श्रीगणेश लेखमाला - मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग ३)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in लेखमाला
20 Sep 2018 - 9:02 am

.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग ३)
यापूर्वीचे कथानक :
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १https://www.misalpav.com/node/41194
मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग २https://www.misalpav.com/node/41865
लोरेंझो गेरार्दिनीची रोजनिशी :
गावातल्या चर्चमधल्या कामाखेरीज जवळजवळ रोजच घराबाहेर पडून दिसतील ती दृश्ये, व्यक्ती, जनावरे वगैरेंची चित्रे काढण्याचा सराव मी करत असे.
.

.
चित्र 1 : Pieter Bruegel the Elder आणि 2 : चित्रकारः Dirck van Bergen

.
चित्र 3. William-Adolphe Bouguereau

असेच एकदा चित्र काढताना कोणीतरी सांगितले की गावात ‘लिओनार्दो दा विन्ची’ आलेले आहेत. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आमच्या लहानशा गावात दा विन्चीसारख्या सुप्रसिद्ध व्यक्तीचे आगमन ही एक फार मोठी घटना होती. त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि ते ज्या उमरावाकडे उतरले होते, त्याने पूर्ण गावाला मोठी मेजवानी दिली आणि संगीताची मैफील भरवली.
.
चित्र 4. चित्रकार: Alma-Tadema

चित्र 5. चित्रकार: Pieter Bruegel the elder
.
चित्र 6. चित्रकार: Gerard van Honthorst
.
दुसऱ्या दिवशी ते आमचे काम बघण्यासाठी चर्चमध्ये आले. एकंदरीत सर्वांचेच काम त्यांच्या पसंतीस उतरले. माझ्या चित्राची त्यांनी बरीच वाखाणणी केली आणि मी कोण, कुठला वगैरे चौकशी केली.
दोन दिवसानंतर प्रत्यक्ष लिओनार्दो अचानक आमच्या घरी आले. मला तर काही सुचेनासेच झाले. एवढी मोठी आसामी आमच्या घरी येण्याचा हा पहिलाच प्रसंग. आईने प्रसंगावधान राखून पटकन स्वयंपाकघरात जाऊन काही खाद्यपदार्थ बनवून आणले.
.
चित्र 7. Johannes Vermeer

आमच्या घरी ते संध्याकाळी उशिरापर्यंत थांबले. त्यांनी एलीला काही गमतीदार नकला करून दाखवल्या, आईशी जुन्या काळातल्या घटनांविषयी गप्पा केल्या आणि मला चित्रकलेतल्या नवनवीन प्रयोगांबद्दल माहिती सांगताना एका लाकडी फळीवर पटाशीने कोरून चित्र बनवणेही शिकवले.
.
चित्र 8. Gerard van Honthors

एलीने एक गाणे म्हणून दाखवले.
.
चित्र 9. Gerard ter Borch the Younger

दा विन्ची यांनी आमच्या घराण्याबद्दल, पूर्वजांबद्दल बारकाईने चौकशी केली. टोलेडोमध्ये आमच्या कुटुंबावर ओढवलेला प्रसंग आणि त्यात वडिलांचा गेलेला बळी याविषयी ऐकून ते फार द्रवित झाले. मात्र सेरिपीचा उल्लेख येताच त्यांचे कुतूहल एकदम जागृत होऊन त्यांनी याविषयी खूपच उत्सुकता दर्शवली. मी त्यांना सेरिपी आणून दाखवताच ते विचारमग्न झाले आणि तिचे बारकाईने निरीक्षण केल्यावर त्यांना एक गुप्त कळ सापडली. ती कळ दाबताच सेरिपीचे पाते आणि मूठ, याच्या मधली जागा उघडली जाऊन तिथे एक पट्टी दिसू लागली. पट्टीच्या कडेला अगदी बारीक अक्षरात काहीतरी कोरलेले होते. "ग्रीक भाषेत या सेरिपीबद्दल माहिती इथे कोरलेली आहे" लिओनार्दो म्हणाले… "आणि असेही लिहिलेले आहे, की या सेरिपीचा स्वामी - म्हणजे तू - जेव्हा अगदी मन:पूर्वक विनंती करशील, तेव्हा तुला त्या पट्टीवर मार्गदर्शन केलेले दिसेल. तुझ्यासाठी ही अगदी अमूल्य ठेव आहे लोरेंझो. आणि ही नेहमी फक्त तुझ्याच कुटुंबात राहायला हवी. हिला कधीही अंतर देऊ नकोस."
मग त्यांनी मला सांगितले, की माझे इथले चर्चमधले काम पूर्ण झाल्यावर मी त्यांच्याकडे मिलानला जावे आणि त्यांचा शिष्य म्हणून काम सुरू करावे. "पण त्यापूर्वी तुला आणखी एका परीक्षेतून जावे लागेल आणि त्याविषयी मी एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. तू प्रवासाला तयार झालास की ही थैली उघड आणि त्यातल्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे कर" एवढे बोलून त्यांनी आमचा निरोप घेतला.
सुमारे महिनाभरानंतर चर्चचे काम संपले, त्यातून मला चांगले पैसे मिळाले. प्रवासखर्चापुरते माझ्याकडे ठेवून मी बाकी सर्व आईकडे दिले. प्रवास किती दिवसांचा आहे, मला कोणत्या परीक्षेतून जायचे आहे, हे मला काहीच ठाऊक नव्हते. मी आता जाणार म्हणून आई आणि एलीसुद्धा बावरल्या होत्या. शेवटी मी आता निघायचेच, असे ठरवून थैली उघडली. थैलीत एक कागद होता आणि त्यावर पुढील मजकूर होता :
"लोरेंझो, तुझे चित्रकलेतले प्रावीण्य आणि तुझी तळमळ बघून मी तुला शिष्य म्हणून निवडले आहे. मी तुला मिलान शहरात भेटेन, पण त्यापूर्वी तुला 'इस्कीहार' हे रत्न बसवलेली अंगठी शोधून आणायची आहे. ही तुझ्यासाठी एक परीक्षा समज. हे रत्न प्राचीन काळी डेल्फीच्या मंदिरात होते. पुढे ते रोमन सम्राट ऑगस्टस, व्हेस्पेशियन, झेनोबिया वगैरेंकडे राहत शेवटी फ्रान्सच्या शार्लमेन राजाकडे ८०१ साली आले. त्याने ते अंगठीत जडवून नित्य धारण करायला सुरुवात केली. पुढे ते पहिल्या लुईपासून सातव्या चार्ल्सपर्यंत सतत फ्रान्सच्या राजांकडे होते.
१४६१मध्ये चार्ल्सच्या मृत्यूनंतर मात्र ते अचानक नाहीसे झाले, ते आजतागायत. ते शोधून काढण्यासाठी तुला एकट्याने प्रवास करावा लागेल. वाटेत तुला जिथे जिथे, जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तू चित्रकलेची साधना अवश्य करावीस आणि मार्गदर्शनासाठी सेरिपीची मदत घ्यावीस". हे वाचून मी धडधडत्या काळजाने सेरिपीची कळ दाबली. बघतो, तो पट्टीवर खरोखरच अक्षरे उमटली होती -
भीषणराती समुद्रकाठी
फुटके गलबत .. लाटा उठती
विद्युत चमके
आणि दिसे मग
दूरवरी तो किल्ला
तेथे जाता आणि त्वरेने
मिळेल पुढला सल्ला...
बापरे... मला कुठेतरी जायला सांगितले आहे... समुद्रकिनारा.. भीषण रात्र.. किल्ला...? नेमके जायचे कुठे हे काहीच कळेना.
आमच्या गावापासून जवळचा समुद्रकिनारा म्हणजे जेनोआ किंवा पोर्तोफिनो.
मला आठवले, लहानपणी आम्ही मुले गावात राहाणाऱ्या एका खलाशाच्या घरी जायचो, तो आम्हाला त्याच्या समुद्री सफरींच्या खूप गोष्टी सांगायचा. मग मी लगेच त्याच्याकडे जाऊन चौकशी केली.
.
चित्र 10. Adolf Eberle

वादळात गलबते खडकवर आपटून फुटण्याच्या घटना पोर्तोफिनोला जास्त घडतात आणि तिथे पोहोचायचे म्हणजे सुमारे पाऊणशे मैलांचा प्रवास असल्याचे त्याने सांगितले. (एक मैल वा ‘मीले पासूम’ म्हणजे व्याख्येप्रमाणे ‘हजार पावले’ असली, तरी प्रत्यक्षात सुमारे दोन ते पाच हजार पावले चालावेत, तेव्हा एक मैल होतो, असेही त्याने सांगितले.)
मग प्रवासाची तयारी करून, एलीचा आणि आईचा निरोप घेऊन मी निघालो.
पोर्तोफिनोपर्यंत पोहोचायला मला पुष्कळ दिवस लागले. बराचसा प्रवास समुद्रकाठाने करताना खूप सुंदर दृश्ये दिसली.
.

.
चित्र 11,12 Claude Joseph Vernet
.
चित्र 13. Claude Lorrain.

पोर्तोफिनोला पोहोचलो, त्याच रात्री भयंकर वादळ आले, समुद्राचे तांडव सुरू झाले. मोठमोठ्या लाटा समुद्रात उठत होत्या. एक गलबत फुटून किनाऱ्याला लागले होते, त्यातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न चालला होता. तेवढ्यात वीज कडाडली आणि मला दूर डोंगरावर एक किल्ला दिसला.
.
चित्र 14. Joseph Vernet
'तेथे जाता आणि त्वरेने' हे आठवून मी लगेचच त्या अंधारात, भर पावसात किल्ल्याकडे निघालो...
(क्रमश:)
पुढील कथा : किल्ल्यात लोरेंझोला काय दिसले? एलीचे पुढे काय झाले? दा विंचीने तिचे चित्र केव्हा रंगवले? तेच ‘मोनालिसा’ का? तिच्या गूढ स्मिताचे रहस्य कोणते?

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2018 - 11:28 am | ज्योति अळवणी

लवकर येउद्या पुढचा भाग. उत्सुकतेने वाट पाहाते आहे

यशोधरा's picture

20 Sep 2018 - 11:37 am | यशोधरा

मस्त! वाचते आहे. पुढचे भाग लवकर टाका.

चिगो's picture

20 Sep 2018 - 12:22 pm | चिगो

आत्ताच तिन्ही भाग वाचले. अत्यंत सुंदर चित्रे आणि रहस्य ह्यांची अप्रतिम गुंफण केली आहे तुम्ही.. जबरदस्त !

मुजरा स्विकारावा..

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2018 - 1:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहिती आणि चित्रांची भन्नाट गुंफण !

या निमित्ताने बराच काळ अडून राहिलेली ही मालिका सुरू केलीत हे फार छान झाले ! आता पटापट पुढचे भाग टाकावे.

११ क्रमांकाचे चित्र व विशेषतः त्यातला छायाप्रकाशाचा खेळ फारच आवडला !

ayush sharad wadnere's picture

20 Sep 2018 - 3:53 pm | ayush sharad wadnere

मस्त लेखमाला आहे.. असच लेखन करत राहा
मोनालिसा विशयी बरच माहित झाल.....

अहो चित्रगुप्त साहेब , कृपा करून लवकर टाका पुढचा भाग . मोनालिसा डोक्यात एकदम फिट्ट बसली आहे . उत्सुकता वाढलेली आहे .

अनन्त्_यात्री's picture

20 Sep 2018 - 6:30 pm | अनन्त्_यात्री

सुन्दर चित्रकथा !

तुषार काळभोर's picture

20 Sep 2018 - 7:13 pm | तुषार काळभोर

हा खजिना दाखवण्यासाठी शतशः धन्यवाद

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा
या मालिकेचा पहिला भाग...
चित्रगुप्त in दिवाळी अंक
21 Oct 2017 - 12:00 am
दुसरा भाग...
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
26 Jan 2018 - 4:06 pm
आणि आता तिसरा भाग...
चित्रगुप्त in लेखमाला
20 Sep 2018 - 9:02 am
काय प्रकार आहे हा नक्की? नाही मालिका खूप रोचक आहे, पण नक्की आम्ही ती दिवाळी विशेषांक (2017) म्हणून वाचायची कि अशीच अधली मधली मालिका म्हणून वाचायची कि श्रीगणेश लेखमाला २०१८ मधे प्रसिध्द झालेली म्हणून वाचायची?

साहित्य संपादक's picture

20 Sep 2018 - 11:01 pm | साहित्य संपादक

अथांग आकाश जी, गेल्या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकात या मालिकेचा शुभारंभ झाला होता. आज श्री गणेश लेखमालीकेत याचा तीसरा भाग आलाय. एकसंध लेखमालाच आहे ही फक्त एव्हडंच की आपल्या विशेषांकांच्या माध्यमातून (एका भागाचा अपवाद वगळता) ही मालीका पुढे जात आहे.

भृशुंडी's picture

20 Sep 2018 - 11:11 pm | भृशुंडी

मस्त.
अवांतर - जी. एंची "इस्किलार" ह्यावरच बेतली आहे काय?

चित्रगुप्त's picture

23 Sep 2018 - 11:43 pm | चित्रगुप्त

जी. एंची "इस्किलार" ह्यावरच बेतली आहे काय?

इस्किलार' माझी अतिशय आवडती कथा आहे. त्यातील सेरिपी एली इस्किहार या त्रयीचा थोड्या अर्थाच्या फरकाने माझ्या कथेत उपयोग केला आहे. त्यामागचे कारण कथेच्या अगदी शेवटी कळेल.

चित्रगुप्त's picture

20 Sep 2018 - 11:13 pm | चित्रगुप्त

माझ्या काही मर्यादांमुळे मला ही मालिका सलगपणे लिहिता येत नाहिये. मला अभिप्रेत असलेल्या स्वरूपात, म्हणजे १६-१७ व्या शतकातील युरोपीय सांस्कृतिक पुनरोत्थानाचा - त्यातील दा विंची, सीझर/ ल्युक्रेशिया बोर्जिया, राफाएल, मिशेलएन्जेलो , सावानारोला वगैरे व्यक्तींच्या प्रभावाचा शोध घेत, मुख्य कथा मांडायची आहे. यासाठी तात्कालीन इतिहास, राजसत्ता, तंत्रज्ञान (ज्यात लिओनार्दोचा फार मोठा सहभाग होता) चित्र-मूर्तीकला वगैरेंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जालावर विपुल साहित्य उपलब्ध असूनही मला डोळ्यांच्या त्रासामुळे पाहिजे तेवढा अभ्यास करणे कठीण जात आहे , त्यामुळे विलंब होत आहे. क्षमस्व.

अथांग आकाश's picture

20 Sep 2018 - 11:36 pm | अथांग आकाश

काही हरकत नाही हो साहेब! मालिका खूप रोचक आहे! Take your own time! थोडं कन्फ्युजन झालं होतं म्हणून प्रश्न पडला होता! All the best!

प्रचेतस's picture

21 Sep 2018 - 8:26 am | प्रचेतस

जबरदस्त लिहित आहात काका.

प्रशांत's picture

24 Sep 2018 - 11:03 am | प्रशांत

काका पुढचा भाग कधि लिहता ?

सविता००१'s picture

21 Sep 2018 - 5:01 pm | सविता००१

मस्त लेखमाला आणि अप्रतिम चित्रे.
वा.खू. साठवीत आहे.

पद्मावति's picture

21 Sep 2018 - 7:59 pm | पद्मावति

अप्रतिम लेखमाला.

मित्रहो's picture

22 Sep 2018 - 7:40 am | मित्रहो

तिसरा भाग आला.
रोचक. चित्रे पण सुंदर

बबन ताम्बे's picture

22 Sep 2018 - 5:13 pm | बबन ताम्बे

कथा आणि चित्रे, दोन्ही अप्रतिम !! पुढच्या भागांची आणि चित्रांची उतकंठा लागून राहिली आहे.

कथानायक आणि त्याच्या थरारक अनुभव मालिकेतून ऐतिहासिक घटना, चित्रकारितेची वैशिष्ट्ये दर्शवत, सुप्रसिद्ध कलाकाराच्या आम्हाला अज्ञात कलाकृती पहायला सफरीवर नेता! मिसळपाव वर ही नयनरम्य फीस्ट आहे...
ती दुधारी सेरीपि कट्यार! अविश्वसनीय प्रवास करून एली कशी विंन्सि कडे पोहोचणार?
चर्मचक्षु पीडेने विद्ध झाल्याने नाउमेद होऊ नये...
आपले कलाचक्षु विशाल आहेत..

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2018 - 7:43 am | सुधीर कांदळकर

चित्रांची निवड, चित्रकारीची आणि साहित्याची समज, लेखाचे शब्दांकन आणि रचना, सारे काही स्वप्नवत आहे. धन्यवाद.

चौकटराजा's picture

23 Sep 2018 - 10:26 am | चौकटराजा

मुळात ही कल्पनाच भारी की सुप्रसिद्ध चित्रे , इतिहासातील संदर्भ व एका अवलियाने केलेले एक जगप्रसिद्ध चित्र ( मी दहा फुटावरून पाहिलेले ) यांची सांगड तर घालायची व कथा ओघवत्या शैलीने रंजक , रहस्य प्रधान बनवायची ! कोणत्या शब्दात आभार मानायचे .सर्वच चित्रे स्तिमित करणारी आहेत.

वरुण मोहिते's picture

24 Sep 2018 - 5:53 am | वरुण मोहिते

वाट पाहत आहे.

रोचक लिखाणाला अप्रतिम चित्रांची जोड. छान चालू आहे मालिका, पुढचा भाग लवकर येउद्यात.

चित्रगुप्त's picture

1 Oct 2018 - 2:37 pm | चित्रगुप्त

सर्व प्रतिसादक आणि वाचक यांचा आभारी आहे. सर्वांना कथा आणि चित्रे आवडत आहेत हे निश्चितच प्रेरणादायक आहे. पुढील भाग लिहीत असून दिवाळी अंकात यावा.

विवेकपटाईत's picture

2 Oct 2018 - 8:01 am | विवेकपटाईत

आवडले, पुढच्या भागाची वाट पाहतो.

श्वेता२४'s picture

4 Oct 2018 - 5:27 pm | श्वेता२४

आता पुढील भाग वाचण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघणे आले.