बालकवींची अप्रतिम निसर्गकविता "श्रावणमासी हर्ष मानसी" ही आमची प्रेरणा. ही कविता त्यांच्याच चरणी अर्पण.
पार्श्वभूमी : - इथल्या अफाट थंडीत आणि बर्फांच्या ढिगात कधीतरी मन थोडं उदास होतं आणि नंतर निसर्गचक्रातले विविध विभ्रम पाहून थक्कही होतं..
शिशिरमासी शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे,
क्षणात असते थंड हि वारे क्षणात फिरुनी हिम हि पडे,
बघता बघता नभ हे सारे झाकोळुन मग जात असे,
सूर्यबिंबही केविलवाणे ढगांतुनी त्या मग हासे,
शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते,
ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते,
नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती,
पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती,
जलाशयी त्या बदके नाहित, नाहित कोणी पक्षि तिरी,
गोठुन गेला काळ असा जणु उदास वाटे आज तरी,
थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी,
विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी!
वितळु लागल्या हळूहळू मग शिशिरखुणा तरि त्या सरत्या,
घेउन येइल वसंत मग तो हिरवाईचे गीतचि त्या,
उदास मन हे झाले मग तरि आनंदी हे नाचतसे,
निसर्गचक्रे स्तिमित असा मी काव्यरंग हा उधळितसे.
११ फेब्रुवारी २००८ (दु.१२.३०)
चतुरंग
प्रतिक्रिया
11 Feb 2008 - 11:44 pm | प्राजु
चतुरंग,
बालकवींचा वरदहस्त आहे तुमच्यावर.. असे वाटले तुमच्या या कवितेवरून. केवळ अप्रतिम.
बघता बघता नभ हे सारे झाकोळुन मग जात असे,
सूर्यबिंबही केविलवाणे ढगांतुनी त्या मग हासे,
शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते,
ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते,
नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती,
पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती,
सगळे माझ्यासमोर आहे... अगदी परिस्थितिचे यथार्थ वर्णन.
- (निसर्गवेडी)प्राजु
12 Feb 2008 - 12:43 am | धनंजय
बालकवींकडून मिळालेल्या प्रेरणेचे सार्थक केले!
12 Feb 2008 - 1:39 am | स्वाती राजेश
अशाच कविता येऊ देत.
कवितेच्या ओळी मस्त आहेत.
वर्णन खूप मस्त केले आहे.
थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी,
विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी!
यामधील फक्त "विजीगिषा" चा अर्थ सांगाल का?
12 Feb 2008 - 1:57 am | चतुरंग
विजीगिषा ह्याचा अर्थ - जगण्याची उमेद - कठिण परिस्थितीतून वाट काढण्याची तीव्र जीवनेच्छा.
चतुरंग
12 Feb 2008 - 1:49 am | ऋषिकेश
नसता पाने झाडे सगळी उदासवाणी उगीच ती,
पांघरुनी मग शुभ्र हिमाची 'हिमपर्णे'ही सजवित ती,
.....गोठुन गेला काळ असा जणु उदास वाटे आज तरी,
थंडित त्याही बागडणारे खगही काही असति नभी,
विस्मय वाटे मनी कशी ही विजीगिषा ती आज उभी!
वा वा वा.. 'नेमक्या' शब्दांतील वर्णन!!! अतिशय चित्रदर्शी कविता.. आवडली
-ऋषिकेश
12 Feb 2008 - 2:54 am | नंदन
कविता. शुभ्र गालिचे, हिमपर्णे, गोठून गेलेला काळ इ. विशेष आवडले. शीर्षकावरुन मर्ढेकरांची शिशिरागम कविता आठवली. (शिशिरऋतुच्या पुनरागमे,एकेक पान गळावया, कां लागता मज येतसे, न कळे उगाच रडावया)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
12 Feb 2008 - 3:23 pm | स्वाती दिनेश
अगदी असेच,नंदनप्रमाणेच..मलाही मर्ढेकर आठवले..
कविता सुंदर झाली आहे.
स्वाती
12 Feb 2008 - 3:05 am | llपुण्याचे पेशवेll
उत्तम वर्णन ..
कदाचित अमेरीकेत येऊन असे प्रत्यक्ष पाहीले नसते तर आम्हास या काव्याचा आनंद संपूर्णपणे लुटता आला नसता. आपण उत्तमपणे हे आमच्या आजूबाजूचे चित्र शब्दबद्ध केले आहे. मस्तच.
पुण्याचे पेशवे
12 Feb 2008 - 11:04 am | विसोबा खेचर
वा चतुरंगा,
फारच सुरेख कविता केली आहेस, वाचून निखळ आनंद मिळाला, समाधान मिळाले!
शुभ्र फुले ही फुलता सगळी हिमगौरी ही अवतरते,
ह्या जमिनीवर अन गवतावर शुभ्र गालिचे अंथरते,
उदास मन हे झाले मग तरि आनंदी हे नाचतसे,
निसर्गचक्रे स्तिमित असा मी काव्यरंग हा उधळितसे.
वा वा! सुरेख...!
तात्या.
12 Feb 2008 - 3:35 pm | प्रमोद देव
चतुरंगशेठ मस्तच रचना आहे.
बालकवी देखिल खुश होतील तिथे स्वर्गात!
12 Feb 2008 - 4:21 pm | केशवसुमार
हेच म्हणतो..
केशवसुमार
12 Feb 2008 - 5:05 pm | सख्याहरि
यथार्थ वर्णन...
सुन्दर कविता...
-सख्याहरि
12 Feb 2008 - 9:00 pm | चतुरंग
मनःपूर्वक आभार आणि आपल्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद!
चतुरंग
12 Feb 2008 - 9:07 pm | वरदा
शिशिरमासी शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे,
क्षणात असते थंड हि वारे क्षणात फिरुनी हिम हि पडे
अगदी असंच चाल्लंय सद्ध्या...फारच छान वर्णन....
12 Feb 2008 - 9:13 pm | मुक्तसुनीत
तुमची ही कविता खूप आवडली. वृत्तबद्ध रचनेचा डौल तुम्ही सावरला आहे आणि सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते.
"शिशिरमासी" हा प्रयोग अर्थाच्या दृष्टीने किंचित चुकीचा आहे (शिशिर हा ऋतू ; "मास" नव्हे. ) आणि सगळ्या कवितेमधे साधलेला वृत्ताचा तोल केवळ या एका ठिकाणी ढळलाय. त्या ऐवजी "शिशिरमौसमी" हा शब्द बसू शकेल. (मात्र असे करण्याने एक फारशी शब्द वापरावा लागतो , जो प्रस्तुत कवितेच्या प्रकृतीशी आणि भाषेशी विसंगत आहे.)
12 Feb 2008 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमची ही कविता खूप आवडली. सगळे वर्णन चित्रदर्शी झाले आहे. या दृष्टीने, तीन-चार पिढ्यांमागच्या कवि माधव, बालकवी, ना.वा. टिळक यांच्या प्रभावळीतल्या उत्कृष्ट निसर्गकवितेशी , ही कविता आपले नाते सांगते.
असेच म्हणतो !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
12 Feb 2008 - 9:23 pm | चतुरंग
आपल्या परीक्षणाबद्दल धन्यवाद!
आपण सांगितलेली "शिशिरमास" शब्दातली चूक मलाही खटकली, तसेच आणखीही सदस्यांनी त्याबद्दल मला सूचित केले.
शिशिरऋतूतिल शुभ्र मानसी हिम हे दाटे चोहिकडे,
असेही चालू शकेल.
असो. सुधारणेस वाव आहे हे समजून आनंद वाटला.
चतुरंग
12 Feb 2008 - 9:30 pm | मुक्तसुनीत
"शिशिरऋतूतिल " ही अगदी योग्य अशी दुरुस्ती आहे. (असे केल्याने, तुमच्या कवितेचे नाते एकदम, बालकवींच्या १-२ पिढ्यांनंतरच्या एका प्रसिद्ध कवितेशी जोडले गेले ; हे तुम्हाला जाणवले की नाही ? :-) )
12 Feb 2008 - 9:49 pm | चतुरंग
आणि बालकवींच्या कवितातल्या सहजसुंदर आणि ओघवत्या शब्दांच्या प्रभावाखाली वृत्तबध्द, तालबद्ध आणि चित्रदर्शी असं आपण काही लिहू शकतो अशी जाणीवही झाली. पण इतक्या थोरामोठ्यांशी नाते जोडणं काही बरोबर नाही असं वाटतंय.
आपल्या सगळ्याच्या लोभामुळे असेच काही सर्जन होत रहावे.
चतुरंग