गोषवारा
हा कशाला गोषवारा पाहिजे
फक्त थोडासा इषारा पाहिजे
माणसाला अन्न वस्त्रे खोपटे
शासनाला शेतसारा पाहिजे
श्वासही आहेत चोरासारखे
जिंदगानीवर पहारा पाहिजे
हात या राखेतही टाकेन मी
पोळणारा पण निखारा पाहिजे
जीव ओवाळून टाकावा असा
जीव कोणी लावणारा पाहिजे
घोषणांची केवढी बुजबुज इथे-
देशव्यापी एक नारा पाहिजे
माणके मोती हिरे सगळीकडे
फक्त माती खोदणारा पाहिजे
काजवे उसने किती आणायचे
आपुला कोणी सितारा पाहिजे
टाक तू कचरा पुरेसा अंगणी
स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे
डॉ.सुनील अहिरराव