श्रीगणेश लेखमाला - छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in लेखमाला
20 Sep 2018 - 8:51 am

.

छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी

मी काही कलाकार नाही, परंतु तांत्रिक ज्ञान थोडेफार आहे, म्हणून स्वतःच्या तुटपुंज्या तंत्रिक ज्ञानाने केलेल्या काही गोष्टी इथे देत आहे.

१. स्पार्क प्लगची समस्या सोडवली एका क्लृप्तीने

मी एम.बी.बी.एस. करीत असताना माझ्या भावाने एक जपानी बनावटीची होंडा मोटरसायकल सेकंड हँड विकत घेतली होती. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे याला रोटरी गिअर्स होते - म्हणजे आपण हिरो होंडाला कसे न्यूट्रलनंतर एक, दोन, तीन आणि चार असे गिअर्स टाकतो आणि उलटे येण्यासाठी ४-३-२-१ करीत खाली येतो, त्याऐवजी या गाडीला चौथ्या गिअरनंतर परत न्यूट्रल गिअर टाकता येत असे आणि तसेच या न्यूट्रलनंतर परत १-२-३-४ असे जाता येत असे. याचा फायदा म्हणजे एकदम स्पीड ब्रेकर आला किंवा सिग्नल लाल झाला, तर ब्रेक मारल्यावर चौथ्या गिअरमधून थेट न्यूट्रलमध्ये जाऊन परत पहिल्या गिअरमध्ये गाडी उचलता येत असे. यामुळे पटकन वेग घेऊन गाडी पुढे काढता येत असे. मी एम.बी.बी.एस. पास झालो होतो आणि आता नौदलात २५ डिसेंबरला कमिशनिंग होणार होते, म्हणून मी भावाकडून ही गाडी घेऊन पुण्याला चालवत नेली होती. एकदम 'जपानी' इंपोर्टेड गाडी आणल्यामुळे तेथे मला बराच भाव मिळाला होता. ती गाडी मी महिनाभर पुण्यात सगळीकडे चालवली होती. परंतु २५ डिसेंबरला कमिशनिंग झाले आणि तीन दिवसांनी २८ तारखेला, म्हणजे मुंबईला यायच्या तीन दिवस अगोदर या गाडीचा स्पार्क प्लग काम करेनासा झाला, म्हणजे स्पार्क प्लगच्या मधल्या इलेक्ट्रोडभोवती असलेल्या चिनीमातीच्या नळकांड्याला बारीक चीर पडून विजेचा प्रवाह गळत होता, त्यामुळे मूळ स्पार्क प्लगमध्ये स्पार्क नीट पडत नव्हता. यामुळे गाडी चालू होऊन सारखी बंद पडत होती. मित्राची गाडी घेऊन मी पुण्यात नाना पेठेपासून लक्ष्मी रोड, डेक्कन सगळीकडे फिरलो, परंतु त्या गाडीला बसेल असा स्पार्क प्लग काही कुठे उपलब्ध होत नव्हता. मला ३१ तारखेला चंबूगबाळे आवरून मुंबईत अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात १ जानेवारीला रुजू व्हायचेच होते आणि त्यासाठी कॉलेजमधील (ए.एफ.एम.सी.मधील) सर्व खात्यांमधून एन.ओ.सी.सुद्धा घ्यायची होती. जे काही करायचे होते, ते दोन दिवसांतच. सुरुवातीला माझा बेत असा होता की मित्रांकडे माझ्या बॅगा द्यायच्या आणि मोटरसायकल चालवून मुंबईला आणायची. पण स्पार्क प्लग खराब झाल्यावर हा बेत रद्द करावा लागणार होता, कारण आख्ख्या पुण्यात हा स्पार्क प्लग कुठेच उपलब्ध नव्हता. होता तो फक्त मुंबई सेंट्रल येथे असलेल्या सेंट्रल गॅरेजमध्ये.

मी एक शक्कल लढवली. स्पार्क प्लगच्या चिनीमाती आणि बाहेरील नळकांडे याच्या आत जी पोकळी असते, त्यात अ‍ॅरल्डाईट भरले आणि ते रात्रभर तसेच ठेवले. सकाळी अ‍ॅरल्डाईट घन झाल्यावर गाडीला लावून पाहिले, तर गाडी व्यवस्थित चालू झाली. पुण्यात कॅम्पात एक चक्कर मारून आलो. गाडी व्यवस्थित चालत होती. मग ए.एफ.एम.सी.मध्ये जाऊन माझे रेल्वे वॉरंट घेऊन आलो. त्यावर ही मोटारसायकल डेक्कन एक्स्प्रेसमध्ये बुक केली आणि त्याच वॉरंटवर माझेही वातानुकूलित कुर्सी यानचे तिकीट बुक केले. ३० तारखेला गाडी पुणे स्टेशनला चालवत नेली. मनात धाकधूक होतीच की गाडी मध्येच बंद पडली तर काय... पण सुदैवाने तसे काही झाले नाही. सुखात मुंबईत उतरलो. मित्रांना माझे सामान दिले आणि मोटरसायकल रेल्वेच्या सामानाच्या डब्यातून उतरवून घेतली आणि झक्कपैकी त्यावर बसून मुंबई सेंट्रलपर्यंत चालवत नेली आणि त्याचा स्पार्क प्लग बदलून घेतला.

२. छोट्याशा क्लृप्तीने वाचवले साडेसात लाख रुपये

१९९९-२००० साली मी गोव्याला नौदलाच्या जिवंती रुग्णालयात होतो. तेव्हा Y२K चा मोठा बोलबाला चालू होता. माझे सिमेन्स कंपनीचे सोनोलाईन हे सोनोग्राफी यंत्र Y२K कम्प्लायंट करण्यासाठी सिमेन्स कंपनीने अडीच लाखाचे कोटेशन (निविदा) दिले होते. तुमचे मशीन काम करणार नाही इ. इ. भीती त्यांचे अभियंते दाखवत होते, कारण त्यात ०० ही तारीख नाहीच.
मी विचार करत होतो की या कंपनीला फुकटचे अडीच लाख रुपये का द्यायचे? केवळ एक तारीख बदलायला? बराच विचार करून मी एक दिवस त्या यंत्राच्या संगणकात तारीख १९०० टाकली. त्या संगणकाला २००० माहीत नव्हते, पण १९०० माहीत होते. आणि काय गम्मत! यंत्र व्यवस्थित चालत होते. आता माझ्या लक्षात आले की रुग्णांना तुम्ही जो अहवाल देता, त्यात तारीख येते त्यात वर्षाचे फक्त शेवटचे दोन आकडे येतात - म्हणजे आजची तारीख १५-०८-१८. मग ही तारीख १९०० असो की २००० असो.

युरेका! मी आमच्या मासिक अहवालात 'माझे यंत्र Y२K कम्प्लायंट झाले' असा अहवाल दिला आणि माझ्यासाठी ही गोष्ट संपल्यात जमा झाली होती. तीन-चार दिवसांनी लष्कराच्या फोनवर मला पुण्याच्या मित्राचा फोन आला, तेव्हा माझ्या डोक्यात एकदम चमकले की ए.एफ.एम.सी. आणि अश्विनी रुग्णालयात अशीच यंत्रे आहेत. मी ताबडतोब त्या मित्राला माझी कल्पना सांगितली. तोही म्हणाला, "ही कल्पना चांगली आहे." प्रत्यक्ष १ जानेवारी २००० रोजी यंत्र चालेल की नाही, याची मला शंका होती. पण यंत्र उत्तम चालत होते. संगणक तसा 'ढ'च असतो. तुम्ही त्याला जे सांगाल तितकाच तो विचार करतो. आता फक्त एक फरक करावा लागणार होता, तो म्हणजे २८ फेब्रुवारीनंतर यंत्र सरळ १ मार्च दाखवणार होते. कारण १९०० सालात लीप वर्ष नव्हते. पण २०००मध्ये होते. म्हणून २९ फेब्रुवारी २००० रोजी यंत्राच्या संगणकात मी तारीख २९ फेब्रुवारी १९८० टाकली आणि येणाऱ्या सर्व अहवालात ८वर काळ्या शाईने ० काढले. १ मार्चला परत यंत्र १९०० सालात टाकले. मुंबई-पुण्यातील माझ्या मित्रांना मी हीच कल्पना सांगितली. यामुळे आमचा वैयक्तिक काहीच फायदा झाला नाही, परंतु सरकारचे आणि पर्यायाने भारतीय जनतेचे साडेसात लाख रुपये वाचवायचे मानसिक समाधान मात्र मिळाले. सिमेन्सच्या अभियंत्यांना फारसा आनंद झाला नव्हता आणि आर्थिक वर्ष संपल्यावर सिमेन्सच्या मुख्य अभियंत्याने हसत हसत मला "तुम्ही कंपनीचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान केले" असे सांगितले.

३. शक्कल बोल्टला फिट करण्याची

विक्रांतवर असताना माझ्याकडे सिल्व्हर प्लस ही मोटरसायकल होती. ही मोटरसायकल 'झुंडाप' या मूळ जर्मन कंपनीची होती. ही कंपनी रॉयल एनफिल्डने विकत घेतली आणि वरील मोटरसायकल बाजारात आणली होती. एके दिवशी दुपारी बाहेर जाण्यासाठी मी विक्रांत जेट्टीवर मोटरसायकल चालू केली, तर तिचा फार आवाज येऊ लागला, म्हणून मी पाहायला लागलो तर मोटरसायकलच्या खाली जमिनीवर तेलाचे मोठे डाग दिसले. खाली वाकून पहिले तेव्हा मोटरसायकलच्या इंजीनातून तेल काढून टाकायचा ड्रेन प्लेगचा 'बोल्ट' जागेवर नव्हताच. (तो बहुधा कुठेतरी पडून गेला असावा.) त्यामुळे इंजीनमधील/गिअर बॉक्समधील सर्वच्या सर्व तेल गळून गेले होते. आता आली का पंचाईत?

मी विक्रांत जहाजाच्या इंजीन रूममध्ये गेलो. तेथे असलेल्या नौसैनिकाला १७ नंबरचा बोल्ट आहे का विचारले. तो बोल्ट घेऊन मी परत जेट्टीवर आलो आणि तो लावायचा प्रयत्न केला, तर तो बोल्ट नुसताच फिरत होता. मग त्या नौसैनिकानेही प्रयत्न केला, तरी काही होईना. मग मी त्या बोल्टच्या जागी बोट घालून पाहिले आणि माझ्या लक्षात आले की हा बोल्ट उलट्या थ्रेडचा आहे. नेहमीचा स्क्रू किंवा बोल्ट हा घड्याळाच्या दिशेने फिरवला तर घट्ट होतो आणि उलट फिरवला तर सैल होतो (याला RIGHT HANDED HELIX म्हणतात), तर या मोटारसायकलचा बोल्ट LEFT HANDED HELIX होता.

मग मी मित्राची मोटरसायकल घेऊन रॉयल एनफिल्डच्या शो रूममध्ये गेलो आणि त्यांना ड्रेन प्लेग मागितला, त्यावर तो उपलब्ध नाही म्हणून उत्तर आले.
केव्हा उपलब्ध होईल? माहीत नाही.
मग दुसऱ्या शो रूममध्ये गेलो. तेथेही तेच उत्तर.
केव्हा येईल? एक आठवड्याने चौकशी करा असे उत्तर आले.
आपली मोटरसायकल बरेच दिवस बंद आहे, ही एकट्या माणसाला फारच दुःखदायक बातमी असते.
वैतागून मी परत आलो. काय करावे या विचारात होतो. गिअर बॉक्सच्या खालच्या बाजूचा पृष्ठभाग सपाट आणि गुळगुळीत होता. दुसरा बोल्ट घुसवला तर थ्रेड निकामी होतील.
मग मला एक कल्पना सुचली. मी परत इंजीन रूममध्ये गेलो. तेथे असलेल्या त्या नौसैनिकाला विचारले की तुझ्याकडे १८ नंबरचा बोल्ट आहे का? त्याने तो काढून दिला. मी त्याला म्हणालो की "हा मशीनवर घासून मला उलट्या बाजूला थ्रेडिंग करून मिळेल का?"
मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो मला घेऊन परत बाहेर आला. त्याने त्या गिअर बॉक्सचे थ्रेड बोट घालून तपासले. त्याचा 'पिच आणि थ्रेड अँगल' समजून घेतला. (त्याने नुसते बोट आतमध्ये घातल्यावर त्याला पिच आणि थ्रेड अँगल लक्षात आला.) आणि पाच मिनिटात हा १८ नंबरचा बोल्ट घासून त्याला उलटे थ्रेड मारून दिले. मी लगेच तो बोल्ट तेथे स्प्रिंग वॉशरसकट लावून पहिला, तर एकदम फिट बसला.

मग मी विचार करत होतो की आता याचे वंगण तेल बाहेर जाऊन कसे आणायचे? त्यावर तो नौसैनिक म्हणाला की "सर, याला कुठले आणि किती तेल लागते?"
मी सांगितले, "६०० मि.ली. २० w ४०." तो म्हणाला, "दोन मिनिटे थांबा." तो आत जाऊन एका मोठ्या बुधल्यात तेल घेऊन आला. मी विचारले की "हे असे तेल कसे घेतलेले चालेल?"
त्यावर तो हसून म्हणाला, "सर, आपल्या जहाजाचे इंजीन ४०००० हॉर्सपॉवरचे आहे. त्याला आणि आपल्याकडे असलेल्या ६ डिझेल जनित्रांना टनावारी तेल लागते. नुसते त्याच्या २१० लीटरच्या एका रिकाम्या झालेल्या ल्यूब ऑइल ड्रमच्या तळाशी लीटरभर तेल निघेल. तुम्ही ६०० मि.ली.ची चिंता काय करताय?"
ते तेल वरून भरले, अर्धा मिनिट इंजीन चालवले आणि मोटारसायकलचे इंजीन एकदम मुलायम तर्‍हेने चालू झाले. पुढे ती मोटारसायकल विकेपर्यंत मी तो बोल्ट काही बदलायला गेलो नाही.

टीप - वरील गोष्ट एखाद्या मेकॅनिकल इंजीनियरसाठी अजिबात आश्चर्यजनक नाही.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

मुक्तांगण's picture

21 Sep 2018 - 10:11 am | मुक्तांगण

अरे, कसल्या मस्त आहेत तिन्ही गोष्टी. जुगाड हा चांगल्या अर्थाने वापरला तर खरंच आपण भारतीय महान आहोत. गरज शोधाची जननी आहे हेच खरे. डॉ. तुमचे सगळे लेखन नेहेमीच वाचनीय असते. आधी इथे वाचनमात्र, पण हल्ली प्रतिसाद द्यावसा वाटतो!

ज्योति अळवणी's picture

21 Sep 2018 - 10:47 am | ज्योति अळवणी

मस्त कल्पना आहेत. आवडला लेख

सविता००१'s picture

21 Sep 2018 - 12:48 pm | सविता००१

तिन्ही किस्से मस्त आहेत.

अथांग आकाश's picture

21 Sep 2018 - 1:44 pm | अथांग आकाश

अरे वाह! मस्त!

.

संपत's picture

21 Sep 2018 - 1:47 pm | संपत

मस्त जुगाड

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2018 - 2:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी जुगाड ! 'खरे' भारतिय शोभता ! :)

Y2K वाली आयडिया एक नंबर. त्यावेळेस, काँप्युटर प्रणालीत बदल केला नाही तर, काँप्युटर जळून जाईल, हार्ड डिस्कला भोके पडतील, अश्या काय काय भन्नाट कल्पना पसरल्या होत्या. तरी बरे त्यावेळेस व्हॉट्सअ‍ॅप, फेबु, वगैरे नव्हते, नाहीतर जगबुडीच्या अफावाही पसरल्या असत्या ! ;)

सोन्या बागलाणकर's picture

5 Oct 2018 - 4:15 am | सोन्या बागलाणकर

Y2K सारखाच अजून एक प्रौब्लेम २०३८ साली येणार आहे ज्यामुळे संगणक १९ जानेवारी २०३८ च्या पुढील तारीख साठवू शकत नाही. जर चेक करायचा असेल तर तुमच्या Android किंवा iPhone वर १९ जानेवारी २०३८ च्या पुढील तारीख टाकण्याचा प्रयत्न करा. अँड्रॉइड २०३७ च्या पुढील वर्षच दाखवत नाही. पुनश्च हरी ओम!

मार्गी's picture

21 Sep 2018 - 3:16 pm | मार्गी

रोचक क्लृप्त्या! क्रिएटिव्हिटी छान आहे! सर, असे आणीबाणीच्या वेळेसही अनेक ठिकाणी केले जात असणार ना. वाचायला आवडेल.

चित्रगुप्त's picture

21 Sep 2018 - 3:57 pm | चित्रगुप्त

वा. एकापेक्षा एक सरस कल्पना आणि प्रयोग.

कंजूस's picture

21 Sep 2018 - 4:58 pm | कंजूस

अ फ ला तू न!!!!

प्रत्येकात एक लहान मूल आणि संशोधक लपलेला असतो हे तितकेच खरं !!!

NiluMP's picture

21 Sep 2018 - 6:30 pm | NiluMP

वॉव जुगाड.

मार्मिक गोडसे's picture

21 Sep 2018 - 6:50 pm | मार्मिक गोडसे

मस्त जुगाड.

डॉक तुमचे जुगाड अगदी परफेक्ट आहेत. तसेच काही जुगाड आम्ही काम करत असताना करतो, फक्त ते करताना सुरक्षा प्रथम हा नियम नेहमीच अवलंबायला हवा, नाहीतर जुगाड अंगाशी येऊ शकतो.

भंकस बाबा's picture

21 Sep 2018 - 9:01 pm | भंकस बाबा

मस्त

भंकस बाबा's picture

21 Sep 2018 - 9:01 pm | भंकस बाबा

मस्त

पद्मावति's picture

21 Sep 2018 - 9:22 pm | पद्मावति

मस्तच.

यशोधरा's picture

21 Sep 2018 - 9:38 pm | यशोधरा

मजेशीर जुगाड.

खटपट्या's picture

21 Sep 2018 - 10:18 pm | खटपट्या

खूप छान,
माझाही छोटासा किस्सा - माझ्याकडे पल्सर १५० डिटीएसआय आहे. या गाडीची पेट्रोल टाकी लिक होउन त्यातून पेट्रोल गळून डीकी कवरवर पडू लागले. डीकी कवरचा रंग उडाला. आता दोन पर्याय समोर होते. टाकी वेल्डींग करुन घेणे किंवा बदलणे. नविन टाकी २५०० रुपयांची होती. वेल्डींग करण्यासाठी संपुर्ण टाकी खाली करुन त्यातील पेट्रोल सुकेपर्यंत थांबावे लागणार होते.
हार्डवेअरच्या दुकानातून एमसील आणले आणि टाकी फुटलेल्या ठिकाणि लावले. गळती बंद झाली. अजूनही एमसील लावूनच गाडी चालू आहे. यात मी फार काही पैसे वाचवले नाहीत. पण श्रम आणि वेळ वाचला.

मझी गाडी एकदा घसरुन पडली आणि मडगार्ड तुटले.. बरेच दिवस तशीच गाडी चालवल्यावर एक दिवस सहस बघितले तर ते मडगार्ड होते फायबर चे.
५ रु च्या फेविक्विक ने काम झाले. नाहीतर २ हजाराचा फत़आ बसला अस्ता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2018 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख चाळला लेखनात ''मी'' किती वेळा आला त्याची मोजणी केली. एकतीस वेळा 'मी' आहे. अजून ''माझे'' ''मला'' ''माझ्याशी'' हे मोजायचा कंटाळा आल्यामुळे मोजले नाही.

कोणते शब्द किती वेळा आले त्याकड़ेच लक्ष केंद्रित झाल्यामुळे लेख कशासंबधी आहे, यावर फोकस करता आले नाही.

उद्या पहाटे वाचून लेख कसा आहे त्याबद्दल प्रतिक्रिया कळवतो. आपल्या उत्तम लेखावर आणि आपल्या आनंदावर विरजन घातल्याबद्दल दिलगीरी आहेच.

-दिलीप बिरुटे
( वाचक)

पिलीयन रायडर's picture

22 Sep 2018 - 9:05 pm | पिलीयन रायडर

लेखमालेचा विषयच "मी" केलेले प्रयोग असा असेल तर "माझा" उल्लेख न करता "मी" कसा काय लेख लिहायचा ह्यावर सरांनी भाष्य केले तर "माझ्या" ज्ञानात भर पडेल. तुम्ही लेखमालेतील बाकी लेखातील "मी" "माझा" मोजत असल्याने कदाचित हे करण्यास उशीर होईल ह्याची नम्र जाणीव आहेच!

तोवर सरांना ह्याचा त्रास होतोय असं वाटत आहे म्हणून खरे ह्यांनी सुबोध पुण्यात फिरला, सुबोधच्या गाडीचा स्पार्क प्लग खराब झाला वगैरे पद्धतीने लेख लिहावेत अशी नम्र विनंती!

ट्रेड मार्क's picture

23 Sep 2018 - 3:55 am | ट्रेड मार्क

+१००

अनुप ढेरे's picture

24 Sep 2018 - 2:49 pm | अनुप ढेरे

बिरुटे सर, तुम्ही "बिरुटे इकडे गेले, बिरुटे आले" असं बोलता काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2018 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बिरुटे सर, तुम्ही "बिरुटे इकडे गेले, बिरुटे आले" असं बोलता काय?

हो असंच बोलतो....! =))

-दिलीप बिरुटे

आनन्दा's picture

25 Sep 2018 - 3:49 pm | आनन्दा

गलगले निघाSSSले

नमकिन's picture

27 Sep 2018 - 8:55 am | नमकिन

सलमान खान चे मोठे तून छोटे ME ME me लिहिलेलं टी शर्ट आठवले.
तळटीप पटली.
डिझाईन इंजिनिअर हा अनेक शक्यता नाकारत एक चपखल वापरतात, त्यामुळे इतर जेव्हा हे मोठाल्या कंपन्यांचे रग्गड पगाराचे इंजिनिअर कुचकामी ठरवत असलेले ग्राहक रोज पाहण्यात येतात.
Y2k चार बागुलबुवा उभा करून भयाण काळोखी चित्र रंगवणारे मरतुकडे रंगारी टाईमपास करताना पाहून कींव यायची.
३- जर लेथ मशीन पण नसती तिथे शॅंपेन चे काॅर्क बूच (थोडं तिरपे असते) अथवा म‌ऊ लाकूड खूपसुन फिरवल्याने स्वयं आटे पडतात (प्लंबर आठवला).
दख्खन च्या राणीची ऐट वातानुकूलित डब्यातली पण दिसलीच का हो बिरुटे मास्तर तुम्हाला?

मुक्त विहारि's picture

22 Sep 2018 - 12:11 am | मुक्त विहारि

लेख आवडला...

भृशुंडी's picture

22 Sep 2018 - 2:01 am | भृशुंडी

मी लेख आधी वाचला तेव्हा कळाला नाही, मग मी तो परत वाचला, तेव्हा आवडला.
मला लेख खूप आवडला. मला तुमचे लेख आवडतात.
मी मोटारसायकलची पहिली क्लृप्ती वापरून बघीन नक्की.
मला Y2Kची क्लृप्तीसुद्धा मस्त वाटली.
मला ३ऱ्या गोष्टीतल्या नौसैनिकाचं कौतुक वाटतं.

~ आपला मी

रमेश आठवले's picture

22 Sep 2018 - 5:35 am | रमेश आठवले

एका मेडिकल डॉक्टरचे एवढे यांत्रिकी स्कील हे खुपच प्रशन्सनीय आहे.

टीप - वरील गोष्ट एखाद्या मेकॅनिकल इंजीनियरसाठी अजिबात आश्चर्यजनक नाही.

असं काही नाही हं.
आमच्या कंपनीत दार महिन्याला सर्वोत्तम सुधारणा पारितोषिके दिली जातात. यात प्रामुख्याने उत्पादन करताना वाया जाणाऱ्या गोष्टी वाचवणे, स्क्रॅप कमी करणे, सायकल टाइम वाचवणे, एखाद्या गोष्टीचा सुलभीकरण करणे, अशा सुधारणा असतात.
७०-८०% सुधारणा ऑपरेटर लोकांनी सुचवलेल्या असतात. आणि २०-३०% इंजिनियर लोकांनी.

आवडला हा लेख. तिन्ही क्लुप्त्या भारी.

Sanjay Uwach's picture

22 Sep 2018 - 2:06 pm | Sanjay Uwach

खूप छान,लेख आवडला

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Sep 2018 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

सगळे जुगाड आवडले
पैजारबुवा,

अभिजित - १'s picture

22 Sep 2018 - 5:31 pm | अभिजित - १

मस्त आयडिया !!

यसवायजी's picture

22 Sep 2018 - 6:08 pm | यसवायजी

3 नंबरची आयडिया चांगली आहे. काही वेळा वापरली आहे.
रच्याकने, बोटीवर इंजिन रूममध्ये टर्निंग मशीन असतात का?

सुबोध खरे's picture

22 Sep 2018 - 6:28 pm | सुबोध खरे

होय. विमानवाहू नौकेवर मोठी कार्यशाला असते त्यामुळे बरेच बारीक बारीक बिघाड तेथेच दुरुस्त केले जातात.

यसवायजी's picture

23 Sep 2018 - 1:46 pm | यसवायजी

माहितीबद्दल धन्यवाद.

भारीच ! इंडियन जुगाड टेक्नॉलॉजी.

त्याने नुसते बोट आतमध्ये घातल्यावर त्याला पिच आणि थ्रेड अँगल लक्षात आला - यह बात कुछ हजम नही हुई !

पिलीयन रायडर's picture

22 Sep 2018 - 8:59 pm | पिलीयन रायडर

मलाही हे कळलं नाही. असा कळत असेल तर त्या माणसाला सलाम! अशाच लोकांच्या आजूबाजूला मला भयानक न्यूनगंड येतो!!

किस्से मस्त!

मार्मिक गोडसे's picture

22 Sep 2018 - 7:53 pm | मार्मिक गोडसे

बोट आट्यावर जोरात दाबले की बोटावर ठसा उमटतो, त्यावरून त्यातील अंतर व दिशा समजते.

मार्मिक गोडसे's picture

22 Sep 2018 - 8:02 pm | मार्मिक गोडसे

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे याला रोटरी गिअर्स होते
अशी हीरो होंडाची स्ट्रीट बाईक माझ्या मामाकडे होती,तिला क्लच नव्हता. मस्त गाडी होती स्मुथ गेअर पडायचे.

नाखु's picture

22 Sep 2018 - 9:24 pm | नाखु

कुणीही विपरीत परिस्थितीत मार्ग काढतोय याचं मला नवलयुक्त कौतुक कायम आहे.

नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

मस्त आयडिया आहेत. लेख आवडला.

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2018 - 7:31 am | सुधीर कांदळकर

१. स्पार्क प्लग दुरुस्ती ग्रेट, अस्सल (ओरिजिनल) कल्पना.
२. ही पण अस्सल कल्पना. वायटूके समस्या दरम्यान आमच्या कंपनीतला (म्हणजे मी नोकरी करीत असलेल्या कंपनीतला) एक इंजिनीअर माझ्याकडे येऊन लीप ईयर कसे मोजतात ते विचारून गेला होता. ते का ते आत्ता कळले. त्याने बहुधा १६०० साल टाकले असावे.
३. केवळ बोटाच्या स्पर्शाने पिच ओळखणार्‍या व्यक्तीचे निरीक्षण आणि जजमेन्ट खरेच अफलातून आहे. अचूक पिच शोधायला आमच्या कंपनीतले कामगार मेणबत्ती वापरीत. बीएसपी च्या जागी यू एनफ वा अन्य आट्याचा स्क्रू बसत नाही.

कूट्प्रश्न सोडवण्यात खरेच असाधारण समाधान मिळते.

एक मस्त लेख. धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2018 - 7:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेब, आज पहाटे पाच वाजता शांतपणे लेख वाचला. तिन्ही अनुभव छान होते आवडले. पहिला आणि तिस-या लंबरचा अनुभव थेट भिडला. टू व्हीलरच्या अडचणीतली 'प्लग' ही मोठी समस्याच आहे. आपण ती सहज सोडवली. लै भारी.

आपलं लेखन नेहमीचं आवडतं. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

एखाद्या माणसाला खरोखर आशी यांत्रिक दृष्टी परमेश्वराने दिलेली असते कि जरुरी नाही ,ती व्यक्ती पदवीधर इंजिनियर असायला पाहिजे . माझ्या घरात एकदा नवीन दरवाज्यचे काम चालू होते .सुतार जाड सागवानी दारास हीजीस लावणार इतक्यात माझे आज्जे सासरे तिथे आले व म्हणाले ."पावणे एक काम करा ,तुम्ही दाराला समान अंतरावर म्हणजे वरती ,मधी व खाली, नेहमी प्रमाणे हिंजीस (बिजागिरी ) न लावता मधला हिंजीस वरच्या हिंजीसच्या बाजूला थोडा सरकून लावा . दार लावल्यावर दाराचे ७५ % वजन वरचा हिंजीस घेत असल्याने मधला हिंजीस वरती सरकल्याने त्याच्यावरील लोड आपोआप कमी होईल . खरोखरच हि गोष्ट पटण्या सारखी आहे .

खटपट्या's picture

24 Sep 2018 - 2:22 pm | खटपट्या

हो ही टीप कामाची आहे.

चिगो's picture

24 Sep 2018 - 5:22 pm | चिगो

भारीच क्लृप्त्या, डॉक्टरसाहेब..

माझा मधला भाऊ ह्या बाबतीत फारच कारीगर आहे.. लहानपणी मी त्याचा नेहमीचा आणि हक्काचा असिस्टंट होतो.. त्यानी आमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या फिंटींग्स आणि दुरुस्तीमध्ये किमान लाखभर रुपये वाचवले असतील. चायनीज विद्युतमाळा येण्यापुर्वी त्याने त्यापण घरातच बनवल्या होत्या. ह्यात माझा वाटा फक्त शॉक खाण्यापुरता मर्यादित होता.

बहुतेक २००१ साली असेल, आमचा पिसी बंद पडला. दुकानदाराने 'मदरबोर्ड उडलाय, नवीन घ्या, ५००० लागतील' म्हणून सांगितले. बंधूंनी घरातच सोल्डरींग करुन ठीक केला..

सुबोध खरे's picture

24 Sep 2018 - 6:25 pm | सुबोध खरे

माझा मधला भाऊ ह्या बाबतीत फारच कारीगर आहे.
हो काही जणांना या गोष्टी नैसर्गिक पणे येतात.
माझा पण मोठा भाऊ इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्याने आमच्या हिरो होंडामध्ये बॅटरी ऐवजी १०००मायक्रोफाराड चा कपॅसिटर बसवला होता. त्यामुळे गाडीला बॅटरीची गरज नाहीशी झाली.गाडीचे इंजिन चालू केले कि हा कपॅसिटर चार्ज होत असे आणि त्यामुळे हॉर्न आणि बाजूचे इंडिकेटर चालत असत. हा अनुभव मी मिपावर कुठेतरी लिहिला आहे.
वर लिहिल्याप्रमाणे त्याने आपल्या घराला असलेल्या दरवाज्याला तीन ऐवजी चौथी बिजागिरी बसवली आहे आणि ती मधली आणि वरची याच्या मध्ये बसवली आहे. कारण चांगल्या सागवानी दरवाज्याच्या वजनामुळे दरवाजा खाली उतरतो आणि त्याचे वजन वरच्या बिजागिरीवर येत असल्याने तेथे अतिरिक्त बिजागिरी बसवली तर दरवाजा उतरल्यामुळे तो खाली घासतो हा प्रश्न येत नाही.
ह्यात माझा वाटा फक्त शॉक खाण्यापुरता मर्यादित होता.
ह ह पु वा