वजनाचा काटा --भाग १०झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय
आता पर्यंतच्या एकंदर चर्चेवरून बऱ्याच जणांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे कि वजन कमी करणे हि अतिशय सोपी गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी आपले वजन अनेक वेळेस कमी केलेले आहे.
दुर्दैवाने ते काही महिन्यात परत येतेच यामुळे काटा हलेना काटा चालेना (अशी कुणाची तरी सुंदर कविता मिपावर प्रसिद्ध झाली होती) हि स्थिती येते.
म्हणजेच एकंदर वजनाचा काटा-- ९ भाग होऊन आपण जेथे आहात तेथेच आहोत. कारण मिताहार (तो आम्ही करतोच) आणि व्यायाम ( तोहि आम्ही करतोच) याचे गणित कुठेतरी चुकतंय हे लक्षात येतंय पण कळतंय पण वळत नाही हि स्थिती आहे.
असो
आता आपण झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय
( ज्यात मिताहार --डाएट आणि व्यायाम-- एक्झरसाईझ याची गरज नाही असा दावा केला जातो) पाहणार आहोत.
या उपायांच्या जाहिराती आणि सवलतींचा आपल्या डोळ्या आणि कानावर सतत मारा होत असतो.
या जाहिराती पाहून आपल्याला आपण पडवळ(पुरुषांसाठी) किंवा चवळीची शेंग (स्त्रियांसाठी) झाल्याची स्वप्ने पडत असतात.
हे उपाय ३ तर्हेचे आहेत
१) शल्यक्रिया विरहित
२) लायपो सक्शन (नळीने चरबी शोषून काढणे)
३) शल्यक्रिया.
१) शल्यक्रिया रहित उपाय
हे आपल्या शरीरातील चरबी प्रत्यक्षात कमी करत नाहीत तर ती इकडची तिकडे हलवली जाते. (म्हणजे हि चरबी व्यायामाने जाळणे आणि परत येऊ नये म्हणून मिताहार करणे आवश्यकच राहते.)
मग हे उपाय का करायचे?
याचे फायदे असे आहेत
१) याचा परिणाम तात्काळ चालू होऊ लागतो.
२) त्वचेचे किंवा शरीराचे बधिरीकरण(anesthesia) करावे लागत नाही
३) दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) अत्यल्प आहेत
४) परिणाम हळूहळू दृगोच्चर झाल्यामुळे आपण असे उपचार घेतो आहोत हे लोकांपासून लपवणे शक्य होते
५)आणि आपण आपले वजन प्रमाणात ठेवले तर हे परिणाम दीर्घ कालपर्यंत टिकून राहतात
या उपचारांच्या मर्यादा अशा आहेत.
१) चरबी मोठ्याप्रमाणावर कमी होत नाही
२)किती चरबी कमी होईल यावर पूर्ण नियंत्रण नसते
३) उपचार बऱ्याच वेळेस किंवा कालावधीने करावे लागतात
४) फक्त चरबीत फरक पडतो त्वचेत नाही.
हे उपाय कुणाला आणि कोणत्या भागावर करता येतात
a ) आपल्याला दुहेरी हनुवटी (DOUBLE CHIN) आहे बाकी सूटाबुटात आपले पुरोगामी पोट लपून जातंय पण हनुवटीमुळे चेहरा अनाकर्षक आहे.
b ) आपल्या पोटावर वळकट्या आहेत त्यामुळे अद्ययावत फॅशनची साडी नेसता येत नाही
c ) पोटापायावर सेल्युलाइट चढलंय त्यामुळे त्वचा गोळीबंद दिसते आहे.
d ) स्तन बेढब झाले आहेत
e ) मांड्यांवर गाठी (love handles) आल्या आहेत
f) स्थूलपणामुळे पुरुषांचे स्तन वाढल्यामुळे ओंगळ दिसत असेल तर तेथील चरबी काढून टाकणे
याचे प्रकार
१) अतिशीत चरबी नाश -- Cryolipolysis
२) लेसर चरबी नाश --Laser Treatment
३) पित्त इंजेक्शन-- Injectable Deoxycholic Acid
४) कर्णातीत ध्वनी चरबी नाश --Ultrasound Fat Reduction
५) Red Light Therapy लाल प्रकाश उपचार
या सर्व उपायांमध्ये आपल्या चरबीच्या पेशीची भिंत फोडून त्यातील चरबी प्रवाही केली जाते जी रक्ताद्वारे आपल्या यकृतात ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते.
या सर्व उपचारांमध्ये आपल्याला पाहिजे तो परिणाम साधेपर्यंत तीन ते चार वेळेस हि प्रक्रिया परत परत करून साधला जातो.
यांचा परिणाम १ महिन्यात दिसू लागतो आणि ३ महिन्यात कायम टिकणारा परिणाम होतो. जर आपण आपले वजन वाढवले नाहीत ता या सर्व उपचारांमध्ये कायम स्वरूपी परिणाम दिसतो.
१) अतिशीत चरबी नाश -- Cryolipolysis -- यात यंत्राचा हात आपल्या त्वचेवर लावला वाजतो आणि त्वचा अशा तापमानापर्यंत थंड केली जाते कि त्यातील चरबीच्या पेशी फुटतात परंतु इतर स्नायू, मज्जा किंवा रक्तवाहिन्याच्या पेशींना इजा पोचत नाही.( या पेशींचे गोठण्याची तापमान चरबीच्या पेशींपेक्षा बरेच कमी असते म्हणून त्यांना इजा होत नाही). बाकी पेशींवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून एका वेळेस साधारण २५ % चरबी कमी केली जाते. त्यामुळे हा उपचार ३-४ वेळेस करावा लागतो
२) LASER लेसर उपचार-- यात विशिष्ट तरंगलांबीच्या लेसरचा वापर केला जातो ज्याचा सर्वात जास्त परिणाम चरबीच्या पेशींवर होतो. यामुळे चरबीच्या पेशी गरम होऊन फुटतात आणि चरबी रक्ताद्वारे शरीरभर नेली जाते. त्वचेला इजा होऊ नये म्हणून त्वचा इतर उपायांनी थंड ठेवली जाते
३) Deoxycholic Acid हे पित्तामध्ये असलेले साबणासारखे द्रव्य असते हे बधिर करण्याच्या द्रव्य (LOCAL ANESTHETIC) बरोबर चरबी असलेल्या भागात इंजेक्शन ने दिले जाते. यामध्ये चरबीच्या पेशी विरघळतात आणि कायमच्या नष्ट होतात. आपल्या हवा तसा परिणाम साधेपर्यंत एक एक महिन्याच्या अंतराने हि प्रक्रिया तीन चार वेळेस केली जाते.
४) कर्णातीत ध्वनी चरबी नाश --Ultrasound Fat Reduction --- सोनोग्राफी करताना अंतर्गोल भिंग वापरले जाते ज्यामुळे कर्णातीत ध्वनीचा शरीरावर परिणाम होत नाही याउलट आपण बहिर्गोल भिंग वापरून सूर्याचा प्रकाश एकत्र करून कागद जाळू शकजा, तसेच बहिर्गोल भिंग वापरून कर्णातीत ध्वनी चरबीच्या एका बिंदूवर एकाग्र करून चरबी वितळवता येते. हि चरबी मग शरीरात इतरत्र नेली जाते. यामध्ये चरबीच्या पेशी विरघळतात आणि कायमच्या नष्ट होतात. आपल्या हवा तसा परिणाम साधेपर्यंत एक एक महिन्याच्या अंतराने हि प्रक्रिया तीन चार वेळेस केली जाते.
५) Red Light Therapy लाल प्रकाश उपचार -- यात लेसर ऐवजी चरबीच्या पेशी जास्तीत जास्त शोषण घेतील असा लाल प्रकाश वापरला जातो. बाकी सर्व प्रक्रिया तीच आहे.
या सर्व उपचारांमध्ये वजन कमी होत नाही तर पाहुणे येणार म्हणून आपण दर्शनी खोलीतील अडगळ आतल्या खोलीत नेऊन ठेवतो तशी चरबी शरीराच्या इतर भागात आणि यकृतात नेली जाते.
या उपचारांबरोबर आपण मिताहार आणि व्यायाम चालू ठेवला तर हि वितळलेली चरबी ऊर्जानिर्मितीसाठी खर्च होऊन कायमची बाहेर जाऊ शकते. अर्थात मिताहार आणि व्यायाम चालू ठेवला नाही तर याचा इच्छित परिणाम दिसणार नाहीच.
२) LIPOSUCTION --लायपो सक्शन अर्थात चरबी शोषण.
यात चरबी प्रथम वितळवली जाते आणि नंतर एक नळी टाकून ती द्रव स्वरूपातील चरबी शोषून शहरीराबाहेर काढून टाकली जाते. चरबी शरीराबाहेर काढण्यासाठी त्वचेला बधिर करून तेथे छोटेसे भोक पडून त्यातून एक नळी आत खुपसली जाते आणि या नळीला मोटार लावून हि द्रवरूप चरबी शोषून बाहेर काढली जाते.
चरबी वितळवण्यासाठी अल्ट्रासाऊंड किंवा लेसर किंवा लाल प्रकाश वापरला जातो. किंवा इंजेक्शनने चरबी वितळवणारे विकर(ENZYME) बधिर करणाऱ्या औषधाबरोबर शरीरात टाकले जातात. शक्तिवान मोटारीने बलपूर्वक शोषून सुद्धा ( वितळवून किंवा न वितळवता) चरबी काढता येते.
हि चरबी काढल्यानंतर एक घट्ट बसणारे रबरी वस्त्र त्या ठिकाणी ४ - ६ आठवडे पर्यंत घालावे लागते अन्यथा चरबी काढलेल्या जागी असलेली त्वचा, फुगवून हवा काढलेल्या फुग्यासारखी सुरकुतलेली राहते आणि जास्तच खराब दिसते. याचा अर्थ असा कि मी आज LIPOSUCTION करून घेईन आणि लगेच शनिवारी बिकिनी घालून गोव्याला मजा करायला जाईन असे नाही.
आमच्या रुग्णालयात (२००९) १८ -२० वर्षाच्या पोरी पोटावर वाढलेली थोडीशी चरबी काढण्यासाठी येत असत. या मुली "आय पी एल" मध्ये चीअर लीडर्स म्हणून नाचत असत. एका सामन्यात नाचण्याचे त्यांना तेन्व्हा रुपये १०,०००/- मिळत असत त्यामुळे पोटावर एक जरी वळकटी आली तरी "पोटावर पाय येईल" या भीतीने त्या हे करायला येत असत. बाकी लग्न ठरलेल्या मुली शरीराला सुडौल आकार देण्यासाठी येत असताना हि मी पाहिले आहे.
या प्रकारात एका वेळेस जास्तीत जास्त १ ते २ किलो चरबी काढता येते.
या शिवाय जर आपल्या त्वचेचे स्थितिस्थापकत्व (ELASTICITY) कमी झाले असेल तर केवळ चरबी काढली तर त्वचा पूर्णपणे आकुंचन पावणार नाही आणि जास्त सुरकुतलेली दिसेल. अशा वेळेस हि अतिरिक्त लोम्बणारी त्वचा प्लॅस्टिक शल्यक्रियेने कापून टाकावी लागते.
याचा अर्थ हि उपचार पद्धती सुद्धा लाव पावडर हो गोरी सारखी एकदम वजन कमी करून देणारी नाही. परंतु चरबीचे गोळे आले असतील तर तेथील चरबी काढून त्वचा जास्त नितळ करता येऊ शकते.
३) शल्यक्रिया हा प्रकार आपण पुढच्या भागात पाहू
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Jan 2019 - 1:28 pm | तुषार काळभोर
दहावा भाग!!!
मी अजून ९४ चा ९४ आहे.
काहीतरी चुकतंय... तुमचं (ह घ्या) किंवा माझं (१००%) तरी!
30 Jan 2019 - 2:18 pm | प्रसाद गोडबोले
मांड्यांवरील गाठींना लव्ह हँडल्स म्हणतात ? फार कल्पना करुनही ही हँडल्स कशी पकडायची हे डोळ्यासमोर येत नाहीये , एखादे चित्र देता का प्लीज ?
30 Jan 2019 - 2:46 pm | यशोधरा
वाचते आहे..
30 Jan 2019 - 3:56 pm | सुबोध खरे
love handles म्हणजे कमरेवर असणाऱ्या वळ्या ज्या आपल्या पॅन्ट च्या वरती दिसतात. स्त्रियांना मांडीच्या वरच्या भागातही अशा वळ्या येतात ज्या अंतरवस्त्राच्या(panty) खाली आणि आतमध्ये दिसून येतात
30 Jan 2019 - 8:03 pm | दीपक११७७
नेहमी प्रमाणे अप्रतिम
30 Jan 2019 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोप्या शब्दांत लोकोपयोगी माहिती देणारी सुंदर लेखमाला.
30 Jan 2019 - 9:21 pm | उगा काहितरीच
वरील सर्व प्रकारच्या उपचारांना लागणारा सरासरी खर्च , परत नॉर्मल ला येण्यासाठीचा कालावधी या गोष्टी असायला हवं होतं.
30 Jan 2019 - 11:06 pm | सुबोध खरे
सदा सर्वत्र जाहिराती उपलब्ध आहेत. प्रत्येक शहरातील आणि विभागातील खर्च हा वेगवेगळा आहे. एकदा विचारणा करून पहा.
31 Jan 2019 - 7:17 am | उगा काहितरीच
तेच ना ! इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जाहिरातींचा भडिमार होत असतो. बर किंमत , केलेले दावे यातही प्रचंड तफावत असते. खरं काय ते कळायला काही मार्गच नाही. त्यामुळे तुमच्या सारख्या तज्ञांकडून क्ष ठिकाणी एक साधारणपणे लागत असलेला खर्च कळाला असता तर बरं झालं असतं.
(रच्याकने सगळ्याच प्रकारच्या सर्जरी साठी असंच आहे थोड्याफार फरकाने. उदाहरणच द्यायचे झाल्यास एक जाहिरात पाहिली पुण्यात कि , किडनी स्टोन ची सर्जरी ४-६ हजार काहितरी पण सारखीच सर्जरी नांदेड मधे झाली ३५-४० हजार मधे. अवांतराबद्दल क्षमस्व ! )
31 Jan 2019 - 10:16 am | सुबोध खरे
दुर्दैवने मला या खर्चाबद्दल काहीच कल्पना नाही.
सुदैवाने मला आजतागायत वजन कमी करण्यासाठी कुठंही पैसे खर्च करायची वेळ आलेली नाही.
टपरीवर चहा ५ रुपयात मिळतो आणि ताज मध्ये रुपये ५०० फक्त अधिक कर
तशीच स्थिती आजकाल सर्व वस्तू आणि सेवांमध्ये आहे (ज्यात वैद्यकीय सेवा हि अंतर्भूत आहे).
एक उदाहरण म्हणून सांगतो कि ओव्हरी मधील सिस्ट ची शल्यक्रिया मुलुंडमध्ये चांगल्या शल्यक्रिया तज्ज्ञाकडून केली तर साधारण ५०-६० हजार रुपयात होते. तीच शल्यक्रिया कोकिलाबेन रुग्णालयात सव्वातीन लाख रुपयात झाली.(याच शल्यक्रिया तज्ज्ञांच्या वर्गमित्राने केली)
हि माझ्या भावाच्या वर्गमित्राची गोष्ट सांगतो आहे. तो रिलायन्स मध्ये नोकरीला आहे. कंपनीने काढलेला आरोग्य विमा पण रिलायन्स चाच आणि रुग्णालय रिलायंसचेच. त्यामुळे त्याला एक दमडीही न भरता काम झाले पण त्याचे मध्यमवर्गीय इमान जळत होते म्हणून त्याने हि कथा मला सांगितली.
31 Jan 2019 - 10:50 am | उगा काहितरीच
सेवेच्या बाबतीत असं होतंय खरं ! कोपऱ्यावरचा केश कर्तनालय वाला ५० रुपयात केस कापेल तर कुणी सलोन वाला ५०० किंवा ५००० रुपये ही घेईल केस कापायचे. वैद्यकीय सेवेत खरं तर असं व्हायला नको होतं कारण ९०% लोक कुठलीही सर्जरी हॉस्पिटल भारी दिसलं , एकदा ट्राय करायचं होतं म्हणून करीत नाही. अगदी नाइलाज झाला तरच हॉस्पिटलची पायरी चढतो. असो ! सगळे सेवा पुरवठादार आपल्या सेवेची किंमत ठरवू शकतो. घेणं न घेणं हे ग्राहकाच्या इच्छेवर.
31 Jan 2019 - 11:30 am | सुबोध खरे
आपण म्हणताय हे सत्य असलं तरी व्यवहार वेगळा आहे.
एक उदाहरण देत आहे. मी दवाखान्याची जागा मुलुंडला पहिल्या मजल्यावर घेतली १५० चौ फूट २००४ साली सप्टेंबर मध्ये किंमत १४ लाख रुपये.( आज याच जागेची किंमत ४५-५० लाखाच्या आसपास आहे.
त्याच महिन्यात माझ्या मित्राने औरंगाबाद येथे (क्रांती चौकच्या आसपास कुठेतरी आहे) तळमजल्यावर १००० चौ फूट जागा १२ लाखात घेतली. त्याचा आणि त्याच्या बायकोचा दवाखाना सोडून इतर ५०० चौ फूट त्याने भाड्याने दिले त्यामुळे त्याचा पुढची सात वर्षे कर्जाचा हप्ता आपोआप भरला गेला.
औरंगाबादला १००० चौ फूट जागा झाडण्यासाठी मावशी ८०० रुपये घेतात आणि मी १५० चौ फूट झाडण्यासाठी ५०० रुपये देतो.हि स्थिती मुंबईत एका टोकाला आहे. मध्य मुंबईत नाहीच.
या दोन्हीची तुलना कशी करणार? तेंव्हा औरंगाबादला डॉक्टर एका रुग्णाचे १०० रुपये घेत असेल तर मुंबईत डॉक्टरला १०० रुपयात रुग्ण पाहणे अशक्य आहे.
31 Jan 2019 - 8:27 am | रीडर
शल्यक्रिया विरहीत पध्दतीत वितळलेली चरबी शरीराबाहेर कशी पडते?
6 Feb 2019 - 8:48 pm | सुबोध खरे
शल्यक्रिया विरहीत पध्दतीत वितळलेली चरबी शरीराबाहेर सहजा सहजी पडत नाही म्हणूनच तुम्हाला व्यायाम आणि मिताहार याची गरज पडतेच. लायपो सक्शन मध्ये १ -२ लिटर चरबी बाहेर काढली जाते म्हणजे साधारण एक ते दीड किलो वजन कमी होते. पण बहुतेक लोकांचे आहारावर नियंत्रण नसल्यामुळे हे वजन परत येरे माझ्या मागल्या म्हणून परत येते.
या बहुतेक पद्धतींचा उपयोग शरीरावरील बेढब चरबी हलवण्यासाठी होतो.
31 Jan 2019 - 12:36 pm | उपेक्षित
नवीन माहिती अतिशय सोप्या पद्धतीने समजत आहे.
31 Jan 2019 - 8:07 pm | खटपट्या
छान माहीती.
15 Feb 2019 - 2:57 pm | डोके.डी.डी.
आपण दिलेले सगळे धागे खूपच माहितीपूर्ण आहेत, माझे सुद्धा 2016 साली वजन 110 किलोच्या वरती गेले होते, वय होते 28 . म्हंटल एकदा तिशी पार झाली आणि वजन असेच वाढत राहिले तर अवघड आहे, आणि मग मनाशी निश्चय केला डायट , केलरीज या संकल्पना गुगल सर्च वरून कळल्या, युट्यूब वरून गुरू मान या अमेरिकस्थित फिट इंडिया मिशन साठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ बघितले आणि व्यायाम आणि त्याला चांगल्या सकस आहाराची जोड देऊन 35 केला वजन कमी केले तेही फक्त 8 महिन्यात (मे 2016 ते डिसेंम्बर 2016) , तेव्हापासून आठवड्याचे 6 दिवस जिम मध्ये व्यायाम चालू आहे आहार देखील जास्त करून प्रोटीन ने भरलेला असेल असा घेत आहे. विशेष म्हणजे यात कोठेही गोळ्या औषधें, इतर मेडिसिन ची गरज लागली नाही.फक्त पोटावर लव हँडल्स अजूनही तळ ठोकून आहेत, त्यासाठी प्रयत्न करतो आहे बघू नैसर्गिक रीतीने जमतंय का.
15 Feb 2019 - 3:17 pm | डोके.डी.डी.
16 Feb 2019 - 10:42 am | सुबोध खरे
डोके साहेब
आपले अभिनंदन.
आपल्यासारखा मनोनिग्रह फार कमी लोकांचा असतो.
(माझा सुद्धा नाही हे प्रामाणिकपणे कबूल करतो. मला सातत्याने व्यायाम करणे जमलेले नाही. मी वजन आटोक्यात ठेवले आहे ते जिभेवर ताबा ठेवून).
आता आपण केवळ "आहे तोच मार्ग चालू ठेवा" कारण हा मार्ग आपल्याला "यशस्वी" ठरलेला आहे.
जर काही कारणाने व्यायाम कमी झाला तर त्याच्या बरोबर आपला आहार कमी करा म्हणजे परत वजन वाढणार नाही.
वजन "कमी ठेवणे" हे "कमी करण्यापेक्षा" जास्त सोपे आहे.
पोटावर लव हँडल्सहे सहजासहजी जात नाहीत त्याला फार काळ लागतो पण आपण कमी केलेले वजन हे कौतुकास्पद आहे तेंव्हा पोटावरच्या लव हँडल्सची काळजी सोडून द्या.
15 Feb 2019 - 10:31 pm | वीणा३
चांगली माहिती