माझी ओडिया

आळश्यांचा राजा's picture
आळश्यांचा राजा in जनातलं, मनातलं
21 Mar 2009 - 5:48 am

भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलीत असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेंव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी. इथे एका भाषातज्ञांनी तर संबलपुरी – ओडिया शब्दकोषच काढला आहे. भुवनेश्वरमध्ये सुरुवातीला आलो तेंव्हा सुलभाने एका अटेण्डण्टला विचारले, वो सुरेश को हिंदी आती नही क्या? तर तो म्हणाला, मॅडम, उसे तो ओडिया भी नही आती, वो संबलपुरीया है! संबलपूर भागातील जुनी माणसे अजून कटक – पुरी ला जायचे असेल तर म्हणतात, ओडिसा ला जायचे आहे! (इथे प्रादेशिकता फार. कटकिया, अंगुलिया, ढेंकेनालिया, संबलपुरिया, इ. ओडिया कुणीच नाही. बाहेरच्या माणसांनी या सर्वांना म्हणायचे.)

आपल्या प्रमाण मराठी मध्ये (असला काही प्रकार आहे हे गृहीतक !) जसे लिहिले असेल तसे उच्चारण असते (तुलना सोपी व्हावी म्हणून इंग्लिश शब्दांची उदाहरणे देतो) उदा. हॉटेल, बॅंक. हिंदीमध्ये उलट, जसा उच्चार तसे लिखाण उदा. होटल, बैंक. पण ओडियामध्ये उच्चार वेगळा, लिखाण वेगळे: म्हणतील होटेल आणि लिहितील हटेल. फोटो म्हणणार पण लिहिणार फट. लॉज म्हणणार पण लिहिणार लज. कॉट ला कट. (एकदा माझ्या असिस्टंटने सी ओ टी ऐवजी सी यू टी असेच स्पेलिंग लिहिले होते.) खरंतर इथे ओ पण स्पष्ट नसतो. अ, ओ आणि ऑ च्या मधला एक स्वर असतो. तोच ‘अ’ ला पण चालतो. बारकाईने ऐकला तर लक्षात येतो. कसे साधतात आश्चर्यच आहे. या भाषेत ‘व’ नाही. ‘व’ ला ‘ब’ म्हणतात. ‘व्ह’ ला ‘भ’ म्हणतात. ड्राइव्हिंग ला लिहितात ड्राइभिं. प्रभात ला प्रवात. स, श, आणि ष तिन्ही लिहितात वेगवेगळे, पण उच्चार एकच – स. म्हणूनच ओडिशा ला ओडिसा म्हणतात. (ओड्र विशय – ओडि विशा – ओडिशा). बऱ्याच जणांना हलका ‘ड’ चा उच्चार नीट जमत नाही. घोडा सडकपे दौडा असे म्हणणार – घोरा सरकपे दौरा. म्हणून ओरिसा. आपण मराठी बिचारे जसे ते बोलतात अगदी तसे बोलून दाखवतो – आपले संस्कार करत बसत नाही!

आम्हाला भाषा शिकवायला एक तज्ञ येत असत. त्रिपाठी नावाचे. ते म्हणायचे ओडिया इज ऍन ‘अ’फुल लॅंग्वेज! (अ चा उच्चार ऑ सारखा). म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी ‘अ’ हे जोडायचेच. हलन्त ठेवायचा नाही. म्हणजे अमिताभ नाही, अमिताभं. जोडाक्षरांची पण गंमत. इतर लिप्यांमध्ये एका ओळीत जोडाक्षरे असतात. इथे एकाखाली एक. त्यामुळे मुद्रणात अडचणी येतात. मग जोडाक्षर आले की फॉंट साइझ एकाच शब्दामध्ये दोन अक्षरांसाठी वेगवेगळा!

त्रिपाठी सर वयस्क असले तरी काळाच्या बरोबर चालणारे होते. त्यांनी ओडियातले बरेच बारकावे आम्हाला समजावून दिले. त्यांच्या मते भाषा जिवंत ठेवायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत तिने चालायला हवे. मोबाइल फोन, इंटरनेट वर सहज रीत्या व्यक्त होऊ शकली पाहिजे. त्यासाठी लिपीतले बोजड कालबाह्य प्रघात काढून टाकायला हवेत असे ते म्हणत. हिंदी, मराठी, बांग्ला, तेलुगु इ. भाषा ज्या गतीने इंटरनेट वर आणि मोबाइलवर पसरत आहेत त्या तुलनेत ओडिया बरीच मागे आहे याची त्यांना खंत वाटे. पण ते गप्प बसणारातले नव्हेत. भाषातज्ञ, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक आणि सॉफ्ट्वेयर डेव्हलपर्स च्या एका सेमिनार मध्ये त्यांनी आपले मुद्दे ठासून मांडले आणि मान्य करवून घेतले. या प्रयत्नांनी इंटरनेटवर ओडिया किती पसरते ते पहावे लागेल.

भाषेवर संस्कृतीची छाप असतेच असते. जसा लोकस्वभाव तशी भाषा. मराठी आणि उर्दू पहा. उर्दूतले आर्जव, ‘दरबारी’ औपचारिकता साध्या सरळ रांगड्या मराठीत नाही. ‘आइये, आइये, तशरीफ रखीये’ ला मराठीत म्हणतील, ‘या, बसा.’ त्याच न्यायाने ओडिया स्वभावही या भाषेत दिसतो. हे लोक बंगाली लोकांप्रमाणे बोलण्यात पटाईत. यांना संस्कृतचे फार प्रेम. आपल्याला एखादा शब्द आठवला नाही तर खुशाल संस्कृत शब्द ठोकून द्यायचा! उदाहरण म्हणून सांगतो, कमी दाबाचा पट्टा तयार होण्याला इथे ‘लघुचापसृष्टी’ म्हणतात! म्हणजे पारिभाषिक शब्द नव्हे, बोलण्यात वापरतात. एकदा मला माझ्या ऍकॅडेमीतल्या मॅडमना विचारायचे होते, आपली तब्येत बरी आहे ना? मी माझ्या अंदाजाने म्हणालो, आपणंकं प्रकृति भलं अछि तो? त्यांनी मला दुरुस्त केले – आपणंकं देहं भलं अछि तो? विचार करा मराठीत मी बाईंना विचारतो – आपला देह बरा आहे ना! बाई काय अर्थ घेतील सांगता येणार नाही. माणूस मरण्याला चक्क ‘नष्ट’ होणे म्हणतात. पण शब्द थोडे विचित्र असले तरी व्याकरण मराठीच्या तुलनेत फारच सोपे. क्रियापदाला ब, छ, ल जोडले की झाले भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ. म्हणजे मु खाइबि – मी खाईन, मु खाइछि – मी (नुकतेच) खाल्लेले आहे, मु खाइलि – मी खाल्ले. असो. बोलण्याची ढब अशी की आळसावून बोलल्यासारखी. (ओडिया लोक उद्योगी म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत.) म्हणूनच ते व, व्ह असले आवाज काढण्याचे कष्ट घेत नाहीत.

माझ्या हिंदी मित्रांना आश्चर्य वाटते की मी इथल्यासारखेच उच्चार कसे काय करू शकतो. पण त्यांना काय माहीत की मी आळश्यांचा राजा आहे, आणि ही माझीच भाषा आहे !

संस्कृतीभाषाप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

21 Mar 2009 - 7:35 am | घाटावरचे भट

आपणं मस्तं लिखछि... :)

प्रत्येक भाषेचा डौल निराळा, लहेजा निराळा. यानिमित्ताने ओडिसी भाषेची चांगली माहिती मिळाली.

अवांतर - मिपाची सदस्यसंख्या ४००० च्या वर गेल्याबद्दल मालकांचे आणि सर्व मिपाकरांचेदेखील अभिनंदन.

- (छापल्यासारखे बोलणारा) भटोबा

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:10 pm | आळश्यांचा राजा

लेखिछन्ति! धन्यवाद!

आळश्यांचा राजा

विसोबा खेचर's picture

21 Mar 2009 - 8:35 am | विसोबा खेचर

लेख अंमळ आवडला..

आळश्यांचा राजा, आळशीपणा सोड आणि अजूनही असंच छान छान लेखन कर! :)

तात्या.

आळश्यांचा राजा's picture

18 Apr 2009 - 10:26 am | आळश्यांचा राजा

तात्या,

प्रोत्साहन दिल्याबद्दल आपला आणि सर्वांचाच मनापासून आभारी आहे. सांगण्यासारखे काही सापडले तर इथे 'टाकीनच'. बाकी माझी 'शाणपट्टी' इथे असतेच!

आळश्यांचा राजा

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Mar 2009 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

राजाभाऊ.... मस्त लिहिलंय. प्रत्येक भाषेची मजा वेगळी. ओडिया सारख्या सहसा संपर्कात न येणार्‍या भाषेची छान ओळख करून दिली.

अवांतर: आपल्या आवडी जुळत आहेत एकदम.... आळस आणि भाषा वगैरे शिकणे. :)

बिपिन कार्यकर्ते

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:16 pm | आळश्यांचा राजा

धन्यवाद! आवडी जुळत आहेत म्हणण्यापेक्षा चरित्रं जुळतात म्हणूया. आळस ही आवड नसून तो पाचवीलाच पुजला आहे. भाषा शिकणे हा देखील छंद नव्हताच, पण शिकायचीच आहे तर कामचलाऊ का, ओडियांपेक्षा चांगली बोलूया - लिहूया असा 'शाणा' भाव त्यामागे आहे! ;)

खोबार वर आपण फिदा आहोत!

आळश्यांचा राजा

यशोधरा's picture

21 Mar 2009 - 2:50 pm | यशोधरा

मस्त आहे लेख.

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:17 pm | आळश्यांचा राजा

आभारी आहे!

आळश्यांचा राजा

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2009 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे

बोलण्याची ढब अशी की आळसावून बोलल्यासारखी.

म्हनुनच आळश्यांचा राजा अशी आयडी घ्यावीशी वाटली होय. एका बालकथेत "मला किनई लाडू तोंडात टाकायचा कंटाळा येतो" अस म्हणणारा आळशीबाळ आठवला.
सुंदर लेखन अजुन येउ देत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:21 pm | आळश्यांचा राजा

उद्योग करण्याची आवड अशी नाहीच, त्याला काय करणार काका? आपली अनुदिनी पहात असतो. बरं झालं ती नोकरी सोडलीत ते. माझ्यासारखे आळशी असता तर काही तुम्ही सोडली नसती म्हणा ! :)

आळश्यांचा राजा

सुनील's picture

21 Mar 2009 - 7:03 pm | सुनील

छान. लेख वाचून "मु तुमोकू भालोपायी" हे वाक्य (आणि तदनुषंगाने अनेक गोष्टी!) आठवल्या. असो.

काही वर्षांपूर्वी ओरीसातील बेरहामपूर येथे महिनाभर राहण्याचा योग आला होता. हा भाग आंध्रच्या जवळ. साहजिकच कटक-पुरी इ. ठिकाणांपेक्षा येथिल भाषा / संस्कृती / खान-पान जरा वेगळेच असावे.

तरीही, एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, सर्वसाधारण उडिया व्यक्तीचे मराठी माणसाबद्दल बरेच गैरसमज आहेत. १८ व्या शतकातील अनेक मराठी सरदारांनी तेथे भयंकर लूटालूट केली त्याचा पगडा तेथील मंडळींच्या मनात अजूनही आहे!

त्याच बरोबर बंगाल्यांच्याबद्दलही ह्यांच्या मनात किंचित असूयेची भावना आहे, असे लक्षात आले होते. त्यांच्या मते, "रसगुल्ला" खरे म्हणजे ओरीसाचा पण बंगाल्यांनी तो पळवला आणि त्याचे व्यवस्थित मार्केटींग करून, "आपलाच" म्हणून जगाला सांगितले! तीच गोष्ट संस्कृतीची. त्यांच्या मते बंगाल्यांची संस्कृती म्हणजे रविंद्र संगीत - जे जेमतेम १०० वर्षांचे जुने आहे. याउलट ओडीसी नृत्यप्रकाराला हजार वर्षांची परंपरा आहे.

आता आळस सोडून अजूनही लिहा. विशेषतः चिलका सरोवर, जगन्नाथ पुरी इ. ठिकाणांबद्दल.

जाता जाता - भुवनेश्वर हे राजधानीचे शहर अतिशय सुबक, सुंदर आणि नीट-नेटके आहे. किंबहुना ज्या फ्रेन्च नगररचनाकाराने चंडीगडची निर्मिती केली त्यानेच भुवनेश्वरही बांधले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:07 pm | आळश्यांचा राजा

तरीही, एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे, सर्वसाधारण उडिया व्यक्तीचे मराठी माणसाबद्दल बरेच गैरसमज आहेत. १८ व्या शतकातील अनेक मराठी सरदारांनी तेथे भयंकर लूटालूट केली त्याचा पगडा तेथील मंडळींच्या मनात अजूनही आहे!

खरे आहे. रा.स्व.स. चा इथे पगडा नसण्याचे कारणच हे आहे. संघाचे मुख्यालय नागपूर. नागपूरच्याच भोसल्यांनी ओडिशाला पिळून काढले. पण आता त्या आठवणी हळू हळू धूसर होत आहेत.


त्याच बरोबर बंगाल्यांच्याबद्दलही ह्यांच्या मनात किंचित असूयेची भावना आहे, असे लक्षात आले होते. त्यांच्या मते, "रसगुल्ला" खरे म्हणजे ओरीसाचा पण बंगाल्यांनी तो पळवला आणि त्याचे व्यवस्थित मार्केटींग करून, "आपलाच" म्हणून जगाला सांगितले! तीच गोष्ट संस्कृतीची. त्यांच्या मते बंगाल्यांची संस्कृती म्हणजे रविंद्र संगीत - जे जेमतेम १०० वर्षांचे जुने आहे. याउलट ओडीसी नृत्यप्रकाराला हजार वर्षांची परंपरा आहे.

हे पण बरोबर. मुळात इथे फार मोठा identity crisis आहे. ओडिशा नावाचे राज्य १९३५ पूर्वी अस्तित्त्वातच नव्ह्ते. बराचसा भाग बंगाल प्रांतात, काही मद्रास आणि उरलेला मध्य प्रांतात अशी वाटणी होती. बंगाल्यांवर यांचा विशेष राग आहे. रसगुल्ला सोडा, बंगाल्यांनी आमचे जयदेव (गीतगोविंद) आणि नेताजी सुभाषचंद्र पण पळवले म्हणतात! नेताजी कटकला लहानाचे मोठे झाले. हे लोक पण जबाबदार आहेत. यांच्यात उद्यम नाही. ओडिसी नृत्य, कोणार्कचे भग्नावशेष, खारवेलाचा धूसर, शंकास्पद इतिहास, आणि प्रभू जगन्नाथ यापलीकडे जाऊन आपली ओळख शोधावी असे कुणाला वाटत नाही. पण परिस्थिती बदलत आहे. मोठे उद्योग येत आहेत. लोकांकडे पैसा येत आहे. चित्र बदलेल.

भुवनेश्वर हे नियोजित शहर आहे. पण चंडीगड ची सर त्याला नाही. गेल्या दोन अडीच वर्षांत फार प्रगती झाली आहे खरी. सध्याच्या म्युनिसिपल कमिशनर एक फार चांगल्या अधिकारी आहेत. त्या चांगले वळण लावत आहेत.

आळश्यांचा राजा

धमाल नावाचा बैल's picture

21 Mar 2009 - 7:08 pm | धमाल नावाचा बैल

मस्त लेख

आमच्या आगामी लेखाच नाव - माझा मॅंगो
------
(माझं खोबार माझी ओडीया च्या यशानंतर ..लवकरच येत आहे माझा मॅंगो)

बैलोबा

क्रान्ति's picture

21 Mar 2009 - 7:36 pm | क्रान्ति

उत्तम लेख आहे. एका नव्या भाषेची ओळख झाली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

आळश्यांचा राजा's picture

21 Mar 2009 - 10:23 pm | आळश्यांचा राजा

बैलोबा, क्रांती

धन्यवाद!

आळश्यांचा राजा

भाग्यश्री's picture

22 Mar 2009 - 12:52 am | भाग्यश्री

वाह सही आहे हे ! ओरिसा बद्दल काहीही माहीती नाहीए(याची लाजच वाटली पाहीजे खरं!) पण तुमच्या लेखाने काहीतरी कळले..
येऊदे अजुन...

नंदन's picture

22 Mar 2009 - 8:50 am | नंदन

अतिशय आवडला. 'अ' च्या 'ओ/ऑ' करण्याने बर्‍याचदा 'ध'चा 'मा' होऊ शकतो. कॉलेजमधल्या एका उडिया मुलाने हरमन नावाच्या पंजाबी मुलाला सगळ्यांसमोर 'हॉर्मोन' म्हणून गोरेमोरे केले होते, तो धमाल किस्सा आठवला :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी