'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' कवितेचे अनुवाद

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
23 Jun 2018 - 8:58 am

मी अलिकडे मिपावर कितीसा पुरोगामी आहेस ? हि कविता लिहिली. :) (त्या कवितेची प्रेरणा विशीष्ट मिपाकर आहेत असे वाटण्याचा संभव आहे :), तसे खरे असण्यास हरकत नव्हती :) पण त्यांच्या दुर्दैवाने -ते दुर्दैवावर विश्वास ठेवत नसलेतरी आम्ही ठेवतो :) - त्या कवितेची तात्कालीक प्रेरणा अभारतीय आमेरीकन व्यक्तीचे अभारतीय विषयावरचे लेखन आहे :( )

कितीसा पुरोगामी आहेस ? कवितेस तुम्ही पुरोगाम्यांनाच का टार्गेट करता परंपरावाद्यांना का नाही असा एक तरी प्रतिसाद यावा अशी राहून राहून इच्छा होती. :) असा प्रतिसाद न झाल्यामुळे मी जरासा अंधश्रद्ध झालो आहे . :) मिपा पुरोगामी मंडळींना खास करून नास्तिकांना ह्या कवितेची प्रेरणा अभारतीय आमेरीकन असल्याचे दैवी शक्तींकडून उमजले असावे असा माझा वहम होऊ लागलेला आहे :) पण ऑदर वाईज केवळ पुरोगाम्यांना टार्गेट न करता परंपरावाद्यां विरुद्धही काही लिहीले जावे हे त्यांना आवडेल हे आम्हाला मात्र दैवी शक्तींकडून कळोन आले :)

आणि म्हणून रविंद्रनाथ टागोरांच्या माझ्या आवडत्या :Where the mind is without fear; या कवितेचा अनुवाद होऊन पुरोगाम्यांवरही परंपरावादी प्रेमाचा वर्षाव व्हावा अशी मनोमन इच्छा करून , सदर कवितेचा अनुवाद करून द्यावा अशी स-आदर विनंती करतो.

तसे माझ्या टिकेच्या फटकार्‍यातून सहसा कुणीच सुटत नाही मग टागोरांना का अपवाद करावे, म्हणून नजर काढणारा एक तीट लावलेला बरा. विश्वबंधूत्व मानणारे टागोर, एवढी पुरोगामी कविता let my country awake. म्हणून केवळ भारतीयांसाठी का राखीव करतात (त्याचेही भारतीय अंध-पुरोगामी उत्साहाने समर्थन करतील पण ) ते आमच्या परंपरावादी डोळस मनास पटणारे नाही. आमचे परंपरावादी मन टागोरांच्या पुरोगामीत्वावर खटू का होत नाही याचा पुरोगाम्यांना रास्त सम्शय येऊ शकतो आणि असा संशय आल्यास या संशयास आधार देणारे तथ्य म्हणजे पुरोगामी टागोर सुद्धा कुठे तरी एके ठिकाणी म्हणतात, 'कोणताही वृक्ष त्याच्या मूळांपासून तोडून घेऊन बहरू शकत नाही.' म्हणून आमचे टागोरांवर निरतीशय प्रेम आहे आणि टागोरांनी त्यांचे प्रेम या कवितेतून पुरोगाम्यांवर करून आदर्श भारतीय परंपरेचे पालन केले आहे.

अलिकडील काळातील एक भारतीय परंपरावादी नेते म्हणालेत , ' आम्ही कट्टर आहोत ते केवळ उदारतेत, आमची उदारता कट्टर आहे' या कट्टर उदारतेने आमच्या परंपरावादी मिपा मित्रांनी या कवितेच्या अनुवादात साहाय्य करावे अशी नम्र विनंती पुन्हा एकदा.

Title: Parthana or A prayer

Where the mind is without fear and the head is held high;
:Where knowledge is free;
:Where the world has not been broken up into fragments;
:By narrow domestic walls;
:Where words come out from the depth of truth;
:Where tireless striving stretches its arms towards perfection;
:Where the clear stream of reason has not lost its way;
:Into the dreary desert sand of dead habit;
:Where the mind is led forward by thee;
:Into ever-widening thought and action;
:Into that heaven of freedom, My Father, let my country awake.

मूळ बंगाली

* खालील बंगाली लिपीचे मराठी- देवनागरी रुपांतरण तपासून हवे आहे.

चित्त जेथा भयशून्य, उच्च जेथा शिर,
ज्ञान जेथा मुक्त, जेथा गृहेर प्राचीर
आपन प्राङ्गणतले दिबसशर्बरी
बसुधारे राखे नाइ खण्ड़ क्षुद्र करि,
जेथा बाक्य हृदयेर उत्समुख हते
:उत्सासिये उठे, जेथा निर्बारित स्रोते
देशे देशे दिशे दिशे कर्मधारा धाय
अजस्र सहस्रबिध चरितार्थताय,
जेथा तुच्छ आचारेर मरुबालुराशि
बिचारेर स्रोतःपथ फेले नाइ ग्रासि,
पौरुषेरे करे नि शतधा, नित्य जेथा
तुमि सर्ब कर्म चिन्ता आनन्देर नेता,
निज हस्ते निर्दय आघात करि, पितः;
भारतेरे सेइ स्बर्गे करो जागरित ৷

* रविंद्रनाथ टागोरांच्या गितांना संगित देण्याचे अधिकार पंकज कुमार मौलिक यांच्या कडे होते. पंकजकुमार मौलिकांनी संगितबद्ध केलेल्यामुळ बंगाली गीत या युट्यूबवर ऐकता येऊ शकेल.

চিত্ত যেথা ভয়শূন্য, উচ্চ যেথা শির,
:জ্ঞান যেথা মুক্ত, যেথা গৃহের প্রাচীর
:আপন প্রাঙ্গণতলে দিবসশর্বরী
:বসুধারে রাখে নাই খণ্ড ক্ষুদ্র করি,
:যেথা বাক্য হৃদয়ের উৎসমুখ হতে
:উচ্ছ্বসিয়া উঠে, যেথা নির্বারিত স্রোতে
:দেশে দেশে দিশে দিশে কর্মধারা ধায়
:অজস্র সহস্রবিধ চরিতার্থতায়,
:যেথা তুচ্ছ আচারের মরুবালুরাশি
:বিচারের স্রোতঃপথ ফেলে নাই গ্রাসি,
:পৌরুষেরে করে নি শতধা, নিত্য যেথা
:তুমি সর্ব কর্ম চিন্তা আনন্দের নেতা,
:নিজ হস্তে নির্দয় আঘাত করি, পিতঃ;
:ভারতেরে সেই স্বর্গে করো জাগরিত৷

* युट्यूबवर ए. आर. रेहमान यांच्या स्वतच्या आवाजात संगितबद्ध मूळ बंगाली + हिंदी स्वैर अनुवाद ; किंवा हेच समुह नृत्यासोबत

* उर्दू अनुवाद

वीररसशांतरससंस्कृतीकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2018 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार

पण कविता खुप आवडली म्हणून तिचा स्वैरानुवाद करण्याचे धाडस केले.

पसायदानः-

असिम निर्भयता नांदते जेथे, जेथे झुकलेली नसेल एकही मान,
खळाळणारे ज्ञानाचे सागर, आसूससले भागवण्यास तहान,

जेथे गरज नसेल एका विशिष्ठ झुंडी मधे रहाण्याची ,
विचारांवरही नसेल सक्ती, काही विशिष्ठ चश्मे लावण्याची,

जेथे अंतरात्म्याचा, घुसमटत नसेल श्वास,
असेल जेथे प्रत्येकाला, केवळ परीपूर्णतेचा ध्यास,

न्यायालयांच्या इमारतींवर, जमतिल जेथे धुळीचे थर च्या थर,
व्यक्ती स्वातंत्र्याचा जेथे, राखला जाईल परमोच्च आदर,

विशाल ह्रुदयाचा असेल, इथला प्रत्येक नागरीक,
जो असेल सत्याच्या मार्गाचा, निष्ठावंत पाईक,

हे परमेश्वरा, माझ्या देश असा असावा,
जेथे मुंगीचाही आवाज, ऐकला जावा......

पैजारबुवा,

माहितगार's picture

23 Jun 2018 - 11:55 am | माहितगार

शीर्षकाचा अनुवाद पसायदान करणे भावले. टागोरांचे पसायदानच आहे ते. स्वैर अनुवाद ही आवडला. इतर मिपाकरांकडून अनुवादाच्या अजून काही आवृत्ती येतील अशी आशा करतो आहे.

बाकी तुम्ही स्वतःला परंपरावादी मानले नाहीतरी परमेश्वर , फादर असे उल्लेख केले कि नास्तिक मंडळी तुम्हाला परंपरावादीच म्हणतील , त्यांची तशी श्रद्धा असते. आमचे नास्तिकांवर एवढे प्रेम आहे की नास्तिकांचे "पसायदान'' कसे लिहाल ?
नावाचा आम्ही धागा काढला पण पसायदान शब्दाचा अर्थ प्रसाद असतो प्रसाद फक्त देवच देतो तर मग आम्ही प्रसाद कसा मागायचा म्हणून नास्तिक फिरकले नाहीत आणि आणि नास्तिकांसाठी असल्याने आस्तीकही खट्टू झाले. त्यामुळे त्यावेळी आम्हाला आपला प्र.के. अत्रे झाला असे वाटले होते :)

आपण अनुवादात सक्रीय मनमोकळा सहभाग दिल्या बद्दल अनेक आभार.

मदनबाण's picture

23 Jun 2018 - 11:26 am | मदनबाण

मूळ बंगाली
भालो ! :) अमार शोनार बांग्ला ...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Boudi Sopner Sundori... ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2018 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रार्थना

जेथे निर्भय आहे मन आणि ताठ आहे मान
जेथे निर्बंध आहे ज्ञान
जेथे कोत्या स्वार्थी विचारांनी नाही भंगलेले जग
जेथे सत्याच्या गहन खोलीतून जन्मतात शब्द
जेथे परिपूर्णतेला गवसणी घालतात अथक प्रयत्न
जेथे सन्मार्ग सोडून जळमटलेल्या जुनाट रुढींच्या वाळवंटात भरकटत नाहीत विचार
जेथे विचारांचे आणि करणींचे सतत वर्धिष्णू गुंते सोडवायला हजर असतोस तू
हे जन्मदात्या, असे मुक्त नंदनवन माझ्या मायभूमीवर अवतरू दे.

माहितगार's picture

23 Jun 2018 - 12:39 pm | माहितगार

सुंदर !

टर्मीनेटर's picture

24 Jun 2018 - 11:20 am | टर्मीनेटर

मूळ बंगाली भाषेतील कवितेचं भाषांतर वर दिलेल्या इंग्रजी कवितेच्या स्वरुपात स्वतः रवीन्द्रनाथांनी केलंय, कि ईतर कोणी स्वैर भाषांतर केलंय?
कारण मूळ बंगालीतले शब्द जर आपण भाषांतरित करून बघितले तर त्यांचा जो अर्थ निघतो तो इंग्रजीतल्या कवितेच्या अर्थापेक्षा भिन्न वाटतो.
अर्थात मला फार काही बंगाली भाषेचं ज्ञान नाही, पण एक उत्सुकता म्हणून अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा असं जाणवलं कि हि सरळ सोपी अर्थबोध होणारी कविता नसून तिचा गर्भितार्थ काहीतरी वेगळा असावा.
(जर स्वतः रवीन्द्रनाथांनी भाषांतर केलं असेल तर प्रश्नच मिटला.)

माहितगार's picture

24 Jun 2018 - 3:30 pm | माहितगार

मला रोमन लिपीतली बंगाली आवृत्ती एका ब्लॉगवर मिळाली, ते बरोबर आहे का मला कळत नाही चुभूदेघे

Chitto jetha voi shunno , Uccho jetha shir
gyan jetha mukto , jetha griher prachir
apon prangon tole dibos shorbori
bosudhare rakhe nai khondo khudro kori
jetha bakko ridoyer utsomukh hote
ucchosia uthe, jetha nirbarito srote
deshe deshe dishe dishe kormodhara dhai
ojosro sohosro bidho choritarthotai ,
jetha tuccho acharer morubalu rashi
bicharer sroto poth fele nai grasi
pourushere kore ni shotodha , nitto jetha
tumi sorbo kormo chinta anonder neta ,
nij hoste nirdoi aghat kori pita
Bharotere sei sorge koro jagorito

बंगाली युट्यूब

माहितगार's picture

27 Jun 2018 - 10:40 pm | माहितगार
माहितगार's picture

24 Jun 2018 - 3:55 pm | माहितगार

कमीत कमी बदलाने मराठी रुपंतर करुन बघूया, हे बरोबर असेल असे नाही.

चित्त जिथे भयशुन्य, उंच जिथे शीर

ग्यान जिथे मुक्त ,

जिथे गृह प्राची - अपना प्रांगणतळी दिवस शर्वरी

या तीन ओळी करुन पाहील्या ' जिथे गृहप्राची आपल्या प्रांगणतळी दिवस शर्वरी' आता हे शर्वरी म्हणजे काय ?

आपण म्हणता तसे एक्झॅक्ट मॅच नसण्याची शक्यता वाटते. अजून काही ओळी करुन बघतो.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार

माहितगार's picture

24 Jun 2018 - 4:11 pm | माहितगार

@ टर्मीनेटर या दुव्यावर विस्तृत विश्लेषणच मिळाले. आपण म्हणतात तशी शक्यता शक्य आहे ( अनुवाद टागोरांनीच केला असला तरी अदमासे दहा वर्षांनी केला आहे आणि स्वैर अनुवाद असावा त्यामुळे फरक आहेत.) आपण म्हणता तसा काही वेगळा सखोल अर्थ आहे का पहावे लागेल.

माहितगार's picture

24 Jun 2018 - 6:10 pm | माहितगार

या दुव्यावरील मूळ बंगाली कविता आणि टागोरांनी स्वतःच केलेला अनुवाद यातील नेमक्या फरकांबद्दल या दुव्यावर बंगाली साहित्याचे दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक शिशिर कुमार दास यांनी विश्लेषण आणि मूळ बंगाली काव्याचा स्वतःचा अनुवाद देण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो अनुवादही बर्‍यापैकी टागोराचंया अनुवादाच्या जवळ जाणारा असावा. टागोरांनी बंगाली ते इंग्रजी असा अनुवाद करताना काही शब्द बदलून वापरले जसे हृदयातून एवजी फ्रॉमद देप्थ ऑफ ट्रूथ असे बदल केले तर शेवटच्या ओळीतील पौरुषत्वाचा उल्लेख स्वतःच वगळला असे दिसते. शिशिर कुमार दास यांचाही अनुवाद मूळ बंगालीच्या पूर्णपणे जवळ नसण्याची अंशतः शक्यता वाटते पण ते बंगाली आहेत आणि आपण नाही असा फरक आहेच .

आपल्याला बंगाली लिपी आणि काही शब्दांच्या अर्थांचे अंदाज येण्यात अडचण येते पण अंदाजा येतो. जे शब्द सरळ समजले ते तसे घेऊन अर्थाचा अंदाजा येण्या इतपत थोडेसे बदल करून आणि शिशिर कुमार दास यांच्या अनुवादाचा जरासा आधार घबंगा; जमतील तेवढे बंगाली जसेच्या तसे ठेऊन खालील अनुवादाचा प्रयत्न केला आहे. (जो अंशतः किंवा पूर्ण चुकीचा असू शकतो चुभूदेघे)

चित्त जिथे भयशुन्य, उंच जिथे शीर
ग्यान जिथे मुक्त ,
जिथे घराच्याप्रांगण तळी-भींती दिवसभर वसुंधरेस खंडित करीत नाहीत
जिथे वाक्य हृदयातून उत्समुख होते, उत्सासिये उठे
जिथे अनिर्बंध स्त्रोताने अजस्त्र सहस्त्र कर्माधारा चरितार्था देशे देशे दिशे दिशे धावतात
जिथे पौरुषत्वाच्या शतधा (शंभर घड्या /तुकडे ) केलेल्या नाहीत विचारेर (विवेक ) स्रोतपथ तुच्छ आचरणांनी मरूवाळूराशीत गिळले गेले नाही
जिथे , तुम्ही सर्व कर्म चिंता आनंदे नित्य नेता
(हे) पित्या निज हस्ते निर्दय आघात करुन, त्या स्वर्गात भारतास जागा कर

ओळवार विश्लेषण

१ चित्त जिथे भयशुन्य, उंच जिथे शीर
२ ग्यान जिथे मुक्त ,

जिथे गृहाच्या प्राची आपल्या प्रांगण तळी दिवसभरी वसुंधरा रखे नाही खंड-क्षुद्र करी
जिथे घराच्याप्रांगण तळी-भींती दिवसभर वसुंधरेस खंडित करीत नाहीत
A more accurate rendering might go: शिशिर कुमार दास अनुवाद
Where, day and night, walls within our homes haven't compartmentalized
our world
but tagore's version captures the essence.

Where the world has not been broken up into fragments by narrow
domestic walls


जिथे वाक्य हृदयातून उत्समुख होते उत्सासिये उठे


जिथे निर्भारीत स्रोते
देशे देशे दिशे दिशे कर्माधारा धाय
अजस्त्र सहस्त्र चरितार्था

शिशिर कुमार दास

Where, in unabated flow
the stream of work flows in all directions
in countless purposefulnesses

Where tireless striving stretches its arms towards perfection टागोर अनुवाद
जिथे अनिर्बंध स्त्रोताने अजस्त्र सहस्त्र कर्माधारा चरितार्था देशे देशे दिशे दिशे धावतात

जिथे तुच्छ आचरण मरूवाळूराशी
विचारेर (विवेक ) स्रोतपथ फेले (पडले) नाही ग्रासी
पौरुषत्वाच्या केल्या नाही शतधा (शंभर घड्या /तुकडे )

शिशिर कुमार दास
Where the clear stream of reason has not lost its way into the dreary
desert sand of dead habit; where it has not belittled one's manhood.

Where the clear stream of reason has not lost its way into the dreary
desert sand of dead habit; टागोर अनुवाद

जिथे पौरुषत्वाच्या शतधा (शंभर घड्या /तुकडे ) केलेल्या नाहीत विचारेर (विवेक ) स्रोतपथ तुच्छ आचरणांनी मरूवाळूराशीत गिळलेले नाही

७ - नित्य जिथे , तुम्ही सर्व कर्म चिंता आनंदे नेता

Where one is ever led forward by thee into ever-widening thought and
action and joy शिशिर कुमार दास

Where the mind is led forward by thee into ever-widening thought and
action टागोर

८ - (हे) पित्या निज हस्ते निर्दय आघात करुन, त्या स्वर्गात भारतास जागा कर

टर्मीनेटर's picture

24 Jun 2018 - 6:58 pm | टर्मीनेटर

मला पहिल्या दोन ओळींचा अर्थ भलताच वाटला होता, दोन विरुद्ध परिस्थितींची तुलना असल्या सारखे वाटले होते.
मी काढलेला अर्थ काहीसा असा काहीसा होता:

कुठे चित्त निर्भय... कुठे गर्वाने गर्दन ताठ...
कुठे ज्ञानाची खुली कवाडे.... कुठे बंदिस्त कुंपणात...

माहितगार's picture

24 Jun 2018 - 7:29 pm | माहितगार

:) नाही बहुधा तसे काही दिसत नाही ; मी बंगाली उतारा ईग्रजी विकिपीडियातून घेतला , विकीपिडियात काही वेळा खोडसाळ पणा झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही . बंगाली उतारा चुकीचा असल्यास कल्पना देणे , तुमच्या प्रतिसादामुळे अधिक अभ्यासण्यास चालना मिळाली.

चर्चा सहभागाबद्दल अनेक आभार

माहितगार's picture

24 Jun 2018 - 7:54 pm | माहितगार

...गर्भितार्थ काहीतरी वेगळा असावा.

टागोरांनी स्वतःच अनुवाद करताना शेवतच्या दोन ओळीतील गर्भितार्थात महत्वपूर्ण बदल केले आहेत का असे वाटते .

खालील दोन ओळी तशा मूळ बंगाली शब्दांच्या जवळ आहेत . यात तुम्ही सर्व कर्म चिंता आनंदे नित्य नेता हि ओळ परमेश्वराची विशेषणे असावीत असे वाटते. जी नंतरच्या इंग्रजी अनुवदात दृगोच्चर होत नाहीत. प्रा. दास यांनी त्या ओळींचा अनुवाद टागोरांच्या अनुवादाच्या जवळ कसा नेला ते निटसे उमगले नाही. निज हस्ते निर्दय आघात करुन, जागा कर असे का म्हणतात कळत नाही, मूळ बंगाली ओळीत केवळ स्वर्गाचा उल्लेख आहे पण दहा अकरा वर्षांनी पुन्हा अनुवादीत करताना त्यांनी स्वांतत्र्य शब्द जोडला आणि खुबीने भारत शब्द टाळला . त्या वेळे पावेतो स्वातंत्र्याची उर्मी जागवली असेल आणि ब्रिटीशांच्या लक्षात येऊ नये म्हणून भारत शब्द माय कंट्रीने बदलला असेल.

जिथे , तुम्ही सर्व कर्म चिंता आनंदे नित्य नेता
(हे) पित्या निज हस्ते निर्दय आघात करुन, त्या स्वर्गात भारतास जागा कर

Where the mind is led forward by thee;
:Into ever-widening thought and action;
:Into that heaven of freedom, My Father, let my country awake.

टागोरकृत ईंग्रजी अनुवादाचा , बंगाली भावार्थाच्या जवळ जाण्याचा प्रयास करत माझा स्वतःचा स्वैर अनुवाद. काही शब्द ओळी डॉ. सुहास म्हात्रेंच्या अनुवादातील ओळींवर बेतल्या आहेत.

मन जिथे भयशुन्य, उंच असेल मान
ज्ञान जिथे मुक्त ,
जिथे संकुचित लोभामुळे वसुधा होत नाही लहान
जिथे सत्यवचनांचे हृदयाच्या तळातून होते उत्साहाने प्रकटन
जिथे परिपूर्णतेला गवसणी घालतात अथक प्रयत्न
जिथे कतृत्वास बंधने पडत नाहीत
जिथे विवेक सोडून जुनाट रुढींच्या वाळवंटात भरकटत नाहीत विचार
जिथे सतत विस्तारणाऱ्या विचार आणि कृतीं करताना
सर्व चिंताहरण करून मनास आनंद प्रेरणा देतोस तू
(हे) पित्या, त्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात भारतास तू जागे कर

माहितगार's picture

24 Jun 2018 - 7:57 pm | माहितगार

मूळ बंगाली भावार्थाशी जवळ जाण्यासाठी कठोरतेने जागा कर असे हवे त्या बदला सहित.

टागोरकृत ईंग्रजी अनुवादाचा , बंगाली भावार्थाच्या जवळ जाण्याचा प्रयास करत माझा स्वतःचा स्वैर अनुवाद. काही शब्द ओळी डॉ. सुहास म्हात्रेंच्या अनुवादातील ओळींवर बेतल्या आहेत.

मन जिथे भयशुन्य, उंच असेल मान
ज्ञान जिथे मुक्त ,
जिथे संकुचित लोभामुळे वसुधा होत नाही लहान
जिथे सत्यवचनांचे हृदयाच्या तळातून होते उत्साहाने प्रकटन
जिथे परिपूर्णतेला गवसणी घालतात अथक प्रयत्न
जिथे कतृत्वास बंधने पडत नाहीत
जिथे विवेक सोडून जुनाट रुढींच्या वाळवंटात भरकटत नाहीत विचार
जिथे सतत विस्तारणाऱ्या विचार आणि कृतीं करताना
सर्व चिंताहरण करून मनास आनंद प्रेरणा देतोस तू
(हे) पित्या, त्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात, भारतास तू कठोरतेने जागे कर

नरेंद्र जाधवांनीही ह्या कवितेचा अनुवाद केलाय, पण तो फार चांगला नाही. मिळाल्यास इथे टाकतो.

माहितगार's picture

25 Jun 2018 - 10:01 am | माहितगार

नक्कीच, आपल्या चर्चा सहभागासाठी अनेक आभार .

ते पुस्तक इथे बघता येईल, कविता ऑनलाईन मिळत नाही. कुठेतरी हे पुस्तक चाळतांना वाचल्याची आठवते, पण सापडत नाहिये...

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4988752758793350895?BookNa......

धन्यवाद, कवितेचे नाव मिळाल्यामुळे शोधण्यास सोपे गेले आणि यु ट्यूबवर संगीतबद्ध गीत स्वरुपात उपलब्ध असल्याचे दिसते त्या खाली गीताचा टेक्स्टपण आहे. जमल्यास मूळ टागोरांच्या अनुवादाशी जराशी तुलना करुया.

माहितगार's picture

25 Jun 2018 - 3:01 pm | माहितगार

खाली नंरेंद्र जाधवांच्या गीत स्वरुपातील अनुवादाची प्रति ओळ तुलना केली आहे. आधी टागोर ईंग्रजी, मग बंगाली टागोरांच्या अगदी निकट शब्दशः आणि मग नरेंद्र जाधव असा अनुवाद दिला आहे. मूळ आठ ओळी तील कवितेची दुसरी आणि तिसरी ओळ एकत्र केल्यामुळे नरेंद्र जाधवांचा अनुवाद अवघ्या सात ओळीत बसला आहे. प्रत्येक ओळी नंतर शेवटची ओळ वाचलीतर गीताचा नरेंद्र जाधव रचित अनुवाद गेय वाटतो. नरेंद्र जाधवांचाही अनुवाद बहुधा मूळ बंगाली आणि इंग्रजी दोन्ही लक्षात घेऊन बनवला असावा अथवा टागोरांव्यतरीक्त इतर कुणाच्या इंग्रजी अनुवादाचा आधार घेतला असेल असे वाटले. खूप कमी शब्द वापरुन टागोरांच्या काव्यातील भाव इसेन्स बरोबर पकडण्यात नरेंद्र जाधवांना बर्‍या पैकी यश आले आहे असे वाटते.

डॉ. सुहास म्हात्रेंप्रमाणेच मीही डेड हॅबीट्स साठी रुढी हाच शब्द वापरला आणि नरेंद्र जाधवांनी ही रुढी शब्दच वापरलाय. मूळ बंगाली मधला भाव त्यात येऊन जातो पण इंग्रजी मधील desert sand of dead habit; ने येणारा इंपॅक्ट कुठेतरी राहून जातोय असे वाटत रहाते. Into ever-widening thought and action; चा अनुवाद नरेंद्र जाधवांनी 'नवउन्मेषी व्यापकता ' नी केलाय बराच जवळ जातो , हि गेय कविता तर ऐकावीच पण इंग्रजी अनुवादही वाचकां ना माहित असावा असे वाटून जाते.

नरेंद्र जाधवांच्या ओळी ठळक केल्या आहेत.

1 Where the mind is without fear and the head is held high;
चित्त जिथे भयशुन्य, उंच जिथे शीर
भयशून्य चित्त जेथ, उन्नत सदैव माथा

2 Where knowledge is free;
ग्यान जिथे मुक्त ,
हो अनिर्बंध हे ज्ञान ना संकुचिताची व्यथा

Where the world has not been broken up into fragments;:By narrow domestic walls;
जिथे घराच्याप्रांगण तळी-भींती दिवसभर वसुंधरेस खंडित करीत नाहीत
3 Where words come out from the depth of truth;
जिथे वाक्य हृदयातून उत्समुख होते, उत्सासिये उठे
गर्भातुनी सत्याच्या ये शब्दांना ही सुंदरता

4 Where tireless striving stretches its arms towards perfection;
जिथे अनिर्बंध स्त्रोताने अजस्त्र सहस्त्र कर्माधारा चरितार्था देशे देशे दिशे दिशे धावतात
अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता

5 Where the clear stream of reason has not lost its way;Into the dreary desert sand of dead habit;
जिथे पौरुषत्वाच्या शतधा (शंभर घड्या /तुकडे ) केलेल्या नाहीत विचारेर (विवेक ) स्रोतपथ तुच्छ आचरणांनी मरूवाळूराशीत गिळले गेले नाही
रूढींना नाही थारा, विचारी अखंड निर्मलता

6 Where the mind is led forward by thee;:Into ever-widening thought and action;
जिथे , तुम्ही सर्व कर्म चिंता आनंदे नित्य नेता
तव प्रेरणेमुळेही नवउन्मेषी व्यापकता

7 Into that heaven of freedom, My Father, let my country awake.
(हे) पित्या निज हस्ते निर्दय आघात करुन, त्या स्वर्गात भारतास जागा कर
मम देशही जागृत होवो, या मुक्त स्वर्गी आता

प्राची अश्विनी's picture

25 Jun 2018 - 11:00 am | प्राची अश्विनी

वा! एकेक सुंदर अनुवाद.
वाखु साठवण्याचा धागा.

माहितगार's picture

25 Jun 2018 - 3:05 pm | माहितगार

__/\__ प्रतिसादांसाठी अनेक आभार , खरे म्हणजे तुमचाही एखादा अनुवाद किंवा यावरुन स्वैर काव्य यावयास हवे असे वाटते.

सुधीरन's picture

18 Aug 2018 - 9:48 am | सुधीरन

अनुवाद

भयशून्य चित्त जिथे, ताठ सदा मान
ज्ञान जिथे मुक्त आणि सर्वांस हो प्रदान

दिवसरात्र या विशाल धरतीस करून विखंडीत
नसेल कोणी स्वतःसाठी छोटे छोटे अंगण बनवीत

जिथे प्रत्येक वाक्य हृदयापासून निघत असेल
दशदिशांमध्ये जिथे कष्टाचे अजस्त्र स्रोत असतील

निरंतर अनिर्बंध वाहत असेल जिथे विचारसरीता
जी जुनाट रुढींच्या वाळवंटात हरवून जात नसेल

जिथे पुरुषार्थाची शेकडो शकले न झाली असतील
जिथे कर्म, आनंद आणि दुःखे तुमच्या अधीन असतील

हे विधात्या तुझ्या हातांनी कठोर प्रहार करावे
त्या स्वातंत्र्य-स्वर्गात तू या भारतास जागवावे

भावानुवाद

भयशून्य चित्त जिथे, ताठ सदा मान
ज्ञान जिथे मुक्त आणि सर्वांस हो प्रदान

तुकड्यांत न वाटलेले ना भिंती असलेले
असे जग जेथे भेदभावांस नसेल स्थान

हृदयापासून सारे शब्द जिथे उमटतील
पूर्णत्वाकडे प्रयत्न सारिखे धाव घेतील

अनेक मार्गांनी जिथे सत्य शोधिले जाईल
जुनाट रूढी परंपरांतून ज्ञान बंधमुक्त होईल

आचार विचारांवर नसतील जिथे काही बंधने
जिथे सत्याच्या मार्गावरी अखंडित चालणे

हे विधात्या तव प्रेरणेने हा भारत जागा व्हावा
मुक्त आणि स्वतंत्र स्वर्ग इथे निर्माण व्हावा