एकल प्रवास - सोलो ट्रॅव्हल
एकल प्रवास! या वेळी थीमच डीआयवाय (Do it yourself) असल्याने भटकंती-प्रवासाचा या दृष्टीकोनातून विचार करू या. सेल्फ प्लॅन्ड भटकंतीतही एकल प्रवास या थीमसाठी एकदम चपखल! अर्थातच त्यामुळे एकट्याने 'पॅकेज टूर'बरोबरचा प्रवास, एकल असला तरीही येथे विचारात घेतलेला नाही. एकल प्रवासातही बॅकपॅकिंग या प्रकारावर हा लेख बेतलेला आहे, याशिवाय लोक सायकल, बाईक, स्वतःचे वाहन इत्यादी साधनांनीही एकट्याने प्रवास करतात, पण ते सर्व जरा वेगळ्या प्रकारात मोडते. परदेशात व देशातही, अलीकडे बऱ्यापैकी लोक एकट्याने प्रवास करायला लागले असल्याने "हॅ, एकटंच काय जायचं!" हा विचार बऱ्यापैकी कमी होत चालला असल्याचे लक्षात येते. एकंदरच या इंडस्ट्रीमध्ये 'एक्स्प्लोजन'सम स्थिती आहे. तुमच्यापैकी काही लोकांना अनुभव असेलही, परंतु तरीही बऱ्याच लोकांना अजूनही त्या पहिल्या 'पुश'ची आवश्यकता असते, त्यांचे धैर्य वाढवण्यासाठीही हा लेख उपयोगी यावा, व इतरांना नुसती माहिती म्हणून. फायदे-तोटे समज-गैरसमज यांच्या माध्यमातून एकल प्रवासाचा स्वानुभवाधारित हा ऊहापोह... भटकंती डन 'डीआयवाय'!!
एकल प्रवासाचे काही ठळक फायदे पाहू या..
चाकोरीबाहेरच्या जगाची ओळख
एकल प्रवासाची सर्वात मोठी देणगी म्हणजे कोषातून बाहेर पडणे ही आहे. विहिरीतल्या बेडकाच्या गोष्टीप्रमाणे आपल्या आवतीभोवतीच्या ओळखीच्या विश्वाच्या पलीकडचे जग कित्येक वेळेला ज्ञातच नसते किंवा समोर असूनही आपल्याला दिसत नाही, किंबहुना आपण पाहत नाही. परंतु बऱ्याच वेळेला एकांत, दृष्टीवरचे हे पटल दूर करून एक वेगळीच दुनिया दाखवतो. नव्या ओळखी, नवे मित्र जोडत, त्यांचे विश्व आपण आपल्या नजरेने पाहत आपली क्षितिजे नकळत विस्तारून जातात. सामान्यातिसामान्यांच्या ओळखी खरी दुनियादारी काय आहे हे दाखवतात व शिकवतात. माझा सगळ्यात पहिला एकल प्रवास हा वेरूळची लेणी पाहण्याकरता केलेला, साधारण सोळा-सतराव्या वर्षी, कमावत नसताना केलेला पहिला आणि एकच, आणि त्यामुळे काटकसरीचे आणखी वेगळे धडे देणारा. जन्मापासून मी मुंबईकर, पण त्या प्रवासाने मला ग्रामीण भागात लोक कसे राहतात याची झलक दिली. लहान वयाचा आणखी एक फायदा असतो - लोक प्रेमाने अगत्य करतात. असो, तर मुद्द्याकडे वळताना, प्रवासात 'जग जाणून घेण्यासाठी' असा एक हेतू, 'सोबत' नसली की सोबत ठेवणे सहज घडते. कोहिमा, नागालँड. ईशान्य भारत प्रवासात निनोच्या घरी मुक्काम होता. स्थानिकांच्या नजरेतून भारत दर्शन.स्वतःच्या क्षमतेची ओळख
वरच्याच मुद्द्याची ही उलट बाजू... जशी जगाची ओळख वाढत जाते, तशीच स्वतःबरोबर समय व्यतीत केल्याने स्वतःचीही ओळख होत जाते. वाक्य फार तत्त्वज्ञानयुक्त वाटू शकते, परंतु सोपे करण्यासाठी लहानसा अनुभव - पायी चालत अफगाणिस्तानची सीमा ओलांडून त्या वैदिक आर्षभूमीची गळाभेट घेऊ, हे कधी स्वप्नातही शक्य वाटले नसते. परंतु आपल्यात काय निभावून नेण्याची क्षमता आहे याची एकेका प्रवासात हळूहळू ओळख होत गेली. सामर्थ्य अचानक येत नसते, येऊही नये. परंतु प्रयत्नपूर्वक ते येते तेव्हा त्याची ओळख व त्याचा योग्य वापर यासाठी आवश्यक चिंतन हे स्वतःबरोबर समय व्यतीत केल्याने सुलभ होते, असा वैयक्तिक अनुभव. कुठल्या परिस्थितीला आपण कोणत्या प्रकारे तोंड देणे योग्य व परिणामकारक ठरेल त्याची ओळख स्वतःलाच हवी, ती असणे म्हणजेच 'प्रसंगावधान'! एकल प्रवासात नाही म्हटले तरी जाणतेपणी स्वतःला प्रसंगात टाकणे होते व त्यामुळे अवधाने सक्षम होतातच.इमं मे गंगे यमुने सरस्वति शुतुद्रिस्तोमं सचता परुष्ण्या | असिक्न्या मरुद्वृद्धे वितस्तयार्जीकीये श्रुणुह्यासुषोमया || तुष्टामया प्रथमं यातवे सजूः ससर्त्वा रसयाश्वेत्या तया | त्वं सिन्धो कुभया गोमतीं कृमुम्मेहत्न्वा सरथं याभिरीयसे || - ऋग्वेदीय नदीस्तुती सूक्ताने अफगाणिस्तानात कुभा नदीस (काबुल) अर्घ्य... मैत्र जिवांचे
एकल प्रवासाचा सर्वात मोठा फायदा... नित्य नवे मित्र! नव्या नव्या ठिकाणी भटकताना कधी गरज म्हणून, कधी विरंगुळा म्हणून, तर कधी अगदीच योगायोगाने नवे मित्र जुळत जातात. कधी आपल्याला त्यांना हुडकावे लागते, जोडावे लागते, तर कधी याउलट ते आपल्याला हुडकतात. पण जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे हा विश्वास या अनुभवात नक्की बळकट होत जातो. हा अनुभव अगदी ब्राझिलच्या जंगलापासून ते अफगाणी वाळवंटापर्यंत सर्वत्र समान व सुखद आहे. कधी यात नवी नातीही गवसतात, कधी मैत्री थोड्या पायऱ्या चढून वेगळ्या उंचीवरही जाते. परंतु एकंदर नात्यांची शिकवण देणारा हा अनुभव ठरतो, यात वाद नाही. आणि यासाठी सगळे सोडून निघालात तरच हा अनुभव विशेषत्वाने मिळणार आहे हेही नक्की. माझ्यासाठी प्रवासाचे हे एक सर्वात मोठे आकर्षण आहे. जगाच्या विविध कोपऱ्यांतून येणारे लोक त्यांच्या अनुभवातून तुमची समज अधिक प्रगल्भ करतात. त्यातले कोण फक्त हाय-हॅलो पुरतेच, कोण दिवसभराचेच साथी, कोण फेसबुकवर ठेवण्यालायक, कोणाबरोबर फोन नंबर शेअर करायचा, कुठे त्रासदायक गुंतागुंत होतेय का, कुठे ती समोरून होतेय का, वन नाइट हॅण्डल होणार आहे का, आणि ते तिथेच संपणार आहे का, असे अनेक प्रश्न कुठे अनुभवाने, तर कुठे इंट्युशनने पटापट सोडवत पुढे जात राहणे ही एकल प्रवासाची मजा.ग्वाटेमालामध्ये तासाभराच्या विमानप्रवासातही अगदी नात्यातले असावेत अशी जवळची मैत्री झालेले आजी-आजोबा... भटक्या जीवनशैलीची झलक
कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी एकल प्रवास केला असेल आणि इतरांनी किमान 'क्वीन' हा चित्रपट तरी पहिला असेल, त्यातले होस्टेलवरचे जीवन आठवा. अशा एकटे भटकणाऱ्या लोकांची एक जमातच आहे असे म्हणेन मी. शेअरिंग बेसिसवर डॉर्म हॉस्टेलमध्ये राहणे, दररोज नवे मित्र बनवून त्यांच्याबरोबर भटकणे, आपली एक क्रिएटिव्ह ओळख मागे ठेवणे, त्या त्या ठिकाणची आठवण-ओळख स्वतःबरोबर घेणे, जमल्यास लहानमोठे काम शोधणे (परदेशात असल्यास व्हिसा नियमानुसार) किंवा व्हॉलंटरी कुठल्या कामात विनामोबदला मदत करणे आणि या कशातही अडकून न पडता पुढल्या मुक्कामी जात राहणे... आयुष्याकडे बघण्याची नजर यामुळे खूप सुटसुटीत होत जाते. फार गुंता न करण्याची सवय लागते. कदाचित स्थैर्याचा अभाव वाटूही शकतो यात, पण हे असे जीवन काही आयुष्यभरासाठी नाही, तर एक अनुभव म्हणून नक्की चाखावे...बोगोटा, कोलम्बिया. ल्युडो खेळत हॉस्टेल मित्रांबरोबर जागवलेली रात्र... स्वातंत्र्य
स्वतःला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचे स्वातंत्र्य, जशा करायच्या तशा करण्याचे स्वातंत्र्य व त्यासाठी आपल्याला हवा तितका वेळ देण्याचे स्वातंत्र्य! माझा पहिला महाराष्ट्राबाहेरचा मोठा एकल प्रवास माझ्या कायम लक्षात राहील. उभा तामिळनाडू पालथा घातला होता. प्रादेशिक, सांस्कृतिक अनुभव हा विषय होताच, पण त्याआधी माझ्या धर्माविषयी आणि देशाविषयी घरात जे शिकलो त्यापलीकडे माझी नुसतीच पुस्तकी मते होती, तेव्हा स्वतः अनुभवातून ती मते दृढ किंवा दुरुस्त करून घेणे असा एक उद्देश. पुढे देशाच्या विविध भागात भटकंती करताना तो अभ्यास चालू ठेवला. पण ज्या ज्या वेळी असा उद्देशाने प्रवास होत असे, तेव्हा त्यासाठी आवश्यक मोकळीक मिळण्यासाठी असा विविक्त प्रवास सर्वात पोषक. तशीच कथा अंकोरवट किंवा माया संस्कृतीचे अवशेष बघण्यास गेलो तेव्हाची. २-२, ४-४ तास एकेका वास्तूला, शिल्पाला, अनुभूतीला देऊ शकू असे स्वातंत्र्य हवे होते, त्यामुळे एकला चालो रे. अशा वेळी मग प्रवासी मित्रसुद्धा माझ्या तंत्राने चालणार नसतील, तर जरा लांबच ठेवतो मी.
स्वातंत्र्याचा थोडा वेगळा दुसराही अर्थ - तुम्हाला जज करणारे ओळखीचे साक्षी जग एकल प्रवासात आजूबाजूला नसते. बऱ्याच वेळा तुमचे वर्तन हे 'चार लोकांत मान्य असेल असे' किंवा त्यांना ओळखीच्या असलेल्या, तुमचे तुम्हीच साकारलेल्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असेच असावे लागते. जरा चाकोरीबाहेरील चाल, संयत व शिष्टसंमत असली तरी तुमच्या परिचित व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसल्यास इतरांचे कटाक्ष ओढवून घेऊ शकते. एकल प्रवासात तसे दडपण उरत नाही. त्यामुळे एक तर तुम्हाला हवा तसा अनुभव तुम्ही घेऊ शकता व शिवाय तुमच्या अनुभवातील जेवढे तुम्ही शेअर कराल तेवढेच प्रसिद्ध होणार आहे, त्यामुळे तो एक कंट्रोल किंवा फिल्टर मला आजकालच्या 'ओव्हर जजमेंटल' जगात फायद्याचा वाटतो.मंडले, म्यानमार. सायकलवर शहरातील प्राचीन वास्तू व बौद्ध विहारांना भेट... स्थानिक वेष, नैसर्गिक सनब्लॉक तनुखा...
एकांत
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून एकांताला तो स्वभावतः घाबरतो, हे सत्य आहे. परंतु त्याचबरोबर जेव्हाही संतृप्तीमुळे म्हणा किंवा उद्विग्नतेमुळे म्हणा किंवा केवळ ज्ञानातून येणाऱ्या वैराग्यामुळे जेव्हा तो एकांत पत्करतो, तेव्हा त्याचे होणारे परिणाम फार खोलवर असतात. पण समजा, या तिन्ही स्थितींत नसताना जेव्हा मनुष्य जाणतेपणी काही क्षणांसाठी एकांत स्वीकारतो, तेव्हा एकतर त्याला ध्यान म्हणतात किंवा चिंतन. यातील चिंतनासाठी एकल प्रवास अतिशय उत्तम. रोजच्या प्रश्नांपासून जरा दूर जाऊन एक त्रयस्थ म्हणून स्वतःचेच अवलोकन करताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. एका क्षणाचा महिमा आणि सिद्धार्थाचा बुद्ध झाला, नरेंद्राचा विवेकानंद झाला... ही फार मोठी उदाहरणे झाली, केवळ सर्वमान्य आहेत म्हणून हे दाखले. परंतु वैयक्तिक पातळीवर स्वतःच्या क्षुद्र क्षमतेतही असे लहानमोठे उद्योतक क्षण अनुभवास नक्की येतात. परंतु अपेक्षा आहे ती एकांताची. आणि हे नेहमीच्या धकाधकीतून दूर गेल्याशिवाय साधत नाही, म्हणून थोडे उपद्व्याप. एकल प्रवासावरील आक्षेपाचे सर्वात मोठे कारण एकाकीपणाचे भय हेच आहे. पण ट्रस्ट मी, डर के आगे जीत है। :-)त्रिसूर, केरळ. दाक्षिणात्य भटकंती. आत्मविश्वास, स्वावलंबन व सकारात्मक दृष्टीकोन
हा एकंदरच डीआयवाय कन्सेप्टचा महत्त्वाचा लाभ आहे. सुरुवातीपासून आखणी व अंमलबजावणी करता करता हे लक्षात येते की एकल प्रवास हे ऑन जॉब ट्रेनिंग असल्यासारखे आहे. एकल प्रवास हे प्लॅनिंग, बजेटिंग, टाइम मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, रिलेशनशिप मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट, बॅकअप प्लॅनिंग, व्हॅल्यू अढेअरन्स, फिअर मॅनेजमेंट, शेम मॅनेजमेंट या सगळ्याचे अगदी शंभर टक्के 'रिअल लाइफ' ट्रेनिंग आहे. बऱ्याच बाबतीत स्वतः सर्व करण्याशिवाय पर्याय नसल्याने स्वावलंबन आपोआपच साधते व त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. जसजसा लोकसंपर्क व संग्रह वाढत जातो, तसे मागे म्हटल्याप्रमाणे 'जग चांगल्या लोकांनी भरलेले आहे' ही सकारात्मक भावना आपला दृष्टीकोन खूपच निर्मळ करते. वरच्या लांबलचक यादीतले तीन मुद्दे जरा विस्ताराने स्पष्ट करतो.
व्हॅल्यू अढेअरन्स : तत्त्वनिष्ठा! कितीही कठीण परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांशी ठाम राहणे जमते आहे का? याची परीक्षा, तसेच असे करण्यामध्ये एक कर्मठपणा येऊ न देता असमांतर तत्त्वांचाही आदर करता येतो आहे का? याचीही परीक्षा. लहानसे उदाहरण - साधारण अठराव्या वर्षी मी मांसाहार सोडला. त्यानंतर जिथे शाकाहार हीसुद्धा एक जीवनशैली आहे हेही माहीत नसलेल्या अनेक भागात प्रवास घडला, परंतु कोठेही अडले म्हणून नाही, काही ठिकाणी अवघड गेले आणि तीच परीक्षा. उझबेकिस्तानात एका कुटुंबाबरोबर राहत असताना इतके जवळचे नाते जडले, दुसऱ्या दिवशी मी बटाट्याचा रस्सा वगैरे बनवला त्यामुळे स्वयंपाकघरापर्यंत संचार झालेला होता व मित्राची आई एकदमच खूश. तिसऱ्या दिवशी मला रात्री जेवणाचा आग्रह करण्यात आला. आग्रह म्हणजे अगदी प्रेमाचा कडेलोट! आईंची खास पाककृती काय, तर 'बीफ सूप'... आता आले का धर्मसंकट! मलाच काय, बऱ्याच भारतीय मांसाहारींनाही हे संकटच. त्यांना समजावले की आम्ही गाईचे दूध पितो, त्यामुळे ती आम्हाला आईसारखी आहे व त्यामुळे आम्ही गाईचे मांस खात नाहीच, परंतु वैयक्तिक मत म्हणून कोणतेच मांस न खाण्याचा माझा नियम आहे. लटके रुसवे-फुगवेही झाले, पण शेवटी त्यांचा आहार त्यांनी केला, माझा मी. (वाचताना खूप सोपे आहे, पण विशुद्ध प्रेमाच्या अशा प्रसंगी नकार देणे अत्यंत कठीण. पण अगदी अनोळखीतून अशी स्निग्ध नाती जोडण्याचे योग येणे हे खरे भाग्य! त्यासाठी मी कायम ऋणी राहीन!)
तरमीझ, उझबेकिस्तान. "तू आम्हाला मुलाप्रमाणेच आहेस" असे मनमोकळेपणे सांगणारे व तशी वर्तणूकही करणारे प्रेमळ उझबेक कुटुंब त्या दिवशीचा जेवणाचा बेत - मित्रासाठी उझबेक सूप (मोठ्या प्लेटमध्ये), मला उकडलेला बटाटा व टोमॅटो-मिरचीचे सॅलड
फिअर मॅनेजमेंट : डर सब को लागता है, गला सब का सूखता है! प्राणी म्हटला की भय नैसर्गिक आहे. भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक उदाहरण टॅरेंटुला किंवा साप किंवा मगर हाताळायची भीती ही प्रामुख्याने काल्पनिक असते. कधी असे प्राणी प्रत्यक्षात जवळून पहिलेच नसल्याने 'तो चावला तर...' वगैरे अशा प्रकारची भीती. आता ही भीती नाही घालवली तरी बिघडत नाही. पण एक धाडस म्हणून पाहिले करून. नाही जमले, तरी कोणाला कळणारे... स्काय डायव्हिंग, बंजी जम्पिंग हे सगळे यातलेच... एक भीती - सामानाची चोरी होईल किंवा फसवले जाऊ किंवा काही इजा होईल अशा प्रकारची. त्यासाठी जपून वावरणे, सजग राहणे, फार नजरेत येईल असे वेष, वर्तन टाळणे, असे काही वावगे घडलेच तर ट्रॅव्हल इन्शुरन्स असे उपाय करता येतात व ही भीती सुरक्षित ठेवते व कमी-अधिक प्रमाणात शिकवण्याचेच काम करते. एक भीती सर्वात महत्त्वाची - स्वतःच्या अस्तित्वाची, परत नाही आलो तर काय... यासाठी, लाइफ इन्शुरन्स आहे का, महत्त्वाच्या ठिकाणी नॉमिनी किंवा वारसदार नेमलेले आहेत का, स्वतःचे मृत्युपत्र आहे का... अशा अवघड प्रश्नांची तयारी हवी. आणि खरे तर यासाठी एकल प्रवासाची आवश्यकता नाही, तर नेहमीच्या जीवनातही ही तयारी हवीच.अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतातील वाळवंटात. आजतागायत पाहिलेल्यातली सर्वात वैराण जागा...
शेम मॅनेजमेंट : काही गोष्टी न करण्यात भीतीपेक्षा लज्जा कारण असते. कराओके नाइटला बिनधास्त शंभर लोकांसमोर गाणे, इथपासून न्यूड बीचला भेट इथपर्यंत किंवा त्याही पुढे ज्या गोष्टी लाजून आपण करणार नाही, त्या एकल प्रवासात बिनधास्त करा. फक्त स्वतःच्या मर्यादा पाळल्या म्हणजे झाले. ती गोष्ट केल्यावर स्वतःला स्वतःची लाज वाटणार नाही, याचे भान ठेवलेच पाहिजे.
एकल प्रवासाविषयीचे काही समज-गैरसमजसोलो ट्रॅव्हल हे अलीकडचे फॅड आहे...
प्राचीन काळापासून 'गुरू, ग्रंथ व प्रवास ही ज्ञानार्जनाची तीन साधने' मानली गेली आहेत. बऱ्याच गुरु-शिष्य कथांमध्ये शिक्षणानंतर गुरू परिक्रमेला पाठवतात असा उल्लेख मिळतो, तर अनेक संतांच्या चरित्रातही देशाटनाचे दाखले मिळतात. आदिशंकराचार्य, समर्थ विवेकानंद आदी अनेक विचारवंतांचा प्रवास देशाटनातून आलेल्या समाजाविषयीच्या कळवळ्यातून सुरू झालेला दिसतो आणि ज्ञानी अवस्थेला पोहोचल्यानंतरही आपले कार्य करण्यासाठी अशांनी भ्रमण केले. हे त्यातले उच्चकोटीचे दाखले झाले, परंतु इब्न बतूता, अल बेरूनी, रुमी, ह्युएन त्सेंग, मार्को पोलो हे दुसऱ्या फळीतले. व्यापार, धर्मप्रसार किंवा केवळ आवड अशा अनेक कारणांनी या लोकांनी देश पालथे घातले आणि बऱ्याच प्रवासात ते एकटेच होते. त्यांची लिखाणे आज अभ्यासाचा विषय बनलेली आहेत. त्यामुळे अशा आवडी असणारे व अशा प्रवासाची गरज ओळखणारे प्रत्येक काळामध्ये होऊन गेले आहेत आणि होत राहतील. आज माध्यमांतून याविषयी अधिक जागृती आली आहे हे खरे. तसेच देशात आता बऱ्यापैकी सुबत्ता आल्याने असे प्रवास अधिक सुकर झाले आहेत.डॅलस, टेक्सास. भरपूर गप्पा मारणारे सहप्रवासी बौद्ध भिख्खू. त्यांच्यासाठी वाहतुकीची साधने प्रगत झाली, तसा प्रवासाचा आवाकाही वाढला. शतकानुशतके पौर्वात्य परंपरांमध्ये पारिव्राजक व्रत अखंड चालू आहे. एकल प्रवास म्हणजे एकटेच राहणे
एकल प्रवासात बरोबर कोणी ओळखीचे न घेता जाणे असले, तरी प्रवासात मित्र जमतातच. मित्र हमखास मिळवण्याच्या काही युक्त्या म्हणजे सर्वप्रथम होस्टेलवर शेअर्ड डॉर्म्समध्ये राहणे. अशा ठिकाणी शक्यतो सकाळची न्याहारी फुकट असते किंवा जवळच न्याहारीचे ठिकाण असते. सकाळ सकाळ अशा ठिकाणी दिवस सुरू करताना नवीन मित्र बनवणे सर्वात सोपे. त्यातले तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाणारे तुमचे त्या दिवसाचे साथी! दुसरी युक्ती संध्याकाळी अंधार पडल्यावर होस्टेलवरचे लोक्स परत येतात, तेव्हा नव्या ओळखी करून घेणे किंवा तिसरी, जास्तकरून विकसित वा पाश्चात्त्य देशात, सोशलायझिंगसाठी लोक जमतात तिथे नवे मित्र बनवणे. इथे थोडा वैयक्तिक सवयींचा वा तत्त्वांचा प्रश्न येऊ शकतो. मी दारू पीत नसलो, तरी बारमध्ये जाऊन 'सोशलाइज' करण्यात मला काही गैर वाटत नाही. किंबहुना ‘लोक जोडणे’ ही प्रवासाची गरज आहे, तसेच नशा न करणे हेही एकल प्रवासात सुरक्षेच्या दृष्टीने अधिक योग्य आहे. काही अनुभव अगदीच अनपेक्षित असतात, एकटे न राहण्याच्या प्रयत्नात भलतीच संगत गळ्यात पडत नाहीये ना, याचेही भान ठेवावे लागते. अलीकडेच कोलम्बियामध्ये होस्टेलच्या गच्चीवर अशाच गप्पा रंगल्या होत्या. आम्ही चार जण होतो. त्यातली एकाकडे एक पुरचुंडी चुरचुरलेली लक्षात आली होती. दुसऱ्या वेळी अधिक निर्ढावलेपणाने त्याने समोरच सफेद पूड करंगळीवर घेत जोरदार नशा चढवला. आता ह्यात थेट असा धोका नाहीही आणि आहेही. कोकेन घेणारा त्याच्या त्याच्या नादात आणि पूर्णपणे निरुपद्रवी होता, त्यामुळे धोका नाही. परंतु त्या पदार्थाचा अंश जरी विमानतळावर किंवा अन्यत्र होणाऱ्या तपासणीत आपल्या सामानावर सापडला, तर आपली चूक नसतानाही नाही त्या त्रासाला सामोरे जावे लागायचे त्याचा धोका. त्यामुळे प्रसंगाचे भान ठेवणे व कायम त्यावर ताबा ठेवता येणे फार महत्त्वाचे.
टिकाल, ग्वाटेमाला. हा एकलपेक्षा युगल प्रवास म्हणायला पाहिजे... तिन्ही ज्येष्ठांच्या जोड्या विवाहित आहेत, बाकी आम्ही चार सोलो टर्न्ड ड्युओ... एकल प्रवास प्रामुख्याने तरुण मंडळींसाठी आहे
प्रवासात तरुण मंडळी अधिक असतात हे खरे, परंतु सर्व वयोगटातील लोक मला भेटलेले आहेत. उझबेकिस्तानात एक सहप्रवासी भेटलेला, रशियामधला. लग्न लवकर झाले, मुले झाली, पुढे ती शिकली आणि मार्गी लागली, आता हा बाबा सिल्क रूट भटकत आपली हौस पूर्ण करतो आहे. तशाच टर्कीमध्ये भेटलेल्या तैवानच्या मावशी. हैदराबादच्या वास्तव्यात ओळखीच्या झालेल्या एक प्राध्यापिकाही निवृत्ती जवळ आली असताना मिळालेल्या मोकळ्या वेळात प्रवासाचा मनसोक्त आनंद घेत असल्याचे आवर्जून कळवतात. बोस्टनमधली आणखी एक मैत्रीण सिसिलिया - नवऱ्याचे अचानक निधन झाल्यानंतर तिच्या पूर्वजांचा मागोवा घेत असताना होंडुरासमध्ये भेटलेली. माझ्या मते विशी-तिशीतल्या तरुणांनी जग समजण्यासाठी नक्कीच भटकंती करावी. पण ते वय उलटले तरीही वेळ काही गेलेली नाही, उलट पुढल्या वयात हा अनुभव नक्की पाच-सात वर्षांनी मानसिक वय कमी करेल व भोवतालच्या जगाची नव्याने ओळख होईल.
एकल प्रवास बॅचलर व त्यातही सिंगल लोकांसाठी आहे
बॅचलर व सिंगल असण्यासारखे स्वातंत्र्य नाही हे खरे. एकल प्रवासासाठी ही उत्तम अवस्था. बिनधास्त धमाल. सिंगल नसताना जोडीने भटकण्यातही खूप मजा आहे. परंतु आधीपासूनच 'मी टाइम'चे अंडरस्टॅण्डिंग असेल, तर दोघेही आपापल्या पद्धतीने अध्येमध्ये असे प्रवास नक्कीच करू शकतात. जोडीदाराला सवय नसेल तर एकदा बरोबर घेऊन जाऊन ओळख करून द्यावी, लेटर शी विल थँक यू फॉर धिस हा स्वानुभव. लेस स्ट्रिंग्स अटॅच्ड रिलेशनशिप समजूतदारपणाच्या वेगळ्याच प्रतलात नेते. अर्थात, आपापल्या जबाबदारीवर हे प्रयोग करावेत :-) प्रवासात असे इतरही अनेक जण भेटतात, मुलीला नवऱ्याबरोबर सोडून ब्रेक घेऊन आलेली ईसा, गर्लफ्रेंडला इटली भटकायला पाठवून उझबेकिस्तानात आलेला मासी, एंगेजमेंटच्या आधीची शेवटची भटकंती म्हणून आलेली मेक्सिकन हेमा असे अनेक...कोपान, होंडुरास. सिसिलिया आणि स्टेफ यांच्याबरोबर फुल मोकाट भटकंती. सिसिलियाने थोरल्या म्हणून आमची काळजी घेतलीच, पण आमच्या बरोबरीला येऊन गोष्टी एन्जॉयही केल्याने त्यांचेही दुःख जरा हलके झाले. एकल प्रवास करायचा म्हणजे सगळी उठाठेव स्वतःलाच करायला लागते
हे मात्र अगदी शंभर टक्के खरे. सगळी उठाठेव स्वतःच करायची आणि म्हणूनच डीआयवाय विभागात हा लेख. अर्थात सवयीप्रमाणे कमी-अधिक सोपे काम आहे हे. सर्वात आधी भटकंती कुठे व कशासाठी या दोन प्रश्नांवर उत्तर मिळाले की पुढचे बरेच सोपे आहे. उदाहरणार्थ, भारताचा सांस्कृतिक ठसा अनुभवण्यासाठी आग्नेय आशियामध्ये केलेला प्रवास. उद्दिष्ट ठरलेले असल्याने थायलँडमधले फुकेत, क्राबी, पट्टाया कितीही सुंदर असले तरी उद्दिष्टाशी एकरूपता नसल्याने प्रवासाच्या यादीत ते कधी आलेच नाहीत, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन टळले. आता अभ्यासाचा फोकस सुखोथाई वगैरे महत्त्वाच्या ठिकाणावर योग्य प्रकारे स्थिरावला. काही वेळा सहा सहा महिन्यांची तयारी लागते. त्यात स्थानिक भाषा, महत्त्वाच्या चालीरिती, सुरक्षेचा अभ्यास हे सर्व महत्त्वाचे घटक. अफगाणिस्तानात जाण्यासाठी ही सर्व तयारी आवश्यक होती. तर काही वेळा त्याउलट फक्त जायचे-यायचे तिकीट, बाकी सर्व जसे होईल तसे. पण सामान्य ठोकताळे द्यायचे म्हटले, तर सर्वात पहिले योग्य दरात तिकीट बुक करणे. भारतात व रेल्वेने प्रवास असेल तर तीन महिने आधी करावेच लागते, विमानाने असेल तर त्याप्रमाणे किमतींवर दोन आठवडे लक्ष ठेऊन योग्य वेळी बुक करणे. विमानासाठी मी momondo.com, skyscanner.com या साइट्स वापरतो. पुढे राहण्याची व्यवस्था, हॉस्टेल यासाठी agoda.com ही उत्तम. पण त्याआधी सोशल नेटवर्कवर झालेल्या दोस्तांचा सल्ला वापरायचा. couchsurfing.com हा स्थानिक दोस्त जोडण्यासाठी तसेच राहायची जागा फुकट किंवा स्वस्तात शोधण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग. त्याचबरोबर इथे त्या भागात येणारे सहप्रवासीही शोधता येतात. airbnb.com ही साइट स्थानिक कुटुंबाबरोबर राहण्याची इच्छा असेल तर सोयीस्कर आहे. परंतु कधीकधी येथे हॉटेलसारखीही व्यवस्था असू शकते, तेव्हा नीट माहिती वाचून मगच बुक करावे. या सगळ्याच साइट्सवर रिव्ह्यू वाचून मगच निर्णय घेणे सुरक्षित व शहाणपणाचे.कोपान होंडुरास, टिपिकल बॅकपॅकर स्वस्त हॉस्टेल. कुझको, पेरू. ऐतिहासिक इमारतीतले हॉटेल प्लस हॉस्टेल. इग्वाझू, ब्राझिल. साधी स्वच्छ मिक्स डॉर्मेटरी. बाकू, अझरबैजान. बंक बेड मिक्स डॉर्मेटरी. राहण्यासाठी स्वस्त आणि मस्त व्यवस्था, शिवाय नवे दोस्त हमखास. एकल प्रवास आवडेल, पण पण लोक काय म्हणतील...
हे आपण काहीही केले काय किंवा नाही केले काय, लोक काही ना काही तर म्हणणारच आहेत. माझ्या तर एका आत्याने फेसबुकवर ती नवीन असताना कुठल्याशा पोस्टवर #solotravel टॅग पाहून चक्क वॉलवर (जुन्या भाषेत, 'भर चौकात') विचारले, 'अजून सोलोच का?' असो. तर, लोक बोलतीलच, काही वैयक्तिक ध्येय ठेवून काही साध्य करण्यासाठी ही उठाठेव असेल, तर त्याची किंमत स्वतःला असली म्हणजे झाले. त्यामुळे प्रवासाच्या तयारीला लागून तिथे कसे लोक भेटतील याचा विचार अधिक फायद्याचा. जर कोणाच्या घरी उतरण्याइतके नाते जोडायचे असेल तर त्याला वेळ द्यावा लागतो. अर्थात, वेगळ्या मार्गाने त्या कुटुंबाला उपकाराची परतफेड निश्चित करावी. त्यामुळे हा फुकट मार्ग नक्कीच नाही, पण सुरक्षित नक्की आहे व अतिशय सहजतेने त्या संस्कृतीत आपल्याला सामावता येते. सवयीने साधते. सॅन बेनिटो, एल साल्वाडोर. एडविन व त्याचे कुटुंबीय, एक अविस्मरणीय प्रवास. कुरीतिबा, ब्राझिल. airbnbचा माझा सर्वोत्तम अनुभव जू आणि जो च्या घरी.
लेखाचा शेवट करताना, एक विचार. आयुष्य खूप सुंदर आहे, आणि हे जग अथांग आहे. तोकडे पडणार हे माहीत असूनही या दोन हातांनी, दोन डोळ्यांनी जे जे अनुभवता येईल तितके आपल्या झोळीत भरून घ्यायचा प्रयत्न. मनुष्याला सोबत कुणीतरी आहे हा फार मोठा भ्रम सदैव असतो. तो तसाच ठेवल्याने जगराहाटी चालू आहे. पण कटू सत्य हेच आहे की येताना आणि जाताना तर एकटे असतोच, तसेच त्या दोन प्रसंगांतले जीवन नावाचे अंतर चालतानाही आपल्या ओझ्याचे आपणच मालक नि आपणच वाहक! आणि यात DIYला पर्यायच नाही! त्यामुळे आपण सारेच खरे तर एकल प्रवासी... नाही का?
शुभं भवतु।
प्रतिक्रिया
17 Sep 2018 - 11:12 am | शान्तिप्रिय
मस्त लेख
एकल प्रवास नेहमीच थरारक असतो.
17 Sep 2018 - 11:14 am | कुमार१
जरा चाकोरीबाहेरील चाल, संयत व शिष्टसंमत असली तरी तुमच्या परिचित व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसल्यास इतरांचे कटाक्ष ओढवून घेऊ शकते. एकल प्रवासात तसे दडपण उरत नाही. >>>>> + १११
17 Sep 2018 - 1:05 pm | पद्मावति
अप्रतिम लेख.
17 Sep 2018 - 2:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम लेख. मूळातून भटक्या असल्याने आणि माझी बहुतांश भटकंती एकल झाली असल्याने मनाला खास भिडला.
एकल प्रवास म्हणजे एकट्याने प्रवासाला सुरुवात करणे, पण प्रवासात एकटे असणे नाही याच्याशी हजारदा सहमत ! माझ्याही एकल प्रवासात एखादाच चुकार दिवस गेला असेल की प्रवासात एखादा तरी कोणी अनोळखी साथीदार मिळाला नाही.
17 Sep 2018 - 2:41 pm | यशोधरा
सुर्रेख लेख!
बाप्पा नाही का एकटा येत आपल्याकडे आणि एकटा जातो परतून पुढच्या वर्षी यायला परत? तसेच!
17 Sep 2018 - 3:20 pm | कंजूस
फोटो देऊन छान लेख लिहिला आहे. आवडला.
17 Sep 2018 - 3:34 pm | सविता००१
अतिशयच सुन्दर लेख आहे. फार आवडला.
17 Sep 2018 - 3:57 pm | तुषार काळभोर
व्हिएतनाम ते कंबोडिया ते कझाकस्तान ते पेरू ते म्यानमार
आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक दृष्ट्या कसं काय जमतं ब्वॉ!!
इथं दोन दिवस महाबळेश्वरला नाहीतर कोकणात जायचं म्हटलं तरी रजा, पैसे, घरचे लोक, गाडी इतकं सगळं बघावं लागतं.
18 Sep 2018 - 1:11 pm | लई भारी
अगदी हेच म्हणतो :)
17 Sep 2018 - 4:29 pm | तेजस आठवले
तुमचे सगळेच प्रवासलेख अप्रतिम असतात. आवर्जून वाचतो. हा लेख पण चांगला झाला आहे. हा लेख एकल प्रवासाबाबत व्यावहारिक वर्णन टाळून थोडा भावनिक झाला आहे.
एकांताविषयी तुम्ही लिहिलेली वाक्ये अत्यंत चपखल आहेत. बऱ्याच लोकांना एकांताची भीती वाटते पण एकांतात बऱ्याच गोष्टींचा विचार योग्य मार्गाने होतो हा स्वानुभव आहे.काही काळ तरी एकट्याने व्यतीत प्रत्येकाने करायला पाहिजे. एकांतात अंतर्मुख होऊन एकाग्रतेने विचार करता येतो.
आपल्याकडच्या अनेक संतांनी त्यांचे विचार हे देशभ्रमण करूनच मांडले आहेत.शिष्यांचा गोतावळा जमा करून हिंडणे हे सध्याच्या काळात चालतं, पूर्वी असे नक्कीच नसावे.
हे सार्वकालिक सत्य आहे.
सहमत.ह्या भ्रमात बरीचशी माणसे आयुष्यभर वावरतात.बऱ्याच गोष्टी गृहीत धरून चालायची सवय असल्याने ह्या भ्रमाचे धुके कधीच दूर करता येत नाही. ज्या दिवशी मात्र हा खोटा भ्रम दूर होतो त्या दिवशी माणसाला एकटेपणाची जाणीव होते आणि तो कोलमडून पडतो.
अत्यंत सत्य.हे ज्याला समजले आणि उमगले तो तरला. त्याला ओझे वाहायचा कंटाळा येत नाही, मुळात ते ओझेच वाटत नाही.मात्र हे ज्याला समजत नाही किंवा समजून तो ते नाकारतो त्याला जीवन ओझे वाटते आणि तो ते लोढणे आयुष्यभर ओढतच राहतो.
पुढील लेखनाला शुभेच्छा!
17 Sep 2018 - 4:46 pm | नि३सोलपुरकर
अप्रतिम लेख.
17 Sep 2018 - 6:15 pm | पिलीयन रायडर
आवडलाच लेख! फार फार इच्छा असली तरी हे सध्या शक्य नाही... पण अर्थात काही वर्षांनी जेव्हा मुलगा जरा मोठा होईल तेव्हा असं फिरण्याची फार इच्छा आहे.
17 Sep 2018 - 9:18 pm | Nitin Palkar
अतिशय सुंदर लेख. आवडला.
17 Sep 2018 - 9:50 pm | पिंगू
भन्नाट आहे सगळे. माझीपण इच्छा उचल खायला लागली आहे, पण सध्या तरी कुठे जाणे शक्य नाही.. :(
18 Sep 2018 - 2:27 am | चित्रगुप्त
लेख अतिशय भावला.
योगायोग म्हणजे अनेक वर्षांनंतर मी पुन्हा एकदा अगदी एकटा रोम भटकंती लवकरच करणार आहे. वयानुसार थोडी गुडघेदुखी वगैरे मागे लागलेली असल्याने आपल्याला एवढे पायी चालणे जमेल का ही थोडी धाकधूक आहे...
18 Sep 2018 - 2:41 am | स्मिता.
हा लेख तर उत्तम आहेच आणि तुमचे आधीचे लेख वाचून फार हेवा वाटतो. आपणही उठावं आणि अश्या एकल प्रवासाला निघावं असं मनात येतं पण सर्वात पहिले आणि सर्वात जास्त 'स्व-सुरक्षिततेचं भय' मनाचा ताबा घेतं. त्यापुढे बाकीचे प्रश्न गौण वाटातात.
थोड्या विचारानंतर वाटलं कदाचित ही भारतीय स्त्री मानसिकता असू शकते. आपल्याकडे एकटीने जावून साधं चहा-नाष्टा करणं होत नाही तर एकटीने होंडुरास, ग्वाटेमाला, उझ्बेकिस्तान, इ. सारख्या देशात बॅकपॅकिंग हे स्वप्नातही येणार नाही.
18 Sep 2018 - 9:54 am | वरुण मोहिते
एकट्याने खूप प्रवास केलेत त्यामुळे अधिक भावला.
18 Sep 2018 - 9:59 am | इडली डोसा
तुम्ही लिहिलेले सगळेच मुद्दे आवडले. विषेश करून परपेच्युअल ट्रॅव्हल बद्दल लिहिलेल्या या गोष्टी तर फारच भावल्या>>
आपली एक क्रिएटिव्ह ओळख मागे ठेवणे, त्या त्या ठिकाणची आठवण-ओळख स्वतःबरोबर घेणे, जमल्यास लहानमोठे काम शोधणे (परदेशात असल्यास व्हिसा नियमानुसार) किंवा व्हॉलंटरी कुठल्या कामात विनामोबदला मदत करणे आणि या कशातही अडकून न पडता पुढल्या मुक्कामी जात राहणे...
ठिकाण ठरवणे, प्रवसाची तयारी आणि मुक्कामाचे नियोजन यबद्दल तुम्ही लिहिलं आहेच. तरीही तुमची प्लॅनिंग प्रोसेस जरा सविस्तर लिहाल का प्रतिसादात? म्हणजे साधारण किती दिवसांसाठीचा प्रवास तुम्ही नेहमी करता? स्थानिक संस्कृती वगैरे नीट जाणुन घ्यायची तर किती दिवसांचा प्रवास तुम्ही सुचवाल किंवा तुमच्या दॄष्टीने योग्य आहे? तुम्हाला अश्या प्रवासासाठी नोकरी/ व्यवसायातून वेळ काढायला काही अडचणी येतात का? असतील तर काय आणि त्या तुम्ही कशा मॅनेज करता? प्रवासासाठी बजेट कसे ठरवता आणि त्यासाठी दरवर्षाकाठी काही वेगळी बचत करता का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची यामागची प्रेरणा काय?
तुमच्या यापुढील अनेकानेक प्रवासांसाठी मनापासून शुभेच्छा!
19 Sep 2018 - 4:10 am | समर्पक
माझा मोठा प्रवास असतो दोन किंवा तीन आठवड्याचा, तो दोन तीन वर्षात एक. त्यात एखाद सुट्टी असेल असेही बघतो. बाकी प्रवास हे आठवड्याचे किंवा त्याहून कमी. अलीकडे, वीकांताच्या पुढे मागे मिळून ५ दिवस असा एक फॉरमॅट काही वेळा वापरला.
माझ्यामते स्थानिक संस्कृती जाणून घेण्याची सुरुवात प्रवासाच्या आधीपासूनच करावी लागते. संपन्न पाश्चात्य देशात देशात महिने किंवा वर्ष सुद्धा 'ऑफ' घेऊन लोक फिरतात तशी सुविधा आपल्या मध्यमवर्गीयांना नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मग एक्सप्लोअर करत शिकणे वगैरे वेळ व पैशात परवडण्यासारखे नाही. तेव्हा पूर्वतयारी करून, ज्या अनुभवाची अपेक्षा आहे त्यासाठी उपयुक्त असे लोक जोडणे अशी तयारी फार आवश्यक. परंतु सांस्कृतिक दृष्ट्या एखाद्या प्रदेशाचा खरा अनुभव घेण्यासाठी एक आठवडा तरी हवा. वैविध्यपूर्ण देशात हा कालावधी बराच अधिक, भारतासाठी मी परदेशी पर्यटकांना किमान सहा महिने सुचवतो
मीही सामान्य नोकरदार माणूस त्यामुळे इतरांसारख्याच या समस्या मलाही तितक्याच प्रमाणात लागू. त्यामुळे सुट्ट्यांची संख्या तेवढीच आहे, 'आजारी' सुद्धा काही ठराविक दिवसच पडता येते, व पगारही महिन्याअखेरीस सामान्य रेंज मधलाच खात्यात जमा होत असतो. गृहकर्ज इत्यादी जबाबदाऱ्याही आहेतच. त्यामुळे विशेष अशी एकच गोष्ट, प्रवासाची इच्छाशक्ती... तिच्या बळावर सगळं निभावतं... नेहमीप्रमाणे मॅनेजर २-३ दिवसांसाठी घासाघीस करण्याचा प्रयत्न करतो, मग मी त्याला संपूर्ण आराखडा वाचून दाखवतो. प्रवासाच्या शुभेच्छांनी चर्चा संपते. अफगाणिस्तानच्या वेळी व्यवस्थित माझी रिप्लेसमेंट बघून ठेवा इथपर्यंत त्यांचीही तयारी केलेली होती. सहसा कधी खोटे बोलत नाही व बाकी सोशल मीडिया मधून त्यांना अपडेट कळत असतेच, त्यामुळे एक ट्रान्सपरन्सी बाळगल्याच्या फायदा म्हणा, पण कधी कोणी मोडता घातल्याचा आजपर्यंत अनुभव नाही.
हो बजेट हा महत्वाचा भाग आहे. काही वेळा त्यासाठी बरीच तयारी करावी लागते. यावर्षी मध्य आशिया भटकंती केली त्याची तयारी म्हणजे त्याच्या आधी एक पूर्ण वर्ष "प्रवास उपवास" केला होता. आता मला ओळखणारे खरंच यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण कटाक्षाने अगदी विकांत प्रवाससुद्धा केलेला नाही. वर्षभर! त्यामुळे सुट्ट्यांची बचतही आपोआप झालीच. टॅक्स रिफंड ची रक्कम न चुकता प्रवासास वापरली जाते, तसेच बोनस इत्यादी सुद्धा. त्यामुळे बाकीच्या नियोजनास फार झळ पोहोचत नाही. पण आता एखादी गोष्ट करणे आहे म्हणजे बाकीच्या काही बाबतीत थोडी कळ सोसावी लागते, याला जीवन ऐसे नाव, कुबेराचे वंशज आपण कोणीच नाही...
सांस्कृतिक वैविध्याचा अनुभव करण्याची हौस-आवड-छंद. आणि कोणाचा विश्वास बसो वा ना बसो पण विचारलंत म्हणून सांगतो, हि अंतःप्रेरणा इतक्या विशुद्ध प्रतीची असते कि त्या हाकेला प्रतिसाद देत केलेले परिश्रम, चाललेली परिक्रमा व पूर्ततेची प्रचिती ही एखाद्या सफल यात्रेप्रमाणे शांती व समाधान देते.
शुभेच्छांसाठी धन्यवाद :-)
19 Sep 2018 - 12:15 pm | सविता००१
आणि उपयुक्त प्रतिसाद
21 Sep 2018 - 4:39 am | इडली डोसा
सगळ्याच प्रश्नांची प्रामाणिक आणि मनापासून उत्तर लिहिलीत तुम्ही, यातल्या काही गोष्टींशी नक्कीच रिलेट करता आले.
अंतःप्रेरणा इतक्या विशुद्ध प्रतीची असते कि त्या हाकेला प्रतिसाद देत केलेले परिश्रम, चाललेली परिक्रमा व पूर्ततेची प्रचिती ही एखाद्या सफल यात्रेप्रमाणे शांती व समाधान देते. हे एकदम खास, हि अनुभूती कोणाला सांगता किंवा दाखवता येणार नाही ती प्रत्येकाला स्वतःच अनुभवावी लागेल.
धन्यवाद _/\_
18 Sep 2018 - 11:28 am | मार्गी
नेहमीप्रमाणेच उत्तम लेख! प्रवासाची ज्ञानार्जनाचे साधन ह्या अर्थाने महत्ता मानली जाते, हे नव्यानेच कळालं! सविस्तर माहितीसाठी खूप धन्यवाद!
18 Sep 2018 - 12:14 pm | अनिंद्य
हे DIY अगदी बेस्ट !
18 Sep 2018 - 12:33 pm | अथांग आकाश
नुकतीच इथे वाचनात आलेली एकल प्रवासाची लेख मालिका, आणि आता अशा प्रकारच्या प्रवासात येणारे सुखद अनुभव, समस्या, घ्यावयाची काळजी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा तुमचा हा अप्रतिम लेख वाचल्यावर एकल प्रवास करण्याची प्रबळ इच्छा झाली आहे. keep it up! all the best!
18 Sep 2018 - 12:48 pm | मी उनाड
विएतनाम ची अशीच एकल यात्रा करु इच्छितो ..... आपनाकडुन काही मार्गदर्शन मिळाल्यास आभारी ...... दहा ते बारा दिवसामधे शक्य होइल का विएतनाम पुर्ण पाहुन ?
18 Sep 2018 - 11:10 pm | समर्पक
व्हिएतनाम ! मेकाँग चा त्रिभूजप्रदेश, सायगांव, प्राचीन चंपा राज्यातले हिंदू मंदिरांचे अवशेष हे दक्षिणेकडे, मध्यभागात हुई व होई आन ची प्राचीन शहरे, आणि हानोई, हालॉंग बे तसेच काही लवणस्तंभांच्या गुहा हे उत्तरेकडे असा प्रवास विभागू शकता. दोन आठवडे नक्की पुरतील.
हो ची मिन्ह मधून कंबोडिया साठी बस सेवा उपलब्ध आहे, अंकोरवट सुद्धा पाहून येऊ शकता.
18 Sep 2018 - 2:56 pm | मंजूताई
अतिशय माहितीपूर्ण लेख अतिशय आवडला. एकदा असा एकल प्रवास करायची प्रचंड इच्छा आहे. तुमच्या प्रवासलेखनाची फ्यान
18 Sep 2018 - 3:16 pm | चांदणे संदीप
DIY सदरांतर्गत जरी हा लेख असला तरीही, एकूणच प्रवास या विषयावरचा आतापर्यंतचा मी वाचलेला सर्वात उत्कृष्ट लेख!
शिवाय नॅनो पण समर्पक असे प्रवासवर्णनही सोबतीला चपखलपणे समर्पक यांनी जोडलेले आहे.
कारवा चलता हैं, चलता ही जायेगा,
वक्त की रेत पर किसके निशां रहे हैं।
Sandy
18 Sep 2018 - 3:20 pm | टर्मीनेटर
खूप छान लिहिलं आहेत समर्पकजी. अगदी योग्य माहिती. प्रत्येकाने एकल प्रवासाचा आनंद घ्यावाच. एका (आगाऊ) सुचने बद्दल आगाऊ माफी मागून वाचकांच्या माहितीसाठी एक छोटीशी भर घालतो, "कुठल्याही कारणाने मग ती घटना, प्रसंग वा समस्या छोटी असो किंवा मोठी जर कोणी 'पॅनिक' होत असतील तर अशा व्यक्तींनी एकल प्रवास टाळावा."
अवांतर: जरा अझरबैजान बद्दल एक सविस्तर लेख लिहा ना, खूप इच्छा आहे तिथे जाण्याआधी त्या देशाबद्दल माहिती जाणून घेण्याची.
24 Sep 2018 - 10:14 pm | समर्पक
बॅकलॉग फार मोठा आहे, पण लवकरच... :-)
18 Sep 2018 - 4:23 pm | नंदन
लेख अतिशय आवडला.
अगदी, अगदी. अशा प्लॅनिंगमध्ये, माहितीची शोधाशोध करून बेत आखण्यामध्ये प्रवासाचा निम्मा आनंद असतो.
19 Sep 2018 - 6:09 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेख.
19 Sep 2018 - 6:17 pm | राघवेंद्र
मस्त हो समर्पक भाऊ !!!
मी जवळपास भारतीय रेस्टॉरंट आहे ना हे फक्त बघतो :)
21 Sep 2018 - 9:10 pm | चौकटराजा
भारत देशात यात्रा कंपनी खेरीज प्रवास करणे हे चेष्टेचा विषय . त्यात परदेश प्रवास ...त्यात एकल प्रवास ! बाबो ! सलाम ... !मे २०१९ मध्ये टर्की चा एकल प्रवास करण्याचे स्वप्न आहे . बघू किती जमते !
22 Sep 2018 - 12:20 am | मुक्त विहारि
लेख आवडला...
24 Sep 2018 - 11:01 am | प्रशांत
अतिशय सुंदर लेख
24 Sep 2018 - 12:14 pm | प्रसाद_१९८२
अतिशय छान लेख. खूप आवडला.
--
तुम्ही भारत सरकार तर्फे अयोजित केली जाणारी, 'कैलास-मानसरोवर' यात्रा केली आहे का ?
24 Sep 2018 - 10:35 pm | समर्पक
नाही... ते लॉटरी वगैरे प्रकरण जरा त्रासाचं वाटतं, पण जायची इच्छा आहे. अलिकडे मध्य आशियाच्या अभ्यासाच्यावेळी चक्षू-सीतेचा शोध घेताना सिंधू, सतलज, ब्रह्मपुत्र व शरयू/गंडकी यांची उगमस्थाने या क्षेत्रात येतात त्याचा बराच अभ्यास झाला. त्यामुळे जर यात्रा घडलीच तर ती अशा विस्तृत क्षेत्राची करण्याचा विचार आहे. कितपत शक्य आहे ते भगवंतास ठाऊक...
24 Sep 2018 - 7:53 pm | चौकटराजा
प्रवास करण्याच्या अनेक शैली असतात . तूनळीवर एका उपेंद्र नावाच्या मुंबईकराने ४० मिनिटाचे १४ भाग एकट्या लखनौ वर केले आहेत. त्याचे सर्वात शेवटी सादर शहरावर केलेले शास्त्रीय " टूरिझम अनालिसिस " पण आहे. मी तरी आतापर्यंत असा प्रयत्न पाहिला नाही. ट्रॅव्हल एक्सपी वर फक्त खाणे व पोहणे असा प्रवासाची व्याख्या असलेले एपिसोडस असतात त्या तुलनेत व्यक्तिगत प्रयत्न मला तरी आवडला .
24 Sep 2018 - 7:56 pm | चौकटराजा
सरासरी २५ मिनिटाचे भाग आहेत !
26 Sep 2018 - 7:13 am | सुधीर कांदळकर
लेख आवडला. धन्यवाद.
या वर्षी बरेच मानसरोवर यात्री दोन यात्रा कंपन्यातल्या मतभेदामुळे चीन सीमेवर अडकले होते अशी बातमी चित्रवाणीवर पाहिली. माझा अनेक वेळचा सहयात्री असलेला पुण्याचा मित्र त्या यात्रेत होता. त्याला त्वरित वॉट्स अप वर विचारले. तोपर्यंत सर्व यात्री पेचप्रसंगातून सुटले होते. पुण्याच्या त्या यात्रा कंपनीचा मालक एक निर्ढावलेला कोडगा माणूस होता. ७० जणांच्या सोयीत १२० जण कोंबले होते. त्याच्यावर कोणाच्याही बोलण्याचा काहीही परिणाम होत नसे. बहुते यात्री मध्यमवयीन होते. परत आल्यावर एकाने यात्रा कंपनी मालकाच्या कानाखाली वाजवली. तरी त्याला काही वाटले नाही. तेव्हा मानसरोवर यात्रेबद्दल सावधान.
26 Sep 2018 - 9:59 am | गवि
एकल प्रवास करणाऱ्या मुसाफिरांची बाजू उत्तमरित्या मांडली आहेत. एकल प्रवासाबाबतचे मनात नोंद न झालेले अनेक मुद्दे या लेखात पुढे आले आहेत.
अर्थात प्रवास, स्थानिक असो की ग्लोबल, कितीही कॉस्ट इफेक्टिव्ह केला तरी त्यासाठी वेळ आणि पैसे हे दोन घटक मॅनेज केल्याशिवाय पुढे सुरुवातही करता येत नाही. बहुतांश बाबतीत सलग मोकळा वेळ (आठ ते अठ्ठावीस कितीही दिवस) आणि आर्थिक जुळणी यामध्ये एकूण "क्ष" वर्षांत किती सफरी करता येतील त्याचा एक "य" आकडा मर्यादित असतो.
त्यामध्ये पूर्ण एकट्याने किती करायच्या, आणि सोबतीने किती करायच्या हे ठरवणं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. भारतीय पार्श्वभूमीवर एकट्या पतीने पेरू, अर्जेंटिना, चिली किंवा मदुराई, कन्याकुमारी, पोंडीचेरी किंवा चीन, जपान, कोरिया फिरून येणं आणि नंतर पत्नीने एकटीने या ठिकाणी जाऊन येणं हे व्यवहारात अशक्य आहे किंवा exceedingly rare आहे. किंवा या सर्व टूर्स एकदा एकट्याने (एकल अनुभवासाठी) आणि पुन्हा सोबत(शेअरिंग अनुभवासाठी) एकत्र अशा दोनदा करणं हे तर डबल बजेट, डबल सुट्ट्या यांमुळे आणिकच अवघड. बरं, एकट्याने एक रूट आणि एकत्र सोबतीने दुसराच रूट अशी विविधता केली तर काही जणांना एक रूट मिळणारच नाही.
तेव्हा एकल प्रवास अनेक बाबतीत वेगळा आहे हे खरं आणि तो कधी ना कधी करावा. पण तो बॅचलर लोक आणि भरपूर सुट्टी उपलब्ध असलेले / प्रवास हाच मुख्य खर्चाचा विषय ठेवू शकणारे लोक यांच्यासाठीच आदर्श आहे. फॅमिली असूनही असे एकल प्रवास तितकेच सहज होतील असं नाही.
तस्मात
एकल प्रवास बॅचलर व त्यातही सिंगल लोकांसाठी आहे
ही मिथ नाही. किमान ९९% बाबतीत.
पुन्हा एकदा, लेख अतिशय सुरेख आहे.
26 Sep 2018 - 10:09 am | गवि
अनेक लोकांना एकल प्रवासाची किंचित, काहीशी, सूक्ष्म का होईना, पण एक झलक व्यावसायिक कारणांसाठी केलेल्या टूर्समध्ये मिळते. कंपनी, व्यवसाय, कॉन्फरन्स इत्यादीसाठी एकट्याने प्रवास करताना त्याला जोडून थोडंसं फिरणं, साईट सीईंग होतं. ही सर्व ठिकाणं कुटुंबासाहित स्वखर्चाने पाहणं वेगळ्या वेळी परत घडेल असं नसतं. अनेकांना अशा वेळी पावलोपावली आपल्या लोकांची आठवण येऊन त्या ठिकाणी मन न रमणं असाही अनुभव येतो. शिरीष कणेकरांनी एका प्रवासवर्णनात लिहिलं आहे की एकटेच परदेशात फिरत असताना चॉकलेट फॅक्टरी बघितली. आत्ता आपली मुलगी इथे हवी होती, तिला किती मजा वाटली असती" असं वाटून त्यांना एकही चॉकलेट गिळवेना. तरी त्यांनी "आता तू एकटा तरी एन्जॉय कर" असं स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला.
असंच तीव्रतेने त्यांना डिस्नेलँडमध्ये आणि अन्य ठिकाणीही वाटलं ("अरे त्यांनी हे बघायला हवं होतं") अशी त्यांनी नोंद केली आहे. एरवी पत्नी आणि कुटुंबावरून कसेही विनोद करणाऱ्या कणेकरांचं हे एक्सप्रेशन टचिंग वाटलं होतं.