तू का राम??

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
10 Oct 2018 - 11:23 pm

डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कारवायांच्या कहाण्या म्हणजे आजकाल अविश्वसनीयच वाटाव्यात असेच प्रकार असतात.
नाशिक मनपाचे आयुक्त असलेल्या मुंढे यांनी आजही अशीच धडक कारवाई केली.
नवरात्रीनिमित्त कालिका मंदिरात तुकाराम मुंढे आरतीकरिता पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मंदिरात आणि प्रसाद स्टॉल्सवर त्यांना प्लास्टिक दिसले. राज्यात प्लास्टिकबंदी असूनही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाहून, आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच भडकले. आरती होताच, मुंढे यांनी सर्व प्रसाद स्टॉल्सची अचानक पाहणी केली, आणि प्लास्टिक न हटविल्यास, दुकाने हटवू असा इशारा दिला.
***
ही बातमी वाचली आणि अशाच एका कारवाईचा कुणाकडून तरी ऐकलेला एक किस्सा आठवला. ती कारवाई करणारा अधिकारी कोण होता माहीत नाही. पण तो किस्सा ऐकल्यावर मात्र, डॅशिंग मुंढेच डोळ्यासमोर आले.
तो किस्सा सांगायलाच हवा...
तर, अशाच एका डॅशिंग अधिकाऱ्याची एका शहरात बदली झाली. (डॅशिंग अधिकारी एकाच ठिकाणी फार काळ राहात नसतात.) योगायोगाने, त्याच शहरात त्या अधिकाऱ्याची बहीण राहात होती. ज्या कार्यालयात या अधिकाऱ्याची नेमणूक झाली, त्याच कार्यालयात त्याच्या या बहीणीचा नवरा नोकरी करत होता.
आपला भाऊ आपल्या गावात आला आहे म्हणताना, बहिणीने एकदा प्रेमाने त्याला घरी जेवायला बोलावले. मेव्हणा जेवायला येणार म्हणून तिचा नवरा अंमळ उशिरापर्यंत कामावर गेलाच नाही. दुपारी हा अधिकारी बहिणीकडे आला, सगळे मिळून छान गप्पाबिप्पा मारत जेवले, थोडा वेळ थांबून हा अधिकारी आपल्या आॅफिसात परतला.
केबिनमधे जाताच त्याने स्टेनोला बोलावले. आणि भराभरा डिक्टेशन दिले.
ते वाचून स्टेनोची गाळण उडाली.
ज्या मेव्हण्याच्या घरी साहेब जेवायला गेले होते, त्यालाच कारवाईची नोटीस देणारे ते पत्र होते!
ड्यूटीवर असताना घरी थांबल्याबद्दल कारवाई का करू नये याची विचारणा करणारी नोटीस!
... बिचारा मेहुणा, पाहुणचार आटोपल्याच्या समाधानाने थोडा उशिरा आॅफिसात आला, अन् ही नोटीस त्याच्या हातात पडली!

असा तो कडवा शिस्तप्रिय अधिकारी!
मुंढेच्या प्लास्टिक कारवाईच्या बातमीवर गप्पा मारताना हा किस्सा आजच मला कुणीतरी सांगितला आणि मुंढेच आठवले!

पण लगेच एक प्रश्न मनात आला.
ड्यूटीवर असताना घरी थांबल्याबद्दल मेहुण्याला नोटीस देणारा तो अधिकारीदेखील, ड्यूटीवर असतानाच तर बहिणीकडे जेवायला गेला होता.

... मुंढे असते तर त्यांनी काय केले असते??

मुक्तकसमाजप्रकटन

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

11 Oct 2018 - 12:45 am | टर्मीनेटर

शेवटी सगळ्यांचे पाय मातीचेच. असो, पण काही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच तर व्यवस्था अजून टिकून आहे हे हि नसे थोडके.

जयन्त बा शिम्पि's picture

11 Oct 2018 - 2:15 am | जयन्त बा शिम्पि

तो अधिकारी फक्त दीड ते दोनच्या दरम्यानच म्हणजे लंच च्या वेळेतच जाऊन ,वेळेवर ऑफिसात परत आला असेल. काय सांगावे, बहिणीला त्याचा स्वभाव माहीत असल्याने, जेवणाचे पदार्थ सुद्धा भरभर खाण्यासारखे असावेत.

मला वाटते हत्ती आणि चार आंधळे अशी आपली गत असते. काही व्यक्ती काही गोष्टी वेगळ्या प्रकाराने हाताळतात आणि आपण वेगळेच समजतो.