हट्ट!

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 7:51 am

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी.
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे.

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे.
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात.

असंख्य वेळा अशी भेटशी
मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही
इच्छा अपुरी, अनिवार.
हट्ट सांग मी करू कोणता?
थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी
आज एवढे ठरवाया?

- मनमेघ

कविताहट्टमनमेघ

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

26 Jul 2018 - 9:21 am | अनन्त्_यात्री

सुंदर कविता!

ज्योति अळवणी's picture

26 Jul 2018 - 5:45 pm | ज्योति अळवणी

खरच सुंदर

मनमेघ's picture

27 Jul 2018 - 6:35 am | मनमेघ

प्रतिसादाबद्दल आभारी आहे _/\_