून खड्डा किती लांब खणावा, म्हणजे इमारतीला धोका निर्माण होणार नाही? हे खास शहरांसाठी