'नाते' म्हणून आहे!
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे
या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे!
निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या
नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे!
जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो
खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!
गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले
शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे!
स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे
या काळजात फिरते पाते म्हणून आहे!
या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण
माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे!
—सत्यजित