गणपतीपुढच्या आरत्या आणि स्तोत्रे
गणेशचतुर्थीचा सण जवळ आलेला आहे. घराघरांमधून त्याची तयारी आणि चर्चा चालू आहे. चौकाचौकांमधून सार्वजनिक गणपतींचीही अशीच तयारी धूमधडाक्यामध्ये चालू आहे. पहिल्या दिवशी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना झाली की गणपतीच्या उरलेल्या दीड-पाच-सात-दहा दिवसांमध्ये संध्याकाळी घरातली सर्व मंडळी जमून घंटांच्या आणि झांजांच्या साथीवर आरत्या आणि स्तोत्रे म्हणतील.
त्यांचा क्रम सर्वसाधारणपणे असा असतो - प्रथम काही आरत्या, त्यानंतर ’घालीन लोटांगणचे’ श्लोक आणि अखेरीस मंत्रपुष्प.
आरत्या सर्वसाधारणपणे गणपतीची, देवीची, शंकराची, दत्ताची, मारुतीची आणि विठ्ठलाची अशा असतात. घराघरांमधून घराच्या पद्धतीनुसार ह्यांपैकी एक व अधिक आरत्या म्हटल्या जातात. अशा आरत्यांकडे आता प्रथम विशेष ध्यान देऊ.
प्रथम गणपतीची सर्वामध्ये अधिक म्हटली जाणारी आरती. ती अशी आहे -
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची ।
नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ १॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ध्रु.॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी, कुंकुम केशरा ।
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया ॥ २ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ ध्रु ॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा, वाट पाहे सदना ।
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन:कामना पुरती ॥ध्रु ॥
ही आरती समर्थ रामदासांनी रचलेली आहे, हे ’दास रामाचा’ ह्या शब्दप्रयोगामधून कळते. आरती तशी सोप्या भाषेमध्ये असून अर्थही स्पष्ट आहे. काही शब्दांबाबत थोड्या खुलाशाची आवश्यकता भासते. ’नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची' ह्यातील ’नुरवी’चा संबंध त्यापूर्वीच्या ओळीतील ’वार्ता विघ्नाची’ ह्याकडे आहे. ’विघ्नाची वार्ता न उरवी’ असा तो संबंध आहे हे सहजी ध्यानी येत नाही. ’रत्नखचित फरा’ ह्यातील फरा हा एक मस्तकाचा दागिना आहे. ’गौरीकुमर’ म्हणजे ’गौरीपुत्र’. गणपती हा शंकर-पार्वती ह्यांचा पुत्र. ’पीतांबर फणिवरबंधना’मधील फणिवरबंधनाची फोड पुढीलप्रमाणे - फणा असलेला तो फणिन् अथवा नाग. त्यांमधील श्रेष्ठ तो फणिवर, असा फणिवर ज्याने कमरेस बांधला आहे, तो फणिवरबंधन. ’चरणी घागरिया’ म्हणजे ’पायामध्ये घागर्या’. ह्यातील ’घागर्या’ म्हणजे घर्घरी किंवा क्षुद्रघंटिका, चाळांमध्ये असतात तशा. ह्यापुढील ’त्रिनयन’ हे गणपतीचे वर्णन मोरगावच्या गणपतीचे असावे असा तर्क आहे, कारण अष्टविनायकांपैकी त्या गणपतीला कपाळावर तिसरा डोळा आहे आणि ही आरती रामदासांनी त्या गणपतीला उद्देशून केली असावी. 'संकटी पावावे’ऐवजी ’संकष्टी पावावे’ असाही प्रयोग काही ठिकाणी कानावर येतो. संकट आणि संकष्ट हे दोन्ही समानार्थी शब्द असून दोन्ही पाठ शुद्धच मानले जावेत.
ह्यापुढील आरती दुर्गादेवीची. तिचे शब्द असे आहेत -
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणाते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दनी।
सुरवर-ईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ ध्रु ॥
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दनी।
सुरवर-ईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ ध्रु. ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दनी।
सुरवर-ईश्वर-वरदे तारक संजीवनी ॥ ध्रु. ॥
ह्या आरतीचा अर्थ सुलभ आहे. केवळ ’चारी श्रमले परंतु न बोलवे काही। साही विवाद करिता पडले प्रवाही।’ हे चरण उल्लेखनीय आहेत. चार म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे चार वेद आणि सहा म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा आणि वेदान्त ही षड्दर्शने. देवीचा महिमा वर्णन करण्यास ते सर्व अपुरे पडतात अशी भक्तांची श्रद्धा आहे, हे ह्यातून दिसते. ’नरहरी’ नावाचा कोणी कवी आरतीचा कर्ता आहे. प्रसिद्ध वारकरी संत नरहरी सोनार हाच तो किंवा कसे, हे सांगण्यास काहीच पुरावा नाही. वि.ल. भावेकृत 'महाराष्ट्रसारस्वत' ह्या ग्रंथामध्ये नरहरी सोनाराबरोबरच आणखीही ५-६ नरहरींचे उल्लेख आहेत. कमी-अधिक प्रसिद्ध अशा ह्या नरहरींमधून नक्की कोणत्या नरहरीने देवीची प्रस्तुत आरती लिहिली आहे, हे सांगता येत नाही.
ह्यानंतर शंकराची आरती. तिचे शब्द असे आहेत -
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळा ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु. ॥
कर्पूरगौर भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु. ॥
देवीदैत्यीं सागरमंथन पै केले।
त्यामाजी अवचित हळहळ जे उठिले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु. ॥
व्याघ्रांबर-फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलकरामदासा अंतरी ॥ ४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
ह्या आरतीचा अर्थही जवळजवळ स्पष्ट आहे. आरतीचा पहिला शब्द ’लवथवती’ असे सूचित करतो की या आरतीचे कर्ते रामदासस्वामी ह्यांना जेजुरीजवळील लवथवेश्वर महादेव मंदिराला भेट दिल्यामुळे ही आरती निर्माण झाली. ’लावण्यसुंदर मस्तकी बाळा’ येथील ’बाळा’ म्हणजे ’बाला’ किंवा तरुण स्त्री. शंकराच्या जटाजूटामधून स्वर्गातून उतरलेली गंगा पृथ्वीवर येते, ह्या पौराणिक कथेचा संदर्भ येथे आहे. ’शितिकंठ नीळा’ ह्याचा अर्थ असा - शिति म्हणजे काळानिळा, हलाहल प्यायल्याने शंकराचा कंठ काळानिळा पडला ही प्रसिद्ध कथा आहे. त्यावरून शंकराचे एक नाव ’शितिकंठ’ पडले. अमरकोशामध्येही हा उल्लेख आहे. असा हा शितिकंठ शंकर वर्णाने काळानिळा आहे. अखेरच्या कडव्यातील ’व्याघ्रांबर-फणिवरधर’ म्हणजे ’वाघाचे कातडे आणि कमरेभोवती नागाचा पट्टा धारण करणारा’ असा आहे. 'मदनारि’ म्हणजे मदनाचा शत्रू. तपश्चर्येमध्ये व्यत्यय आणणार्या मदनाला तिसरा डोळा उघडून दग्ध केले ही प्रसिद्ध पौराणिक कथा आहे. ’पंचानन’ म्हणजे पाच मुखांचा. शंकराचे हेही रूप प्रसिद्ध आहे. ’शतकोटीचें बीज वाचे उच्चारी’ ह्याचा अर्थ असा - रामायणाची लांबी ’शतकोटि’ आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. (पाहा - चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् - रामरक्षास्तोत्र.), म्हणून ’शतकोटीचे बीज’ म्हणजे रामनाम आणि ते शंकराच्या तोंडी सतत असते असे आरती सांगत आहे. आरतीचे कर्ते रामदास आहेत हे ’रघुकुलतिलकरामदासा अंतरी’ - रघुकुलाचा तिलक जो राम त्याचा दास - ह्यावरून स्पष्ट होते.
ह्या आणि अशाच आणखी एक-दोन आरत्या झाल्या की ’घालीन लोटांगण’चा पाठ सुरू होतो. हा पूर्ण पाठ असा आहे -
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजिन ।
भावे ओवाळीन म्हणे नामा ।।१।।
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव।।२।।
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।
करोमि यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि ।।३।।
अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।
हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
पुंडलिकवरद हरिविठ्ठल । पार्वतीपते हरहर महादेव । सीताकान्तस्मरण जयजयराम ।
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्तु प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष मां परमेश्वर ।।
संत नामदेवकृत श्लोकापासून सुरू होणारी ही श्लोकमालिका ह्याच क्रमाने वर्षानुवर्षे आणि पिढ्यांमागून पिढ्या अशीच म्हटली जात आहे आणि हा मराठी आणि संस्कृत श्लोकांचा मिश्र क्रम कोणी गुंफला ह्याचा काहीही मागोवा उरलेला नाही. तो चार शतके इतकातरी जुना आहे हे निश्चित, कारण ल.रा. पांगारकर संपादित श्रीसमर्थ ग्रन्थभांडार उत्तरार्ध ह्या रामदासांनी केलेल्या रचनांच्या संग्रहामध्ये ’अच्युतं केशवं’ येथपासून ’सीताकान्तस्मरण जयजयराम’ येथेपर्यंत पाठ आढळतो.
ह्या श्लोकमालिकेचे वैशिष्ट्य असे की तिच्यातील प्रत्येकाचा स्रोत निरनिराळा आहे आणि कोणीतरी इकडून तिकडून हे श्लोक एकत्र आणून गुंफले आहेत. ते मिश्रण शतकानुशतके असेच म्हणत गेल्यामुळे ते एकाच काव्याचा भाग आहे असे साहजिकच वाटते.
ह्यांपैकी पहिला श्लोक ’घालीन लोटांगण’ उघडपणे नामदेवाचा आहे, कारण त्यामध्ये ’म्हणे नामा’ असा स्पष्ट उल्लेख आहे.
दुसरा 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हे गणपतीला किंवा कुठल्या देवाला उद्देशून नसून तो गुरुस्तोत्राचा भाग आहे. परंपरेनुसार आदिशंकराचार्यांनी जे चौदाश्लोकी गुरुस्तोत्र लिहिले, त्यामध्ये 'त्वमेव माता च पिता त्वमेव' हा चौदावा श्लोक आहे. आपल्याला माहीत असलेला 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:' हाहि प्रसिद्ध श्लोक त्याच तिसर्या क्रमांकावर समाविष्ट आहे.
तिसरा श्लोक 'कायेन वाचा' हा श्रीमद्भागवतपुराणातील आहे. एकूण अठरा पुराणांपैकी हे एक, व्यासांनी लिहिलले. ’कायेन वाचा’ हा श्लोक स्कंध ११, अध्याय २ येथे ३६वा श्लोक आहे.
चौथा श्लोक 'अच्युतम केशवं' हे 'अच्युताष्टकम्' ह्या आदिशंकराचार्यांच्या काव्यातील पहिला श्लोक आहे. काव्याचे नाव जरी 'अच्युताष्टकम्' आहे, तरी त्यात नऊ श्लोक आहेत.
पाचवा श्लोक 'हरे राम हरे राम' हा 'कलिसन्तरण' ह्या उत्तरकालीन आणि छोट्या उपनिषदातील आहे. हे उपनिषद् इ.स. १५००च्या पुढे-मागे निर्माण झाले आणि चैतन्यप्रभूंच्या भक्तिमार्गामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे. चैतन्यप्रभूंच्या भक्तिमार्गातूनच निर्माण झालेल्या ISKONमध्येही त्याला महत्त्वाचे स्थान आहे.
’यानि कानि च पापानि’ आणि ’अन्यथा शरणं नास्ति’ ह्या दोन श्लोकांचे अनेकविध पर्याय शेकडो स्तोत्रांमधून, तसेच अनेक पूजाविधींमधून पाहायला मिळतात. त्यांची इतकी गल्लत झाल्याने कोणी कोणाकडून कधी उचलले आहे हे आता उलगडणे अशक्य आहे.
ह्या दोन श्लोकांच्या वेळी स्वतःभोवती फिरणे ही चाल काही ठिकाणी आढळते. हे देवळातल्या प्रदक्षिणा घालण्याचे रूपक असावे असे वाटते. देवळात प्रदक्षिणेला जागा असते, तशी जागा घरामध्ये पूजाविधीच्या वेळी असणे अवघड असते. त्यासाठी हा सुकर पर्याय. 'प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलाबरोबर पापे नाश पावोत' असे श्लोकामध्ये म्हटलेले आहेच.
कोणत्या भक्ताने वा कोणत्या मठात ही जुळणी प्रथम पठणात आणली, हे आता सांगता येणार नाही. अनेक शतकांच्या वापरामुळे ती आपल्या पूजासंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे हे निश्चित.
ह्याच्यानंतर मंत्रपुष्पाचे पठण केले जाते. ह्याचे शब्द आणि अर्थ पुढीलप्रमाणे -
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् |
ते ह नाकं महिमान: सचन्त यत्र पूर्वे साध्या: सन्ति देवा: ॥१॥
(ऋग्वेद मं.१० सू.९० ऋ १६)
देवांनी यज्ञाच्या द्वारे यज्ञाचे (यज्ञरूप प्रजापतीचे) यजन केले. ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास करीत असत, ते (स्वर्गलोकाचे) स्थान यज्ञाचरणाने महान साधक प्राप्त करते झाले.
राजाधिराजाय प्रसह्ये साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान्कामकामाय मह्यम् । कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नम: ॥२॥
(तैत्तिरीय आरण्यक, प्रपाठक १, अनुवाक ३१, मन्त्र ९)
सर्व प्रयत्नपूर्व घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वर वैश्रवण कुबेर कामार्थी अशा मला सर्व कामनांची पूर्ती प्रदान करो.
स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमहं समंतपर्यायी
स्यां सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥३॥
(ऐतरेय ब्राह्मण पञ्चिका ८, खंड १५)
मला (क्षत्रियाला) साम्राज्य, भोगसंपदा, स्वराज्य, प्रभुसत्ता, ऐश्वर्य, महान् ऐश्वर्य, आधिपत्य, सर्वव्यापित्व, सार्वभौमत्व, पूर्णायुष्य, संपूर्ण पृथ्वीचे स्वामित्व, आसमुद्र पृथ्वीचे एकराज्य भोगावयास मिळावे.
तदप्येष श्लोकोऽभिगीत: ।
मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा: सभासद इति ॥ ४॥
(ऐतरेय ब्राह्मण पञ्चिका ८, खंड २१)
अशासाठी हा श्लोक गायला गेला आहे की कामना पूर्ण करणार्या अविक्षितपुत्र मरुत्ताच्या (मरुत्त नामक राजाच्या) घरामध्ये मरुत नामक सर्व देव राहत असत.
ह्या चार श्लोकांचे स्रोत पूर्णपणे वेगवेगळे आहेत. अर्थाच्या दृष्टीनेही त्यांना जोडणारे सूत्र दिसत नाही. ह्याबाबत मी अनेक तज्ज्ञांकडे विचारणा केली, पण ह्या इकडून तिकडून उचललेल्या मंत्रांच्या निरर्थक मालिकेला सध्याचे महत्त्व का प्राप्त झाले, हे मला कळलेले नाही.
प्रतिक्रिया
13 Sep 2018 - 9:38 am | तुषार काळभोर
अतिशय छान लेख.
खूप धन्यवाद, अरविंदजी.
13 Sep 2018 - 10:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणि अर्थाच्या दृष्टीने उत्तम लेखन. आभार.
-दिलीप बिरुटे
13 Sep 2018 - 10:14 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेखन.
ह्याला काही संदर्भ आहे का? लवथव ह्याचा अर्थ हालचाल असाही होतो. समर्थांनीच रचलेल्या गणेशगाथेत 'लवथव दोंद कट्ट नागबंध, धुधु:कारें द्वंद्व
जिव्हा लाळीतसे' असा उल्लेख आहे. आरतीची पुढील ओळ लक्षात घेतल्यास अमृतमंथनातून निघालेल्या हलाहल विषाच्या भयाने ब्रह्मांड कंपित होऊ लागले ते विष प्राशन करुन (शिवाचा) कंठ काळा झाला असाही अर्थ निघू शकतो.
13 Sep 2018 - 12:34 pm | अथांग आकाश
माहितीपूर्ण!
गणपती बाप्पा मोरया!!!
13 Sep 2018 - 1:02 pm | नंदन
समयोचित आणि संग्राह्य लेख.
('समुद्रपर्यंताया एकराळिति' यावरून अन्यत्र झालेली वैदिक संस्कृतातला ळ आणि ड यावरची चर्चा आठवली).
13 Sep 2018 - 1:22 pm | यशोधरा
चांगला लेख.
13 Sep 2018 - 1:37 pm | पद्मावति
माहीतीपुर्ण लेख. उत्तम.
13 Sep 2018 - 3:41 pm | नाखु
माहीती,रोचक लेख
13 Sep 2018 - 5:44 pm | पुंबा
ही गोष्ट माहीत नव्हती..
13 Sep 2018 - 8:57 pm | रमेश आठवले
बरेच जण' म्हणे नामा' चा उच्चार म्हणे नमा असा करताना दिसतात. अगदी ध्वनिमुद्रित आरतीमध्ये सुद्धा ही चूक ऐकु येते.
कोल्हटकरांचे लेख नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि उपयोगी.
13 Sep 2018 - 10:10 pm | मदनबाण
गणपती बाप्पा मोरया...
सुरेख लेखन आणि माहिती. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदक वळु लागला , माझा बाप्पा हा नाचु लागला ! :)
14 Sep 2018 - 3:24 am | रमेश आठवले
श्री. कोल्हटकर यांस सा.न. वि. वि.
मारुतीच्या आरती विषयी मला एक शंका आहे आणि आपण त्याचे निराकरण करू शकाल असे वाटते. या आरतीची सुरुवात 'सत्राणे उड्डाणे ' अशी होते. यातील सत्राणे या शब्दाचा अर्थ काय ?
22 Sep 2018 - 1:27 am | अरविंद कोल्हटकर
सत्राण = स+त्राण with force असा अर्थ तुळपुळे-फेल्डहाउस ह्यांच्या प्राचीन मराठीच्या कोशामध्ये दिला आहे आणि त्याला 'मग तमाचे ते दारुण । स्थिरावलेया वाउधाण । सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी ॥ १५.१८३' असा ज्ञानेश्वरीतील आधार दाखविला आहे.
14 Sep 2018 - 5:57 am | शाली
सत्राणे म्हणजे शक्तीने, आवेशाने. स+त्राणे. जसे आपण म्हणतो “चालून चालून पायातले त्राण गेले.” किंवा “अंगात त्राण राहीले नाही” वगैरे.
14 Sep 2018 - 6:36 am | रमेश आठवले
धन्यवाद.
14 Sep 2018 - 1:01 pm | अनन्त अवधुत
गणपतीच्या 'सुखकर्ता दुखहर्ता..' आरती मध्ये नागपूरला हे अजून कडवे गातात.
चरणीच्या घागरिया रुणझुण वाजती
ते निनादे देवा वाक्या गर्जती
टाचा दुमकीत दुमकीत नाचे गणपती
शंकर पार्वती कौतुक पाहती ||
हे कडवे इतर कोठेही ऐकायला मिळत नाही. मी ते योग्य लिहिले आहे का हे मला माहिती नाही. कदाचित भरपूर अपभ्रंश असतील.
15 Sep 2018 - 12:28 am | चित्रगुप्त
उत्तम, संग्रहणीय लेख.
15 Sep 2018 - 9:06 am | ज्योति अळवणी
अप्रतिम आणि माहितीपूर्ण लेख.खूपच छान. आवडला!
17 Sep 2018 - 7:39 pm | खिलजि
छान माहिती , समयोचित आणि काही नवीन महत्वपूर्ण संदर्भ मिळाले . छोट्याना सांगायला महत्वाचे .. धन्यवाद , वाचनखूण साठवत आहे ..
17 Sep 2018 - 8:41 pm | शान्तिप्रिय
अतिशय माहितिपुर्ण लेख
धन्यवाद
18 Sep 2018 - 8:39 am | राही
'विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ' यातल्या ' शितिकंठ' ऐवजी एक पाठभेद ' सित कंठ ' असाही आहे. सित म्हणजे गौर,धवल. मूळचा गौर असा कंठ हालाहलप्राशनानंतर निळा झाला हा संदर्भ त्यामागे आहे. 'विषे कंठ काळा ' हे या आरतीत सुरुवातीलादेखील येते. ' शिति कंठ' हा शब्द योग्य मानला तर आधीच काळासावळा असलेला कंठ विभूतीच्या उधळणाने निळा झाला असा अर्थ निघतो. विभूतीचे उधळण सर्वांगावर असते. त्यामुळे फक्त कंठच निळा कसा होईल? तर कंठाचे हे निळेपण विभूतीमुळे नसून विषप्राशनामुळे आहे. शितिकंठ म्हणजे शंकर; अशा अर्थाने पाहिले तर शंकर हा विभूतीच्या उधळणाने नीलवर्णी झाला असे मानावे लागेल. भस्म चर्चनामुळे अंग निळे दिसत नाही. फार तर राखाडी दिसेल. शंकर हा सावळ्या वर्णाचा होता असे या सगळ्यातून सूचित होते. पण अनेक ठिकाणी शंकराचे वर्णन ' हिमगौर', 'कर्पूरगौर' असे असते. म्हणून ' सित' शब्द योग्य वाटतो.
दुसरे म्हणजे ' दुर्गे दुर्घट भारी' या आरतीत ' साही विवाद करता पडले प्रवाही' असे म्हटले जाते. यात ' पडले' ऐवजी 'पडली' (जुन्या लेखनानुसार 'पडलीं) असे पाहिजे. कारण 'दर्शन' हा शब्द नपुंसकलिंगी आहे. अनेकवचनात ' षड्दर्शने पडली ' असा प्रयोग योग्य होईल.
18 Sep 2018 - 8:39 am | राही
'विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ' यातल्या ' शितिकंठ' ऐवजी एक पाठभेद ' सित कंठ ' असाही आहे. सित म्हणजे गौर,धवल. मूळचा गौर असा कंठ हालाहलप्राशनानंतर निळा झाला हा संदर्भ त्यामागे आहे. 'विषे कंठ काळा ' हे या आरतीत सुरुवातीलादेखील येते. ' शिति कंठ' हा शब्द योग्य मानला तर आधीच काळासावळा असलेला कंठ विभूतीच्या उधळणाने निळा झाला असा अर्थ निघतो. विभूतीचे उधळण सर्वांगावर असते. त्यामुळे फक्त कंठच निळा कसा होईल? तर कंठाचे हे निळेपण विभूतीमुळे नसून विषप्राशनामुळे आहे. शितिकंठ म्हणजे शंकर; अशा अर्थाने पाहिले तर शंकर हा विभूतीच्या उधळणाने नीलवर्णी झाला असे मानावे लागेल. भस्म चर्चनामुळे अंग निळे दिसत नाही. फार तर राखाडी दिसेल. शंकर हा सावळ्या वर्णाचा होता असे या सगळ्यातून सूचित होते. पण अनेक ठिकाणी शंकराचे वर्णन ' हिमगौर', 'कर्पूरगौर' असे असते. म्हणून ' सित' शब्द योग्य वाटतो.
दुसरे म्हणजे ' दुर्गे दुर्घट भारी' या आरतीत ' साही विवाद करता पडले प्रवाही' असे म्हटले जाते. यात ' पडले' ऐवजी 'पडली' (जुन्या लेखनानुसार 'पडलीं) असे पाहिजे. कारण 'दर्शन' हा शब्द नपुंसकलिंगी आहे. अनेकवचनात ' षड्दर्शने पडली ' असा प्रयोग योग्य होईल.
20 Sep 2018 - 11:45 pm | तुषार काळभोर
'घालीन लोटांगण'ची चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडातील
एबीपी माझा
21 Sep 2018 - 8:21 am | गवि
इथे आपापल्या लिंगानुसार पुरुष आरतीकर्ते "श्रमलो, पडलो" आणि स्त्रिया "श्रमले, पडले" असं म्हणताना सर्रास ऐकलं आहे. इतर कोणी ऐकलं नाही का?
हे लहानपणी "तेथून भक्ता लागे पाऊस लवलाही" असं म्हटलेलं ऐकू यायचं.
यात जोक नाही.
22 Sep 2018 - 1:38 am | अरविंद कोल्हटकर
@राही आणि @गवि,
राही हयांनी सुचव्लेले पाठभेद असू शकतात परंतु लक्ष्मण रामचन्द्र पांगारकरांच्या भक्तिमार्गप्रदीपामध्ये दोन्ही आरत्यांमधील मी दाखविलेलीच शब्दरचना दिसते.
गवि ह्यांनी सांगितलेले "श्रमलो, पडलो" आणि "श्रमले, पडले" हे प्रयोग मात्र ठीक नाहीत कारण "श्रमलो, पडलो" आणि "श्रमले, पडले" ह्या क्रियापदांचा कर्ता आरतीगायक तो अथवा ती नसून चारी (वेद) आणि साही शास्त्रे/दर्शने हे आहेत.
22 Sep 2018 - 6:54 am | गवि
हो पडलो श्रमलो हे निश्चित चुकीचेच आहेत. मी फक्त निरीक्षण नोंदवलं. लोकांचं ऑटोकरेक्ट फंक्शन असावं ते. ;-)
2 Oct 2018 - 1:17 pm | ट्रम्प
सात आठ वर्षा पूर्वी घरी गणपती ची आरती करताना मी अचानक थोडा आरतीच्या चाली बाबत संभ्रमात पडायचो !!!!
आपण घरी म्हणतो ती आरती आणि लता मंगेशकर नीं गायलेली आरती यात जमीन अस्मान चा फरक आहे आणि आरती ला सुरवात करताना माझ्यात अचानक लताची चाल शिरायची !!!! .
लताने गाताना " सुखकर्ता !!! दुखहर्ता !!! " असा जरा सूर लांबवलेला आहे आणि तोच सूर मी पकडायचो .
त्यामुळे घरातील बाकीच्यांचा गोंधळ व्हायचा , आई वडील आणि बायको माझ्याकडे रागाने बघायचे व मुलं फिदीफिदी हसायचे .