मिस्टर प्रामाणिक
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं?