इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले
जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता
दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड
अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका
मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो
-- विशाल
प्रतिक्रिया
10 Sep 2018 - 7:53 pm | अथांग आकाश
"अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका"
चांगली लिहिली आहे गझल.
12 Sep 2018 - 11:33 am | कहर
धन्यवाद
11 Sep 2018 - 12:48 pm | श्वेता२४
तुमच्या सगळ्या कविता/गजल खूप छान आहेत
12 Sep 2018 - 11:34 am | कहर
धन्यवाद