gazal

सावल्यांची सरमिसळ होते ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
2 Apr 2016 - 8:55 pm

एक ना कारण सबळ होते
पण तुझे जाणे अटळ होते

हे कसे नाते दुराव्याचे
जे कधीकाळी जवळ होते

कोणता येथे ऋतू आहे
देहभर ही पानगळ होते

चेततो वणवा फुलापासुन
नी झुळुकही वावटळ होते

रोषणाई केवढी आहे
सावल्यांची सरमिसळ होते

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकविताप्रेमकाव्यगझल

मी सुखाची भेट घेणे टाळतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
26 Feb 2016 - 7:36 pm

वेळ दु:खाला दिलेली पाळतो
मी सुखाची भेट घेणे टाळतो

फारसे घडले नसावे कालही
मी उगाचच रात सारी चाळतो

ही फुलांची वाट आहे पण इथे
ऱोज एखादातरी ठेचाळतो

कोणते असते हवेमध्ये जहर
रंग प्रेमाचा कसा डागाळतो

केवढी जडशीळ दुनिया वाटते
देव जाणे कोण ही सांभाळतो

चालला असता तुझा साधेपणा
मी कुठे रंगारुपावर भाळतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalगझल

कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
21 Feb 2016 - 9:59 am

चार दिवस पुरणारे अत्तर असते
प्रेम तसे मग बाकी खडतर असते

सुटकेचा आयास निरर्थक असतो
कैद तिच्या डोळ्यात दिगंतर असते

आपण अपुली सांभाळावी दुनिया
सूख जरासे दु:ख निरंतर असते

आकाशाला हातच पोचत नाही
नी स्वप्नांचे व्यस्त गुणोत्तर असते

प्रश्न तुला मी तोच कितीदा केला
तुझे आपले एकच उत्तर असते

कुठून कोठेतरी जायचे नुसते..
प्रेम शेवटी एक अधांतर असते

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalकवितागझल

आरसा हरवेल तेव्हा ये ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
22 Jan 2016 - 8:22 pm

आरसा हरवेल तेव्हा ये
(चेहरा गवसेल तेव्हा ये)

केवढी गर्दी तुझ्याभवती..
एकटे वाटेल तेव्हा ये

पोकळी आहे जशी येथे
ही तिथे दाटेल तेव्हा ये

दाह सोसावा कसा तुजला
हा ऋतू बदलेल तेव्हा ये

वाहती आहेच ही दुनिया
पण कधी आटेल तेव्हा ये..

डॉ.सुनील अहिरराव

gazalगझल

शेवटी संपन्न हा वनवास झाला..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
12 Jan 2016 - 12:01 pm

जो जसा झाला तसा, पण खास झाला
शेवटी संपन्न हा वनवास झाला

पाप माझे राहिले शाबूत अवघे
पुण्यकर्माचा त्वरेने र्हास झाला

मी जरी अध्यात ना मध्यात होतो
केवढा दुनियेस माझा त्रास झाला

देव प्रत्यक्षात नाही पाहिला मी
पण मला दगडात त्याचा भास झाला

जीव कोठेही कधी रमलाच नाही
मग असा नुसताच टाइमपास झाला

डॉ.सुनील अहिरराव

gazalहे ठिकाण

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
23 Dec 2015 - 10:10 am

चार शब्दांचा सहारा होत नाही
तेवढ्यावरती गुजारा होत नाही

खूप काही लागते जगण्यास येथे
प्रेम काही ऊनवारा होत नाही

गगनचुंबी हे तुझे आहे शहर पण
चांदतार्यांचा नजारा होत नाही

जिंदगी नुसतीच लुकलुकते दुरातुन
रोज आताशा इशारा होत नाही

टाळले मजला बरे केलेस तूही
(दु:ख दु:खावर उतारा होत नाही)

मी मनाला शिस्त आहे लावलेली
फारसा आता पसारा होत नाही

डॉ.सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलगझल

तू कुणाचा...

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
24 Oct 2015 - 1:16 pm

फाटली भलत्या अवेळी जीर्ण झोळी
थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते
राहिला साचून तेथे षड्ज वेडा
आर्त वेणूचे जिथे संगीत होते

थिरकते ही एकटी जेथे अबोली
त्या तिथे शून्यात होती रासलीला
हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा
खोड माझी काढण्या तू फोडलेला

नादती येथे वृथा का पैंजणे ही
छेडता दूरात तू मंजूळ पावा
रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे
एवढा सलतो जिवाला हा दुरावा

मान्य हे कळले जरा मजला उशीरा
की तुझ्या असण्यातही नसणेच होते
भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे
सावळे ते हास्यही उसनेच होते

gazalकविता

माणसांना पालवी नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 8:17 pm

चेहर्यावर टवटवी नाही
वाटते,माझी छवी नाही

दूरवर नुसतेच रण आहे
माणसांना पालवी नाही

बालकांचे अर्भकांचेही
हास्य आता लाघवी नाही

हाक देवाला नका मारु
भाव त्याचा वाजवी नाही

तू कधी येशील तेव्हा ये
ही प्रतिक्षाही नवी नाही

हा कुणाचा चेहरा आहे
आज काही चौदवी नाही

डॉ.सुनील अहिरराव

gazalहे ठिकाण

गांधीजयंती निमित्त गझल

चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू's picture
चिमणराव वरवंटे ... in जे न देखे रवी...
4 Oct 2015 - 5:22 pm

बापू

जिकडे तिकडे हिंसा आता दिसते बापू
जनतेला या गरिबी अजून पिसते बापू

जेव्हा जेव्हा लूट पाहतो मी सत्याची
तुझीच प्रतिमा मनात माझ्या वसते बापू

शेतीचाही कणा मोडला दुष्काळाने
शेतकय्रांचे जीवन झाले सस्ते बापू

मातीमोल रे तुझी अहिंसा झाली आता
सदा मनाला चिंता याची डसते बापू

भिंतींवरचे फोटो नुसते नावापुरते
जनता तुजला जयंतीलाच पुसते बापू

खोटे नाटे सारे हे व्यवहार चालती
कुठे कुणीही आज कसे रे फसते बापू?

खरेच जर तू आठवला असता देशाला
खून, दरोडे, बलात्कारही नसते बापू

gazalगझल

नभाचा सातबारा

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
5 Sep 2015 - 11:57 am

ढगच दाटतात आकाशात सध्या,
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली...

जगणे सुद्धा कठीण झाले सध्या,
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली...

जरी बाप राबतो शिवारात त्याचा,
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली...

पाहू कोण पुरुन उरतो सध्या,
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली...

सारे नेतेच उदंड झाले सध्या,
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली...

जिप्सी

gazalमराठी गझलगझल