गावाच्या गोष्टी - ३
गावाकडच्या जगण्याची दुसरी एक मजा म्हणजे ब्रेक मध्ये लगबग सिगारेट ओढल्याप्रमाणे इथे कुणीही जगत नाही. इथे जगण्याची कला हि हुक्का बार मध्ये हळुवार गुडगुडी ओढत जगणे. मग वारंवार कोळसा हलवत धुराचे ढग निर्माण कारण आस्वाद घेत जगणे. इथे बांगडा फक्त ताटांत पाहून खाऊन ढेकर द्यायचा नसतो. तर त्याची प्रोसेस बाजारांत बांगडा आणि तो विकणारी मासेवाली ह्यावरून सुरुवात होते. मग पोट दाबून (माश्याचे, मासेवालीचे नव्हे) बांगडा फ्रेश आहे का नाही हे पाहणे. मोठा असेल तर बांगडा, छोटा असेल तर बांगडुली, जास्तच मोठा असेल तर बांगडाच पण इथे नाक थोडे मुरडयाचे असते.









